हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘विन्या उठलास का? चार वाजलेत. साडेपाचला येतोय तुझ्या घराखाली. आवर पटकन.’ शनिवार सकाळचा अत्यंत परिचित असणारा हा संवाद. विनयला अलार्म कॉल करून झाल्यावर मीही तयारीला लागलो. संदर्भ पुस्तकं, नकाशे, खादाडीचं सामान आणि इतर आवश्यक वस्तू सॅकमध्ये आपापल्या जागी स्थानापन्न झाल्या. बुटाच्या नाडय़ा आवळल्या गेल्या, बाईक सुरू केल्याचा आवाज पहाटेच्या शांत वातावरणाला क्षणार्धात चिरत गेला.. आणि नाशिकच्या दिशेने एका अनवट सफरीची सुरुवात झाली!!
नगर जिल्ह्यातल्या भैरोबा दुर्ग – पेमगिरी आणि नाशिक जिल्ह्यातल्या बहुला – त्रिंगलवाडी या परिचित-अपरिचित गिरीदुर्गाच्या भेटीची ओढ लागून जवळपास महिना उलटला होता. पण चांगल्या कामांना योग्य वेळी योग्य मुहूर्त सापडतोच असं नाही. सबमिशन्स, क्लासेस, परीक्षा आणि अधूनमधून घरच्यांची मुक्ताफळं या सगळ्या गोष्टी एकदाच्या विनासायास पार पडल्या आणि नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवार-रविवारी दोन दिवसांत चार किल्लय़ांच्या ट्रेकवर अखेर शिक्कामोर्तब झालं. शनिवारी पहाटे घरातून बाहेर पडताना मातोश्रींनी टोला हाणलाच..
‘दर रविवारी उनाडक्या करता. काही लाज-लज्जा आहे की नाही??’
‘आहे ना. पण जी काही आहे ती ट्रेकला बरोबरच घेऊन चाललोय!!!’
विनयला नाशिक फाटय़ावरून उचललं आणि नारायणगावजवळच्या एका ढाब्यावर र्तीबाज रस्सा वडा आणि मिसळ हादडून बोटा गावामार्गे कोतूळ रस्त्याला लागलो. आज भैरोबा दुर्ग आणि त्रिंगलवाडी किल्ला बघून बहुला पायथ्याला मुक्काम टाकायचा होता. कोतूळहून भैरोबा दुर्गाच्या पायथ्याला पोचताना विहीर गावापाशी डावीकडे कुंजरगडाची भव्यता मात्र नजरेत भरली. कोतूळवरून भैरोबा दुर्गाचं पायथ्याचं कोथळे गाव हे हरिश्चंद्रगडाच्या टोलार खिंडीचा विरुद्ध दिशेचा पायथा आहे. ट्रेकर्स सामान्यत: खिरेश्वर बाजूने टोलार खिंड चढून हरिश्चंद्रगडावर पोहोचतात. पण कोथळे गावातून जाणारा मार्ग हा खिरेश्वर बाजूने येणाऱ्या रस्त्याला टोलार खिंडीत येऊन मिळतो आणि पुढे दोन्ही वाटा हातात हात घालून गडावर प्रवेश करतात.
कोथळ्यापासून भैरोबा दुर्गाचा छोटासा कातळकडा सहज नजरेत भरला आणि किल्लय़ावर आपली एन्ट्री सुकर करणारी शिडीही दृष्टीस पडली. कोथळे गावापासून किल्लय़ाचा पायथा अगदी जवळ आहे. पायथ्याच्या दोन झापांपाशी पोहोचताना डावीकडे टोलार खिंडीचा मार्ग दाखवणारी पाटीही दिसली. हरिश्चंद्रगडाचं घनदाट जंगल हे कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्याअंतर्गत संरक्षित केलं आहे. भीमाशंकर अभयारण्याचं प्रमुख वैशिष्टय़ असलेली शेकरू खार या परिसरातही सापडत असल्याने या जंगलाला विशेष महत्त्व आहे.
