वैशाख वणव्यात गिरिदुर्गावरील भटकंती काहीशी त्रासदायकच असते, पण याच काळात सह्य़ाद्रीच्या डोंगरातील घनदाट जंगलात वसलेले वनदुर्ग आणि निसर्गनिर्मित घळींची भटकंती हा निश्चितच एक वेगळा अनुभव असू शकतो.
उन्हाळा हा खरं तर राजमाची-लोहगड-विसापूरसारख्या फिलर ट्रेकचा ऋतू. म्हणजे जायचे होते कुठे तरी दूरच्या ट्रेकला, पण ऋतू आणि वेळेचे गणित न जमल्याने तो छोटुला-पिटुकला(?) ट्रेक म्हणून राजमाची केला. त्यामुळे उन्हाळ्यातही करायचे ट्रेक असतात हे पक्के झाले. असाच एखादा ट्रेक असावा आणि तो उन्हात जास्त पायपीट करायला लावणारा नसावा असा शोध चालू केला होता. असा ट्रेक म्हणजे एखादा वनदुर्गच हवा आणि पश्चिम महाराष्ट्रात जंगल म्हटले की, सर्वात आधी नंबर लागतो तो कोयनेच्या जंगलाचा. सूर्यकिरणांनाही शिरायला वाव मिळणार नाही अशी दाट जाळी, जनावरांचा मुक्त वावर आणि मे वैशाखाच्या उन्हाने आटलेले पाणवठे. पश्चिम महाराष्ट्राचा पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाचं नाव सध्या भारतभर गाजतंय. याच प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काही वनदुर्ग वसले आहेत, त्यातलाच एक भैरवगड. रुद्रभैरवाच्या मंदिराने पावन झालेली भूमी तसल्याच रुद्रभीषण जंगलाने वेढलेली आहे. त्याची राखण करणारे वाघ-बिबटे-अस्वलं असे भुत्या आहेत, पण निसर्गावर त्याचे नियम पाळत मनापासून प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या टोळभैरवांना त्यांची कसली भीती? कोकणकडय़ावरल्या त्या भैरवासमोर जाऊन पुढे असेच त्याने आपल्या वेगवेगळ्या गडांवरील स्थानांवरून बोलावणे करावे लोटांगण घालावे यासाठी भैरवगडाकडे वाकडी वाट करायचे मनसुबे रचत मी, अमित, अजय आणि अनिरुद्ध असे चार टोळभैरव शुक्रवारी संध्याकाळी आपापली बोचकी आवळून कराडच्या दिशेने निघालो.
रस्त्याच्या दोहो बाजूंनी मावळतीच्या रंगात न्हालेल्या सिंहगड, पुरंदर, वैराटगड असे आसपासचे किल्ले आणि बाकी इतरही गतकाळच्या आठवणींना उजाळा देत भुईंजच्या ‘विरंगुळा’च्या मिसळपर्यंत जाऊन पोहोचलो. (बे)चव तशी काही खास नाही, उगाच मिरची टाकून जाळ केलेला होता. तिथून समोरच दिसणाऱ्या वैराटगडावरल्या मंदिराला ओळख देऊन चंदन-वंदनची जुळी जोडी पाहत पुढे कराडचा रस्ता जवळ केला. कराडला पोहोचलो तेव्हा अमितच्या आईच्या हातची सर्वागसुंदर कढी-खिचडी आणि मुरांबा खात तृप्त होत असतानाच कराडच्या वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने ट्रेकवर प्रश्नचिन्ह उभे केले. व्याघ्र प्रकल्पात जाणारे घाटावरले मार्ग निरीक्षणाखाली आणले असले तरी कोकणातून वर येणाऱ्या घाटवाटा मात्र मोकळ्याच होत्या. शिकारी त्या वाटांनी घुसून शिकार करून पुन्हा कोकणात उतरतात, अशी ती बातमी होती. मन थोडेसे खट्टू झाले होते. या बातमीमुळे वनविभागाची गस्त वाढली तर प्रवेश असलेल्या क्षेत्रातही आम्हांस जाता आले नसते.
