हाडाच्या डोंगरभटक्याला सरधोपट वाटांपेक्षा सह्य़ाद्रीतल्या आडवाटा, घाटवाटा धुंडाळण्यात अधिक आनंद मिळतो. अशा भटकंतीत वाटाडय़ा मिळाला तर उत्तमच, पण मिळूनदेखील त्याने टांग दिल्यावर, वाट चुकल्यावरदेखील डोंगरदऱ्या भटकण्यात एक वेगळाच आनंद असतो.
‘‘ताई, आपण वळवणच्या पुढे आलोय.’’ यज्ञेशच्या वाक्याने जागी झाले. अर्धवट झोपेतून उठवल्यामुळे त्याला जरासा फैलावरच घेतला आणि जेमतेम १२ फुटांच्या त्या कच्च्या रस्त्यावर पुढेमागे करत आमची गाडी वळवणच्या दिशेने वळली. खेडजवळ रघुवीर घाटाच्या घाट माथ्याला पर्वतगडाच्या पायथ्याशी वळवण गाव आहे. गावाच्या आधीच अंबोली घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे शेवटचे घर जंगममामांचे. या भागातल्या जवळजवळ सगळ्या घाटवाटा माहीत असलेला आणि कोणत्याही वेळी सोबत येण्यास तयार असणारा हा एकमात्र गडी.
गावात पोहचलो तेव्हा जंगमदादा गुरांना चारा घालत होते. अस्तान सरीने उतरून खांदाटात चढायचं आहे हे सांगितल्यावर दादा उत्साहाने तयार झाले, पण लगेचच जंगलाचे नियम कडक झालेत वगैरे सांगून पावती फाडावी लागेल म्हणाले. आम्ही तीपण तयारी दाखविली. होळीची सुट्टी असल्याने चौकी बंद आहे असं सांगून सर्वाचे नाव, पत्ते लिहायला लावून माणशी २०० रुपये मांडायला लावले.
‘माणशी २०० रुपये’ हे शब्द ऐकताच हिंदी सीरिअलमध्ये आम्ही सगळे एकमेकांकडे पाहू लागलो.
‘‘काय दादा, काहीही सांगू नका. दिवसाला माणशी ३० रुपयांपेक्षा जास्त कुठेच घेत नाहीत. तेवढे देऊ .’’
‘‘अहो मॅडम, नवा कायदा आलाय, नियम आहे तो.’’
‘‘दादा, येडे समजलात काय आम्हाला? जंगलं आम्हीपण फिरतो. पैसे द्यायला ना नाही, पण कायद्याने घ्या की पैसे. प्रत्येकी ३० रुपयांप्रमाणे पावती फाडा. आमची हरकत नाही.’’
‘‘नाही मॅडम, इथे २०० रुपये आहेत, व्याघ्र प्रकल्पाचे. नवीन पॉइंट बनवतोय आम्ही ट्रेकिंगसाठी. मचाण आणि राहायची सोयदेखील करतोय.’’
‘‘पण दादा, प्रत्येकी २०० रुपये कुठेच नसतात. आम्हाला एवढे परवडणारही नाही. त्यापेक्षा आम्ही परत जातो. कोकणातनं महीपत रसाळ चढतो.’’ सगळे सॅक उचलू लागले. (कायम एकत्र फिरल्याचा हा फायदा असतो. कोणाला काही बोलायची गरज नव्हती. सगळेच नौटंकी.) अखेरीस एका पॉइंटचे ३०० असे दोन पॉइंटचे ६०० रुपये ठरले. आम्ही ७०० रुपये देऊन चालकदादांच्या जेवणाची सोय करायला सांगितली.
वाटाडय़ा होता, म्हणजे रात्री कितीही उशीर झाला तरी गावात पोहोचणार याची खात्री होती. फक्त पाणी आणि शिदोरी घेऊन निघायचे ठरले. एक्स्ट्रा कपडय़ांचा जोड आणि स्लीपिंग बॅगांची रवानगी गाडीत केली. ड्रायव्हरदादांना खांदाट गावचा रस्ता लिहून देऊन आम्ही अस्तान सरीच्या दिशेने सरकलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते.
समोर पर्वतगडाचा पसारा आणि अस्तान सरीच्या डग्ग्यामधल्या घळीत अस्तान सरीची सुरुवात दिसत होती. रस्त्यात दादांच्या गप्पा अखंड सुरू होत्या. जंगलात आंबोळ्या पिकल्या असल्याने त्यावर ताव मारत ३-४ डोकी मागे राहिली. बाकी जंगली फळांवर विश्वास न ठेवणारी दुर्दैवी मंडळी दादांबरोबर पर्वतगडाचा घसारा चढू लागली. अंजनीच्या फुलांचे फोटो काढत खोळंबलेल्या पुढच्या कंपूला गाठून मी दादांना हटकलं. तेव्हा दादा म्हणाले, ‘‘यंदाच्या पावसात खालची वाट मोडली आहे मॅडम. इथून नवी वाट काढली आहे, नेतो की तुम्हाला बरोबर. नवीन पॉइंटपण दाखवतो की तुम्हाला, ट्रेकिंगसाठीच बनवलाय.’’
दादा आम्हाला चांगल्याच खडय़ा चढावरून नेत होते. जसजशी उंची वाढत होती तसतशी अस्तान सरी खाली डावीकडे आणखी खोल जात होती. चढ तीव्र होत गेला तशी पायाखालची वाट आणखीनच निमुळती आणि निसरडी. पावलागणिक दरीची खोली वाढत होती आणि पर्वतगड अधिक नजीक होत होता. अस्तान सरीपासून दूर आणि पर्वतगडाच्या दिशेने चढतोय हे स्पष्ट झाले होते. अस्तानची वाट मोडली आहे सांगून दादा आम्हाला पर्वतगड ओलांडून खांदाटात नेण्याच्या विचारात दिसत होते. दादांना थांबायला सांगून आपल्याला अस्तान गावी उतरून खांदाटात चढायचे आहे. पर्वत ओलांडून खांदाट गाठायचे नाही, असा निरोप वॉकीवरून दिला. दादांनी हा संवाद ऐकला. त्यांना कळून चुकले, ही मॅडम काही ऐकणार नाही. मी माथा गाठेपर्यंत दादांचा सगळ्या कंपूचं मन वळवण्याचा निष्फळ प्रयत्न करून झालेला. वर पोहोचल्यावर दादांनी आपला मोहरा कडय़ाकडे वळवला आणि इथून आपण अस्तान सरीला उतरणार आहोत असं जाहीर केले. जसं काही झालंच नव्हतं. दादा सगळ्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘या खालच्या सगळ्या गावची माणसं इथूनच येतात मल्लिकार्जुनला. इथून उतरला की अस्तान सरी आली की.’’
