lp81सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकताना केवळ गडकिल्लेच नाहीतर मावळातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागतं. ही समृद्धी मिरवणाऱ्या आंदर मावळातल्या पाऊलखुणा..

गेले काही महिने एका ‘रानभूली’नं पछाडलंय..
झालं असं की, मावळात भिरीभिरी भ्रमंती करताना काही ‘अनोख्या पाऊलखुणा’ गवसल्या होत्या. आणि मग चालू झाली मावळातल्या आडवाटांची ‘वारी’. डोंगरमाथे शोधले, कातळकडय़ांच्या पोटातल्या गडद गुहा धुंडाळल्या, आडवाटांवरची काटेरी गच्च गचपणं उलथीपालथी केली..
कधी कारवीला धरून स्वत:ला खेचलं; ओढय़ा-धोंडय़ांमधून धडपडलो; तर कधी उभ्या घसरंडीवरचा निसटता कातळटप्पा ओलांडताना धडधड वाढली. आडवाटेवर आम्हाला पाहून कधी एखादं भेकर दचकलं, तर कधी एखादा गिरीजन आम्हालाच दरोडेखोर समजून भेदरला. घामटं आलं, ऊर धपापलं, तासन तास मावळात वणवण फिरूनही ‘पाऊलखुणांची रानभूल’ तशीच भुलवत होती..
कसल्या पाऊलखुणांचा हा होता शोध, कोणाच्या त्या पाऊलखुणा, इथे याच मावळात का आणि अशा अजूनही काही पाऊलखुणा असतील का तिथे, अशी भूणभूण मनाला लागली..
पाऊलखुणा धुंडाळल्या मावळातल्या संस्कृतीच्या. मावळवारीची सुरुवात झाली काही महिन्यांपूर्वी. ‘सह्यद्री ट्रेकिंग = दुर्गभ्रमण’ ही व्याख्या एव्हाना अपुरी पडू लागली होती. दुर्ग-किल्लय़ांसोबत खोऱ्यातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागलं होतं. प्रत्येक वीकएण्डला ‘होम-मिनिस्टर’कडून ट्रेकसाठी परमिट काढणं, हे तर अशक्यच. पण त्याचवेळी मावळातून घुमणाऱ्या वाऱ्याचं वेड घरी स्वस्थ बसू देत नव्हतं. ‘जवळ असूनही, नावीन्यपूर्ण आणि कसदार भटकंती’ अशा अटीत बसणारे पर्याय हवे असतील, तर ते शोधावेच लागतात. कारण या ठिकाणांची माहिती सरकारी गॅझेटिअर, संदर्भ पुस्तकं अन् ब्लॉग्जमध्ये क्वचितच सापडणार. मग आम्ही सह्यद्रीच्या घाटमाथ्याजवळच्या नद्यांच्या वळणवेडय़ा खोऱ्यांमध्ये म्हणजेच ‘मावळा’त भटकून अनवट दुर्ग, घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, राऊळं, देवराया आणि डोंगरमाथे धुंडाळू लागलो. हळूहळू जाणवू लागलं, की आमच्या मावळवारीतले हे दुर्ग, लेणी, टाकी, मंदिरं म्हणजे खरं तर आहेत, इतिहासाची-संस्कृतीची स्मरणं आणि खरं तर या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या ‘पाऊलखुणा’!
lp82साकेत गुडी, मिलिंद लिमये, अमेय जोशी आणि मी अशी नेहमीच्या भटक्यांची गेल्या काही महिन्यांतली ‘मावळवारी’ चालू होती आंध्रा नदीच्या खोऱ्यात, म्हणजेच ‘आंदर मावळा’त. हे छोटेखानी देखणं मावळ आहे तळेगाव दाभाडेच्या वायव्येला. आंदर मावळच्या पश्चिमेला आहे सह्यद्रीची मुख्य धार, तर उत्तर आणि दक्षिणेला आहेत खणखणीत कातळभिंती दिमाखात मिरवणाऱ्या ‘तासूबाई’ आणि ‘वडेश्वर’च्या लांबच लांब डोंगररांगा. सह्य़धारेपाशी उगम पावल्यापासून मंगरुळपाशी इंद्रायणीमध्ये एकरूप होईपर्यंतचा आंध्रा नदीचा प्रवास जेमतेम २५-३० किमी अंतराचा..