साशंक मनानेच पहाटे पाच वाजता पाटणचा रस्ता कापू लागलो. थंडगार पहाटवाऱ्यात दातेगडाच्या डोंगररांगेच्या कुशीतले पाटण सकाळचे आळोखेपिळोखे देत होते. डावीकडे मोरगिरी किल्ला नि:स्तब्ध उभा होता. समोरच्या पठारावरल्या पवनचक्क्य़ा रात्रपाळी करून धूसर प्रकाशात जणू दमलेल्या दिसत होत्या. अजून सूर्य उगवायचा होता. कोयनेचे खोरे हिरव्यागार शिवारांसरशी आपल्या समृद्धपणाची खात्री पटवून देत होते. कोयनानगरचा फाटा मागे टाकून आम्ही हेळवाक गावाच्या मुख्य चौकात आलो. ट्रेक खरं तर इथूनच सुरू होणार, पण ‘चाफ्याचा खडक’ नावाच्या धनगरपाडय़ापर्यंत गाडी जाते असे ऐकून होतो. एकच ‘ट्रिकी’ टप्पा होता, पण बाकी रस्ता ठीक आहे असे समजले. प्रयत्न करावयाचे ठरवले; परंतु एक टप्पा चढून गेल्यावर, एका खडय़ा चढणीवर अगदी पिठासारख्या मऊशार मातीमुळे गाडीची चाके जागेवरच फिरू लागली. गाडीच्या प्रयत्नांचे नि:श्वास धुळीच्या लोटांद्वारे हवेत विरू लागले, तेव्हा मात्र गाडी सोडून पायांवर भिस्त ठेवावी असे ठरवले. जोखमीने गाडी पुन्हा खाली आणून एका वस्तीवर लावली आणि सॅक पाठुंगळी मारून चढाई सुरू केली. पिठूळ मातीत बूट जवळपास अर्धा-एक इंच फसकत होते. एव्हाना सकाळच्या उन्हाचा कोवळेपणा जाऊन हळुवार चटके बसू लागले तशी धापही लागू लागली. श्वास आणि पावलांची गती वाढवत एका पठारावरून चालतच ‘चाफ्याचा खडक’ गाठला. जयराम कोळेकर वाटाडय़ा म्हणून यायला तयार झाले. समर्थाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली गुहा, जिथे दासबोधाच्या रचनेचा आरंभ करून पुढे शिवथरला पूर्ण केली अशा हेळवाक-रामघळीत आम्ही रात्री मुक्कामी जाणार होतो. रामघळ तशी चाफ्याच्या खडकावरून अगदीच पंधरा मिनिटांच्या अंतरावर. आम्ही भैरवगड करून पुन्हा चाफ्याच्या खडकाला येऊन मग रामघळीत मुक्कामी जाणार होतो. (भैरवगडावर रात्री मुक्काम करण्यास मनाई आहे.) त्यामुळे अधिकचे सामान वाटाडय़ाच्या घरात टाकले आणि फक्त टोप्या, पाणी आणि जरुरीचे खाण्याचे सामान घेऊन खऱ्या अर्थाने ट्रेक चालू केला.
आमचा वाटाडय़ा समोर मोठय़ाने धनगरी गाणी म्हणत निघालेला, पाठीशी लावलेला कोयता एका लयीत त्याच्या अडकावण्याशी कुई-कुई आवाज करत असायचा आणि त्याच्यामागे आमची वरात. पाडा मागे टाकल्यानंतर येणारा उजवीकडचा पहिलाच डोंगर आमचा कस पाहत होता. वाटेत एके ठिकाणी पाणवठा होता. थंडगार पाण्याने तो थकवा कसाबसा शमवला. त्यानंतर एका प्रदीर्घ पठारावर आमची पायपीट चाललेली. वर वैशाखातला सूर्य आग ओकत होता. त्यापासून स्वत:ला कसेबसे टोप्या-चष्म्यांनी वाचवत भैरवाच्या ओढीने अंतर कापीत निघालेलो. वाटेत तोरणाच्या झाडांना फळे लागलेली आढळली. एखाद्या उंच शिडशिडीत बांध्याच्या तरुणीने अंगभर पिवळ्या-गुलाबी मोत्यांचे दागिने घालावेत अशी तोरणाची झाडं दिसत होती. अवीट गोडीची चव जिभेवर रेंगाळत असतानाच जांभळाची बेटं दिसू लागली. सुरुवातीला जर्द लाल आणि नंतर काळ्या जांभळाचे घोसच्या घोस दृष्टीस पडू लागले. उन्हात लोलकासारखी चमकणारी जांभळं मनसोक्त खाऊन आम्ही आमची तोंडं लाल करून घेतली.
