कंपनीने दिलेले टार्गेट, त्याचा तब्येतीवर झालेला परिणाम, चिडचिड, घालमेल यानंतर श्रीरंगने वैतागून नोकरीला रामराम ठोकला होता. नक्की काय करावे, कळत नव्हते. म्हणून मग आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक राहिलेल्या कॉलेजमधील इतिहासाच्या आवडत्या सरांना त्याने गाठले. त्याची अवस्था पाहून सरांनी विचारले, नोकरी सोडलेल्या अवस्थेत किती काळ राहू शकतोस? श्रीरंग म्हणाला, दोन महिने! सर म्हणाले, मग महिनाभराची घरच्यांची अडचण होणार नाही अशी व्यवस्था कर आणि बाहेर फिरून ये! मग बोलू. अट एकच, या काळात नोकरीचा विचार करायचा नाही. त्याने विचारले, पण जाऊ कुठे? सर म्हणाले, कुठेही!

घरच्यांची व्यवस्था करून श्रीरंग निघालाही. त्या वेळेस त्याला लक्षात आले की, गेल्या कित्येक वर्षांत तो निरुद्देश बाहेरच पडला नव्हता. त्याने थेट ईशान्य भारत गाठला, तेव्हा पावसाळा सुरू होता. तुफान पावसात कोलकातापर्यंतच्या रेल्वे प्रवासात ‘चेंजिंग द मान्सून’ वाचून पूर्ण केले. त्या वेळेस त्याला लक्षात आले, पट्टीचे वाचन करणाऱ्या त्याने गेल्या कित्येक वर्षांत नोटा मोजताना पुस्तकाची पाने उलटायची राहूनच गेली होती! हे पुस्तक वाचल्यानंतर चेरापुंजी या भूतलावरील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा तीव्र झाली; तिथे पोहोचलाही. चेरापुंजीच्या पावसाची मजा काही वेगळीच होती. तिथे फिरताना त्याला लक्षात आले की, पाऊस खूप असला तरी साठवणूक नसल्याने पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. मग आपलं जिऑलॉजीमधील ज्ञान पणाला लावून त्यावर त्याने उपायही शोधला. इंटरनेटवरून ईशान्य भारतातील एका स्वयंसेवी संस्थेची माहिती काढून त्यांना तो उपायही सांगितला.. त्यांना तर देवदूतच भेटल्याचा भास झाला!
दुसरीकडे तो नेटच्या माध्यमातून मित्रांशी कनेक्टेड होताच.. एका ग्रुपवर चर्चा रंगली आणि मग नद्यांमध्ये पाणी भरपूर असले तरी पिण्याचे पाणी, वीज या समस्या असलेल्या काश्मीर या दुसऱ्या टोकाला भेट देण्याचा निर्णय त्याने घेतला. तिथे त्याने ऊरीला जाऊन चार दिवस तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला तेव्हा त्याला चेरापुंजी आणि ऊरीमधल्या समस्या आणि उपायांतील साम्यही लक्षात आले. हा प्रदेश लष्कराच्या प्रभावाखाली असल्याने त्याने लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा आणखी एक आनंदाचा क्षण अनुभवता आला, कारण सीमेवर रक्षण करणारे जवान मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे होते. राज्याबाहेर मराठी माणसे भेटतात तेव्हा ती वेगळीच असतात, याची जाणीव त्याला झाली! महिना संपत आला होता. दररोज स्काइपवर घरच्यांशी बोलणे व्हायचे खरे, पण तरी घरची ओढही लागली होती. महिनाभर जेवणखाणे वेळच्या वेळी होत होते. पोटाच्या तक्रारीही कमी झाल्या होत्या. तणाव पूर्ण निवळला होता. या साऱ्याचे कारण आनंद आहे, हे श्रीरंगच्या लक्षात आले होते. पुढच्या वेळेस तो कुटुंबासोबत दोन्ही ठिकाणी जाणार होता, कारण तिथे नवे मित्र जोडले गेले होते. असे काम करायचे की, जे देशाला आणि माणसांना जोडेल आणि त्यांच्या समस्यांना हात घालेल, असा निर्णयही त्याने घेतला होता. त्यात त्याला एकाच वेळेस देशकार्य आणि करिअरची संधीही दिसत होती. परतला तेव्हा सर घराच्या दाराशीच उभे होते.. ते म्हणाले.. हं, आता बोल! तो म्हणाला, काहीच नाही, सर! आता माझ्याकडे अनेक उपाय आहेत! सर म्हणाले, चरति चरतो भग: म्हणजे चालणाऱ्याचे भाग्य चालते, असे उगीच नाही म्हणत! अरे, चार युक्तीच्या अर्थात शहाणपणाच्या गोष्टी कळतात.. शिवाय तुला तणावमुक्त करण्यासाठी हे गरजेचे होते. नवीन ऊर्जा शरीरात खेळू लागते. आजवर जे जे महापुरुष झाले मग ते ते भारतभ्रमण करून नंतर कामाला लागले होते. त्यात स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास, महात्मा गांधी यांचा समावेश आहे! ..म्हणूनच भ्रमणाने मनुजा येतसे शहाणपण फार!