आम्ही काही जण श्रीलंकेत सायकलिंगसाठी गेलो होतो. युरोपमधील सायकलिंगचे बीज रोवले गेले. प्रत्यक्ष निघेपर्यंत एक वर्षांचा कालावधी गेला. आमच्या युरोप मोहिमेला आम्ही ‘बियाँड बॉर्डर्स ऑन सायकल्स’ असे नाव दिले.
फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली असे सहा देश आम्ही ठरविले होते. पॅरिसमधील आयफेल टॉवर ते रोम, इटलीमधील कोलोसियम असा सारा प्रवास होता; हे अंतर ३५०० कि.मी. होतं. मधले काही टप्पे ट्रेनने व व्हिएन्ना ते फ्लोरेंस हा मोठा टप्पा विमानाने पार करायचा ठरला. उरलेले १२०० ते १५०० कि.मी. सायकलिंग करण्याचा आमचा इरादा होता.
२८ ऑगस्ट २०१३ला आम्ही १० जण आपापल्या सायकलींसह पॅरिसच्या चार्लस् द गॉल (CDG) या विमानतळावर उतरलो. आमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही चार्लस् द गॉल ते युथ होस्टेल्स असा १५ कि.मी.चा प्रवास सायकलने करणार होतो. सायकल्स आम्ही या सायकल बॅग्जमधून बाहेर काढल्या; पण सायकल पॅकिंगसाठी वापरलेले दहा बॉक्स कुठे टाकावेत हेच कळेना. आय विंडो (Information Window) दिसली. दोन उंचपुरे फ्रेंच निळय़ा आकाशी गणवेशात होते. त्यातल्या एकाला मी आमची बॉक्सची समस्या सांगितली. तो लगबगीने उठला, म्हणाला, फॉलो मी. एका लिफ्टने खाली आलो. एका बोळातून एका मोठय़ा खोलीत तो आम्हाला घेऊन आला. तेथील मोठय़ा डम्परसारख्या कंटेनरकडे बोट दाखवून म्हणाला, डम्प हीअर. आमची वरात परत उलट मार्गाने सायकलींजवळ आली. आम्ही तिघांनी ते बॉक्स घेतले व परत त्याच रस्त्याने जाऊन त्या कंटेनरमध्ये टाकले. त्या कंटेनरमधूनच चार यांत्रिक हात बाहेर आले व त्या दहा खोक्यांना दाबून सपाट केले. चपट झालेले ते सर्व खोके एका छोटय़ा स्लॉटमधून सरकत पुढे दिसेनासे झाले व त्यांचा भुगा होण्याचा आवाज यायला लागला.
थोडासा बदल करून पॅरिसमधील मेट्रो ट्रेनचा आनंद घेत आमच्या युथ हॉस्टेलजवळील स्टेशनपर्यंत जायचं ठरलं. ९ युरोंचे (साधारणत: ८०० रु.) मॅग्नेटिक तिकीट काढून सायकलींसह जाताना मेट्रोतील स्वच्छता, व्यवस्था व काटेकोरपणा टकामका पाहात राहिलो.
पॅरिसमध्ये भटकून रात्री युथ हॉस्टेलला आलो, तर जिन्यात काळोख दिसला. विजेचे बटन शोधण्याच्या विचारात असतानाच आपोआप जिन्यातले दिवे लागले. एकदम चमकायला झालं. योगायोग असेल असा समज करून पुढे झालो, तर दुसऱ्या जिन्याची सुरुवात होतानाही हाच खेळ पुन्हा. मग एकदम टय़ूब पेटली की, हे तर वीजबचतीसाठी केलेले ऑटोमेशन. जिना संपल्यावर मागे पुन्हा काळोख. विजेची अशा पद्धतीने बचत तिथे अनेक ठिकाणी केलेय.
तीन दिवस ‘जिवाचं पॅरिस’ करून आम्ही ठरल्या योजनेप्रमाणे बेल्जियममधील ब्रुसेल्सला बुलेट ट्रेनने गेलो. ३०० किमीचे हे अंतर केवळ एका तासात पार करून आम्ही बेल्जियममधील आमच्या सायकलिंगला प्रारंभ केला.
