lp54
नेपाळ म्हणजे तस्करीचं, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचं आश्रयस्थान आणि आपल्या इमारतींची राखण करणारे बहादूर ज्या देशातून येतात त्यांचा देश, असा समज अनेक जण बाळगून असतात. नेपाळचा ‘आँखों देखा हाल’ मात्र काही वेगळंच सांगतो.

‘‘साहब, हिंदुस्थान तो हमारा बडम भाई है, हिंदुस्थानसे हमें हमेशा सहयोग मिलता है..’’
चारधाममधील प्रसिद्ध ज्योतिर्लिग असणाऱ्या केदारनाथ येथे अस्मादिकांना डोलीने वर घेऊन जाणाऱ्यांपैकी एक जण बोलत होता. आपल्या देशाविषयी एवढं चांगलं ऐकायची सवय नसल्याने बरं वाटलं. अतिशय काटक आणि चिवट असणारे ते नेपाळी, डोली आणि घोडय़ांच्या माध्यमातून हजारो यात्रेकरूंना यमुनोत्री आणि केदारनाथचं दर्शन घडवत होते, नेहमीच घडवतात. त्याच्याशी मारलेल्या गप्पांतून समजलं की चारधाम दर्शनासाठी जेव्हा अधिक झुंबड उडते त्या काळात म्हणजे दिवाळीनंतर व पावसाळा सुरू होईपर्यंत हे नेपाळी तरुण उत्तराखंडात (उत्तराखंड व नेपाळ परस्परांना लागूनच आहेत.) दाखल होतात, अशी अंगमेहनत करतात, पैसे कमावतात आणि मे महिन्याच्या अखेरीस मायदेशी जातात. नेपाळविषयीचं कुतूहल चाळवलं गेलं ते या गप्पांमुळे. यानंतर ठिणगी पडली ती केदारनाथ आणि पशुपतीनाथाविषयीची आख्यायिका समजल्यानंतर. केदारनाथ येथील शिवलिंगाचा एक भाग पशुपतीनाथ येथे आहे, असं मानलं जातं. त्यामुळे पशुपतीनाथलाही जायला हवं, असं वाटून गेलं. नेपाळच्या निमित्ताने होणारी परदेशवारी आणि तिकडचं अन्य स्थळदर्शन याचं आकर्षण तर फार मोठं होतं. यथावकाश नेपाळच्या दिशेने आम्ही प्रस्थान ठेवलंही.

karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Chandrapur Khalistan supporter arrested
मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
car used for procession of notorious goon gudya kasbe after release from yerwada jail
‘आया मेरा भाई आया’ म्हणत गुंड कसबेची येरवड्यात वाहन फेरी; गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या रिल्सवर कडक कारवाई केव्हा?

भौगोलिक सलगता आणि सांस्कृतिक साहचर्य यामुळे भारतीयांना नेपाळला विमानमार्गे जाण्यासाठी पारपत्रही लागत नाही. यापेक्षाही सर्वसामान्यांसाठी सोयीची गोष्ट म्हणजे तेथे रस्तामार्गे जाता येतं. आम्ही दुसरा पर्याय निवडला. नेपाळ सीमारेषेपासून आपलं सर्वाधिक जवळचं स्थानक म्हणजे उत्तर प्रदेशातलं गोरखपूर आणि तिथून पुढे बस. बसचा हा प्रवास ३६० किलोमीटर्सचा. आपल्या देशाची सीमा ओलांडताना व तेथून परत येताना उभय देशांच्या सैन्यांचे तपासणी नाके आहेत. अर्थात, नेपाळच्या हद्दीत शिरताना काहीच त्रास होत नाही, पर्यटकांनी जुजबी कागदपत्रं दाखवल्यावर प्रवेश मिळतो. याचं प्रमुख कारण म्हणजे हा देश प्रामुख्याने पर्यटकांवरच अवलंबून आहे. नेपाळच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो पर्यटनातून मिळालेल्या पैशांचा. नेपाळमध्ये शिरल्यानंतर दोन गोष्टी लगेच जाणवल्या. आमचा प्रवास ज्या रस्त्यावरूंन सुरू होता, ती माती पांढुरकी होती, आपल्यासारखी लाल वा काळी नाही. दुसरं म्हणजे, सगळ्यांचे मोबाइल फोन बंद झाले. आपली सिम कार्ड्स तिकडे चालत नाहीत. तेथे गेल्यानंतर फोन सुरू ठेवायचा असेल तर तिकडचं सिम कार्ड घ्यावं लागतं, जे फार किफायतशीर नसतं. साहजिक, आपला मोबाइल आता कॅमेरा, म्युझिक प्लेअर, कॅलेंडर, कॅलक्युलेटर आदी कामांसाठीच असणार, अशी खूणगाठ आम्ही बांधली.
