रस्त्यांचं जाळं वाढत गेल्यावर डोंगर-दऱ्यांमधल्या पायाखालच्या वाटा अस्तंगत होत चालल्या आहेत. डोंगरभटके मात्र आवर्जून अशा वाटा धुंडाळत राहतात. कधी कधी नेहमीपेक्षा वेगळी वाट सापडते आणि नवं शोधण्याचा थरार आणखी रोमांचक होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतिहास काळात घाटमाथ्यावरून सह्य़ाद्रीत उतरण्यासाठी असंख्य पायवाटा होत्या, काही आजही आहेत. व्यापारी पेठेच्या आणि इतर कामाच्या अनुषंगाने काही नियमित वापरल्या जात तर वापर कमी होईल तशा काही अस्तंगतदेखील होत. कालौघात वाहनं आली, रस्त्याचं जाळं वाढत गेलं आणि या पुरातन पायवाटा-घाटवाटा विस्मृतीत जाऊ लागल्या. पण डोंगर भटकण्याच्या हौसेमुळे आजही आमच्यासारखे काहीजण या वाटांच्या वाटेला जात असतात. अशा घाटवाटांवर भटकतानाच कधीतरी नवीनच काहीतरी गवसण्याचा आनंद मिळतो. असाच आनंद या दोन ट्रेक्सनी दिला.
पंधरा दिवसांपूर्वी झालेला उन्हाळ्यातला पावसाळी ट्रेक म्हणजे आधीच थंडीनं थरथर कापणारे हात, त्यात हे ‘धामणओहोळ’ ज्याचा लोकांनी ‘धामणहोळ’ किंवा ‘धामणवहाळ’ असा अपभ्रंश केला आहे, त्याच्या परिसरातल्या देवघाट, लिंग्याघाट आणि निसणीची वाट या तीन घाटवाटांचं कोडं ह्य़ा लेखात नेमकं खरडवणं खरंच अवघड काम आहे. असो, हाती घेतलं तर तसं अवघड नाही. या सगळ्या प्रकरणात प्रमुख कलाकार आहेत धामणओहोळ गावातले शेडगे आणि काळे कुटुंबीय आणि मग आपला चमू- रोहन, सागर, मनोज, प्रीती, राजस, यज्ञेश, पवन आणि मी.
पुण्याच्या दक्षिण-पश्चिमेला, ‘लवासा टाऊनशिप’ च्या पलीकडे साधारण १६ किलोमीटरवर धामणओहोळ आहे. अनेक जागा बडय़ा धेंडांना विकल्या गेल्या असल्या तरी पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील अशा ६६ गावांची जी यादी करण्यात आली, त्यात धामणओहोळची वर्णी लागली आहे. माझी आणि धामणओहोळची ओळख झाली ती तेथून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांमुळे. त्यापैकी मी एकच वाट केली होती, ज्याला मी लिंग्याघाट समजत होतो. ही वाट तशी ट्रेकर्सच्या ऐकण्या-माहितीत असलेली, आणि देवघाट तसा बऱ्यापैकी अनोळखी.
मी, मनोज, रोहन, सागर आणि प्रीती ह्य़ा वाटांवर भटकंती करण्याच्या हेतूने धामणओहोळला पोहोचलो. ‘मी याआधी केलेली वाट नक्की लिंग्याघाटाची होती का?’ ह्य़ातल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर हे ह्य़ा कोडय़ातला एक महत्त्वाचा भाग आहे. गावात विचारपूस केल्यावर निसणीची वाट आणि चिपाचं दार ही पायवाटांची आणखीन काही नावं कानावर आली. मग मात्र आम्ही खऱ्या अर्थानं शंकर मामांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यावर अनेक अशा गोष्टी कळल्या की ज्यामुळे लक्षात आलं की काही संदर्भ पुस्तकं, ब्लॉगज् आणि
गावक ऱ्यांची माहिती यात तफावत आहे. मग (स्व-समाधानासाठी) या सर्वाची शहानिशा करण्यासाठी आम्ही तो आणि पुढचा विकेंड पण बुक करून टाकला. एका ट्रेकमध्ये दोन-दोन वाटा केल्या तर इथल्या चारही वाटा होणार होत्या. चिपाचं दार पुढच्या खेपेसाठी ठेवून या रविवारी देवघाटाने उतरायचे आणि निसणीच्या वाटेने चढायचे असं ठरवलं.