कडय़ावरून खाली डोकावून पाहिले. थेट काटकोनात अस्तान सरी दिसत होती, पण तिथे पोहोचायला ४०० फुटांचा ८० अंशाचा घसारा सहन करावा लागणार होता. केवळ अशक्य. सुरुवातीच्या १००-१५० फूट तर आधाराला एखादं खुरट झाडदेखील नव्हतं. पुढे घसाऱ्याला कारवीची दाट जाळी होती आणि त्यापुढे एक टप्पा दिसत होता. दादा आणि यज्ञेश वाट शोधायला कडय़ापासून थोडय़ा खाली असलेल्या एका दगडावर उतरले. इथून उतरणं खूपच जोखमीचं होतं, पण आल्या वाटेने जाणंही तितकंसं सोपं नव्हतं आणि निदान दोन तासांची फोडणी पडणार ती वेगळी. वाट जोखमीची आहे यात दुमत नव्हतेच, पण मागे फिरायचे की जोखीम पत्करायची? यज्ञेश आणि दादा आणखी खाली उतरले. त्या दिशेला पाहणाऱ्या सागर आणि विशालच्या माना नकारार्थी फिरताना मला दिसत होत्या. विशाल वाटेची मापं काढून मला ऐकवू लागला होता, दादा कसं उतरायचं ते सांगत होते.
मी दगडावर पोहोचले, खरंच पॅच अवघड होता. जरा तोल गेला तर काही खैर नाही. मध्ये एक १० फुटांचा सरळसोट पॅचपण होता. एव्हाना यज्ञेश आणि मामा थेट कारवीच्या जंगलात पुढे पोहोचले होते आणि पुढे रस्ता ओके असल्याचा सिग्नल मिळाला. टप्पा कठीण होता यात वाद नाही, पण जे चढून आलो होतो ते उतरणेही द्राविडी प्राणायामच ठरणार होता. आधीच दोन तास खर्ची पडले होते. आणखी वेळ दडवण्यापेक्षा इथून जपून उतरणे रास्त होते. प्रत्येक कच्च्या लिंबूसोबत एक पक्का लिंबू अशी गाडी बनवली. हळूहळू सर्वानी तो पॅच पार केला आणि कारवीच्या जाळीत घुसून मुख्य वाटेला लागलो.
वाट मळलेली असली तरी मजबूत घसरण आणि निमुळती होती. पुढील दहा मिनिटांत जेमतेम तोल सांभाळत अस्तान सरीच्या मुखाशी येऊन पोहोचलो. अस्तान सरी सुरू होते ती गर्द जंगलाच्या पोटातून आडव्या फिरत जाणाऱ्या पायवाटेने. गव्याचे लीद पडले होते. उजवीकडे वळत अखेर आम्ही अस्तान गावाच्या दिशेने जाऊ लागलो. उजवीकडे पर्वतगडाचा पसारा होता, तर डावीकडे कारवीची दाट जाळी. सूर्याची किरणे पोहोचतच नाही एवढे दाट जंगल आणि तळवा पूर्ण बुडेल एवढा पालापाचोळा. संपूर्ण वाटेवर १००-१५० फुटांवर वाघाची विष्ठा पसरलेली.
अस्तान सरीहून उतरायला लागलं, की वाट पहिला पाऊण तास गर्द जंगलातून, कारवीच्या जाळीतून पर्वतगडाच्या भिंतीच्या समांतर जाते आणि मग उजवीकडे वळत तीव्र उताराची होते. इथे मुरूम मातीतून अति उताराचे १०-१५ फुटांचे ४-५ टप्पे जवळजवळ घसरगुंडी करूनच बाजूच्या कारवीचा आधार घेत कसेबसे पार करून एकदाचे आम्ही मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या सोंडेच्या माथ्यावर येऊन पोहोचलो. इथून पुढे १५-२० फुटांचा सोपा कातळ टप्पा उतरून पुन्हा एका सपाटीला पोहोचलो. उजवीकडे पर्वतगडाच्या पोटात उंचावर अनेक नैसर्गिक गुहा दिसत होत्या. दादा म्हणाले, ‘‘त्या गुहांमध्ये अस्वलं राहतात. सूर्यास्त झाला की त्या भागात कोणी फिरकत नाही.’’
थोडे पुढे गेलो तोच दादांनी आवाज दिला. आम्ही ज्या दिशेने जात होतो त्याच्या विरुद्ध दिशेने आणि बऱ्याच खालून आवाज आला. वाट अशी नव्हतीच. सगळे कारवी कापत आवाजाच्या दिशेने झेपावले. १० मिनिटे उतरून आम्ही एका विशाल आंब्याच्या झाडाशी पोहोचलो. इथे एक झरा होता. त्यावर बांध बांधून त्याचे पाणी पाइपने खाली एका छोटय़ा टाकीत सोडले होते आणि तिथून पुढे पाइप गावाकडे वळवला होता. सव्वा अकरा झाले होते. गेले चार तास आम्ही अखंड चालत होतो. पाझराच्या थंड पाण्यात हात, तोंड, डोकं धुऊन ताजेतवाने होउन थोडक्यात (पुरणपोळी, गाजर, भाकरी इ.) न्याहारी आटोपून अस्तानकडे प्रस्थान केले.
हा पाझर आंब्याच्या झाडापाशी फुटला असल्याने या भागाला गावकरी ‘आंब्याचे पाणी’ म्हणून ओळखतात. इथून गावात नेलेल्या पाइपला समांतर चालले की गावात पोहोचता येते. इथून पुढे वाट सोपी होती, पण ही वाट साधारण अर्धा तास एकाच उंचीला (डोंगर उजवीकडे ठेवून) डोंगराला वळसा घालते आणि मग तीव्र उतरत गावात पोहोचते. वाट गावाकडे उतरू लागली तशी विरळ झाडीतून समोर महिपत सुमार रसाळ गडांचे त्रिकूट अवतरले. त्याच्या उजवीकडे दूर क्षितिजावर महाबळेश्वराचे डोंगर दिसत होते, तर पुढय़ात अस्तान सरीसारखीच एक सोंड आडवी पसरली होती. मागे वळून पाहिलं तर पर्वतगडाचा अगाध पसारा आणि अस्तान सरीची घळ हातात हात मिसळून उभे होते.