आता खरी वनखात्याची हद्द सुरू झाली होती, कारण खुणेचा बांध आला होता. डोंगरउताराशी अगदी घनदाट म्हणतात तसले जंगल. सगळीच झाडे एकमेकांशी स्पर्धा करीत आकाशाला गवसणी घालू पाहत होती. त्या झाडांभोवती वेली आपल्या असंख्य बाहूंनी फेर धरून केशसंभार सावरीत नाचत होत्या. अवघ्या अरण्याने चैत्राची पालवी घेऊन हिरवा वैशाख साजरा करण्याचे ठरवले होते. सूर्यकिरणांच्यात जमिनीशी बिलगण्याची अहमहमिका लागलेली, पण झाडे आणि वेलींच्या जाळीतून त्यांनाही बरेच कष्ट पडत होते आणि आमचे कष्ट वाचत होते. जागोजाग प्राण्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या खुणा (उदा. विष्ठा) होत्या. अशातच दाट झाडी संपून अचानक आम्ही एका डोंगराच्या बोडक्या टोकावर येऊन पोचलो. तिथून समोर अवघे वाघोणे नदीचे खोरे दिसत होते. खाली तळाशी सदाहरित वृक्षांची गच्च जाळी, उजवीकडे दूरवर धक्का (संगमनगर), नाव, पाथरपुंजवरून येणारा लालमातीचा नागमोडी रस्ता मध्येच जाळीत गुडूप झालेला. ते टोक उतरून खाली उतरलो आणि भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या वाघोणे गावच्या घरांची जोती दिसू लागली. भग्न भिंती, आजूबाजूला शेतीसाठी केलेली आणि आता उखडून गेलेली बांधबंदिस्ती, विदीर्ण वाघजाईच्या मंदिराचे अवशेष जुन्या वाघोणेची अर्धवट राहून गेलेली गोष्ट सांगत होते. मन थोडे विषण्ण झाले आणि त्यासरशी थकवा गडद झाला. पाण्याची जागा बघून विसावा घेण्याचे ठरवले. १५ मिनिटं चालल्यावर एक ओढा दिसला. कडक उन्हाळ्यातही या काही मैलांच्या परिसरात हा भरपूर पाणी असलेला एकमेव ओढा. तिथे थोडा दम टाकून सगळे गडी ताजेतवाने झाले आणि भैरवगडाला शेवटचा धक्का देण्याच्या निर्धाराने उठलो. पुन्हा एकदा जंगली जांभळांची चव घेत दाट जाळीत घुसलो. एका कोरडय़ा ओढय़ाच्या पलीकडे जाताना खडकावर अनिरुद्धला रानमांजराचे दर्शन झाले. अजिबात ऊन लागत नसल्याने वाटचाल तशी सुखकर होती. पण वाहता वारा मिळत नसल्याने एक प्रकारचा गच्चपणा दाटून राहिलेला. पण भैरवाच्या ओढीनं कुणीच तक्रार करत नव्हते. साधारण पाऊण तास चालल्यावर एका जाळीतून अचानक आम्ही एका पठारासमोर आणि त्यावरल्या मोठय़ा मंदिरासमोर उभे ठाकलो. शेवटी रुद्रभैरवाने दर्शन दिले. तिथे आधीच एक चौघांचा पुण्यातला ग्रुप आला होता. त्यांच्याशी ओळख करून घेत असतानाच गाडीच्या इंजिनाचा आवाज आला. पाहतो तर समोर दोन जीप येऊन उभ्या राहिल्या. आम्ही जिथे मरमर करत चार-पाच तास जंगलातून चालत- चढत- आपटत इथे पोहोचलो होतो तिथे एक रिसॉर्टवाले ‘किड्स कॅम्प’च्या नावाखाली गाडीत मेंढरं भरावीत अशी कॉन्व्हेंटच्या पोरांची जत्रा घेऊन आले होते. त्यांचा इन्स्ट्रक्टर जरा गुर्मीतच दिसत होता. आमच्याकडचे प्रत्येकाच्या कमरेला असलेले बियर ग्रिल्स सव्र्हायवल नाइफ पाहून उगाचच आमच्याशी बोलायला