ब्रुसेल्स ते अँटवर्प असे साधारणत: ६५ किमीचे सायकलिंग हा आमचा पहिला टप्पा होता. मध्ये-मध्ये दिसणारी प्रेक्षणीय स्थळे, जंगलं, नद्या, गावं व चर्चेस इ. पाहात मस्त सायकल चालवत तेथील जनजीवनाचे निरीक्षण करणे असे आमचे काही उद्देश होते.
ब्रुसेल्समधील Atomium (अटोमियम) ही जगप्रसिद्ध विज्ञान वास्तू पाहून आम्ही पुढे पेडलिंग सुरू केले. अटोमियमला पोहोचेपर्यंत सगळा रस्ता शहरामधूनच होता. इथे मुख्य फरक दोन. एक म्हणजे सारी वाहतूक लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह. त्यामुळे सारी वाहने आमच्या डावीकडून पुढे जात असत व रस्त्याच्या अगदी उजवीकडून सायकल पाथ असायचा.
सायकल प्रवासाचे एक छान असते. वाहतूक धोकादायक नसेल तर सभोवतालचा परिसर पाहात, निरीक्षण करीत, स्थानिक लोकांना वाट विचारत व त्यांच्याशी बोलत प्रवास चालू ठेवता येतो.
एका ठिकाणी झाडाच्या फांद्या यांत्रिक पद्धतीने कापण्याचं काम चालू होतं. एक गृहस्थ एका ट्रॉलीमधून यांत्रिक करवतीने झाडाच्या छोटय़ा फांद्या कापीत होता. या फांद्या खालील कंटेनरमध्ये पडून त्याचा ताबडतोब भुगा होत होता. राइसमिलमधून तूस जसा झोताने बाहेर येतो तसाच हा भुगा पुढील डम्परमध्ये फेकला जात होता. तंत्रज्ञानाचा वापर शहराच्या सुबकतेसाठी किती छान करतात युरोपमध्ये.
अँटवर्पला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. सारे लहानथोर पायघोळ काळा कोट व काळी हॅट घालून घोळक्या घोळक्यांनी फिरत होते. बऱ्याच जणांची सायकलवरूनही लगबग चालू होती. दिवस कलला तरी वातावरणात एक उत्साह वाटत होता. चौकशीअंती कळले की, ज्यूंचा एक सण आहे.
अँटवर्पवरून आमचा रोटरडॅमच्या दिशेने प्रवास चालू होता. वाटेत एका मोठय़ा सायकल शर्यतीची तयारी सुरू होती. अनेक रस्ते बंद केले होते. एका डच गृहस्थालाच पुढील रस्त्याविषयी विचारले तर त्याने लगेचच घरातून स्वत:ची सायकलच काढली व स्वत:च्या पत्नीला डबलसीट घेऊन आम्हाला वाट दाखवायला निघाला. चार-पाच कि.मी. गल्लीबोळांतून फिरवून त्याने पुढे आम्हाला योग्य रस्त्याला लावले.
नेदरलँड (हॉलंड) जवळ येत होते. वाटेत ‘नेदरलँड टू किलोमीटर’ असा मोठा बोर्ड दिसला. वाटेत एक मोठी, खूप जुनी पवनचक्की दिसली. नेदरलँडमध्ये आम्ही प्रवेश केला त्याचीच ही पोचपावती. आता रस्त्यावर सायकलस्वार दिसत होते. विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रोफेसर, कॉलेज युवक-युवती, नोकरदार स्त्री-पुरुष, फादर, वरिष्ठ नागरिक व स्त्रिया असे सायकलवरूनच ये-जा करीत होते. सगळय़ांच्याच सायकली उत्तम. कोणाचीही जुनाट, गंजलेली, रंग उडालेली किंवा खडखडाट करणारी नव्हती. सायकल चालवणारे सगळेच टापटीप असायचे, तशाच त्यांच्या सायकल्स रंगीबेरंगी व विविध आकार- प्रकारच्या.