पाऊलखुणा अक्षरश: चक्रावून टाकणाऱ्या, सातवाहनांच्या?
परवा सहजच, मावळवारीत बघितलेली गिरीस्थळं गुगल नकाशावर मांडली. अपेक्षेप्रमाणे आधी नकाशावर नोंद केली दोन दुर्ग आणि महत्त्वाच्या चार घाटवाटांची. बघितलेली लेणी आणि डोंगरमाथ्यावरची राऊळं नकाशावर नोंदवू लागलो, आणि मग आला एक साक्षात्कार क्षण!!! आंदर मावळामधल्या जेमतेम २०-२५ किमी लांबीच्या एका डोंगररांगेमध्ये गवसली होती, तब्बल ७-८ वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेली कातळकोरीव लेणी आणि शिखरांवर वसलेली देवीतत्त्वाची ७-८ राऊळं. अक्षरश: चक्रावून गेलो. इतक्या सगळ्या पाऊलखुणा नक्की कोणाच्या? कोण्या गावकऱ्याला विचारावं, ‘कोणाचं काम हे?’, तर टिपिकल उत्तर तयार, ‘आरं, आमचा आजा सांगायचा, त्ये पांडव होते पाच. ते बसल्ये होते रात्रभर खोदत कातळात. तांबडफुटीला कोंबडा आरवला आणि पांडवांचं काम तसंच राहिलं ना अर्धवट.’ काही अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रातील आद्य राज्यकुल ‘सातवाहन’ – ज्यांना ‘आंध्रभृत्य’ असंही म्हणतात – त्यांचा संबंध आंदर मावळाशी असावा. खरंच असं असेल, तर आंदर मावळात सातवाहनांशी संबंधित काही तरी सापडायला पाहिजे होतं. आंदर मावळातल्या या पाऊलखुणा धुंडाळण्यासाठी आम्ही मावळवारीवर पुन:पुन्हा कसे जात राहिलो, प्रत्येक मावळवारीमध्ये आंदर मावळातल्या कोणत्या संस्कृतीच्या पाऊलखुणा गवसल्या, पुन:पुन्हा भुलवत राहिल्या, पाऊलखुणांचं कोडं सुटत गेलं की अधिकाधिक गहिरं होत गेलं, याचे हे सारे अनुभव..
अफलातून कांब्रे लेणी
आंदर मावळातली आमची पहिली भटकंती होती थरारक ‘कांब्रे लेण्या’ची. कांब्रे गावातून वडेश्वर डोंगररांगेचा जबरदस्त कातळकडा आणि बोरवलीचा अजस्र धबधबा थक्क होऊन बघत होतो. पल्याड कातळात कोरलेल्या ‘कांब्रे लेण्यां’नी लक्ष वेधलं. गावकरी म्हणाले, ‘आरं पोरांन्नू, कुठं तरास घ्येता जीवाला. वाटेत आहे ो थोरला खडक. नाही रं जमायचा तुम्हास्नी.’ म्हणलं बघूयात जमतंय का. आमची वाट अडवली ४० फुटी गुळगुळीत रॉकपॅचनं. आधार मिळवण्यासाठी ‘अंगविक्षेप’ करत पिंच होल्ड्स पकडत कसंबसं माथ्यावर पोहोचलो. आता आमच्यामध्ये आणि मुख्य लेणी यांच्यादरम्यान होता सरळसोट कातळकडा आणि एक अनपेक्षित आश्चर्य – लेण्यात प्रवेश करण्यासाठी कडय़ाच्या पोटातून कोरलेला १५ फूट लांबीचा बोगदा! लेणी खोदवणाऱ्या अभियंत्याच्या कौशल्यानं आम्ही खुळावलोच. मुख्य लेण्यांत निवासी गुहा, मोठ्ठाली खोलवर कोरत नेलेली lp84टाकी, सारीपाट खेळाचा आराखडा आणि धान्य दळण्याचं उखळ दिसलं. पण, एखादा शिलालेख, शिल्पं अथवा स्तूप असं काहीच आढळलं नाही. अपरिचित ‘कांब्रे लेणी’ पाहून आम्ही खूश, पण या ‘पाऊलखुणा’ कोणाच्या, हे गूढ काही उलगडेना.