गावात पोहोचलो तेव्हा साडेअकरा वाजले होते. ऊन चांगलंच तापलं होतं. उन्हाची तीव्रता आणि आमचा मंदावलेला वेग लक्षात घेता दादांनी ताडलं की, इथून पुढे पोरं झपाझप चालायची नाहीत. त्यांनी गौप्यस्फोट केला.
‘‘मला परत फिरायला हवं. चकदेवाला जायचंय पूजेला. आता पुढे मी नाही येऊ शकत.’’ दादांशी बरीच हुज्जत घातली. गावातून माणूस घ्यावा तर सगळे बापे हलकुंडला गेल्याचे कळले. (हलकुंडला म्हणजे होळीसाठी लाकडं गोळा करायला.) दादांनी गावातल्या मावशीकडे समोरच्या दांडावराच्या वाटेची चौकशी केली. तीन-चार तासांत मळलेल्या वाटेने खांदाटात पोहोचू अशी खात्री देत ते म्हणाले, ‘‘या समोरच्या सोंडेने चढून जा. पुढच्या वाडीत कोणी आलं तर ठीक, नाय तर सरळ दांडय़ाने जा वर. तो एकदम वरचा डुंगा चढायचा नाही. माथ्यावर पोहोचलात की पलीकडे अध्र्या तासावर खांदाट. लगेच निघालात तर चार तासांत पोहोचाल.’’ खूप वादविवाद झाले, पण सगळे व्यर्थ. ६०० रुपयांचा चुना लावून दादा परत फिरले.
समोरची वाट म्हणजे लहान लहान टेकडय़ांची एक शृंखलाच होती. सोपी भासत असली तरी सगळी टेकाडं भकास होती. झाडं नसल्यातच जमा होतं. त्यात वरच्या ३-४ काळकभिन्न टेकडय़ा तर नुकत्याच वणव्याने खरपूस भाजून निघाल्याने भकास भासत होत्या. अशा टेकडय़ाची चढाई म्हणजे निसरडय़ा निमुळत्या पायवाटा. आणखी एक-दोघांकडून वाट मळलेली असल्याचा दुजोरा मिळाल्यावर पुढच्या पायपिटीला निघण्यापूर्वी पुन्हा एकदा शिदोरीच्या पिशव्या सैल झाल्या. एक तास त्यातच गेला. समोरच्या सोंडेवरच्या वाडीत पोहोचण्यासाठी आणखी २०० मीटर उतरून पुढे २०० मीटर चढायला लागणार होते. दुपारी साडेबाराला आम्ही वाडी सोडली आणि उतरायला लागलो. खाली तळाशी आणखीन काही घरं होती तिथे पोहोचून वरच्या वाडीची वाट विचारून चढायला सुरुवात केली. सूर्य आग ओकत होता. तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या उष्ण वाफा अंगाची काहिली करीत होत्या. तीव्र चढाई झेपेनाशी भासू लागली. कसे तरी धापा टाकत २० मिनिटांत आम्ही पहिलं घर गाठलं. सगळ्यांचीच खूप दमछाक झाली होती. घरानजीकच्या आंब्याच्या शीतल छायेत सगळ्यांनी अक्षरश: लोळण घेतली.
इथल्या ताईकडे चौकशी केल्यावर ती म्हणाली, दोन तासांत पोहचाल. गावकऱ्यांचे दोन म्हणजे आम्हाला तीन-साडेतीन तास नक्कीच. हाताशी बराच वेळ होता. मग एक तास इथे आराम करूयात, उन्हंपण जरा कलतील, पाणीही कमी लागेल असा विचार करून सगळेच सावलीत पहुडले. एवढय़ा उष्म्यात चढाई म्हणजे प्रत्येकी किमान ५ लिटर पाणी लागणार होते. त्यापेक्षा थोडं विसावून मग पुढे जाणे जास्त रास्त होते. वामकुक्षी संपवून वाटेला लागेपर्यंत साडेतीन वाजले होते.
वरच्या वाडीत पोहोचायला आणखी २० मिनिटांची खडी चढण होती. आता पुढची वाट नीट समजावून घेणे आवश्यक होते. पुढे खांदाटापर्यंत मनुष्यवस्ती नाही. पण वाडीतल्या घरापाशी पोहोचलो तर जे दृश्य दिसलं त्याची कधी कल्पनाही केली नव्हती. रस्ता विचारण्यासाठी पुढे गेलेल्या विशाल आणि सागरला चोर समजून गावातल्या एका मावशीने काठीच्या धाकावर अडवून धरलं होतं. त्यांच्यावर अखंड प्रश्नांचा भडिमार सुरू होता. कोण, कुठून, कशासाठी.. असं सहज डोंगर भटकायला, हातची गाडी खांदाटला पाठवून अस्तानात डोंगर उतरून कोणी येतं का? या दुर्गम वाटेने चढून खांदाट गाठणं हे सहजासहजी तिच्या पचनी पडण्यासारख नव्हतं. विशालनं मला मावशीच्या तोंडी दिले. ‘‘ही आम्हाला इथे घेऊन आली. हिलाच काय ते विचारा. चोर नाहीत आम्ही, डोंगरयात्री आहोत.’’
मावशी मला नखशिखांत न्याहाळत म्हणाली ‘‘ह्य़ा बाप्पा एवढय़ा बाप्यात तू एकटीच हायेस व्हय. कशासाठी इतका आटापिटा. ऊन काय कमी हाय?’’
‘‘आवडतं आम्हाला डोंगर भटकायला, आणि तुमच्यासारख्या प्रेमळ मंडळींना भेटायला.’’ माझ्या प्रेमळ या शब्दाचा चांगलाच प्रभाव पडला मावशीवर.
