नेपाळमधल्या २५ एप्रिलच्या भूकंपात अक्षरश: काळच हललेला आम्ही पाहिला, कसेबसे भारतात पोहोचलो, पण पुन्हा ३० एप्रिलला नेपाळमध्ये पोहोचलो, गिरिप्रेमी देशाला ‘गिरिप्रेमीं’कडून मदत करण्यासाठी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या पाच वर्षांपासून एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू अशा अनेक यशस्वी मोहिमांनतर यावर्षी मात्र मोहिमांऐवजी सुट्टी घालविण्यासाठी कुटुंबासह नेपाळमध्ये पोहचलो. आणि २५ एप्रिलला सकाळी तो भयंकर भूकंप झाला. ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप काय असतो, याची प्रचीती आम्हाला ‘याचि देही याचि डोळा’ आली.
तिथून परतलो तरी माझे मन मात्र नेपाळ सोडत नव्हते. हिमालयाच्या अनेक मोहिमा करताना, आमचे एक वेगळे नाते या देशाशी जोडले गेले आहे. त्या ठिकाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर नैसर्गिक संकट आल्यानंतर आपण आपल्या परीने काही तरी करावे, हा विचार मनात सतत घोळत होता. परतीच्या प्रवासादरम्यान आमच्या पुण्यातील ‘गिरिप्रेमीं’च्या सहकाऱ्यांशी संपर्कात होतो. भूषण हर्षे, रुपेश खोपडे व इतर दहा जणांचा गट, मी पुण्यात दाखल होण्याआधीच कामाला लागला होता.
मी २८ एप्रिलला पुण्यात दाखल झालो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. ३० एप्रिलला सकाळी, आमचा दहा जणांचा गट तंबू, ‘वॉकीटॉकी’, ‘जीपीएस’ व मेडिकल किट घेऊन काठमांडूमध्ये दाखल झाला. यामध्ये भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे, विशाल कडुस्कर, टेकराज अधिकारी, अतुल मुरमुरे, अक्षय पत्के, आनंद माळी, रुपेश खोपडे, दिनेश कोतकर यांचा समावेश होता. हे सर्वच जण कसलेले गिर्यारोहक होते. त्याचबरोबर त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे रीतसर प्रशिक्षणही घेतलेले होते. तसेच, ‘रेडक्रॉस’ या जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षणदेखील घेतले होते. याआधी याच गटाने २०१३ सालच्या उत्तराखंड महाप्रलयात आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले होते.
नेपाळमध्ये परत जाताना काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली होती. नेपाळमधील लोकांना या महाभयंकर आपत्तीतून सावरण्यासाठी धीर देणे, आरोग्य शिबिरे, गरजूंना तांदूळ, ताडपत्री व इतर आवश्यक साधनसामग्री पोहोचवणे, दवाखान्यांना भेटी देऊन काही रक्ताची आवश्यकता असल्यास त्याची पूर्तता करणे, अजूनही या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे आणि नेपाळच्या ज्या दुर्गम भागामध्ये या भूकंपाचा परिणाम अधिक झाला आहे तेथे मदत पोहोचविणे. कारण या भागामध्ये जाण्यासाठी ट्रेकिंग करत जावे लागते, त्यासाठी आमच्या या गटाचा उपयोग जास्त होणार होता. याचबरोबर पुण्यातील एक गट आमच्या मदतीसाठी सज्ज होता. यामध्ये निरंजन पळसुले, गणेश मोरे, प्रसाद जोशी, चंदन चव्हाण आदी लोक आमच्या कामात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी पुण्यातील बाजू सांभाळत होते.
काठमांडूमध्ये दाखल झाल्यानंतर आम्ही काही भागांची पाहणी केली. यामध्ये ‘धादिंग’ या अतिदुर्गम व डोंगराळ भागामध्ये काम करण्याची गरज असल्याचे जाणवले. त्याचबरोबर नेपाळमधील लोकांना सध्या अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे निवारा. त्यासाठी आम्ही ‘टोर्पेलीन’चे तंबू उभारण्यास सुरुवात केली. दुर्गम भागातील लोकांना तात्पुरती राहण्यासाठी व्यवस्था करून दिली. यासाठी आम्हाला नेपाळ येथील ‘पिक प्रमोशन’ संघटनेचे केशव पौडीयाल व तसेच पुण्यातील ‘मैत्री’ संस्थेचे शिरीष जोशी यांनी मोलाची मदत केली. जोशी यांनीच काठमांडूपासून सुमारे २०-२५ किमी अंतरावर असलेल्या ‘बलाजू’ या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाल्याचे कळविले. आम्ही तेथे तातडीने पाहणी करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा तेथील विदारक चित्र पाहून आमचे मन हेलावून गेले. दगड-विटांचे ढिगारेच फक्त समोर दिसत होते.