हातात एका आठवडय़ाचा कालावधी असल्याने काठमांडू, भक्तपूर, चितवन, पोखरा, लुंबिनी आदी स्थळदर्शन करणं सहज शक्य होतं. पहिला मुक्काम काठमांडूला असल्याने स्थळदर्शनाचा पहिला मान पशुपतीनाथालाच मिळाला. नेपाळला राजेशाहीचा मोठा इतिहास असल्याने व ही राजेमंडळी कलासक्त असल्याने येथील स्थापत्य पुन:पुन्हा पाहण्यासारखं आहे. पशुपतीनाथ हे खूप प्राचीन मंदिर असलं तरी त्यांचं सध्याचं स्वरूप हे गेल्या तीन-चारशे वर्षांतलं आहे. हे मंदिर लांबून वा बाहेरून दिसत नाही. त्याच्याभोवतीचा परिसर अवाढव्य आहे, त्यामुळे अगदी आत गेल्यानंतरच या मंदिराची वास्तू दृष्टीस पडते. बागमती नदीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या या मंदिराच्या परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरं आहेत. काठमांडूमध्ये एवढी मंदिरं आहेत, की त्याला मंदिरांचं शहर म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही. असो, पशुपतीनाथाकडे जगभरातल्या हिंदूंचा ओघ असतो, हे विशेष. या मंदिराची बारचना विशेषत: वरचा भाग हा पॅगोडा शैलीप्रमाणे आहे आणि मंदिराचं छत तर चक्क सोन्याचं आहे. केवळ आस्तिकांनाच नाही तर नास्तिकांनाही मन:शांती लाभेल, असं सात्त्विक चैतन्य या परिसरात आहे, यात शंका नाही. ही प्रसन्न अनुभूती घेऊन तेथून परतलो. काठमांडू शहर नजरेच्या एका टप्प्यात जेथून दिसतं ते उंचावरचं स्वयंभूनाथ मंदिरही प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा सुळसुळाट असल्याने त्याला मंकी टॉप असंही म्हणतात.