घराच्या मागच्या शेताच्या टोकाशी नेऊन धाकासाठी आणलेल्या जाड काठीनेच खुणावत मावशी वाट समजावू लागली. ही समोरची टेकडी उभी चढायची, उजवीकडे रानात जायचं नाही. वर पोहोचलात की सोंडेच्या माथ्यावरुन पुढे वाट आधी टेकडय़ांच्या डावीकडून जाईल आणि मागच्या टेकडीच्या पोटाशी निघेल. पुढे गेलात की त्या जळक्या डोंगराशी पोहोचाल तो चढायचा नाही. त्याच्या पोटाशी वाट डोंगराला वळसा घालून पलीकडे खिंडीत नेईल. या आपल्या बाजूनेच आहे वाट. खिंडीत पोहोचलात की मग समोरची टेकडी सरळ चढायची की आलं सात कट. तिथून खांदाट अध्र्या तासावर आहे. वर गेलात की पल्याड (सोंडेच्या माथ्याकडील अतिउंच टेकडाच्या पलीकडे हातवारे करत, डावी दिशा दर्शवत) खांदाटची घरं दिसतील.’’ मावशीची सून दुजोरा देत म्हणाली, ‘‘वाट चांगली मळलेली आहे. आता १५ दिवसांपूर्वीच लोकं गेलंती. आम्ही जातो की, माझं माहेर आहे खांदाट. जाल तुम्ही. वणवा झालाय परवाच, पाय दाबत दाबत सावकाश जा. दोन तासांत जाल.’’
मावशी पुन्हा फुरफुरली, ‘‘निघा आता वेळ दवडू नका. मी इथून सांगते तुम्हाला रस्ता. आता निघताय.. तुमचं काही खरं नाही. अंधार होणार. पर्वताच्या पोटात अस्वली आहेत सांजेला निघतात बाहेर. सांभाळून जा.’’ साडेचार झाले होते. पटापट पाय उचलणं गरजेचं होतं. आम्ही टेकडीकडे वळलो तेव्हा मावशीचे शब्द पुन्हा एकदा कानावर आदळले. ‘‘आता यांचं काही खरं नाही, अंधार होणार यांना रानात.’’
आता फुटा अशाच आवेशात मावशीने काठीने समोरच्या टेकडीकडे वळण्यास खुणावले. संपूर्ण टेकडी गुडघाभर उंचीच्या वाळलेल्या गवताने आच्छादली होती. त्यात ८० डिग्रीची खडी चढाई. वाट अशी नाहीच. जरा वाट सापडली की ती उजवीकडे वळायची आणि खालून मावशी कोकलायची, ‘‘उजवीकडे नको सरळ चढा.’’ आम्ही सरळ चढून दृष्टिआड होईपर्यंत मावशी खालून रस्ता सांगत उभी होती. आम्ही दृष्टिआड होईपर्यंत बराच काळ अगदी ती आम्हाला हाकारत होती. ही गावची माणसं अशी जीव लावून जातात.
मावशीच्या कृपेने आम्ही अखेर मुख्य सोंडेच्या माथ्यावर पोहोचलो. संध्याकाळचे ५ वाजले होते. आता इथून चार-पाच छोटय़ा छोटय़ा टेकडय़ांची शृंखला ओलांडली की जळक्या डोंगराला वळसा आणि मग एक उभी चढाई पार करून घाटमाथा आणि तिथून पुढे अध्र्या तासात खांदाट. मावशी आणि सुनेचे शब्द पक्के डोक्यात बसले हाते. सोंड माथ्यावरून धरलेली एक अस्पष्ट पाऊलवाट पुढे दाट जंगलात शिरली आणि दोन टेकडय़ांना उजवीकडे ठेवत डावीकडून वळसा घालून तिसऱ्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचली. इथून पुढे ७० अंशी चढाई आणि संपूर्ण उतारावर वाळक्या गवताचा जणू गालिचाच पसरला होता. गवतावर पाय ठरत नव्हता. काठीचा आधार घेत पाय निसटण्यापुर्वीच पुढे रेटत झपाझप गवताळ टेकडीच्या माथ्यावार पोहोचलो. इथवर येईस्तोपर्यंत चांगलीच दमछाक झाली होती. एक छोटा ब्रेक घेतला. उजवीकडे पर्वतगड आणि अस्तानसरी आमच्याकडे जणू रोखून पाहत होते. त्यापलीकडे चकदेवाचा डोंगर डोकं उंचावून आम्ही कुठवर पोहोचलोय पाहत होता. इथून पर्वतगड आणि संपूर्ण अस्तान सरी एका फ्रेममध्ये टिपता आली. मागे रसाळ सुमार महिपतची रांग आडवी पसरली होती. अस्तानसरीकडे पाठमोरे बसून आम्ही महाबळेश्वरकडील डोंगररांग न्याहाळत असताना मधेच मकाव जातीच्या निळ्या पोपटाची एक जोडी खाली दरीतून पिया पिया पिया ओरडत उडून गेली. काहीतरी दुर्मीळ पहिल्याचा आनंद डोळ्यात चमकू लागला.
पुढची चढाई वणव्यामुळे बेचिराख झालेल्या ओक्याबोक्या टेकडय़ांवर होती. ८० अंशांत वेडीवाकडी वळणे घेत, मुरमाड, भुसभुशीत जमिनीवर पाय गच्च रोवत अखेर आम्ही माथा गाठला. इथून १००-१५० फूट सरळ चालत आम्ही अखेर त्या अवाढव्य जळक्या डोंगराशी पोहोचलो. एक अवाढव्य जळून काळा ठिक्कर पडलेला डोंगर आमची वाट अडवून उभा होता. आता वळसा घालून खिंड गाठायची होती. मी मावशी आणि सुनेच्या सूचनांची उजळणी करत होते. कडय़ाशी जाऊन वळसा नक्की कोणत्या टप्प्यावरून असेल याचा अंदाज लावायचा जो तो प्रयत्न करत होता. वाट अशी काही दिसतच नव्हती. अति तीव्र घसाऱ्याखाली हजार-दीड हजार फुटांची दरी असं एकंदर गणित दिसत होतं. मावशीने या डोंगराच्या उजवीकडील धारेच्या पोटाशी एका झाडाकडे बोट दाखवत सांगितल्याचे आठवले त्या झाडाच्या खालून वाट पलीकडे खिंडीत नेईल.
