एरवी सगळ्यांनाच आयुष्यभर पोटापाण्याच्या उठाठेवी कराव्या लागत असल्या तरी हाडाच्या ट्रेकरला त्यातूनही उसंत काढता येते. दर काही काळानं सह्य़ाद्रीचं वारं अंगाखांद्यावरून खेळलं नाही तर त्याची घुसमट व्हायला लागते. मग त्याच्यामधला जिप्सी घराबाहेर पडून डोंगरवाटा धुंडाळायला लागतो.
आम्हा ट्रेकर्सच्या मनात मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी कवितेमधला एक ‘जिप्सी’ खोलवर दडलेला असतो. एरवी पोटापाण्यासाठी ‘नस्त्या उठाठेवी’ करतानाही, ‘सख्या सह्यद्री’ची ओढ स्वस्थ बसू देत नाही. अन्, कोणे एके दिवशी- वळणवेडय़ा रानवाटांची, रानफुलांच्या घमघमाटाची, रौद्र कातळभिंतींची, भारावून टाकणाऱ्या दुर्गरचनेची, तंगडतोड माळरानांची, पूर्वजांच्या उत्तुंग कर्तृत्वाची गाथा सांगणाऱ्या कोरीव लेण्यांची, कुण्या पाखरांच्या मोहक शिळांची, दाट अंधाऱ्या रानव्याची- ‘रानभूल’मनी दाटून येते..
गेल्या आठवडय़ात असंच काहीसं झालं, अन् बेत शिजू लागला सह्यद्रीच्या आडवाटांच्या ट्रेकचा…
..‘फार दिवस ट्रेकला जाऊ दिलं नाही, तर या प्राण्याला (अस्मादिकांना) आवरणं मुश्कील होतं’, हे ऑफिसमधल्या अन् घरातल्या बॉसनी भोगलेलं असल्यानं ट्रेकसाठी सुट्टी लग्गेच मंजूर झाली. बहुतांशी ट्रेकर दोस्त संसारी कामांमध्ये अडकल्याने एकटा मिलिंद या ट्रेकला येऊ शकणार होता. छोटय़ा तुकडीनं भटकंती करण्याचे संभाव्य धोके गृहीत धरले. ट्रेकमध्ये पायथा – मध्य – शेवट अशा ठिकाणी पाणी अन् वस्ती असेल, पण सह्यद्रीची अफलातून दृश्यं अन् तंगडतोड चाल असेल, अशा अटी लादून घेतल्या. संदर्भपुस्तकं, गुगल मॅप्स धुंडाळले, करायच्या ट्रेक्सची यादीच रवंथ केल्यावर ट्रेक कुठल्या भागात, कसा असावा हे हळूहळू स्पष्ट होऊ लागलं.
लोणावळ्याच्या दक्षिणेला तेलबैला – घनगड – सुधागड असे नितांतसुंदर अन् ट्रेकर-प्रिय दुर्ग आहेत. या मुलखात तथाकथित विकासाच्या रेटय़ामुळे निसर्गाला ओरबाडून उभारलेली खासगी पर्यटनस्थळे आली, अन् इथली दुर्गमता हरवू लागली. असं असलं, तरी या मुलखातल्या पायथ्याच्या कोकणपट्टी अन् सह्यद्रीच्या घाटमाथ्याला जोडणाऱ्या काही जुन्या ‘घाटवाटा’ (दुर्गम पाऊलवाटा. डांबरी रस्ते नव्हेत) ट्रेकचा रसदार अनुभव देणार, या विश्वासावर आम्ही कूच केलं.
‘खडसांबळे लेणी’
भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत खोपोली-पाली रस्त्यावर आमची कार दौडत होती. तेजोनिधि लोहगोल गगनराज भास्कराच्या दिव्य तेजाने दूरवर तेलबैल्याच्या जुळ्या भिंती झगमगत होत्या.
ठाकूरवाडीपाशी पाठीवर सॅक चढवल्या. १०० मी. उतरून खडसांबळे गावाजवळ नदी पार करून मागं वळून बघितलं, अन् थबकलोच. उत्तरेला सुधागडच्या पहाडाशी लगट करत खोलवर धावलेली सह्यद्रीची मुख्य रांग, अन् पाठीमागच्या चिंचोळ्या खोऱ्यात उठवलेल्या तेलबैल्याच्या खडय़ा कातळभिंती – असं देखणं दृश्य!