पेठजवळची अनोखी दुर्गरचना
पुढची मावळवारी होती देखण्या ‘पेठच्या किल्लय़ाची’ (कोथळीगड). किल्लय़ाच्या कोकण पायथ्याला होती बौद्धधर्मीय ‘आंबिवली लेणी’, खुद्द किल्लय़ाच्या पोटातली विशाल गुहा म्हणजे कातळकोरीव लेणंच म्हणायचं, माथ्यावर जाण्यासाठी पोटातून कोरून काढलेला कातळमार्ग अगदी विस्मयकारक होता. या सगळ्यांसोबत आणखी एक ठिकाण गवसलं, ते म्हणजे ज्या जुन्या घाटवाटेचं रक्षण हा दुर्ग करीत असे, त्या ‘कौल्याच्या धारे’च्या वाटेवर गवसली पाण्याची कातळकोरीव टाकी. त्यामुळे ही ‘वहिवाट’ कोणाची, या साऱ्या ‘पाउलखुणा’ कोणाच्या, हे कोडं पडलंच..
कुसूर घाटात..
काही दिवसांच्या रहाटगाडग्यानंतर, अर्थातच परत निघालो ‘मावळवारी’ला. यंदा बेत होता घाटमाथा आणि कोकण यांना जोडणारा ‘कुसूर घाट’ बघायला. कधी गच्च कारवीतून तर कधी गवताळ टप्प्यांमधून सुसाटलेली कुसूर घाटाची नागमोडी वाट, वाऱ्याच्या तालावर मस्त डोलणारं गवत, झाडीतून घुमणारा वारा, कोवळं ऊन असूनही गारठवणारी थंडी आणि सोबतीला दोस्तांबरोबर रंगलेलं गप्पाष्टक (अर्थातंच ट्रेक्सचं) असा माहोल. काही ठिकाणी वाट दगड बसवून पक्की केलेली, तर काही ठिकाणी होत्या पहारीचे घाव घालून वाट रुंद केल्याच्या खुणा. आणि, मग दिसली कातळात खोदलेली पाण्याची जुनी पाच टाकी. जमिनीच्या पातळीत चौकोनी मुख असलेली आणि आत खोलवर नेलेली टाकी इथे असणं, ही कुसूर घाट नि:संशय पुरातन आणि महत्त्वाचा असल्याची ही खूण होती. पण या ‘पाऊलखुणा’ कोणाच्या हे मात्र उलगडलं नाही..
ढाक दुर्ग परिसर
मावळवारीमध्ये एकदा ‘गाळदेवी घाटा’नं चढत होतो. कोकणातला भिवगड, बलदंड ‘ढाक दुर्ग’ आणि ‘ढाक बहिरी’च्या गडद गुहेतल्या बहिरीदेवाच्या दर्शनाचा थरार अनुभवला. जाणवलं, की बहिरीची ही गडद (गुहा) म्हणजे प्राचीन लेणंच. कोरीव लेणी, पायऱ्या, पाण्याची टाकी, घाटवाट आणि दुर्ग ही सारी लक्षणं – या पाऊलखुणा कोणाच्या हा प्रश्न पडलाच..