कोथळ्यातून अध्र्या तासात भैरोबा दुर्गाचा माथा आम्ही गाठला. वर बघायला फार काही नसतानाही खिळवून ठेवणाऱ्या दृश्यांनी मात्र आमचा बराच वेळ खाल्ला!! पायथ्याशी परत येताना सरकारी कर्मचारी असूनही इमानेइतबारे काम करणारे दोन वनसंरक्षक भेटले. या भागात बिबटय़ांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. शेकरूही दिसतात आणि औषधी वनस्पतीही मोठय़ा प्रमाणात आहेत अशी माहिती मिळाली. पायथ्यापासून भैरोबा दुर्ग पाहून पुन्हा खाली यायला दोन तास पुरतात. कोथळ्याहून सुमारे २५ किलोमीटर्सचं अंतर पार करून आम्ही राजूर गाठलं तेव्हा एक वाजत आला होता. राजूरला पोचतानाच पोटात खड्डा पडल्याने एसटी स्टॅन्डजवळच्या शुभम नावाच्या हॉटेलमध्ये घुसलो आणि ‘राजूर’ हे नाव काढल्यावर आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसंग घडला.
‘जेवण तयार आहे’ अशी पाटी वाचून आम्ही आत गेलो. पाचेक मिनिटं कोणाचाच पत्ता नाही. विनयने आवाज दिला तेव्हा आतून एक माणूस डोळे चोळत आणि जांभया देत बाहेर आला.
‘काय पायजे??’ आपल्या सुटलेल्या पोटावरून हात फिरवत त्याने विचारलं. आता हॉटेलमध्ये आम्ही काय आमची फाटलेली पॅन्ट शिवायला आलो होतो??
‘काय पायजे म्हणजे??’
‘काय पायजे म्हणजे काय पायजे??’ पुन्हा तेच
‘अहो जेवण मिळेल का? आम्ही त्याकरताच आलोय.’
‘नाय. आचारी पोरगा इमर्जन्सीमुळे घरी गेलाय. जेवण बनवायला कोणबी नाहीये. बायको हाये पण ती पण झोपलीये. हॉटेल बंद झालंय.’ आता मात्र आमची वाचाच खुंटली. कारण दार सताड उघडं असताना हॉटेल बंद असतं हा शोध आम्हाला पहिल्यांदाच लागला होता.
‘अहो पण बाहेर तुम्ही पाटी लावलीये जेवण तयार आहे म्हणून.’
‘त्याच्यायला ते चुकून राहिली भायेरच. एक काम करा, गावाबाहेर अकोले रोडला मातोश्री ढाबा आहे. तिकडे जावा. कधीपण जेवण मिळतं.’ या महापुरुषाने स्वत:च्या ऐवजी दुसऱ्याच्या हॉटेलचं मार्केटिंग करून शब्दश: आमच्या पोटावर पाय दिला.
भरलेली पोटं आणि तृप्त झालेलं मन घेऊन आम्ही आता घोटीच्या दिशेने सुसाट निघालो. भंडारदरा धरणाच्या पाश्र्वभूमीवर रतनगड आणि पाबरगड कमालीचे उठून दिसत होते. समोरचं कळसूबाई शिखर आभाळात झेपावलं होतं. पश्चिमेकडे अलंगचा विस्तार स्पष्टपणे जाणवत होता. बारी गावापाशी आल्यावर रतनगडाच्या मागे कात्राबाई खिंडीनंही दर्शन दिलं तर नैर्ऋत्येला आजोबाच्या शिखरानंही डोकं वर काढलं. बारी गावाची खिंड आम्ही ओलांडली आणि जादूची कांडी फिरावी तसं दृश्य समोर अवतरलं!!! पश्चिमेला कळसूबाई, अलंग-मदन- कुलंग, पूर्वेला बितनगड, शेणीत सुळका, महांकाळ डोंगर, पट्टा, औंढा, म्हैसवळण घाट आणि टाकेद-देवळालीचा प्रदेश, वायव्येला मोरधन तर ईशान्येला बहुला आणि कावनई.. आंबेवाडी फाटय़ाला स्तंभित होऊन आम्ही हे दृश्य बघतच बसलो. जिथे नजर जावी तिथे फक्त सह्याद्रीच!!! आभाळाला भिडलेल्या त्या रौद्र कडय़ांपुढे आपण किती क्षुल्लक आहोत याची क्षणार्धात जाणीव झाली. सह्याद्रीची ही रंगलेली मैफल संपूच नये असं क्षणभर वाटून गेलं. नकळत दुखावला जाणारं ‘अहं’ आणि तत्त्वांशी एकनिष्ठ असणारं ‘स्वत्व’ धाडकन कोसळून पडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. भरून आलेलं मन आणि सर्वागावर उभे राहिलेले रोमांच. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळाली होती!!