lp55
दुपारच्या जेवणानंतर आम्हाला वेध लागले ते भक्तपूरचे. नेपाळची राजेशाही पूर्वी काठमांडू, भक्तपूर आणि ललितपूर अशा तीन ठिकाणी विभागलेली होती. लहान-मोठे राजे तर असंख्य होते. (या सर्व राजांना पराभूत करून एकछत्री अंमल आणण्याची महत्त्वाकांक्षा पृथ्वीनारायण शहा या राजाने बाळगली व त्याच्या वारसदारांनी कालांतराने ती पूर्ण केली.) तर, हे भक्तपूर या राजेशाहीतलं एक महत्त्वाचं केंद्र. नेपाळमध्ये न जाताही आपण अनेकदा भक्तपूर अनुभवलं आहे.. कसं म्हणून काय विचारता, देव आनंदने ‘कांची रे कांची रे’ अशी साद मुमताजला जिथे घातली होती तेच हे भक्तपूर आणि ‘प्यार मे दिल पे मार दे गोली’ असं झीनत अमान अमिताभला जिथे म्हणते तेही भक्तपूरच. भक्तपूरमध्ये पाय टाकता क्षणीच आमची अवस्था ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ अशी झाली. नेपाळमधल्या अन्य ठिकाणांबद्दल जेवढी माहिती आम्ही गोळा केली होती, त्या मानाने भक्तपूर आमच्यासाठी अज्ञात होतं. आधी उल्लेख केलेल्या गाण्यांमधून त्याचं ओझरतं दर्शन झालं होतं, मात्र ही वास्तू प्रत्यक्ष अनुभवण्यातली मजा औरच. नावावरून भक्तपूर म्हणजे आणखी एक मंदिर, असं कोणाला वाटेल, मात्र ही तर एक राजधानीच आहे, एका टुमदार नगराचा आवाका ही राजधानी बाळगून आहे. दुतर्फा ओळीने देखण्या इमारती असलेलं एक भलं मोठं पटांगण आपलं स्वागत करतं. (स्थानिक तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज येथे सुरू असते) एकेकाळी राजवैभव अनुभवलेल्या या वास्तूमध्ये अनेक सुंदर इमारती आजही उभ्या आहेत. भक्तपूरचा राजा जेथे जलविहार करीत असे, तो दगडी स्विमिंग पूलही बांधकामाचा सुंदर नमुना आहे. बाय डिफॉल्ट असणारी इथली मंदिरंही अतिशय कलात्मक आणि भव्य आहेत. हा सगळा परिसर केवळ पायी फिरावा लागतो आणि त्यातच खरी गंमत आहे. भरपूर तंगडतोड झाल्याने दमछाक झाली तर पॅगोडा शैलीची उंचच उंच रेस्टॉरंट्स वाफाळलेल्या चहा-कॉफीने तुमचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतातच. याच उंच पॅगोडातून सूर्यास्ताचं दर्शन घेऊन आम्ही जडावलेल्या पावलांनी भक्तपूरला निरोप दिला.
काठमांडूमधून चितवनसाठी आमचा मुक्काम हलला. नेपाळी लोक फार कष्टाळू असतात, असं ऐकून होतो आणि त्याची प्रचीतीही आली. दिवसभरात बराच प्रवास करायचा असल्याने आम्ही पहाटे पाच वाजता काठमांडूला निरोप दिला. आपले पाच म्हणजे त्यांचे सव्वापाच. तर, पहाटे सव्वापाच वाजता काठमांडू शहर जागं झालं होतं, केवळ जागंच नाही, तर त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले होते. दुकानं उघडलेली होती, नोकरीला जाणाऱ्यांची लगबग सुरू होती. (हे दृश्य पाहून आमच्या एका पुणेकर मित्राला तर चक्करच आली!) आज काही विशेष आहे का, असं आमच्या चालकाला विचारलं असता त्याने सांगितलं की ते त्यांचं रूटीनच आहे. आम्ही लवकर उठतो आणि लवकर झोपतो, नेपाळमध्ये कुठेही गेलात तरी तुम्हाला हेच दृश्य दिसेल..! ही नवलाई मनात जपत आम्ही चितवनच्या दिशेने निघालो. उंचच उंच हिमशिखरे, मध्यम उंचीच्या शिखरांचा प्रदेश आणि पठारी प्रदेश जो तेराई या नावाने ओळखला जातो, अशा तीन प्रकारांत नेपाळची भौगोलिक रचना मोडते. तेराईमधील वनसंपदा हजारो किलोमीटरवर पसरलेली आहे. (नेपाळमध्ये एकूण १० राष्ट्रीय उद्याने व तीन वन्यजीव आरक्षित क्षेत्रं आहेत) चित्त म्हणजे हृदय व वन म्हणजे अरण्य, जंगल. त्यामुळे अरण्याचे जे हृदय आहे ते म्हणजे चितवन, अशी ही व्युत्पत्ती आहे. चितवनच्या राष्ट्रीय उद्यानात अनेक प्रकारच्या जंगल सफारी उपलब्ध आहेत, यात हत्तीवरून केली जाणारी सफारी आगळीवेगळी आहे. मात्र, तेथे बंगाली वाघ, चित्ते, मगरी, गेंडे, अस्वल आदी ‘दयाळू’ प्राण्यांचा सुळसुळाट असल्याने आम्ही संरक्षित बसचा पर्याय निवडला. अनेक प्राणी हे भल्या पहाटे पाणवठय़ावर येत असल्याने कडाक्याच्या थंडीत आम्ही या बसमध्ये प्रवेश केला. थोडय़ा लांबून का होईना वाघोबासह अनेक प्राण्यांचं दर्शन घडलंही. इथलं पक्षीवैभवही सुखावणारं आहे. वृक्षवल्लींची दाटी तर एवढी की सिमेंटच्या जंगलात राहाणाऱ्यांना अॅलर्जी व्हावी.