गडद लेणी
‘अमक्या गावापासच्या डोंगरात गडद-लेणी आहेत’, इतक्या माहितीवर मावळवारी होतंच राहिली. एकदा असंच झालं. गडद गावी पोहोचलो. गावामागे तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्कय़ा कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या. भाताच्या घमघमणाऱ्या शिवारांनी स्वागत केलं. कोणत्या आधुनिक यंत्रात आमच्या मावळच्या भातखाचरांचा ताजा गंध रेकॉर्ड कराल, तो ऊरातंच भरून घ्यायला हवा. ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिरामागे ‘देवराई’त होते, आभाळाला भिडलेले जुने-जाणते वृक्ष. पल्याड दुर्गेश्वर ठाण्यापाशी कडय़ाच्या खळग्यात स्थापिलेल्या शिवलिंगावर अव्याहत जलाभिषेक होत होता. आणि, मग सुरु झाला दुर्गेश्वर लेण्यांचा थरार. लेण्याच्या कातळमार्गावर होती सुरू झाली उभ्या कडय़ातल्या एकदम खडय़ा उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळी. खाली खोरररलवर देवराईचा झाडोरा. ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरडय़ा पायऱ्यांमुळे थरार..आणि थ-र-का-प देखील!!! मध्येच एक अर्धवट पायरी – ‘फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट!!! तब्बल शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या पार केल्यावर माथ्याकडचा कातळ जवळ आला.. साध्या खोदाईची कोरडी टाकी, ५० फूट रुंद – ४० फूट खोल आकाराचं मुख्य दालन, धान्याचे उखळ, आतील भागातील छोटी खोली, लगतचं दुर्गेश्वराचं देऊळ आणि वाघोबा – दीपमाळ – नागप्रतिमा – शिवलिंग असं साधं मूर्तिकाम निरखलं. बाकी शिलालेख, स्तूप असं काही आढळलं नाही. पुन:पुन्हा प्रश्न तोच, या पाऊलखुणा कोणाच्या.
‘फेण्यादेवी’ घाट
कोकणातून आंदर मावळाचा घाटमाथा गाठण्यासाठी ‘फेण्यादेवी’ नावाची घाटवाट चढत होतो. माळेगावच्या उत्तरेला दाट झाडीतून चढत लांब पसरलेल्या सोंडेवर पोहोचलो. पश्चिमेकडे झुकलेली उन्हं जुन्या-जाणत्या वृक्षांमधून-पारंब्यांमधून वळणं घेत जाणारी पावठी उजळवत होती. पाण्यापासचा उंबर झुकला होता – लगडलेल्या उंबरांमुळे आणि त्यावर अधाशीपणे खादाडगिरी करणाऱ्या हुप्प्यांमुळेही! डावीकडे थेट डोक्यावर आलेला सकडा, त्याचे एकावर एक रचले गेलेले थर एकदम देखणे दिसत होते. ३६० अंशात आम्हाला lp85वेढलेल्या सह्यद्रीच्या अनवट सौंदर्याचा आनंद आम्ही आकंठ लुटत होतो. पदरातून आडवं जात घळीतून चढत घाटमाथ्याजवळ पोहोचलो घाटाच्या देवतेपाशी – ‘फेण्यादेवी’च्या ठाण्यापाशी! पुन्हा कोडं तेच ही इतकी मळलेली प्रशस्त वाट आणि या पाऊलखुणा कोणाच्या?
तासूबाई डोंगरावर
..एका मावळवारीत धमालच झाली. पोहोचलो होतो तासूबाई डोंगर माथ्यावर आणि देवीच्या राऊळाकडे जाताना अचानक आवाज आला, ‘कान तोडू का कान?’ दरडावण्याचा आवाज ऐकून दचकलोच!!!!! तर परत आवाज, ‘..तोडू का रे कान?’ ही काय भानगड ‘तासूबाई’च्या डोंगरावर.. ‘..आता हा आलो, कान तोडायला.’ करवंदीच्या जाळीमागून परत आवाज. जाणवलं, समोरचा अज्ञात आमचा अंदाज घेऊ पाहतोय.. ओरडून सांगितलं, ‘तासूबाईच्या दर्शनाला आलोय.’ करवंदीमागून बाहेर आली एक काळी-सावळी आकृती. आणि, मग सगळा गोंधळ लक्षात आला. तासूबाई डोंगराच्या माथ्यावर धनगरवाडय़ात राहणारा हा गुराखी दूध पोहोचवायला केंद्रावर निघालेला. आमच्या पिशव्या, सॅक्स, कॅमेरा, गॉगल पाहून आम्हाला ‘दरोडेखोर’ समजून भेदरलेला. आता पाया पडायला लागला, ‘देवाच्या पाहुण्याना तरास दिला..’ मग काय, साकेतने मला आणि मी त्याला ‘दरोडेखोर’ असं यथेच्छ चिडवून झालं. पुढं दोन मिनिटात पोहोचलो तासूबाईच्या राऊळापाशी. नजर गरगरेल अशा खोल घळईसमोर तासूबाईचं राऊळ स्थापलेलं. आसपास कोरलेल्या लढाऊ वीर आणि वाघोबाची भग्न शिल्पं पाहून, परत एकदा वाटलं – कोणाच्या या पाऊलखुणा?