घोटी गावातून मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडून टाके फाटय़ामार्गे आम्ही त्रिंगलवाडीकडे निघालो तेव्हा उन्हं कलायला लागली होती. म्हाळुंग्याच्या अजस्र डोंगराला वळसा घालून पुढे आलो तेव्हा त्रिंगलवाडी किल्ला त्रिंगलवाडी जलाशयात स्वत:चंच रूप न्याहाळीत उभा होता. त्रिंगलवाडी गावातून पुढे येऊन किल्ल्याच्या अॅक्च्युअल पायथ्याला गाडी लावली तेव्हा शेजारच्या घरांमधली पोरं आणि बाया बाहेर डोकावल्या. ‘लेणी आणि किल्ला दाखवतो. शंभर रुपये द्या फक्त.’ सोमनाथ नावाच्या षोडशवर्षीयाने आपणहूनच तयारी दाखवली. त्याला बरोबर घेऊन गावाची शेतं तुडवत निघालो.
संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात उजळून निघालेला कातळकडा कमालीचा सुंदर दिसत होता. याच्या डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूने माथा गाठता येतो. डावीकडच्या पायवाटेने सरळ गेल्यावर वीस मिनिटांत गडाच्या दरवाजाकडे नेणाऱ्या पायऱ्या सुरू होतात. डावीकडून दरवाजातून किल्ल्यावर पोचून उतरताना उजव्या कातळकडय़ावरून येता येईल.
त्रिंगलवाडी किल्ल्यावर पाण्याची तशी वानवाच आहे. पण किल्ल्यावरून चारही बाजूंना सुंदर दृश्य मात्र मिळालं. भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश आणि सर्वात सुखावून जाणारे कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग!!
किल्ला उतरून साडेसहाच्या सुमारास आम्ही घोटीला पोहोचलो तेव्हा पश्चिमेकडे एक विलक्षण सुंदर दृश्य साकारलं होतं. निरभ्र आकाशाच्या कॅनव्हासवर जांभळ्या-गुलाबी रंगांची झालेली स्वैर उधळण, त्या रंगपंचमीत स्वत:ला चिंब भिजवणारे कळसूबाई, अलंग-मदन- कुलंग, संध्याकाळचा सुटलेला गार वारा आणि योगायोगाने नेमकं त्याच वेळी आयपॉडवर लागलेलं लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातलं ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’.. एक अविस्मरणीय संध्याकाळ अॅण्ड अ वेल स्पेण्ड डे!!!
त्या धाब्यावर वेळेचे सगळे नियम धाब्यावर बसवत बराच वेळ टाइमपास केला आणि शेवटी भानावर येऊन नाशिकच्या दिशेने सुसाट निघालो. आज रात्री किमान दहाच्या आत तरी आंबे बहुला गावातलं मंदिर मुक्कामासाठी गाठणं आवश्यकच होतं. मुंबई-आग्रा हायवेवर वाडिव्हरेच्या अलीकडे एका पंक्चरवाल्याच्या दुकानात आम्ही जेव्हा ‘आंबे बहुला’ गावाचा पत्ता विचारला तेव्हा दुकान मालक आणि त्याच्या पोऱ्याने फक्त मख्ख चेहरे करून एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्या तोंडून ‘वाडिव्हरेहून न्यूजर्सीला जाणारी जीप किती वाजता मिळेल हो?’ असला काही तरी अचाट आणि अगम्य प्रश्न ऐकल्यासारखे भाव उमटले. दहा-बारा सेकंद अशीच शांततेत गेली आणि अचानक काही तरी आठवून त्या तेजस्वी महापुरुषाच्या ओजस्वी वाणीतून शब्द्फुलं प्रकटली.. ‘हमें मालूम नाही!!!’. आता मख्ख चेहरे करण्याची वेळ आमच्यावर आली होती. त्या सत्पुरुषाच्या मेंदूतलं जीपीएस नाशिक जिल्ह्यात कुठे तरी भरकटल्याने त्याने आम्हालाही स्टॅण्डबायवर टाकून दिलं होतं. अंधारात बुडालेला मुंबई-आग्रा महामार्ग, त्यावरून सुसाट धावणाऱ्या गाडय़ा आणि त्यातला किमान एक तरी दुर्दैवात्मा याचक बनून आपला धंदा करून देईल, या अपेक्षेने त्या सुनसान जागेत उभा असलेला तो पंक्चरवाला. बाकी त्या रस्त्यावर (जिवंत) माणसाचा मागमूसही नव्हता. तेवढय़ात विनय माझ्या कानात कुजबुजला ‘अबे त्याच्याकडून दोन्ही चाकात हवा भरून घे, मग त्याला बरोबर आठवेल!!!’ मला त्या परिस्थितीतही फिस्सकन हसू आलं. इतक्यात आमच्या सुदैवाने एक माणूस हवा भरायला त्या दुकानात आला. तो वाडिव्हरेचाच राहणारा असल्याने त्याने आम्हाला आंबे बहुलाचा अचूक पत्ता सांगितला. मुंबईहून नाशिककडे जाताना घोटीहून अंदाजे पंधरा किलोमीटरवर वाडिव्हरे गाव आहे. या गावानंतर नाशिकच्या दिशेने सरळ गेल्यावर रायगडनगर नावाची एक कॉलनी लागते. इथूनच रस्ता ओलांडायचा आणि पलीकडच्या आंबे बहुला फाटय़ावरून बहुला पायथा गाठायचा. नाशिकहून विल्होळी गावानंतर अंदाजे दोन किलोमीटरवर आंबे बहुला फाटा आहे (थोडक्यात वाडिव्हरे आणि विल्होळीच्या मध्ये आंबे बहुला फाटा आहे). या फाटय़ावरचं ‘विजयानंद हॉटेल’ हे या फाटय़ाची मुख्य खूण.