पादचाऱ्यांसाठी व सायकलस्वारांसाठी खास सिग्नल युरोपातील सहाही देशांत आढळले. एखाद्या सायकलस्वाराला वा पादचाऱ्याला खूपच घाई असेल, तर या खास सिग्नलच्या खांबावरील एक बटण दाबले, तर वाहनांसाठी लगेचच लाल दिवा लागायचा. वाहतूक आज्ञाधारकपणे थांबायची व घाईत असलेला पांथस्थ व सायकलवीर रस्ता लगेचच ओलांडू शकायचा. पुढे अॅमस्टरडॅमला पोहोचेपर्यंत सायकलचे अक्षरश: अनेक प्रकार, आकार व उपयोग पाहिले.
अॅमस्टरडॅममध्ये अॅन फ्रँकचे घर पाहायला गेलो तेही सायकलनेच. तिच्या त्या आठवणी व घर पाहताना, आपलं बालपण युद्धाच्या काजळीने करपलं नाही याचं सुदैव वाटत राहतं.
मध्येच एका पिवळय़ा रंगाच्या सायकलवर मागे व पुढे खूप मोठय़ा पिवळय़ा रंगाच्याच पेटय़ा लावून एक गृहस्थ सायकल चालवताना दिसले. हा इथला पोस्टमन. जर्मनीमध्ये एका गावातून जाताना बरेच फाटे, गल्ली-बोळ लागले. त्यामुळे आम्ही आमच्या रस्त्यापासून भरकटलोच. आमचा गोंधळ एक जर्मन सायकलिस्ट पाहात होता. त्याच्याकडे रेसिंग रोड बाइक होती. त्यांचं नाव रोनाल्ड. ते अखेर आमच्याकडे आले. आमची अडचण विचारली व मदत करण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे तर इतस्तत: पसरलेल्या आम्हा दहा जणांना फेऱ्या मारून त्यांनीच एकत्र आणलं व त्यांच्यामागे यायला सांगितलं. या गृहस्थांचे वय ६१ वर्षे. तब्बल वीस किलोमीटरनंतर रोनाल्ड महाशय थांबले. आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे योग्य रस्त्यावर आणून त्यांनी आमचा निरोप घेतला!
बऱ्याचदा आम्ही सायकलींसह ट्रेनमधूनही प्रवास केला. सायकलींसाठी ट्रेनमध्ये खास जागा असते, तर काही गाडय़ांमध्ये एक संपूर्ण डबा सायकलींसाठी असतो. अशा डब्यांवर स्पष्ट दिसेल असं सायकलचं चित्र असतं व ट्रेनच्या पुढेमागे असे प्रत्येकी दोन डबे असतात. अनेक तरुण-तरुणी आपापल्या चकचकीत सायकली घेऊन प्लॅटफॉर्मवर व अशा खास डब्यांतून दिसत असत. मोटारबाइकच्या वेडाने पछाडलेले तरुण येथे दिसलेच नाहीत. मोटारबाइक अगदी तुरळकच दिसत. दिसल्या त्याही हर्ले डेव्हिडसन सारख्या महागडय़ा, अवाढव्य व मजबूत. आपल्याकडील मोटारबाइक्स अशा गाडय़ांसमोर अगदीच किरकोळ वाटतील.
आमचं सायकलिंग आता इथल्या ग्रामीण भागातून चालू होतं. सफरचंदाच्या बागा, मक्याची शेती, तर कधी सूर्यफुलांची शेती यांतून काढलेल्या रस्त्यांवरून सायकलिंग करताना हरवून जायला होत होतं. टुमदार गावात सुंदर घरं असायची व प्रत्येक गावात एखादं तरी चॅपेल असायचंच. ही सगळीच दृश्यं विलक्षण लोभस वाटायची. निसर्गाची व जर्मन जनजीवनाची अशी विविध रूपे पाहत आम्ही पुढे पुढे जात होतो.