गावातल्या शेडगे मामांशी बरीच चर्चा करून झाल्यावर मीसुद्धा बुचकळ्यात पडलो होतो की मी याआधी नेमकं कोणत्या वाटेत जोडं झिजवलंय. हां, आता ‘कोणती पण वाट चढलो असू, त्यात काय एवढं’ असं ज्यांना वाटत असेल तर, हे कोडं त्यांच्यासाठी नक्कीच नाहीये, नाकाच्या शेंडय़ावर राग घेऊन त्यांनी अगदी काढता पाय घेतला तरी चालेल.
बऱ्याच चर्चेनंतर शेवटी आम्ही मामांना आम्हाला लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडायला भाग पाडलं. लांबवर दिसणाऱ्या एका टॉवरकडे बोट दाखवत मी मामांना म्हणालो की, मी तिथून वर आलो होतो. तीच निसणीची वाट आहे असं मामांनी पुन्हा एकदा सांगितलं. मात्र त्यालाच लिंग्याघाट म्हटल्याचा उल्लेख मी वाचला होता. अगदी त्या वाटेवरून कुर्डूगडाचा उल्लेख लिंगाच्या आकाराचा दिसतो म्हणून असे संदर्भदेखील होते. घाट उतरायला सुरुवात होते अगदी तेथेच वाघजाई देवीचं छोटं मंदिरवजा स्थानसुद्धा आहे.
मग त्यांच्या मते देवघाट कोणता ह्य़ा आमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मामांनी आम्हाला तिथून जवळच असलेल्या एका नाळेच्या तोंडाशी आणून उभं केलं. मामांचा निरोप घेऊन आम्ही त्या वाटेनं खाली उतरायला सुरुवात केली. दगड रचून बनवलेली टिपिकल वाट. एखाद्या घाटवाटेला साजेशी अशी ही वाट. अगदी मधोमध उभ्या असलेल्या सुळक्यापासून अजून खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक भलीमोठी नैसर्गिक गुहा होती. अत्यंत देखणी अशी जागा. वाट सोडून पाय आपोआप गुहेकडे वळले हे सांगायला नको. गुहेच्या पोटाशी मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसले, पण आवड असली तरीही अज्ञानापोटी ते नीट ओळखता आले नाहीत. जमेल तेवढे फोटो काढून, पोटाचे थोडे चोचले पुरवून, द्राक्ष अक्षरश: गिळून मुखशुद्धी केली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. गुहेनंतर नळी उतरत असताना अचानक वाट नाहीशी झाली. तिथून धबधब्याच्या वाटेनं थोडं खाली उतरल्यावर अचानक मोठा टप्पा दिसला. मग थोडी शोधाशोध केल्यावर वरच्या झाडीत वाट मिळाली. आम्ही पुढे गेलो आणि ओढा/नाळ खाली उजवीकडे राहून गेली. त्याच वाटेने जंगल तुडवत आम्ही एका फाटय़ाशी आलो.
