इंडोनेशियामधली मंदिरं पाहताना आपल्या देशापासून इतक्या दूरवर आपली संस्कृती एकेकाळी पोहोचली आणि इथल्या लोकांनी ती इतक्या प्रेमाने जपली हे बघून मन भरून येतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामानिमित्त इंडोनेशियामध्ये आमची बदली झाली हे ऐकल्यावर मागासलेला देश, सर्व जनता इस्लाम धर्माची, कसे राहाणार तुम्ही, असे भाव प्रकटपणे अथवा अप्रकटपणे मित्रमंडळींच्या संभाषणात उतरलेले! पण आमचा तिथला अनुभव अगदी सुरेख. लोक कुठल्याही धर्माचे असले तिथे तरी अगदी सहजपणे सांगतात, ‘‘रामायण-महाभारत ही आमची संस्कृती आहे.’’ तेथील वास्तव्यात जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर, बोरोबुदूर आणि एक अतिशय सुंदर हिंदू मंदिरांचे समूह, प्रम्बनन पाहण्याचा योग आला.

योग्यकर्ता या शहराच्या जवळ असलेली ही ठिकाणे ‘मेरापी’ या जागृत ज्वालामुखीच्या जवळ आहेत. त्याच्या फूत्कारांची झळ अनेक वेळा सोसत नवव्या शतकापासून ही मंदिरे उभी आहेत.
प्रम्बनन हे योग्यकर्ता शहराच्या वेशीपाशीच आहे. जेव्हा बांधले तेव्हा हा २२५ हून अधिक मंदिरांचा समूह होता. या मंदिरांचे बांधकाम केवळ दगडांवर दगड ठेवून केले आहे. दगडांना एकमेकांत बसतील अशा खाचा आहेत. त्या आधारे मंदिराची बांधणी केली आहे.
यातले मध्यभागी असलेले शिवमंदिर सर्वात मोठे आहे. त्याला चारही बाजूने दरवाजे आहेत. पूर्वेकडे शिवाची मूर्ती आहे, दक्षिणेस अगस्त्य, पश्चिमेस गणेश व उत्तरेस दुर्गेची मूर्ती आहे. शिव मंदिराच्या कडेला विष्णू आणि ब्रह्माची मंदिरे आहेत. देवतांच्या देवळांच्या समोर त्यांच्या वाहनांची म्हणजे हंस, गरुड आणि नंदी यांची मंदिरे आहेत. या दोन ओळींच्या मध्ये जी रेष तयार होते त्याच्या दोन कडेला ‘आपित’ मंदिरे, चार दिशांची चार आणि चार कोपऱ्यांत चार अशी आठ मंदिरे अशी मुख्य रचना आहे. याच्याच भोवती एकाबाहेर एक चौरस मंडलात २२४ आणखी लहान ‘परिवार’ मंदिरे होती. सध्या तीन मुख्य देवता अन् त्यांच्या वाहनांची मंदिरे जीर्णोद्धारीत आहेत. इतर मंदिरांचे बांधकाम सुरू आहे. देवळाच्या आजुबाजूच्या परिसरात बाग केली आहे.

मंदिरे उभी, उंच निमुळते कळस असलेली आहेत. ही मंदिरे बघून जाणीव होते ती आकाशाला भिडण्याची मनुष्याच्या अपार महत्त्वाकांक्षेची. मंदिरांच्या भिंतींवर आतील बाजूस कोरलेली रेखाचित्रे आहेत. शिवमंदिरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. इतर मंदिरांत सुद्धा पुराणातील कथांचे संदर्भ असलेली अत्यंत सुबक आणि सुरेख शिल्पे आहेत. ही मंदिरे निव्वळ ऐतिहासिक सौंदर्यस्थळे म्हणून जपली गेली आहेत. इथे पूजा-अर्चा मात्र होत नाही. देवाच्या गाभाऱ्यात स्वच्छता असली तरी चपला बूट बाहेर काढण्याची सक्ती नाही.