स्टुटगार्ट-उल्म-ऑसबर्ग- म्युजिक असं सायकलिंग करून बर्चेसगेडन येथे पोहोचलो. दुसऱ्या महायुद्धात हिमलरने हिटलरसाठी येथे एक विश्रांतिस्थळ बांधले आहे. डोंगरावर अवघड जागी असलेल्या या स्थळाचे नाव आहे ‘ईगल्स नेस्ट’. ईगल्स नेस्ट पाहायला काही जणांनी ट्रॉली वापरली, तर आम्ही तिघे डोंगर चढतच वर गेलो. येथे आमचा ‘होम स्टे’ होता. रात्री परतताना विजेचा तोच लपंडाव पाहिला. विजेच्या खांबाजवळ आल्यावर खांबावरील दिवा लागायचा. त्याच्या कक्षेतून पुढे गेलो की, मागचा दिवा बंद होऊन पुढील खांबावरचा दिवा प्रकाशायचा. हे लोक संसाधनांची अशी काटकसर करतात, तेही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने.
बर्चेसगेडननंतर आम्ही ‘साल्झबर्ग’ या ऑस्ट्रियातील शहरात प्रवेश केला. जर्मनीतून आता आम्ही ऑस्ट्रियात आलो होतो. पण येथेही सरहद्दीवर ना तारेचे कुंपण, ना सैनिकांचा जागता पहारा. एका देशातून दुसऱ्या देशात जताना आपल्याला कोणीही हटकत नाही, थांबवत नाही. हा खरा मानवाचा सन्मान. ही खरी मानवता.
ऑस्ट्रियात प्रवेश केला आणि लगेचच डोंगररांगा दिसू लागल्या. पण डॅन्यूब नदीच्या किनाऱ्यानेही येथे सायकल पाथ होते. डॅन्यूब नदीच्या कडेने आम्ही साधारणत: २०० कि.मी. सायकलिंग केले. पण एवढय़ा प्रवासात पाण्यात प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक बाटली व कागदाचा साधा कपटाही दिसला नाही. या नदीचे पात्र मोठे, रुंद व खोल आहे. मोठी जहाजे, क्रूझ व लाँच यांची त्यातून ये-जा चालू होती.
आमच्या या सफरीत व्हिएन्ना या शहराचा अंतर्भाव मुद्दाम केला होता. कारण येथे युनोचे कार्यालय आहे. आम्ही तेथे गेलो तेव्हा वर्ल्ड अॅटोमिक एनर्जीची तिथे कॉन्फरन्स होती. एका पाकिस्तानी स्टॉलला भेट दिली, तिथे भारताचा स्टॉल नव्हता. तरुण पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आम्हा भारतीयांना पाहून खूपच आनंद झाला, इतका की त्यांनी खास पाकिस्तानी मिठाई आम्हा प्रत्येकाला आग्रह करकरून खाऊ घातली. एक छोटी भेटवस्तूही दिली. एका पाकिस्तानी नागरिकाने पॅरिसमध्येही वाट दाखविण्यासाठी आमच्यासाठी १५-२० मिनिटे खर्च केली होती, तेही आठवले.
व्हिएन्नाहून विमानाने आम्ही फ्लोरेन्स या इटलीमधील नितांतसुंदर शहरात गेलो. फ्लोरेन्स ते रोम विमानतळ हा परत सगळाच सायकल प्रवास करताना डोळे भरून इटलीचे निसर्गवैभव पाहून घेतले.
फ्रान्स-बेल्जियम-नेदरलँड-जर्मनी-ऑस्ट्रिया-इटली असा सायकलप्रवास संपला तेव्हा युरोपची स्वच्छता, कलासक्त समाज, शिस्त पाळणारे नागरिक, सायकलचा वापर करणारे सजग नागरिक, त्यांची सहृदयता, मोठी म्युझियम्स्, साल्झबर्ग, फ्लोरेन्स, पॅरिससारखी शहरे मोझार्टव अॅन फँक यांची घरे छळ छावणी, स्वच्छ नद्या, सफरचंद व सूर्यफुलांच्या बागा असं बरंच काही लक्षात राहिलं होतं. हाच ठेवा घेऊन मी आलो तो आमूलाग्र बदलून.
धनंजय मदन