त्या बाइकवाल्या तारणहाराचे आभार मानून आम्ही आता नाशिकच्या दिशेने निघालो. वीसेक मिनिटांनंतर शेवटी एकदाचं ते रायगडनगर सापडलं, त्याच्या पुढचं ते विजयानंद हॉटेल सापडलं, त्या हॉटेलला चिकटून आत जाणारा आंबे बहुलाचा रस्ता सापडला आणि त्या रस्त्याची दिशादर्शक पाटीही सापडली!!!
साडेनऊच्या सुमारास आम्ही आंबे बहुलामध्ये पोचलो तेव्हा गावातल्या विठ्ठल मंदिरातलं भजन कमालीचं रंगात आलं होतं. विठुनामाचा गजर अगदी टिपेला पोचला होता. मंदिराच्या बरोब्बर समोर असलेल्या किराणामालाच्या दुकानात आम्ही मंदिरात राहू का असं विचारल्यावर अर्थातच होकार आला. आता भजन संपण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण साडेनऊला सुरू झालेलं भजन बारा वाजले तरी संपेचना!! शेवटी साडेबाराच्या सुमारास सगळी आवरावर झाल्यावर आमची रवानगी मंदिराच्या वरच्या अतिशय स्वच्छ अशा माळ्यावर झाली आणि मागून अंथरूण-पांघरूण आणि पाण्याची कळशीही पुरविण्यात आली. साडेनऊ ते साडेबारा या तीन तासांच्या दीर्घाकात दुकानाच्या कट्टय़ावर रंगलेल्या आमच्या गप्पांचा हा परिणाम. दुकानाचा मालक (दुर्दैवाने आत्ता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही पण प्रमोद असावं असं पुसटसं आठवतंय) म्हणजे साधारण तिशीतला भलताच मनमिळावू आणि अत्यंत आतिथ्यशील स्वभावाचा माणूस. त्याने त्याच्या तुकाराम ढगे नावाच्या मित्राला आणि गावातल्या बाकीच्या तरुण पोरांनाही आमच्या सभेत सामावून घेतलं आणि साडेबारापर्यंतचा आमचा वेळ अगदी सुस झाला.
मंदिर मोकळं होताच विनय झोपायला पळाला आणि आमच्या गप्पा तशाच पुढे सुमारे दीड वाजेपर्यंत रंगल्या. त्यात मग नाशिक आणि परिसरातल्या किल्ल्यांच्या इतिहासापासून ते शहरातील नोकरीच्या संधी इथपर्यंत अनेक विषयांचा समावेश होता. प्रमोद आणि सेनेला मात्र आम्ही पुण्याहून बाइकवर इतक्या लांब आल्याचं भारीच कौतुक वाटत होतं. उद्या हेच मंडळ आमच्याबरोबर किल्ल्यावर येणार होतं. त्यांचा निरोप घेतला. रात्री अंथरुणाला पाठ टेकली त्याचक्षणी स्वर्गीय सुखाची लहर शरीरात स्पष्टपणे जाणवली. ट्रेकचं अर्ध टार्गेट आज पूर्ण झालं होतं. उद्याचा दिवस आता आमची वाट पाहत होता!!
(पूर्वार्ध)
ओंकार ओक