‘ही डावीकडची वाट वर त्या टॉवरपाशी जाते, मी ह्यच वाटेने वर गेलोय आधी. उजवीकडे कुर्डूगड’, असं म्हणून छानसा दगड पाहून मी त्यावर बसकण मारली. आमच्यापैकी फक्त मी आणि प्रीतीने कुर्डूगड केला असल्याने कुर्डूगड पाहायचं ठरलं. गेल्या खेपेला वेळेअभावी मी निव्वळ भोज्जा करून आलो होतो, मात्र ह्य़ावेळेस कुर्डूगड एकदा नीट पाहायची संधी आयती चालून आली होती. हा किल्ला मावळ खोऱ्याचे वतनदार बाजी पासलकर ह्यंच्या देखरेखीखाली होता. हे मला तोंडपाठ आहे असं मी म्हणत नाहीये, पण धामणओहोळ गावातल्या किती पोरांना हे माहीत असेल देव जाणे. कदाचित त्यांना हेही माहीत नसेल की वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचं नाव का दिलं गेलं. जलाशयाला नाव दिलं गेलं, पण दुर्दैवाने त्यांचा जुना वाडा आणि जमीन त्याच पाण्याखाली बुडाली आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्डूगड पाहून किल्लय़ावरच जेवणाचा कार्यक्रम उरकला, आणि कुर्डाई देवीच्या मंदिरापासून ११ नंबरच्या बसने पुन्हा त्याच फाटय़ापाशी आलो. सूर्य आग ओकत असल्याने गाडीचं रेडिएटर मजबूत तापलं होतं, मग गटागटा पाणी पिऊन ते गार केलं आणि हाशहुश करत करत थोडा वेळ आराम करुन चालते झालो. अगदी ठळक, नियमित वापरातली आणि कमी-अधिक चढणीची ही वाट. कुर्डूपेठेतून घाटमाथ्यावर येण्यासाठी जेमतेम पाऊणएक तास लागतो. वाटेत एका अवघड ठिकाणी लाकडाचे वासे बसवून पाय ठेवायला जागा केली आहे तर काही ठिकाणी दगड रचून पायऱ्या केल्या आहेत. धामणओहोळला याच वाटेने पोहोचलो. गावकरी यालाच निसणीची वाट म्हणतात.
गावात परतल्यावर झालेल्या चर्चेपासून कोडय़ाला खरी सुरुवात झाली. ‘आम्ही देवघाटानं उतरलो’ असं ऐकल्याक्षणी आम्हाला गावातल्या काही जाणकार मंडळींनी ते शक्य नसल्याचा टोला हाणला. त्यांच्याशी बरीच चर्चा झाल्यावर मामांनी केलेली लबाडी कळली. मामांनी आम्हाला सकाळी देवघाटाऐवजी लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडलं होतं. मग आमच्या ज्ञानात भर पडली की नाळेत थोडं खाली उतरल्यावर एक जेमतेम २०-२५ फुटाचा सुळका दिसतो, त्याला अनुसरून त्या वाटेला लिंग्याघाट असं नाव पडलं. मुद्दा निघालाच होता म्हणून हातासरशी त्यांनी आम्हाला देवघाटाचा अ‍ॅप्रोच कोठून आहे ते सांगितलं. त्यात काही ठिकाणी वाचल्याप्रमाणे निसणी आणि देवघाट यामध्ये गोंधळ होता. त्यावरून पुन्हा आम्ही कोडय़ात! ‘निसणीची वाट म्हणजेच देवघाट का हो?’ तर याचं सरळसोट उत्तर ‘नाही’ असं आलं. त्याचं आकलन आम्हाला पुढील आठवडय़ाच्या ट्रेकला झालं!
या खेपेला मात्र सगळे सोबती वेगळे होते. यज्ञेश, राजस, पवन, प्रीती आणि पाऊस. यात सर्वात जास्त त्रासदायक ठरू शकणाऱ्यांमध्ये पावसाचा नंबर सगळ्यात वर. पवन आणि मी शनिवार दुपारपासूनच धामणओहोळात ठाण मांडून बसलो होतो. आम्ही पुन्हा मामांना गाठलं. ‘मामा, या वेळेस देवघाटानं खाली जायचं’, मी पिल्लू सोडलं.
मामांनी आधी बाहेर पावसाकडे नजर फिरवली आणि मग पु. लं.च्या ‘मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर’मध्ये ‘पुण्यातल्या दुकानात गिऱ्हाईक कसा दुय्यम असतो’ याचं जसं वर्णन आहे अगदी तसं दुर्लक्ष करून बऱ्याच वेळानंतर आमच्याकडे करडय़ा नजरेनं पाहिलं. ‘नाही जमायचं. कोण बी जात नाही तिथं. लय आधी गुरं लावाया जायचं, आता ते बी नाही. लय आधी त्या तिथं चौऱ्यापाशी उंबर्डीतनं गावातलं मानुस गुरं वर आणायचं, आता ते बी न्हाई येत’, मामांचा सपशेल नकार. म्हाताऱ्यानं तंबाखू मळून चुरा करावा अगदी तसं आमच्या कार्यक्रमाचा चुरा केला होता.