वरसूबाई राऊळ
मे महिन्यात कळाकळा ऊन तापलं, तरी ट्रेक्सशिवाय घरी बसवत नाही. मावळवारी निघाली लोणावळे – भीमाशंकर ट्रेकरूटवरच्या जादुई ‘वांद्रे खिंडी’ला बिलगलेल्या ‘वरसूबाई’च्या डोंगरावर. निवांत चढणाऱ्या वाटेवरून उलगडत गेले वरसूबाई डोंगराचे कातळउतार आणि झाडीचे टप्पे. तासाभराच्या चढाईनंतर माथ्यावरच्या सडय़ावर वरसूबाई राऊळापाशी पोहोचलो. शेंदूर माखलेला देवीचा तांदळा, वाघराशी लढणारा वीर – दीपमाळ – मारुती असं थोडके अवशेष. कोणी – कधी स्थापिलं असेल हे. कोणाच्या या पाऊलखुणा?
अल्पपरिचित पद्मवती लेणी
एकदा पहाटेच आंदर मावळातल्या वळणा-वळणांच्या रस्त्यावरून निघालो. आंध्रा नदीच्या पात्रावर तरंगणाऱ्या धुक्याचे लोट उसळत होते, गारठवत होते. नदीच्या पल्याड समोर खुणावू लागली लांबच लांब पसरलेली डोंगररांग. बेत होता उंच शिखराच्या पोटातलं लेण्यामधलं देवीचं राऊळ शोधायचा आणि मित्र lp86अमेय गाणं गुणगुणत होता..
..नदीच्या पल्याड, आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर..
घालु जागर जागर, डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून,
उघड देवी दार..
अगदी अगदी अस्संच दृश्य आम्ही अनुभवत होतो. ‘निगडे गावाजवळ लेणी आहेत’, इतक्याशा माहितीवर सुसाटलो होतो. गावाबाहेर गवताळ माळावर ‘उडिचिरायत’ नावाची स्वर्गीय फुलं बहरली होती. पदरातल्या झाडीनंतरचा घसरडा उभा चढ केवळ कारवीच्या काटक्यांच्या आधारे चढला. वळणावरच्या कातळावर लोखंडी शिडी असल्याने पटकन खोदीव पायऱ्या गाठल्या आणि ‘निगडे लेणी’ गाठली. पाण्याची टाकी आणि मुख्य दालन पाहून पद्मवती ऊर्फ पदूबाईच्या घुमटीपाशी पोहोचलो. तिथे होता शेंदूरचर्चित तांदळा आणि वाघोबा शिल्प. कोणी-कधी स्थापिलं असेल हे.. कोणाच्या या पाऊलखुणा
फिरंगाई लेणी, पिराचा डोंगर
..तळेगाव एमआयडीसीपासून प्रवास करताना जेसीबी कंपनीमागे डोंगरात कातळाच्या पोटात एक दिवा खुणावायचा. देवस्थान झाल्याने आता चांगली मोठ्ठी वाट आहे. खोदीव पायऱ्या, पाण्याची टाकी, विहार पाहून मुख्य दालनापाशी आलो. दुर्गम उंचावरच्या विहारात फिरंगाई देवीचं राऊळ स्थापन केलंय. निसरडय़ा कातळात कोरलेल्या जुन्या खोबणी चढणं पूर्वी अवघड असणार. आता मात्र लोखंडी शिडीवरून देवीचं दर्शन घेणं सोप्पं झालंय. प्रशस्त विहारात देवीचा शेंदूरचर्चित तांदळा आणि काळ्या पाषाणातली मूर्ती चांदीच्या मखरीत शोभते. आत अजून एक छोटी खोली आणि महिषासूरमर्दिनीची साधी मूर्ती आहे. मंदिराबाहेर इंद्रायणी खोरं खुणावत होतं. नवलाख उंबरे या जुन्या गावाजवळची ही लेणी कोणी, कधी आणि का खोदवली, कुणास ठावूक.. पल्याड मंगरूळच्या ‘पिराच्या डोंगरा’वर भटकायला गेलो, तेव्हा खांब सोडून खोदवलेली पाण्याची विशाल टाकी, अर्धवट सोडलेला विहार आणि पायऱ्या गवसल्या. आता या पाऊलखुणा कोणाच्या, हे कोडंच होतं.