खडसांबळे गावापासून पाऊणेक तास अंतरावर लेणी लपली आहेत. थोडक्या चढाईनंतर पदरातून आडवं गेलो. उजवीकडे उतरणाऱ्या डोंगरसोंडेला वळसा घालून पल्याड जंगलात कुठे तरी ही कोरीव लेणी असणार होती. दिशाशोधनाचे फंडे वापरत, घनगडकडे जाणाऱ्या नाळीच्या वाटेची दिशा डावीकडे सोडली. ओढय़ाच्या पात्रापलीकडे शेकडों फुलांनी घमघमणाऱ्या करवंदीच्या जाळ्या होत्या. कधी बघितल्या नसतील इतक्या, १५ फूट उंचीच्या. वैराण माळावरची आडवी वाट तुडवत सोंडेला वळसा घालून दाट रानात शिरलो. अखेरीस उभ्या कडय़ाच्या पोटात लेण्याची जागा दिसली. झाडोऱ्यातून सूर्याची कोवळी किरणं अलगद उतरत होती.
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात खोदलेलं हे लेणं हीनयान बौद्ध शैलीतलं (बुद्धाची पूजा ‘स्तूप’ चिन्हरूपाने करणारं) आहे. काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी मुंबई मराठी मिशनचे रेव्हरंड अॅबट यांनी १८८९ साली प्रकाशात आणली. खडसांबळे लेण्यांना ‘पांडवलेणी’ किंवा पायथ्याच्या गावच्या नावावरून ‘नेणावलीची लेणी’ अशा नावानेदेखील ओळखतात. कातळात कोरून काढलेल्या प्रशस्त दालनात २१ विहार अन् एक स्तूप आहे. या लेण्याच्या पश्चिमेला अध्र्या किमी अंतरावर दुर्गम जागी अजून १० विहार आहेत. (संदर्भ : सांगाती सह्यद्रीचा)
लाल मुरुमाच्या स्तरात कोरल्या असल्याने लेणी फारंच भग्नावस्थेत आहेत आणि खोदाईची सफाई साधी आहे.
एखादं कोरीव पाण्याचं टाकं दिसलं खरं, पण साधारणत: अन्य लेण्यांमध्ये दिसणारी पाण्यानं भरलेली टाकी किंवा शिलालेख असंही काही दिसेना. कातळाची योग्य पत नसल्याने अन् पाण्याच्या अभावाने या लेणी किती वापरल्या गेल्या असतील यात शंका वाटली. लेण्यांच्या तोंडापाशी दगडांचा खच पडलेला. बेचक्यात असल्यानं वारं नाही. अख्ख्या दालनात वटवाघळाच्या विष्ठेचा सडा पडलेला. त्यामुळे मुक्कामाचा बेत आखायला अयोग्य ठिकाण. पण, पुढची काही शतकं सह्यद्रीत लेणी खोदण्याचा जो भव्य उपक्रम चालू राहिला, त्यातला पहिल्या काही प्रयोगांपैकी एक- म्हणून इतक्या आडवाटेला जाऊन आम्ही ही लेणी धुंडाळली अन् खडसांबळे गावात परतलो.
‘नाणदांड घाटा’ची चढाई
प्राचीन बंदर चौलपासून सह्यद्री घाटमाथ्यावर चढणाऱ्या जुन्या अनेक घाटवाटांपैकी तीन व्यापारी घाटवाटा- नाणदांड घाट, नाळेची वाट अन् घोणदांड घाट या खोऱ्यात आहेत, तर त्यांचे संरक्षक दुर्ग कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला अन् घनगड असे दिग्गज. सर्वात जलद चढणारी अन् वापरातली असली, तरी ‘नाळेची वाट’ चिंचोळ्या झाडीभरल्या घळीतून चढताना घामटं काढते.
आम्ही मात्र उत्तरेला सुधागडपासून खोलवर आत गेलेल्या सह्यद्रीच्या भिंतीचं अन् तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अनोखं दर्शन घेण्यासाठी लांबची ‘नाणदांड घाटा’ची वाट घेतली. उन्हाचा ताव अन् आद्र्रतेनं जीव कासावीस होणार, हे गृहीत धरलंच होतं. पण पदरातून कातळावरून अन् गवताळ टप्प्यांवरून तासभर आडवं चालताना सागाची वाळकी पानं अचानक सैरभैर उधळू लागली, निळ्याशार आभाळात ढग दाटू लागले, शेतात राब जाळण्यासाठी पानं उतरवलेल्या झाडांची भुंडी खोडं लवू लागली अन् गिरक्या घालणाऱ्या ससाण्याची वाऱ्याच्या तडाख्यामुळे धडपड सुरू झाली. माथ्यावर ढगांनी सावली धरलेली, तर समोर सुधागड ते तेलबैल्याचं सुरेख ‘वसूल’ दृश्य.