तरी आम्ही काही माघार घेतली नाही, नेटाने खोदून-खोदून माहिती विचारली. त्या दरम्यान देवघाटाची वाट किती अवघड आणि झाडीझाडोऱ्याने किती माजलेली आहे याचं कीर्तन आमच्यासमोर गायलं गेलं. पावसामुळे शेतीची कामं अडकून पडल्याने गावातली बरीच पुरुष मंडळी जमली. ते एकाच स्वरात सांगत होते की त्या वाटेनं उंबर्डीपर्यंत आजवर एकही व्यक्ती गेली नाही. गेल्या ३५-४० वर्षांत, खुद्द मामाही नाही. माजलेलं गवत, मोडलेली वाट, नाकावरचा उतार आणि त्यात हा अवकाळी पाऊस. मग दुपार आम्ही आसपासची मंदिरं, विहिरी पाहण्यात आणि वॉचटॉवरवर बसून घालवणं पसंत केलं.
शांत गाणी (अर्थातच, हेडफोन टाकून) ऐकत तिथं किंवा अशाच कुण्या आडगावी घालवलेली दुपार ही खोलीत भर्र पंख्याखाली लोळत घालवलेल्या आळशी दुपारीपेक्षा खूपच जास्त सुखदायी ठरते. त्यातलं गाणं ही अर्थातच दुय्यम गोष्ट.
संध्याकाळी पावसामुळे गावाबाहेर फेरफटका मारता आला नाही आणि नाइलाजानं पायाची भिंगरी काळेमामांच्या व्हरांडय़ात अडखळली. मस्त गप्पा रंगल्या. दिवेलागणीची वेळ झाली आणि जवळजवळ रिकामी झाल्यावर खळखळ वाजणाऱ्या काडेपेटीतून कशा चार-पाच काडय़ा निघतात, तशी स्वारगेटहून साडेतीनला निघालेली धामणओहोळची एस.टी. आली आणि बसमधून इनमीनतीन डोकी उतरली. स्वारगेटहून इथं येणारी एकमेव एस.टी. ही मुक्कामी असते आणि पहाटे पावणेसहाला निघते. रात्री झोपण्याआधी एस. टी. चालक आणि वाहककाका, नथु काळेमामा आणि आमच्या पुन्हा गप्पा रंगल्या. डिझेलचे पण पैसे निघत नसताना नुकसान सोसून या आणि खरं तर याहून अधिक आडगावात सेवा अविरत चालू ठेवण्याबद्दल एस.टी.चे आभार मानावे तेवढे कमी. निदान ट्रेकर्स तरी याला नक्कीच दुजोरा देतील. गप्पांमध्ये आम्हाला सोबत होती कान खाली पाडून बोटभर वीतभर सरकत, हातपाय ताणत आमच्या सतरंजीवर आलेला काळेकाकांचा आळसावलेला भुभू राजा, अर्धा डझन मोठय़ा कोंबडय़ा (जिवंत) आणि त्यांची पिल्लावळं.
रात्रभर बाहेर पाऊस कोसळतच होता आणि कुत्रं गोणपाटावर झोपतं तसं मुटकुळं करून आम्ही कसंतरी कुडकुडत डुलक्या काढत होतो. पहाटे पावणेसहा म्हणजे अगदी वेळेवर एस.टी. निघून गेली. पाऊस चालूच होता. सकाळी पाऊस त्याचं काम संपवून जरा ओसरला तसं आम्ही स्वत:हून जायची मानसिक तयारी करून, पुन्हा पाण्यात दगड टाकायचा म्हणून मामांशी बोलायला सुरुवात केली. शेवटी, पूर्ण वाट नाही पण निदान चौऱ्यापर्यंत सोडायला मामा तयार झाले. वाटेत पाण्याची टाकी आहेत त्या जागेलाच गावातले लोक चौऱ्या म्हणतात. या वेळेस शंकरमामांचे आडनाव बंधू, मारुती शेडगेसुद्धा आमच्या सोबतीला होते. सोबत हुशार आणि तरतरीत दिसणारे दोन कुत्रे, शंकरमामांचा पांढरा ‘राजा’ आणि मारुतीमामांचा काळा ‘काळ्या.’