लागला. आधीच तो माणूस डोक्यात गेला होता. त्यात ‘हंटिंग इज माय प्राइम हॉबी’ आणि ‘मी बोहरी आळीत असे नाइव्ह्ज पाहिले आहेत’ असे त्याच्याकडून ऐकल्यावर त्याचा तिथेच कडेलोट करून टाकावा असा आमच्या मनात आलेला विचार आम्ही परतावून लावला होता. मंदिरासमोर उजवीकडे असलेला भैरवगड पाहायला निघालो तेव्हा त्याने त्याच्या किड्सची (मराठीत किडं) तिकडे उतरणीवर लाइन लावून ट्राफिक जॅम करून टाकले होते. दुसऱ्या रस्त्याने उतरून आम्ही पटकन त्यांच्या पुढे जाऊन किल्ल्य़ाचे भग्न झालेले बुरुज आणि दरवाजाचे अवशेष पाहून आलो तर हा माणूस इकडे किड्सना दुसऱ्या लीडर्सच्या हाती पुढे पाठवून स्वत: मंदिराच्या शेडमध्ये आडवा झाला होता. का तर म्हणे पाठ दुखतेय. तेव्हाच आम्ही ‘हंटिंग इज माय प्राइम हॉबी’ म्हणणाऱ्याचे ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ असे नामकरण करून टाकले. हा ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ त्यांच्या जेवणाची गाडी आली नव्हती म्हणून कुणावर तरी फोनवर उखडला होता. मुलं शांत होती, पण यालाच खायची घाई झाली असावी. त्याच्या नशिबाने अध्र्या तासाने गाडी आली.
आम्ही आधीच्या वाटाडय़ाला (त्याला घाई असल्याने) परत पाठवून दुसऱ्या एका जयरामसोबत (हा जयराम लांबोर) चाफ्याच्या खडकाकडे परतण्याचे ठरवले. भैरवनाथाचं चांगभलं केलं आणि तिथला गुलाल भाळी लावला. शेजारी वाघजाईदेखील आशीर्वाद देत होती. मंदिराच्या शांत, धीरगंभीर, थंड गाभाऱ्यात सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही घटकाभर तिथे विश्रांती घेतली आणि परतीच्या वाटचालीस निघालो.
परतीची वाटही अशीच बिकट ठरली. एक तर कमी खाल्लेले आणि पुन्हा दोन अंगावर आलेले डोंगर चढून पायपीट करायची. थकत, धापा टाकत वाघोणे खोरे चढून आलो. रस्त्याने उतरतीला लागलेली तरीही चटका देणारी किरणे आणि आमच्या पावलांचे आवाज यांखेरीज काहीच नव्हते. अचानक पठारावर धडाधड दगड कोसळल्यासारखा आवाज झाला. या सपाट मैदानात दगड कुठून कोसळले म्हणून आवाजाच्या दिशेने पाहिले तर दोन गवे चौखूर उधळत डावीकडल्या झाडीत दिसेनासे झाले. पुढल्याच क्षणाला उजवीकडेही तसाच आवाज. आम्ही गव्यांच्या कळपाच्या मधून गेलो होतो हे पाहून शहारलो. आता अनिरुद्ध थकला होता. मग आमच्यात अंतर पडत गेले. अस्ताला चाललेल्या सूर्यासरशी सावल्या लांबल्या. अंधार पडण्याआधी जयरामसोबत जाऊन रामघळीचा रस्ता माहीत करून घेणे ही माझी जबाबदारी होती, म्हणून मी पुढे होतो, बाकी तिघे मागे पडले.
रामघळीत येऊन पोहोचलो. अहाहा! काय सुंदर जागा, पूर्वाभिमुख अशी गुहा, पश्चिमेच्या वाऱ्याच्या आडोशाला, चांगली शंभर-दोनशे फूट लांब, चार-पाच टप्प्यांत. समोरून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळत असेल, खाली खळाळता ओहळ असेल या कल्पनेनंच मन आनंदलं.