घसाऱ्यावर अगदी डोंगराच्या पोटात एक वारसचे भले मोठ झाड डोलत होतं. त्याच्या पायथ्याशी एक अस्पष्टशी वाट दिसली. म्हणजे वळसा घालणारी वाट फारच उंचीवरून अगदी डोंगरतळाला लागून जात होती तर. आता सूर्य हळूहळू महिपतच्या दिशेने सरकत असल्यामुळे जास्त वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. जेमतेम एक पाउल मावेल अशा ६० अंशी निसरडय़ा वाटेवरून सुरक्षित अंतर ठेवत साखळीने आम्ही हळूहळू पुढे सरकू लागलो. उजवीकडची दरीची खोली पायाखालील वाटेवरून नजर हटू देत नव्हती. मध्येमध्ये एकमेकांना हात देत आणि नवनवे नवस बोलत (आधीचे न फेडता) १५ मिनिटांत आम्ही खिंडीत पोहोचलो. अखेरचा टप्पा बऱ्यापैकी कठीण श्रेणीचा होता. ८० अंशी खडी चढण, मुरमाड टेकाड, खाली १५०० फूट खोल दरी मध्ये एक छोटासा कातळ टप्पा.
सगळे चढून जाईपर्यंत सूर्यास्त होणार हे नक्की होते. मग विशाल आणि सागरला रोप लावायला सांगितले. त्यांच्या मागोमाग वर पोहोचलेल्या विशालला अंधार पडायच्या आत पुढील रस्ता पाहून येण्यास पाठवून दिले. एकेकाला बो-लाइन मारून कुणी क्लाइंबिंग करत, तर कुणी मावळा मारत वरचा टप्पा गाठला. इथून वर अजून शंभरेक फूट ८० अंशी चढण वेडीवाकडी वळणे घेत सगळे चढू लागले. वरच्या अंगाला दोन ठिकाणी झेंडे रोवलेले दिसत होते. रोप आवरून मागून येणाऱ्या आदी, यज्ञेशने जोरात ओरडून सांगितले, झेंडय़ाकडून उजवा वळण रस्ता घ्या. मी आणि सागर, यज्ञेश आणि अनिश असे आम्ही जोडीजोडीने चालत होतो. झेंडय़ाच्या आधी उजवे वळण घेत आम्ही पहिल्या झेंडय़ाशी पोहोचलो. राजस आणि ब्लेझ सर आधीच इथे पोहोचले होते. राजसला आदीसाठी थांबायला सांगून आम्ही पुढे सरकलो.
अजून बरीच चढाई बाकी होती नि एव्हाना चांगलंच अंधारून आलं होतं. रस्ता नीट कळत नव्हता, पण अखेर माथा गाठायचा एवढं ध्यानी ठेवून आम्ही चढत होतो. दुसरा झेंडा ओलांडून कारवीचा आधार घेत अखेर आम्ही टेकडीचा माथा गाठला. तेवढय़ात खालून यज्ञेश ओरडला, ‘‘अरे, तिथे कुठे गेलात? सांगितलं होतं ना, झेंडय़ाकडून उजवा वळण रस्ता घ्यायचंय.’’ बाकीचे लोक उजवीकडे वळले. आम्ही जे चढून आलो होतो ते उतरणं म्हणजे मरणाशी झुंज होती. जिथे पाय ठरत नाही आणि आधाराला साधं गवतही नाही अशा घसरणीवरून, विजेरीच्या उजेडात मला आणि ब्लेझ सरांना मुख्य रस्त्यापर्यंत उतरून नेण्याच्या द्राविडी प्राणायामाने अर्धा तास खाल्ला होता. झेंडय़ापुढचा वळण रस्ता तरी कुठे सरळ होता, पण एवढा टप्पा ओलांडला की सुटलो या आशेवर मोठय़ा उमेदीने पावले झपाझप पुढे सरसावली आणि रात्र झाल्यामुळे उजवीकडील दरीची खोली तशी जाणवतही नव्हती. हुश्श! एकदाचे पाऊल सपाटीवर पडले.
खोल खाली कोकणात अस्तान आणि इतर आसपासच्या गावांचं अस्तित्व काही मोजक्या मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडापुरते मर्यादित झाले होते. बाकी सगळा परिसर अंधाराने जणू गिळंकृत केल्यासारखा शून्यात विलीन झाला होता. आम्ही जिथे विसावलो होतो तो भाग नुकताच झाडं तोडून साफ केल्यासारखा जेमतेम ३०-३५ फुटांचा सपाटीचा भाग होता. वणव्याने जळलेल्या गवताची राख सगळीकडे पसरलेली होती. जमिनीलाही सपाटी नव्हतीच. आगीची धग लागून जमीन नांगरल्यासारखी उकलली होती. जरा विसावून खांदाट गावाचा शोध घेण्यासाठी आम्ही पुन्हा उठलो. वळण रस्त्याकडून आलेली पायवाट पुसट होत उजवीकडच्या कारवीच्या जाळीत लुप्त होत होती. मावशीने सांगितल्याप्रमाणे सपाटीच्या वर जो उंच डग्गा होता त्याच्या पलीकडे (डावीकडे) अस्तान गाव होतं, पण डावीकडे जाणारी कोणतीच वाट मिळेना. डावीकडे कारवीची अभेद्य जाळी होती. उजवीकडची वाट धरून १० मिनिटं पुढे गेलो, तर एका उतरणीवर पोहोचलो. संपूर्ण उतरणीवर नरम गवताची गादी पसरली होती. इथून सरळ पुढे पर्वतगड दिसत होता. दूरदूरवर कोणत्याही गावाचे काही अस्तित्व नजरेस पडत नव्हते.
होळीच्या पूर्ण चंद्राच्या निखळ प्रकाशात १८० अंशात क्षितिजापर्यंत दाट जंगलांच्या डोंगररांगा पसरल्या होत्या. मनुष्यवस्तीचा कुठेही मागमूस नव्हता. उजवीकडची वाट पर्वतगडावर जाते आणि खांदाट डावीकडे आहे अशी मनात ठाम धारणा रुजल्यामुळे त्या उजव्या वाटेने पुढे जाण्यास मनं धजावत नव्हती. गावकऱ्यांच्या मते घाटमाथ्यावरून गाव केवळ अध्र्या तासावर होतं. इथे समोर पर्वतगडापर्यंत किमान ४-५ तासांच्या अंतरावर कोणतेही गाव दिसत नव्हते. डग्गा ओलांडून गाव पलीकडेच असणार अशी सर्वाचीच खात्री झाली. अखेरीस मोबाइल जीपीएसवर खांदाट गावाचा शोध सुरू झाला. फोनाफोनी झाली. जीपीएसवर फक्त एवढंच कळू शकलं की, समोर पर्वतगडाच्या पलीकडे शिंडी गाव आहे आणि मागे डग्ग्यापलीकडे महाबळेश्वर.