अपरिचित कल्हाट लेणी
आंदर मावळातली बहुतांशी ठिकाणं बघून झाली, असं वाटायला लागलं असतानाच अनपेक्षितरीत्या एक रत्न गवसलं. फेसबुकवर एक मेसेज आला आंदर मावळातल्या संभाजी धनवे यांचा, ‘..तासूबाईला आलात. गडदची लेणी पाहिलीत. गडदच्या पलीकडची कल्हाटची लेणी पाहिलीत का तुम्ही? तिथल्या लेण्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी.’ आंदर मावळातल्या अपरिचित लेण्यांची माहिती मिळाल्यावर अजिब्बात चैन पडेना. पुढच्या काही तासांत भल्या पहाटे संभाजीच्या घरी कल्हाटच्या धनवेवाडीत पोहोचलोदेखील. संभाजी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अगत्याने फार फार भारावून गेलो. खरंच, सह्यद्रीप्रेमामुळे जुळलेलं मैत्र!
शेताडीतून हरभऱ्याची हवी तशी गड्डी बनवून चरत निघालो. समोरच्या झाडीत ‘स्वर्गीय नर्तक’ (Paradise-flycatcher) मुक्त विहरत होता. तर पाठीमागच्या डोंगराच्या करकरीत कातळकडय़ाच्या पोटात गडद गुहा खुणावत होत्या. थेट गुहांपाशी पोहोचणं अवघड असल्याने, मोठ्ठय़ा वळशाच्या वाटेचा ‘द्राविडीप्राणायाम’ करणं भाग होतं. पायथ्यापासून गडद न्याहाळत पश्चिमेच्या उभ्या दांडावरून डोंगरमाथ्यावर गेलो. परत अलीकडे येत घळीतून उतरत गडदजवळ आलो. इतकं लांब आल्यावर इथे खरंच ‘लेणी’ सापडावीत, अशी आस लागली. निसटत्या ट्रॅव्हर्सवर नजर अक्षरश: ग-र-ग-र-ली. आणि, आमच्यासमोर उलगडू लागली जगाला अल्पपरिचित अशी कल्हाटची लेणी. विविध विहार, बेसॉल्टमधील रोपी लाव्हाच्या खुणा, पाण्याची खोल खोदत नेलेली विशाल टाकी आणि तीन छोटय़ा खोल्या असलेला विहार समूह बघितला. शिलालेख किंवा दागोबा अशी चिन्हं नव्हती. अखेरीस गवसलं सर्वात अचंबित करणारं एक फूटभर व्यास असलेले एक मुख-शिल्प. कानात मोठ्ठय़ा िरगसारखी कर्णफुले, तर माथ्याजवळ गोल महिरप, मोठ्ठे बंद डोळे-नाक-जाड ओठ. lp87खरंच, एक अमूल्य ठेवा!!! कुठले हे शिल्प, कधीची ही लेणी.. या पाऊलखुणा कोणाच्या, हे कोडंच!