‘नाणदांड घाटा’ची सुरुवात सापडताना थोडी खटपट करावी लागली. वाटाडय़ाच्या मदतीची गरज भासली नसली, तरी दिशाशोधनाचे तंत्र-मंत्र-यंत्र वापरून खोऱ्याच्या उजव्या बाजूला चढणारी वाट घेतली. माथ्याकडचा कातळकडा अन् घळ लक्षवेधक होती. फेब्रुवारी असूनही झरे वाहते होते. भुंगे अन् मधमाश्यांची लगबग, आभाळातल्या ढगांच्या मनोहारी लाटा अन् फुलांनी पेटलेल्या पलाशवृक्षांमुळे रानात जिवंतपणा होता. हळूहळू चढत दाट जंगलातून डोंगरधारेजवळ जाऊ लागली. माथ्याकडून उतरलेल्या दांडावरचा मोठ्ठा कातळटप्पा हे ‘नाणदांड’ चढण्यासाठी अचूक दांड ओळखायची खूण. झुडपी रानातून आडवं जात, पुढे कारवी अन् घसाऱ्यावरून उभं चढून नाणदांड सोंडेवरच्या कातळटप्प्यावर पोहोचेस्तोवर चांगलीच धाप लागली. खडसांबळे गावापासून निघून अडीच तास झालेले. घाटाच्या निम्म्या उंचीवर झाडोऱ्यात सॅक्स टेकवल्या. भिरभिरणाऱ्या ढगांच्या सावलीत पाऊण तासाची विश्रांती अन् पौष्टिक जेवण गरजेचंच होतं. प्रत्येक पावलागणिक उभी होत जाणारी दांडाची उभी वाट चढल्यावर, कारवीतून जाणारी बारीक आडवी वाट धम्माल होती. सरसगड-सुधागड-तेलबैला यांचं दर्शन देत, नाणदांड घाट आमच्यावर प्रसन्न झाला. सामोर आलं घाटमाथ्यावरचं ते केवणी गावाचं पठार.
वणव्यात करपलेल्या माळामागे केवणी गाव आणि उठवलेला घनगड हे राकट दृश्य समोर होतं. गावकरी किती दुरून पाणी आणतात, हे कळूनही केवणी गावात समोर आलेल्या पाण्याच्या कळशीचं अगत्य नाकारणं शक्य नव्हतं. केवणीच्या पठारावरून घनगडकडे जाताना खिंडीतून सह्यद्रीच्या रंगमंचावर दिसत होते तेलबैला- सुधागड – घनगड यांच्यासारखे कसलेले कलाकार. सोबतीला तालेवार सोबत होती कोकणात कोसळणाऱ्या असंख्य रेखीव डोंगरधारांची आणि घळींची. गवताळ माळावर दडलेली परीसंस्था (इकोसिस्टीम), झाडावर बहरलेली ऑर्किड्स, त्यावरून अवचित तरंगत जाणारा महाभृंगराज असं किती किती कवतिक सांगू आमच्या सह्यद्रीचं.. अंगावर एक सुखद शहारा आला. कितीतरी वेळ तिथे बसून राहिलो.
रात्रीच्या मुक्कामास एकोले गावच्या मारुती मंदिरात आसरा घेतला. पुनवेच्या टिपूर चांदण्यात गर्रम तांदळाची भाकर, पिठलं, कांदा अन् लाल मिरचीचा ठेचा यांची लज्जत काही औरच.
‘अंधारबन’ची घाटवाट
आदल्या दिवशी घनगडच्या एका अंगाने परिक्रमा झाली होती. दुसऱ्या बाजूच्या सह्यद्रीचं दर्शन घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेचं निघालो. गाडीच्या मदतीने ८-१० किमी दक्षिणेला पिंप्री गावाजवळील पाझर तलावापाशी पोहोचलो, तर पाण्यावर धुक्याचे ढग रेंगाळले होते. आजचा पल्लादेखील मोठ्ठा होता.