पाहावं ते नवलच…
* नेपाळींमध्ये दोन प्रकारची चेहरेपट्टी दिसून येते. एक म्हणजे आपल्याप्रमाणे वैशिष्टय़ं असलेली आणि दुसरी म्हणजे मंगोलियन. हे मंगोलियन वंशीय नेपाळशी एकरूप झालेत.
* आपला एक रुपया म्हणजे त्यांचे एक रुपया साठ पैसे. तेथे खरेदी करताना आपला रुपया चालतोही. मात्र, या तफावतीचा भारतीय पर्यटकांना लाभ होत नाही. कारण आपल्याकडे जी वस्तू १० रुपयांना मिळते, ती तिकडे त्यांच्या चलनात किमान १५ रुपयांना मिळते. त्यामुळे एकूण हिशेब एकच होतो.
* आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेपाळमध्ये हिंदू पंचागानुसार कालगणना होते. सरकारी वा सार्वजनिक वापरात इंग्रजी कॅलेंडर औषधापुरतंही नाही.
* उद्योगधंद्यात मागे पडलेल्या नेपाळने नैसर्गिक संपत्तीच्या साहाय्याने आता हायड्रो पॉवरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. भविष्यात भारतालाही वीजपुरवठा करून उत्पन्न वाढविण्याचं उद्दिष्ट त्यांनी आखलं आहे.

भोजनभाऊंची निराशा…
नेपाळमध्ये कोणते विशेष खाद्यपदार्थ मिळतात, हे शोधण्याच्या आघाडीवर आमची सपशेल निराशा झाली. नेपाळी जनता खाण्यापिण्याची शौकीन नाही, हे समजल्यानंतर फार मोठा सांस्कृतिक धक्का बसला. डाळ-भात आणि रोटी-भाजी एवढंच त्यांचं जेवण. कोशिंबिरी, लोणची, पापड, शेव-चिवडा वगैरे त्यांच्या पानात काहीच नसतं. त्यांना मांसाहार आवडतो, मात्र मांसाहाराच्या निरनिराळ्या पाककृतींचे चोचले त्यांच्याकडे बिलकूल नाहीत. प्रवासात अनेक ठिकाणी ‘थकाली खाना मिलेगा’ अशा पाटय़ा दुकानांवर दिसल्या. विचारणा केली असता समजलं की थकाली म्हणजे मटण! नेपाळमध्ये गोहत्याबंदी असून या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा असल्याने तेथे बीफ कोठेही मिळत नाही. नेपाळमध्ये मिठाई, बर्फी वा अन्य मिष्टान्न केलीच जात नाहीत. त्यांचा अलीकडच्या काळातला एकमेव गोड पदार्थ म्हणजे मोमोज. खाण्यापिण्यातल्या या साधेपणामुळे नेपाळी लोक आपल्या तुलनेत अधिक तंदुरुस्त आहेत.