सकाळी ७.३० वाजल्यापासून अखंड पायपीट केलेले जीव आता अधिक शोधाशोध करण्याच्या स्थितीत नक्कीच नव्हते. आजची रात्र इथेच मुक्काम करून पहाटे गावाचा शोध घेण्याचं सर्वानुमते ठरलं. मुक्कामाच्या दृष्टीने येथील उतारापेक्षा आधीची सपाटीची जागा अधिक योग्य होती. ओबडधोबड असली तरी सपाटीला उतार नव्हता, कोणी लोळत लुडकत जाण्याचा धोका नव्हता. तसेच जागा बऱ्यापैकी विस्तीर्ण असल्यामुळे जंगली प्राण्यापासून जरा अंतर राखता येणार होते आणि गवत आधीच जळून गेल्याने शेकोटीदेखील करता येणार होती.
शेकोटीसाठी मोठाली लाकडं गोळा करत आम्ही परत सपाटीवर पोहोचलो. मधोमध शेकोटी रचून बाकीची लाकडं तिथेच रचून ठेवली. आता शेकोटी पेटली होती. एकटय़ा आदीने वाटाडय़ा दादावर विसंबून न राहता खाली अंथरायला एक प्लास्टिक आणि पांघरायला शाल बाळगली होती. (माझ्याबरोबर ट्रेकिंगचा दांडगा अनुभव!!!) बाकीचे सगळे सॅका डोक्याशी घेऊन, तसेच एका रेषेत एकमेकांना खेटून जमिनीवर पसरले. हवेत बऱ्यापैकी उष्मा असल्याने पांघरूण नसल्याची खंत नव्हती, पण जशी रात्र चढेल तशी थंडी वाढणार यात शंका नव्हती. शेकोटी पेटती ठेवणे आवश्यक होते.
खांदाट गावात वाट पाहणाऱ्या चालकदादांचा फोन लागत नसल्यामुळे त्यांच्या मुंबईतल्या मालकांना फोन करून निरोप ठेवला. मध्यरात्रीपर्यंत हवामान दमट असल्यामुळे पांघरुणाशिवायही चांगली झोप लागली होती, पण नंतर गार वारा सुरू झाला. विझलेली शिकोटी पेटती ठेवणे गरजेच होते. मी उठून चार जाडजूड लाकडं शेकोटीत सरकवली. या उबेच्या आश्रयाने अर्धा घटका सर्व जण शांतपणे पुनश्च निद्राधीन झाले, पण थोडय़ाच वेळात लाकडं जळून गेली आणि कापरं भरू लागलं. आता हा खेळ रात्रभर चालणार होता. थंडी वाजली की उठून चार लाकडं शेकोटीत टाकायची आणि अर्धा तास एक झोप काढायची. धग कमी झाली की थंडीमुळे पुन्हा जाग यायची. अखेर पहाटे चार वाजता लाकडं संपली. अजून झोपेचे निदान दोन-अडीच तास शिल्लक होते आणि उबेशिवाय कापर भरणार यात काही शंका नव्हती. पुढील दोन तास शेकोटी सुरू ठेवायची होती. मला लाकडं आणायला आठ-दहा फे ऱ्या मारायला लागल्या असत्या. मग मी हलकेच एक डायलॉग टाकला, ‘‘सगळी लाकडं संपली आहेत. अजून उजाडायला वेळ आहे. शेकोटी विझली तर अस्वलं येतील!!!’’
एरवी कोणी हललं नसतं, पण अस्वल या शब्दातच इतकी ताकद होती की अनिश आणि सागर काही न बोलता लाकडं गोळा करायला निघून गेले. विशाल, आदी आणि यज्ञेश तसेच ब्लेझ सर मात्र रात्री जे झोपले ते थेट पहाटे साडेसहाला उठले. पुढे सरकण्याआधी कोणाकडे किती पाणी शिल्लक आहे याचा पडताळा घेऊन पाण्याचे समान वाटप केले. सागरने ५० मिली पाणी तोंड धुवायला वापरल्यामुळे सारे हळहळले. बाकीच्यांनी यज्ञेशने आणलेल्या हायपेडेंटची एक एक गोळी तोंडात कोंबली. प्रत्येकी अंदाजे एक लिटर पाणी घेऊन आम्ही डावीकडच्या डग्ग्याकडे कूच केलं.
ज्या टेकडीच्या पलीकडे खांदाट गाव आहे असे आम्हाला सांगण्यात आले होते, त्या टेकडीला संपूर्ण वळसा घालून अखेर आम्ही टेकडीपासून अलग झालेल्या एका निमुळत्या सोंडेवर पोहचलो तेव्हा सगळ्यांची पावले होती तेथे थबकली.. अध्र्या एक तासात कोणतेही गाव गाठता येण्याच्या सगळ्या आशा क्षणार्धात लोप पावल्या. आम्ही दौडासरीच्या टेकडीच्या पायथ्याशी एका अति निमुळत्या प्रचंड उताराच्या सोंडेवर उभे होतो. आमच्या पाठीमागे एक टेकडी आणि त्यापलीकडे दौडासरीची कोकणात उतरणारी वाट होती. डावीकडे आणि समोरचे खडय़ा उताराचे कडे साधारण २००० फूट खोल दरीत उतरत होते. दरीतून एक शुष्क ओढा अनेक वळणे घेत जणू अटक ते तटक पसरला होता. त्यापलीकडे मनुष्य वस्तीच्या कोणत्याही खुणा न बाळगणाऱ्या अखंड घनदाट जंगलाने आच्छादलेल्या डोंगररांगा थेट महाबळेश्वपर्यंत पसरल्या होत्या. उजवीकडील एकच डोंगर काय तो आमच्या परिचयाचा भासत होता, तो म्हणजे चार-पाच आडव्या पसरलेल्या डोंगरांपलीकडून डोकावणारा पर्वतगड. इथून गाव तर लांबचीच गोष्ट, पण साधा डोंगर उतरणीवरील एखादा धनगराचा मोडका तोडका झापही दिसत नव्हता.