कोसळलेल्या इमारती, उद्ध्वस्त झालेले संसार, मिळेल तेथे आसरा शोधणारे लोक आम्हाला सर्वत्र दिसत होते. रस्ते व वाहतुकीच्या सोयी असणाऱ्या भागांमध्ये मदत हळूहळू पोहोचत होती, पण अजूनदेखील काठमांडूपासून १५०-२०० किमी अंतरावर असलेले दुर्गम भाग मदतीपासून वंचित होते. यापैकी ‘धादिंग’ व ‘सिंधुपालचोक’ या दोन दुर्गम जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर हानी झाल्याचे समजले. आम्ही लगेच कामाची आखणी करून रुपेश, आनंद व अक्षय यांना ‘धादिंग’ जिल्ह्य़ातील खेडय़ामध्ये पाहणीकरिता पाठविले तर डॉ. सुमित व टेकराज हे ‘सिंधुपालचोक’ येथील ‘थिंपो’ या गावी गेले. येथे गेल्यावर जाणवले की ही गावे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. खूप मोठय़ा प्रमाणावर यांना मदतीची गरज आहे. परंतु एवढी मदत सामग्री काठमांडूमध्ये उपलब्ध होऊच शकत नव्हती. आम्ही ही सर्व सामग्री लखनौहून मागविली. तब्बल १७०० किलो वजनाची विविध साधनसामग्री वेळेत पोहोचवण्यासाठी विजय जोशी यांचे प्रयत्न कामास आले.
या सर्व दुर्गम भागामध्ये आम्ही सर्व जण गटागटाने कामे करत होतो. छोटय़ा खेडय़ांची पाहणी करून काय मदत पोहोचवता येईल याची आखणी करत होतो. हे करत असताना आम्ही ‘त्रिपुरेश्वर’ नामक खेडय़ामध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा तेथील स्थिती बघून अंगावर काटा आला. एकूण २२५ घरांपैकी सुमारे २१२ घरे जमीनदोस्त झाली होती. सर्व गावच या धक्क्याने सैरभर झाले होते. या सर्वासाठी तंबू ठोकून, वैद्यकीय उपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. काही दिवस पुरेल एवढे अन्न त्यांना दिले. सरकारी मदत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी हालचाली केल्या. हे गाव सोडताना गावातील लोकांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमच्या डोळ्यांच्या कडादेखील पाणावल्या.
दुसरीकडे डॉ. सुमित व आनंद हे दोघे धादिंग जिल्ह्य़ातील ‘दारखा’ या गावी काम करत होते. जवळपास ७०-८० किलो साधनसामग्री घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचले होते. भूकंपानंतर तब्बल आठ दिवसांनी देखील येथे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत गावामध्ये पोहोचली नव्हती. दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये आनंद व सुमित यांनी ५०-६० जखमींवर प्रथमोपचार केले. आणखी काही दिवस पुरतील एवढी वैद्यकीय साधने व औषधे स्थानिक वैद्यकीय कर्मचाऱ्याकडे देऊन ते दोघे काठमांडूला परतले. दहा दिवस जमेल त्या पद्धतीने मदत करून सगळे पुण्याकडे रवाना झालो, परंतु मन मात्र नेपाळ सोडत नव्हते.
खरेतर नेपाळ हा फार गरीब देश आहे. या देशावर एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. या देशातील लोक गरीब असले, तरी मनाने व शरीराने कणखर आहेत. एवढय़ा न भरून येणाऱ्या जखमा झाल्यानंतरदेखील, ते हळूहळू उभे राहत आहेत. त्यांना गरज आहे ती धीर देण्याची आणि त्यांना मदत करण्याची. लवकरच आता पावसाळा सुरू होईल आणि गावोगावी ढिगाऱ्याखाली गाडलेले प्राणी कुजण्यास सुरुवात होईल. याचा सर्व परिणाम हा मनुष्यावर, निसर्गावर होणार आहे. त्यासाठी तातडीने त्या ठिकाणी मदत करणे आवश्यक होते आणि अजूनही आहे. भारतीय सैन्य, इतर आपत्ती व्यवस्थापन दलं, उत्तमरीत्या काम करीत आहेच, पण त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी आम्ही तेथे दाखल झालो होतो.
नेपाळबरोबर असलेल्या भावनिक नात्याबरोबरच माणुसकीच्या नात्यासाठी हे सर्व करणे, हे आमचे कर्तव्यच होते आणि ते आम्ही छोटेखानी पद्धतीने पार पाडले, यात आनंदच आहे. यामध्ये आम्हाला जाणवला तो नेपाळी लोकांचा प्रामाणिकपणा. या सगळ्यात कुठेही लुटालूट, चोरी आम्ही अनुभवली नाही, ही खूपच जमेची बाजू! असा हा नेपाळ लवकरात लवकर उभा राहावा, अशी सदिच्छा मनात आहेच! ‘गिरिप्रेमी’ आपल्या परीने सहकार्य करते आहे, करीत राहील, याचे एक सार्थ समाधान आहे.