निसणी आणि लिंग्याघाटाच्या वाटा डावीकडे ठेवून आम्ही उजवीकडे असलेल्या टेकाडाकडे वळलो. अगदी टेकाडावर न जाता त्याच्या पोटातल्या कारवीतून वाट काढत आम्ही एका नाळेशी पोहोचलो. या भागाला गावातले लोक दुर्गाडी म्हणतात. मामांपाठोपाठ आम्ही नाळेतून खाली उतरायला सुरुवात केली. पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती आणि त्यामुळे नाळेतला चिखल आणि चिकट झालेले दगड-गोटे यामुळे एकूणच आमची गाडी हळूहळू पुढे जात होती. मामा आपले टपाटप या दगडावरून त्या दगडावर उडय़ा मारत उतरत होते. साधारणत: ३० मिनिटे तसा प्रकार केल्यावर आम्ही उजवीकडच्या पदरात शिरलो. कारवीतून वाट काढत एका मोकळ्या जागी आलो. तिथून लिंग्याघाटाच्या अगदी समोरची नाळ दिसली. पावसाळ्यात इथून धबधब्यांचा प्रताप पाहून डोळ्याचं पारणं फिटेल अशी ती जागा. तसंच कारवीतून पुढे आल्यावर एक मोकळा माळ लागला. गेल्या रविवारी साधारण याच वेळी माझी आणि प्रीतीची चर्चा झाली होती की इथं येता येईल का आणि आज आम्ही तिथं होतो, अर्थात मामांच्या मदतीमुळेच.
बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीतरी ठरवतो आणि नंतर त्याला तडीस नेत नाही. ट्रेकचं पण तसंच आहे. ठरवा, पोतडी भरा आणि निघा. ट्रेकला जाण्यापूर्वी माहिती घेणे जरुरी आहे. पण कधी कधी आपण खूप अभ्यास करत बसतो आणि ट्रेक तसाच राहून जातो. माझं वैयक्तिक मत (खासकरून घाटवाटांबद्दल) असं आहे की त्या त्या वाटेची माहिती आणि अजून नवीन वाटा त्या त्या जागी जाऊन पाहिल्या आणि गावच्या वयस्कर माणसांशी चर्चा केल्यावर चांगल्याच कळतात. बाकी अभ्यास तर चालूच असतो की आपला. इथल्या लिखाणाप्रमाणे.
आम्ही तिथंही इथं तिथं वाट सोडून फेरफटका मारला, फोटो फोटो खेळलो. इतक्यात मामांनी न राहवून हाळी दिली. दोन्ही मामा पाण्याच्या टाक्यांपाशी उभे होते. चांगलीच मोठी अशी एक आणि त्याहून थोडी छोटेखानी. ही टाकी पाहून वाट वापरातली होती ह्यवर आमचा नक्की विश्वास बसला.
आम्हाला वाटलं की आता या चौऱ्यापासून पुढे वाट आम्हालाच शोधावी लागणार, पण मामा अजून पुढे जात राहिले आणि त्यांनी खात्री केली की ते आम्हाला योग्य वाटेला लावूनच परततील. त्यांनी आमच्यासाठी आत्तापर्यंत केलेली दोन-तीन तासांची मरमर त्यांना वाटणाऱ्या आपुलकीची ग्वाही देत होती. ऐनाच्या झाडांची जागा आता बोचऱ्या काटय़ाच्या झुडपांनी घेतली, डोक्यावर पाऊस चालूच. १५ मिनिटं कसे तरी अंगविक्षेप करत आम्ही एका नाळेच्या तोंडाशी आलो. मामांनी आम्हाला त्या नळीतून सरळ खाली जायला सांगितलं.
‘‘अजिबात हिकडं-तिकडं व्यचं न्हाई, कणा-कणा खाली जाते वाट. बरं का म्याडम, न्हाई गावली वाट तर पुना वरी या. वरी यायची वाट सापडंल ना? सावकाश जा.’’ त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. मी आणि यज्ञेश वाट पाहायला पुढे सरसावलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते, पण पावसामुळे एकंदरच सगळं सुसह्य़ झालं होतं. आम्ही थोडं खाली उतरलो आणि वाट पाहायला थांबलो. तितक्यात वरून मामांचा आवाज आला. ते अजूनही कडय़ावरून आमच्यावर लक्ष्य ठेवून होते. काय देवमाणसं आहेत!