आल्यामार्गे अस्तान गाठणे हा सगळ्यात सोपा मार्ग असला तरी तो कोणालाच मंजूर नव्हता. संध्याकाळच्या अंधारात जे चढून आलो होतो ते दिवसा उजेडी उतरण्यापेक्षा आणखी एक रात्र जंगल मुक्काम बेहत्तर. डावीकडे उतार म्हणजे सरळ कोकणात उतरणारे कडेच दिसत होते. उजवीकडे मंद उतार टप्प्याटप्याने तळाकडे झुकताना दिसत होता, म्हणून उजवीकडील एखादी पाण्याची वाट उतरत जाऊन खाली दरीतील ओढा गाठण्याचे ठरले. एकदा का तळ गाठला की मग पात्रातून चालत जाऊन एखादे गाव गाठणे शक्य होते. उन्हं चढायच्या आत पाण्याचा स्रोत मिळणेही तितकेच गरजेचे होते. मार्च महिन्यात पाणी एक तर एखाद्या जिवंत झऱ्याला किंवा पावसाळी नाळेतील एखाद्या डोहातच साठलेलं असण्याची शक्यता होती. पाण्याच्या वाटेने एक तर पटापट उतरता येणार होते आणि पाणी मिळण्याचीही शक्यता आधिक होती.
जंगलाने झाकोळेली उजवीकडची पहिलीच नाळ डोंगर उतारावर एका वारस वृक्षापाशी उघडत होती. प्रथमदर्शनी उतार बेताचा वाटत होता. झपाझप कारवीतून वाट काढत आम्ही पुढे सरसावलो. वाट अशी नव्हतीच. कोयता हाती घेऊन कारवीशी अखंड झुंज देत तासाभरात आम्ही त्या वारस वृक्षापाशी पोहोचलो. हवेत मंद गारवा असला तरी नाळीतून पूर्ण बाहेर आल्यावर उष्मा जाणवू लागला होता. थोडय़ाच वेळात चांगलच गरम होणार आहे याची जाणीव झाली. अपुऱ्या पाण्यानिशी कोणतेही गाव गाठणे केवळ अशक्य होते. सगळे मनातून एकच प्रार्थना करत होते, पाणी मिळण्याची.
थोडे अंतर पुढे गेलो आणि अखेर एक पाण्याचे डबके आढळले. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोबतीच्या सर्वाची अजून एक दोन दिवस जंगलात काढायची तयारी होती, चालायची तयारी होती, खाण्याचेही जिन्नस निदान दोन दिवस पुरेल इतके होते, संपत आले होते ते फक्त पाणी. डबक्यातील पाण्यावर खूप कचरा तरंगत होता आणि डबके वाळलेल्या पानांनी भरलेले असल्यामुळे पाणी गढूळ, मातकट रंगाचे भासत होते; पण तरंगता कचरा दूर करून बुडबुड आवाज करत बाटली भरली तेव्हा अतिशय नितळ थंड पाणी होतं. इथेच नाश्ता उरकून आणि होत्या नव्हत्या तेवढय़ा सगळ्या पाणपिशव्या, बाटल्या भरून, जमेल तेवढे पाणी पिऊन आम्ही पुढे सरकलो. पाणवठय़ाशेजारीच एका झाडावर मोडकी मचाण पाहिल्यावर इथून पुढे एखादी शिकारीची वाट मिळण्याची आशा पल्लवित झाली. इथल्या थांब्यावर जेवढा वेळ होतो तेवढा वेळ समोरच स्वर्गीय नर्तकाचे मंत्रमुग्ध करणारे नर्तन पाहायला मिळाले होते. पाण्याच्या साठय़ापासून थोडय़ाच अंतरावर मोडून पडलेल्या एका झाडाच्या फांद्यांवर आणि तिथून नळीत असे मुरक्या घेत हा पक्षी डौलात नाचत होता.
सूर्यराव आकाशी बरेच वर सरकल्याने आता चांगलेच तापले होते. थोडेच पुढे गेलो आणी ४० फुटी कातळ टप्प्याने रस्ता अडवला. सोबत दोर असल्यामुळे चिंता नव्हती. पण एक कातळ टप्पा ओलांडला म्हणजे झालं असं गणित नसतं. इथून उतरायचे आणि पुढे २००-४०० फूट दरी असली तर अडकून पडायचो म्हणून आदीला पुढे पिटाळले. आदीने रस्ता मोकळा असल्याचा ग्रीन सिग्नल दिल्यावर मी खाली उतरले. माझ्या अनुभवाप्रमाणे एकदा कातळ टप्पा लागला आणि उतार वाढला की कातळटप्प्यांची शृंखला सुरू होते. अशा कोणत्याही विचित्र परिस्थितीत अडकण्याची ही वेळ नव्हती, म्हणून स्वत: खात्री करून घेणे योग्य वाटले. दहा-पंधरा मिनिटं पुढे गेले आणि समोर पुन्हा नळी उघडताना दिसली. साहजिकच आणखी एक कातळ टप्पा आमची वाट अडवणार होता. कडय़ाशी पोहोचले आणि समोरचे दृश्य पाहून थिजून गेले. क्षणभर शब्दच फुटेना. ही नळी डोंगराच्या जाळीत थेट हजार फूट खोल खाली सरळ कोसळत होती. कडय़ावरून दिसले ते एकामागोमाग अनेक डोंगरांचे पदर आणि त्याच्या पायथ्याशी वेडीवाकडी वळणे घेत दूरवर पसरलेली दरी. अगदी ग्रँड कॅनिअनच..
तास-दोन तास उतरूनही आम्ही अजून बऱ्याच उंचीवर होतो. पुढे उतरणे अशक्य होते, आल्या वाटेने मागे फिरून इतर पर्याय शोधणे भाग होते. आल्या वाटेने मागे फिरायचे, मध्ये रस्त्यात एक पुसटशी वाट उजवीकडच्या जंगलात शिरत होती, ती चाचपडायची. नाहीच मिळाली वाट तर पुन्हा दौडा सरीने उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. पण दौडा सरीच्या माथ्यापर्यंत पोहोचेस्तोवर रात्र झाली असती. म्हणजे आणखी एक रात्र जंगलात राहावे लागणार..