अशा अनेक रामघळी समर्थानी शोधून काढल्या, ठीकठाक केल्या आहेत. तिथून बाकी तिघांना बरेच आवाज दिले तरी काहीच उत्तर येईना. अंधारून यायला लागलेले. काळजी वाढली. जयरामसोबत पाडय़ापर्यंतचा रस्ता कापला आणि पाणी पिताच तिघांचा पत्ता काढण्यासाठी पुन्हा जंगलाच्या दिशेने गेलो. खूप हाका मारल्यावर कुठूनसा क्षीण आवाज आला. मंडळी सुखरूप होती, जराशी वाट चुकली होती.
पाडय़ावर पोहोचलो तेव्हा जनावरे गोठय़ांत परतत होती. आया-बाया हंडे-कळशा घेऊन निघाल्या होत्या. चुली पेटल्या होत्या. पाडा धुराने वेढला होता. पाडय़ावरल्या मठावरून घंटेचा नाद खोऱ्यात घुमत होता.
चुलीवरचा गरमागरम खडा चमचा चहा पिऊन तरतरी आली. जयरामच्या घरी जेवण तयार करायला सांगितले. उन्हाळ्याचे दिवस असूनही गारठा वाढला होता. ओसरीवरही संध्याकाळी आम्हाला स्लीपिंग बॅगमध्ये पडून राहावे लागले एवढी थंडी. गप्पा निवत होत्या आणि त्या सांजवाऱ्यात जनावरांच्या घंटेच्या किणकिणाटात कधी आमचा डोळा लागला ते समजलेच नाही. जेवण तयार झाले तसे जयरामने आवाज दिला. अर्धवट ग्लानीत मस्तपैकी तिखट आमटीभात खाल्ला तेव्हा सगळे भानावर आले. सकाळी पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन आम्ही रात्री दहाच्या सुमारास रामघळीचा रस्ता धरला. टॉर्चच्या उजेडात २० मिनिटांतच तिकडे पोहोचलो.
अमावास्येची रात्र असल्याने आकाश चांदण्यांनी भरलेले दिसत होते. जणू भैरवाच्या दर्शनानंतर ‘आकाश सारे, माळुनि तारे’ आमचे अभिनंदन करायला आले होते. आकाशभर चांदण्यांचा सडा पडलेला. घळीसमोरच्या दरीत काजव्यांचा जागर. मधेच ते इकडून तिकडे उडत तारेच जमिनीवर आल्याचा भास व्हायचा. पाठ टेकली तशी कधी निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेच नाही. रात्री एक-दोन वेळा मध्येच जमीन उकरल्याचा आवाज वगैरे यायचा. अस्वलांचा वावर असल्याने दचकून जाग यायची. टॉर्चच्या प्रकाशात आसपास काही नाही आणि सगळे सुरक्षित आहे याची खात्री करून आपोआपच पुन्हा झोप लागायची.
भल्या पहाटेच शीळकरी कस्तुराच्या मंजूळ आवाजाने जाग आली. अर्धवट झोपेत असताना कमीत कमी अर्धा तास तरी तो आपल्या पहाटेच्या गाण्याने मोहिनी घालत होता. साथीला शिंजीर, कोकीळ होतेच. सुतारही टॉक.. टॉक.. करत तालवाद्याची साथ देत होता. पूर्व क्षितिजावर फटफटले तसे आम्ही घळीतला आमचा मुक्काम आवरून पुन्हा पाडय़ावर आलो. सकाळच्या हळदुल्या उन्हात पाडय़ातली लगबग पुन्हा वाढली होती. धारा काढल्या, जनावरं रानात सोडली गेली, पोरं इकडेतिकडे खेळायला पळाली, कोंबडय़ा खुराडय़ातून बाहेर पळाल्या. आम्ही चहा पिऊन टाकोटाक हेळवाक गावात आलो आणि तिथे नाश्ता उरकून घेतला. येताना तांबडय़ा धुळीच्या रस्त्यात एक हरणटोळ दिसला. एखाद्या गाडीखाली यायचा उगाच, म्हणून त्याला बाजूला करता करता त्याचेही काही फोटो काढले.