वीर नावजी बलकवडे यांच्या स्मारकापासून कुंडलिका दरीचं अन् अंधारबन-नावजी अशा सुळक्यांचं सुरेख दर्शन झालं. कोवळ्या सूर्यकिरणांची ऊब हवीहवीशी वाटत होती. पिंप्री गावापासून तब्बल दोन तास ‘अंधारबन’ जंगलाची आडवी चाल होती. कधी ओढय़ांच्या घळीतून, तर कधी पाचोळ्यातून सह्यद्रीच्या संवेदनशील टप्प्यांमधून दमदार पण सुखद चाल होती. निसर्ग अभ्यासकांसाठी उत्तम अशा या रानात कमीत कमी १५ प्रकारच्या पक्ष्यांनी आम्हाला साद घातली असेल. या रानाला स्वार्थी जगाची दृष्ट लागू नये अशी सह्यद्रीचरणी प्रार्थना. इथल्या निसर्गात कृपया ढवळाढवळ करू नये, अशी पर्यटकांकरिता कळकळीची विनंती!
रानातून बाहेर पडल्यावर सूर्यकिरणांनी डोळे दिपले. घनगडच्या दक्षिण बाजूचं दूरदर्शन घेत हिर्डी गावचं लांबच लांब पठार तुडवलं. शंकराच्या देवळापाशी थंड पाण्याच्या कुंडापाशी गावकऱ्यांशी हितगुज केलं. हिर्डी गावापासून साधारणत: ट्रेकर्स भिरा गावाकडे उतरतात. आम्ही मात्र गाडीपाशी परत येण्यासाठी कमी वापरातल्या वाटेनं नागशेत गावाकडे निघालो. उभ्या उताराच्या टप्प्यांवरून परत एकदा खडसांबळे लेणी डोकावली, मागे केवणी पठार, तो तेलबैल्याचा माथा आणि आमचा सखा घनगड. तासाभराच्या उतराईनंतर धनगरवाडय़ापाशी विसावलो. संत्री-चिक्की-खजूर यांच्या संजीवनीने परत एकदा उत्साहात निघालो अन् अंधारबन घाटाची उंची उतरली. पिंप्री गावापासून अंधारबन जंगल, हिर्डी पठार आणि उरलेला घाट उतरायला साडेचार तास चाल झाली होती.
पाठीमागच्या सह्यद्रीच्या भिंतीच्या वैभवाचं कवतिक करत असतानाच, सामोरं आलं एक निसर्गआश्चर्य. नागशेतच्या अलीकडे नदीच्या पात्रात खोल रांजणखळगे अन् कोंडजाई देवीचं स्थान. स्थानिक भाविक कोंडजाईला साकडं घालत होते.
शेवटचे दोन तास नदीच्या पात्रातून पश्चिमेला जात, खडसांबळे लेण्यांच्या डोंगराला वळसा घातला. नदीच्या पात्रापाशी धुणं धुणाऱ्या पोरी, उन्हाने त्रासलेल्या म्हशी, उगीच इकडे तिकडे बागडणारे बगळे, नदी पात्रातल्या वाळूवर डोळा ठेवणारे कंत्राटदार, बहरलेला पळस, भान हरपून मनसोक्त क्रिकेट खेळणारी पोरं आणि यासर्वाच्या बाजूने सणसणीत तापलेल्या बैलगाडी वाटेने आम्ही चिकाटीने किती चाललो याची मोजदादच नाही. सुधागडच्या पायथ्याला ठाकूरवाडीला कसं(बसं) पोहोचलो ही एक वेगळी कथाच आहे. दोन दिवसांच्या या तंगडतोडीत तांत्रिक चढाई कुठेही नसली, तरी जबरदस्त चाल अन् आडवाटा यामुळे हा ट्रेक फक्त अट्टल ट्रेकर्सची हौस पुरती भागवणारा आहे.
आता शेवटच्या टप्प्यात पोहचलो. या खोऱ्यातली बरीचशी गावं रस्त्यांनी जोडलेली नाहीत. म्हणून पाऊलवाटेवरून बाईक हातात घेऊन जाणारा एक तरुण आम्हाला म्हणाला, ‘‘आरं बाबा, असली चाल तुम्ही लोकंच करा. आमच्यानं नाही व्हायची. तुम्हाला काय सरकारी अनुदान मिळतं का.?’’
त्याला काय अन् कसं समजवावं, की अरे ‘एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून..’