पाणवठय़ाशी पुन्हा एकदा पाण्याचे सगळे साठे भरून घेऊन आम्ही त्या उजवीकडच्या (परतताना डावीकडे) पायवाटेशी पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेबारा वाजले होते. देवाचे नाव घेऊन पटापट पावले उचलली. दौडा सरीने उतरण्याचे कोणालाही मान्य नव्हते. सुरुवातीला अस्पष्ट असलेली वाट हळूहळू स्पष्ट होत गेली. मध्येच कारवीच्या दाट जाळीतून तर मध्येच उघडय़ा पठारावर वाट हळूहळू अधिक स्पष्ट होत होती. एका पठारावर वाट डावीकडे वळली आणि टेकडी चढू लागली. इथे या वाटेला उजवीकडून आलेली एक वाट मिळाली होती. टेकडी चढल्यावर मागे वळून पाहिले तेव्हा लक्षात आले की, ती उजवीकडून येणारी वाट दौडासरीकडून येत असावी. दौडासरीचा डग्गा अगदी डोळ्यासमोर होता. उजवीकडे ज्या नळीने आम्ही उतरलो होतो ती नळी गर्द झाडीतून डोकावत होती. आता वाट चांगलीच मळलेली दिसत होती. डोंगराच्या उतरणीवरून ही वाट डोंगराला पूर्ण वळसा घालून पुढच्या डोंगराच्या पोटात घुसली.
एव्हाना आम्ही बऱ्याच डोंगरांना वळसा घातला होता. दौडा सरीकडून येणारी आणि खांदाटात जाणारी ही एकच वाट होती. मावशीने सांगितलेली वाट आठवली आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ‘माथ्यावर पोहोचलात की मग सात कट आणि मग खांदाट.’ सात कट म्हणजे सात डोंगरांना ओलांडून जाणारी वाट हे कोण सांगणार. मोठा घोळ झाला होता तो दिशेच्या सूचनेने. मावशी आणि जंगमदादा दोघांनी डग्ग्याच्या डावीकडे खांदाट दाखविले होते. वास्तविक दौडा सरी माथ्यावरून उजवीकडे वळून सात डोंगर ओलांडत खांदाटात पोहोचता येणार होते.
आता वाट कधी कारवीच्या जाळीतून तर कधी अंजनीच्या दाट जंगलातून एकामागोमाग एक डोंगरांना वळसे घालत अडीच तासांत एका मोठय़ा डोंगर उतारावर पोहोचली. समोरच्या माळावर एक झाप दृष्टीस पडला. २४ तासांनंतर प्रथमच मानवी वस्तीच्या खुणा दिसल्या होत्या. गावात पोहोचलो तेव्हा दोन वाजले होते. झापावरच्या मावशीने दिलेल्या हंडाभर ताकाचा फडशा पडायला १० मिनिटे पुरेशी होती. ताकासोबत कोणाच्या वाटेला माशी तर कोणाच्या वाटेला मुंगळा आला.
गावातल्या शाळेशी पोहोचलो आणि कळले की आमची गाडी रात्रीच निघून गेली होती. गावात ना गाडी होती ना नेटवर्क. आता पुढचे गाव म्हणजे उचाट गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. वॉकी घेऊन राजस एका सायकलवरून पुढे गेला. राजसचा निरोप आला उचाटमध्ये आपली गाडी नाही. आम्ही सॅका उचलल्या आणि चालायला सुरुवात केली. पाच किलोमीटरची कंटाळवाणी पायपीट करून आमची वरात उचाटमध्ये आली तेव्हा साडेचार झाले होते. मुंबईत गाडी मालकाला फोन करून विचारणा केल्यावर कळले की, आमचे चालकदादा वळवणला आमची वाट पाहात आहेत. काल रात्री गाडी मालकांना दिलेल्या निरोपाचा हा परिणाम. ‘चालकदादांना जिथे बोलावलंय तिथेच थांबायला सांगा’चा अपभ्रंश असा झाला की ‘चालकदादांना जिथे सोडलं तिथेच थांबायला सांगा.’
उचाटमध्ये मागच्या ट्रेकच्या वेळची ओळख निघाली आणि एक गाडी मिळाली. पुढील १५ मिनिटांत आम्ही एका मोडक्यातोडक्या मॅक्स गाडीत बसून वळवणकडे निघालो. १८ किलोमीटर पार करायला तब्बल एक तास लागला. उचाट आणि वळवण ही पर्वतगडाच्या विरुद्ध बाजूला वसलेली दोन गावं. उचाटहून वळवणला जाण्यासाठी पर्वतगडाला संपूर्ण वळसा घालावा लागतो त्यावरूनच पर्वतगडाचं नाव एकदम सार्थ असल्याचे जाणवले.
इतकी उठाठेव करून वळवण गाठले तेव्हा संध्याकाळचे सव्वापाच वाजले होते. चालक दादांच्या डोक्याचे तीनतेरा वाजले होते. नेटवर्क नाही, आमचा पत्ता नाही, गावात कोणी ओळखीचे नाही, हॉटेलदेखील नाही. बिच्चारे.. दिवसातून तीन वेळा मालकांना आणि आम्हाला फोन करण्यासाठी नेटवर्कच्या शोधात बरीच पायपीट करावी लागली होती त्यांना. चालकदादांनी आम्ही परतल्यावर अक्षरश: देवाला दंडवत घातला. जंगमदादांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अपराधी आणि हायसे वाटल्याचे असे संमिश्र भाव तरळत होते.
जंगमदादांनी चालकदादांकडे कबूल केले होते की, मी त्यांना वरच्यावर खांदाटात नेणार होतो पण ती ‘मॅडम’ तिला सगळे डोंगर, वाटा, गाव माहीत होते. तिने काही ऐकले नाही. मी फॉरेस्टमध्ये आहे का, अशीही विचारणा जंगमदादांनी चालकांकडे केली. या पुढे तरी जंगमदादा असे उपद्व्याप करताना दोनदा विचार करतील, अशी आशा वाटली.