आता हाताशी पूर्ण दिवस होता म्हणून पाटणजवळचा दातेगड पाहायचे ठरवले. पाटण-केर-टोळेवाडी करत आम्ही दातेगडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथल्या गुराखी मुलाने पूर्ण गड फिरून दाखवला. मोठमोठय़ा गणेश आणि हनुमान मूर्ती, प्रचंड मोठी पायऱ्या असलेली विहीर आणि त्याभोवती गुंफल्या गेलेल्या दंतकथाही ऐकवल्या. उतरताना गडाच्या पायथ्याला करवंदाच्या जाळ्या दिसल्या. मनसोक्त तोही रानमेवा खाऊन घेतला. पुढे पाटणच्या पठारावरून पवनचक्क्यांच्या जंगलातून अतिशय खराब रस्त्याने ठोसेघर गाठले. ३०-३५ किलोमीटरच्या अंतरासाठी दीड तास गेला. ‘बोहरी आळीचा जखमी हंटर’ची टोळी इकडेही भेटली. ठोसेघरला जेवण करून पाण्यात डुंबल्याने सगळा शीण नाहीसा झाला आणि आम्ही अजिंक्यतारा पाहण्याच्या उद्देशाने साताऱ्याच्या दिशेने निघालो.
आठ-दहा किलोमीटरवर आल्यावर सज्जनगडाच्या फाटय़ाशी अमितला अचानक कॅमेरा बॅग सोबत नाही याची जाणीव झाली. पाण्यात उतरण्याच्या आधी अजयने स्वत:चा ब्लॅकबेरी, पाकीट त्यातच ठेवले होते. त्यामुळे पुन्हा ठोसेघरला जाऊन त्या हॉटेलमध्ये चौकशी करणे भागच होते. अमितचा जीव कंठाशी आलेला. गेल्याच आठवडय़ात ट्रायपॉड हरवलेला, त्यात कॅमेरा गेला तर बायको घरात घेईल का याची काळजी. पण तिथे हॉटेलमध्ये विचारताच त्या भल्या मालकाने अमितने विसरलेली जपून ठेवलेली बॅग हाती दिली. एकदाचा अम्याचा जीव भांडय़ात पडला. आता या प्रसंगाची वसुली अम्याकडून पार्टी घेऊन केली जाईलच याची कृपया नोंद घ्यावी.
सूर्यास्ताच्या समयी अजिंक्यतारा आणि तिथली गडफेरी आटोपून आम्ही पुण्याचा परतीचा मार्ग कापू लागलो तो पुढला प्लॅन काय करायचा याचा विचार करतच. दुसऱ्या दिवशी ईमेल इनबॉक्समध्ये अनिरुद्धचे सुंदर मेल येऊन पडले होते.
वाह, काय होते ते तीन दिवस.
म्हणतात ना, सुरुवात चांगली झाली की शेवटही गोड होतो. अगदी तसंच झालं.
काकूंच्या हातची गरमागरम खिचडी, त्यावर आंब्याचा मुरांबा ह्यांनी सुरुवात आणि शेवट आंब्याच्याच मिल्कशेकने.
रूक्ष ऑफिसला जाताना आम्हास आठवण करुन देतोय तो कराड-कोयनानगरचा रस्ता, हिरवीगार शाल पांघरलेली झाडं, त्यातून वाहणारे कालव्याचे पाणी.
एरवी एसीमध्ये बसून काम करणाऱ्या शरीराला आठवतीये घातलेली घामाची ओलीचिंब अंघोळ.
बिल्डिंगच्या आजूबाजूला चार झाडं लावून स्वत:स निसर्गप्रेमी म्हणवणाऱ्या आम्हांस घनदाट जंगलातली पाऊलवाट.
बर्गर-पिझ्झा खाऊन फुगणाऱ्या पोटास दाखवली धनगराच्या हातचे साधाच पण अमृत असलेला आमटीभात आणि रानमेव्याची चव खास.
डनलॉपची गादी जास्त मऊ की समर्थाचं अस्तित्व असलेली रामघळीतली आमची झोपायची जागा जास्त मऊ?
ऑफिसमधून घरी आल्यावर झालेली दमणूक खरी की गडाचे चढउतार खाचखळगे पार करून पाठ टेकवल्यावर जाणवलेली दमणूक खरी?