पावसामुळे त्यांचा आवाज काही आमच्या कानी येईना, पण मग तरीही सगळं कळल्यासारखं माना डोलावून आम्ही मामांना परत जायला सांगितलं आणि खाली उतरायला लागलो. धबधब्यातून खाली उतरताना कसरत होत होती, पण थकवा अजिबात जाणवत नव्हता. मामांच्या सांगण्यानुसार आम्ही नाळेतूनच खाली उतरत होतो आणि तसंही दुसरीकडे कुठे उतरायला काहीच वाव नव्हता. उजवीकडच्या भिंताडाला लागून नळीने आम्ही खाली उतरत आलो. मामांचा निरोप घेतल्यापासून साधारणत: तासभर दगड-गोटय़ांतून उतरल्यावर आम्ही कोकणात उतरलो. तिथं डावीकडून अजून एक मोठा ओढा येऊन मिळतो. लिंग्या घाट आणि त्या समोरच्या तीन-चार घळींचं पाणी पिऊन हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असताना ओलांडणं म्हणजे मोठय़ा जिकिरीचं काम असावं ह्यत तिळमात्र शंका नाही.
निसटत्या दगडातून पुढे उंबर्डीकडे जाणारी वाट सोडून आम्ही डावीकडच्या डोंगराकडे म्हणजेच निसणीच्या वाटेकडे आमचा मोर्चा वळवला. सगळे विसाव्याला आणि खादाडीला बसायच्या तयारीत असताना मी वाट पाहायची म्हणून डावीकडे घुसखोरी केली. सवयीप्रमाणे तसाच अजून थोडं, अजून थोडं असं करत काटय़ातून घुसत मी वाट शोधून काढली आणि अचानक एका जागी थबकलो. सुरुवातीला काही चौरसाकृती दगड दिसले, मग नेमकं काय प्रकरण आहे ते पाहण्यासाठी अजून फेरफटका मारला आणि पुरता वेडा झालो. एकावर एक अगदी पद्धतशीर रचलेले दगड, जुन्या बांधकामाचे अवशेष, कोरीव पायऱ्या. मग कोठे दिवा पेटला, आपण कोळी राज्याच्या राजवाडय़ाजवळ आलोय.
मामांनी आधीच्या बोलण्यात त्याचा उल्लेख केला होता. मग मात्र सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी खाली धूम ठोकली. तोपर्यंत खालची मंडळी वाट पाहातच होती. त्यांनी त्यांचं थोबाड उघडून माझी कानउघाडणी करण्याआधी मी वरच्या गमतीची बडबडगीते गायली. मग मला लाडू आणि खजूर आणि अजून बऱ्याच प्रकारचा खाऊ पुरवण्यात आला. तो अक्षरश: हादडल्यावर पुढच्या पाचच मिनिटांत आम्ही वर चढत होतो.
राजवाडय़ाच्या भागात बक्कळ फिरून खूप समाधानी झालो होतो, हरपलेलं भान घडय़ाळ बघून पुन्हा आकडेमोडीत गुंतलं. आता निघायला हवं. अगदी जेमतेम अर्धा तास वामकुक्षी घेऊन पाऊस पुन्हा पूर्ण तयारीनिशी हजर झाला. ज्या प्रकारे अंधारून आलं होतं ते पाहता चिपाचं दार हुकणार होतं. पण मला त्याची खंत नव्हती. अशा वेळी मी हार्वे व्होगचे शब्द आठवतो, ‘माऊन्टन्स ऑलवेज विल बी देअर, द ट्रीक इज टू मेक शुअर यू आर टू.. ’