या मंदिरांच्या पुनर्बाधणीमध्ये अडथळे अनेक आहेत. बरेचसे मूळचे दगड सापडत नाहीत. काळाच्या ओघात इकडे तिकडे विखुरलेले दगड लोक स्वत:चे घर बांधायला घेऊन गेले. काही नष्ट झाले. तेव्हा ज्या मंदिरांचे ७५ टक्के मूळ सामान मिळेल तीच मंदिरे परत बांधायची असे येथील लोकांनी ठरवले.
२००६ मध्ये जावामध्ये जो भूकंप झाला त्याने या मंदिरांचे खूप नुकसान झाले. त्यानंतर ही मंदिरे परत बांधावी लागली. अजूनही काम चालूच आहे. २०१० च्या मेरापीच्या धुराचा त्रास मात्र या वास्तूला झाला नाही. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडे असल्याने ही देवळे वाचली.

मंदिराच्या मागील बाजूस, आवाराच्या बाहेर मोठे व्यासपीठ आहे. इथे रात्रीच्या वेळेस मंदिराच्या पाश्र्वभूमीवर जावा नृत्याचे सादरीकरण होते. जावा नृत्य हे त्यांचे एक शास्त्रीय नृत्य. (बाली नृत्य हे पण अजून एक शास्त्रीय नृत्य. आपल्याकडे भरतनाटय़म, ओरिया वगैरे कसे, तसे!). नृत्यातून रामायण सादर करतात. याचे वेळापत्रक त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. रामायण-महाभारत हे इंडोनेशियामधल्या माणसांच्या आयुष्यात रुजलेले आहे. अत्यंत मनापासून हे लोक रामायणाची गोष्ट संगीतातून, नृत्यातून सांगत असतात.
बोरोबुदूर हे योग्यकर्ता शहरापासून सुमारे ४० किमी आहे. ९व्या शतकात बांधलेले हे प्राचीन मंदिर जगातील सर्वात मोठे बौद्ध मंदिर आहे. हे मोठे मंदिर आणि याच्यापासून सरळ रेषेत असलेली पावोन आणि मेंदूत या ठिकाणी असलेली मंदिरे यांचे विशेष महत्त्व आहे.
या मंदिरांची रचनासुद्धा प्रम्बननसारखी दगडावर दगड ठेवून केली आहे, ‘सिमेंट’शिवाय. बोरोबुदूर मंदिराचा पाया चौरस आकाराचा आहे. बाहेरून आतील बाजूस उंचीने वाढत जाणारे ९ मजले मंदिरास आहेत. पहिले ६ मजले चौरस आकारात आहेत तर सर्वात उंच ३ टप्पे वर्तुळाकृती आहेत. मध्यभागी उंच स्तूप आहे. त्याच्या बाहेरील वर्तुळांमध्ये छोटय़ा आकाराचे पोकळ स्तूप आहेत ज्यामध्ये गौतम बुद्धाच्या मूर्ती आहेत. वरून बघितले तर या मंदिराचा नकाशा बौद्ध मंडलाप्रमाणे दिसतो. या मंदिरास बंद खोल्या नाहीत, गाभारा पण नाही. सर्व मजल्यांच्या भिंतींवर शिल्पकाम आहे. सिद्धार्थ गौतमच्या आयुष्यातील प्रसंग, ८व्या शतकातील लोकांच्या रोजच्या आयुष्यातील प्रसंग हे या शिल्पांचे विषय आहेत.
खालपासून वपर्यंत प्रदक्षिणेची वाट, त्या भिंतींवर असलेली शिल्पे हे बौद्ध धर्मातील कामधातूकडून रूपधातूकडे आणि तेथून अरूपाधातूकडे असलेल्या प्रवासाचे रूपक आहे. या मंदिराची पुनर्बाधणी करताना जिथे मूळ दगड सापडले नाहीत तिथे त्या आकाराचे नवीन दगड बसवले, परंतु त्या ठिकाणी असलेली शिल्पे त्यामुळे अर्धवट दिसतात.