चितवनमधून पाय निघणं कठीण होतं, मात्र पोखराही खुणावत होतं. आता पोखरा व्हाया लुंबिनी. लुंबिनी म्हणजे गौतम बुद्धांचं जन्मस्थान. इथला अतिभव्य पॅगोडा व अशोक स्तूप पाहण्यासारखा आहे. जगभरातून नेपाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे पाय लुंबिनीकडे वळतातच. लुंबिनीचं स्थळदर्शन झाल्यानंतर आमची सहल अखेरच्या मुक्कामाकडे निघाली. पोखरा म्हणजे एक थंड हवेचं ठिकाण, असं ऐकून होतो. मात्र, तेथे गेल्यानंतर डोळ्यांचं अक्षरश: पारणं फिटलं. सात दिवस इथेच मुक्काम करायला हवा होता, असा विचार सगळ्यांच्याच मनात आला. पोखऱ्याचं वातावरण एवढं आल्हाददायक आहे की हवापालटासाठी तेथे गेलेली एखादी आजारी व्यक्ती खडखडीत बरी होऊनच परतावी. साहसीवीरांना आव्हान देणारी अनेक ठिकाणं पोखऱ्याच्या आसपास असल्याने देशी-विदेशी गिर्यारोहकांचा तेथे नित्याचाच डेरा असतो. बंगी जंपिंग, पॅरा ग्लायडिंग, माउंटन बायकिंग, प्रस्तरारोहण असे कितीतरी अचाट प्रकार करण्यासाठी ही मंडळी येथूनच पुढे सरसावतात. पोखऱ्याच्या सौंदर्यात भर टाकणारा एक विस्तीर्ण तलावही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. या तलावात जलविहाराची सोय आहे, मात्र दिवसभरात केवळ दोन तासांसाठी, म्हणजे सकाळी आठ ते दहा! इथलं वातावरण सतत बदलत असल्याने पाऊस-वारा कधीही थडकू शकतो. यामुळेच या दोन तासांत तेही स्वत:च्या जबाबदारीवर हा जलविहार करता येतो. हातीपायी धड परतायचं असल्याने आम्ही काठावरूनच या तलावाची शोभा अनुभवली.. झालं, आमची सहल संपली.. परतीची तिकिटं अलाहाबाद-मुंबई अशी मिळाल्याने आम्हाला आता गोरखपूर नव्हे तर अलाहाबाद गाठायचं होतं. हा प्रवास दीड दिवसांचा, पूर्ण रात्रभरचा होता. मात्र, कंटाळा वा शिणवटा नावालाही नव्हता. विरंगुळ्यासाठी नेपाळची नवलाई, तिचं मनन पुरेसं होतं. भारत आणि चीनच्या बेचक्यात असूनही ताठ मानेने जगणाऱ्या या देशाने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. या देशाला निसर्गाचं दान भरभरून लाभलं आहे, इतकं की जगातली १० पैकी ८ उंच हिमशिखरं इथेच आहेत. एव्हरेस्टचं सर्वोच्च हिमशिखर इथलंच. इथले लोक आपल्याप्रमाणे स्मार्टवर्क करू शकत नसले तरी हार्डवर्क करून शांततेत जगतायत. बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं बरंच काही असलेल्या या देशाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. शेवटी, तो आपला लहान भाऊच आहे ना!

कसे जावे? केव्हा जावे?
ऑक्टोबर ते जानेवारी हा भटकंतीसाठी उत्तम कालावधी. विमानामार्गाबरोबरच अलाहबाद अथवा गोरखपूर येथे बससेवा देखील आहे. पारपत्राची आवश्यकता नसली तरी भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. (उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, इ.) डोंगराळ भागामुळे येथे रेल्वे नाही. दळणवळणाचं मुख्य साधन म्हणजे रस्तेमार्ग, शिवाय एक आतंरराष्ट्रीय विमानतळ आणि सुमारे २५ देशांतर्गत विमानतळ पर्यटकांसाठी उपयुक्त ठरतात.
अनिरुद्ध भातखंडे

Story img Loader