समाधानी मनाने आम्ही राजवाडय़ामागची सोंड चढायला घेतली. माझ्या आणि प्रीतीच्या अंदाजाप्रमाणे त्या वाटेने आम्ही कुर्डूपेठहून निसणीच्या वाटेकडे जाणाऱ्या पाऊलवाटेवर येणार होतो, आणि तसंच झालं. पण ही चढाई जरा छातीवर येत होती, त्यात आम्ही दमलेलो. अगदी सर्वसाधारण गतीने आम्ही वर चढून येताना पाऊण तास कसा गेला ते कळलंच नाही. निसणीच्या वाटेला ही वाट येउन मिळते तिथं उंबराचं मोठं झाड आहे हे मामांनी आम्हाला आधी म्हणजे मागच्या आठवडय़ात सांगितलं होतं. मग काय गेल्या आठवडय़ातच तुडवलेल्या वाटेने डोळ्याचे पारणे फिटतील असं दृश्य पाहात आम्ही टॉवपर्यंत आलो. पाऊस आता दडी मारून बसला होता. चिपाचं दार पण झालं असतं अशी कुरकुर लागली खरी, पण जास्त वेळ नाही. तिथंच निवांत जागी बसून गप्पा मारत जेवण उरकल्यावर थकवा कुठच्या कुठं पळून गेला होता. गावात आल्यावर मामांनी आग्रहानं पाजलेला चहा, काळे मामांनी केलेलं कौतुक आपुलकीचा एक ठेवा कायमस्वरूपी देऊ न गेला. तुम्ही म्हणत असाल की ह्यला मी कोडं का म्हणतोय? साधा तर ट्रेक आहे. घाटमाथ्यावर एक गाव, गावातून चार घाटवाटा असं नेहमीचंच समीकरण. माझ्यासाठी तरी हे एक कोडं होतं आणि त्याला बरीच कारणं आहेत. फारसा उल्लेख नसलेल्या चिपाचं दार या वाटेची माहिती झाली होती, देवघाट, लिंग्याघाट आणि निसणीची वाट यातील गोंधळ दूर झाला होता. महत्त्वाचं म्हणजे जरा लांब आणि तुलनेनं सोपी असणारी देवघाटाची वाट गावकऱ्यांच्या खनपटीला बसून पाहता आली होती.
आमची माहिती आणि आजवरची लिखित माहिती याबद्दल प्रीतीने प्रसिद्ध गिर्यारोहक आणि लेखक आनंद पाळंदे यांच्याशी संपर्क साधला. सह्य़ाद्रीतील डोंगरवाटाचे बायबल समजल्या जाणाऱ्या ‘डोंगरयात्रा’ आणि ‘चढाई उतराई’ या पुस्तकात पाळंदे यांनी असंख्य घाटवाटांवर लिहिलं आहे. आम्हाला मिळालेल्या या नव्या माहितीबद्दल त्यांच्याशी बरीच चर्चा झाली आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं. कोणे एके काळी प्रचलित असणाऱ्या मात्र आता कालौघात विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या या वाटेने आम्हाला जाता आलं हाच आमचा खरा आनंद होता. ट्रेक साधा असो वा अवघड, नवं काय पाहिलं हे महत्त्वाचं असेल तर तो आनंद नक्कीच आम्हाला देवघाटानं दिला होता.

सह्य़ाद्रीत भरपूर वाव – आनंद पाळंदे
उंबर्डी(कोकण) आणि धामणओहळ (घाट) यांना जोडणाऱ्या तीन वाटा, पण कालौघात त्यापैकी देवघाटाची वाट स्थानिकांच्या न वापरण्याने काहीशी विस्मृतीतच गेली. पण नव्या दमाच्या या तरुण भटक्यांनी केलेल्या भटकंतीमुळे माझ्या नोंदीत भरच पडली आहे. सह्य़ाद्रीत आता नवं काही असं कोणी म्हणत असलं तरी आजही अशा आडवाटांच्या भटकंतीला वाव आहे. त्याच्या नोंदी व्हायला हव्यात. मात्र नोंदीमध्ये डावीकडे-उजवीकडे जावे असे न लिहिता दिशादर्शन व्यवस्थित असावे. अंतराची नोंद हवी. वाटेवरील पाण्यांच्या टाक्यासारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या नोंदीमुळे इतिहासाच्या अभ्यासालादेखील चालना मिळते. अर्थात अशा आडवाटांवर जाताना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण असणे श्रेयस्कर. डोंगरभटक्यांचे काही गट आवर्जून अशा भटकंती करतात आणि चढाई उतराईच्या नव्या नोंदी करतात हे नक्कीच आनंददायी आणि स्वागतार्ह आहे.