२०१० साली झालेल्या मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या मंदिरात २.५ से.मी.चा राखेचा थर साठला. मग तातडीने मंदिर बंद ठेवून हजारपेक्षा जास्त माणसे मदतीला घेऊन हा राखेचा थर दूर केला.
बोरोबुदूरला दर वैशाख पौर्णिमेला हजारो बौद्ध भिख्खू येतात आणि उपासना करतात. मेंदूत देवळापासून इथपर्यंत चालत येऊन देवळाला प्रदक्षिणा घालतात व मेणबत्त्या लावतात. आपल्या देशापासून एवढय़ा दूर, आपली संस्कृती पोचली होती आणि तिथल्या लोकांनी ती अजून जपली हे बघून फार समाधान वाटते.
काही उपयुक्त माहिती
फोटो काढण्याचा दृष्टीने प्रम्बननला सूर्यास्ताच्या आधी थोडा वेळ गेले तर मंदिरेसुद्धा बघून होतात व फोटोही
सुंदर येतात. बोरोबुदूर मंदिरातून सूर्योदय बघणे हा एक वेगळा अनुभव आहे असे तिथे गेल्यावर कळले. देवळाच्या अगदी जवळ राहण्याची व्यवस्था आहे. तिथे राहिल्यास हे शक्य होईल.
http://www.borobudurpark.co.id/ या वेबसाइटवर प्रम्बनन आणि बोरोबुदूर यांची माहिती उपलब्ध आहे. याच वेबसाइटवर रामायण नृत्यनाटकाचे वेळापत्रक आहे.
योग्यकर्ता परिसरात चालायला लागते. प्रवेशद्वारापासून देवळापर्यंत २००-३०० मीटर चालावे लागते. प्रत्येक मंदिरात साधारण एक किंवा दोन मजले चढावे लागतात. बोरोबुदूरला तिथला गाईड घ्यावा लागतो. तिथेसुद्धा ऑफिसपासून देवळाच्या पायथ्यापर्यंत चालायला दहा-पंधरा मिनिटे लागतात. शिवाय सात मजले चढून सर्व मजल्यांवर फिरायलाही लागते. सर्व पर्यटनस्थळांच्या बाहेर असतात तसे इथेसुद्धा विक्रेते पिच्छा पुरवतात. तुमचे भाव करण्याचे कौशल्य अमाप असेल आणि तेवढा वेळ असेल तरच या विक्रेत्यांकडे लक्ष द्यावे, नाहीतर उगाच काहीतरी वस्तू खूप महाग विकत घेणे होते.

कसे जावे? केव्हा जावे?
बोरोबुदूर आणि प्रम्बनन या दोन्ही ठिकाणी योग्यकर्ता येथे राहून जाता येते. साधारण सकाळी लवकर योग्यकर्ताला पोहोचलो तर सकाळच्या वेळेस योग्यकर्ताचा राजवाडा बघून जेवण झाल्यावर प्रम्बनन मंदिरे बघायला जाता येते. दुसऱ्या दिवशी सकाळी बोरोबुदूरला भेट देऊ शकतो. बोरोबुदूरपासून जवळ मेरापी ज्वालामुखी बघायला जाता येते. मेरापीच्या पायथ्याशी मेरापीची माहिती देणारे एक संग्रहालय आहे. हे सर्व पाहून दुपापर्यंत योग्यकर्तामध्ये परत येता येते. योग्यकर्ताला जाण्यासाठी बाली, जकार्ता, सिंगापूर इ. ठिकाणांहून विमान सेवा आहे. शिवाय जकार्तापासून योग्यकर्तापर्यंत रेल्वेने जाता येते.
नोव्हेंबर ते मार्च हे पावसाळ्याचे महिने सोडून येथे जावे.
आरती हळबे

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special