भिरीभिरी भ्रमंती
अल्पपरिचित ‘कल्हाट लेणी’ गवसल्यानंतर आंदर मावळात अजून काही गुहालेणी दडलीयेत का, अजून कुठल्या पाऊलखुणा गवसतील का असं फारफार वाटू लागलं. अर्थातच, मावळात उंडारायला काही तरी सबब हवीच होती. सह्य़माथ्यापासून निघून आंदर मावळातल्या माळेगाव (पिंपरी), कुणे, अन्सुटे, इंगळूण, परिठेवाडी, कशाळ, भोयरे अशा १५-२० किमीच्या पट्टय़ातल्या प्रत्येक गावी जाऊन, गडद-कोरीव गुहा आहेत का हे प्रत्यक्ष बघणं, अशी मोहीम काढली. धनवेवाडीच्या आमच्या संभाजीने या भागातल्या नातलगांशी संपर्क साधून, माहिती काढायचा प्रयत्न केलेला.
मावळात पहाटे स्वागत केलं २५-३० मोरांनी. कुरकुरणाऱ्या पवनचक्कय़ांमागे पूर्व दिशा उजळू लागली. आणि आमची धडपड सुरू झाली कुठल्याशा कातळभिंतीच्या पोटात धबधब्याशेजारी गडद गुहांमध्ये ‘कोरीव’ लेणी आहेत का हे शोधायची. सोबत घेतला एखादा स्थानिक गुराखी, जो इथल्या डोंगर-लवणात बागडलाय. हळूहळू उन्हाचा ताव वाढत चाललेला. रानातल्या उंबराखाली दडलेल्या पाण्याच्या जागा बघाव्यात. कोण्या धबधब्याच्या लोंढय़ासह गुरं वाहून गेली, म्हणून त्यांच्यासोबत स्वत:ला झोकून देणाऱ्या गुराख्याची कथा ऐकावी आणि तिथल्या शेंदूर फासलेल्या रानदेवाला वंदन करावं. ओढय़ाच्या गचपणीतून खडकांवरून उतरताना काटेरी झुडपांनी ओरबाडून काढलेलं. आखूड, गवताळ, मुरमाड उतारांवरून आडवं जाताना पाय हुळहुळू लागलेले. निसरडय़ा कातळावरून कसंबसं उतरल्यावर, दरीच्या काठावरून वळत आता समोरच्या कातळकडय़ाच्या पोटातली एखादी गुहा डोकावू लागलेली. गांडूळमातीच्या घसरडय़ा उतारावरून कारवीच्या काटक्या धरत तोल सांभाळत हळूहळू सरकत जायचं. ‘ही आहे बघा गडद’, असं गाईडने म्हणावं. आम्ही कातळात छिन्नी-हातोडीचे घाव घालून भिंती-विहार-टाकी खोदल्याच्या खुणा शोधाव्यात. बहुतांशी वेळा, ‘हीसुद्धा नैसर्गिक गुहाच आहे.’ असा निकाल लागायचा. कधी गुराख्यांनी दगड रचून आडोसा केला असायचा. पल्याड बिळाबाहेर साळिंदराच्या काटय़ांचा खच पडलेला आणि रानडुकराच्या खुणा. धबधब्याच्या पोटातली ती जागा मात्र अती भन्नाट असायची. आंध्रा नदीच्या वळणवेडय़ा खोऱ्यांतून घुमत घुमत भर्राट वारा धडकत असायचा. झाडीतून डोकावायचं ठोकळवाडी आणि आंध्रा धरणांचं नितळ पाणी. कडाडून भूक लागली असायची. घरून आणलेल्या रुचकर डब्याचा फन्ना उडवायचा. स्थळ-काळ-वेळ विसरून हातांची उशी करून, धबधब्याच्या पोटात निखळ झोपेचा आस्वाद घ्यायचा आणि परत एकदा पुढच्या गुहा धुंडाळायला निघायचं.
डोंगरदऱ्या वणवण भटकल्यावर अखेरीस आम्हाला थोडय़ाशा पाऊलखुणा खरंच मिळाल्या – अन्सुटेजवळ गडद गुहेत लेणी खोदाई सुरू केल्याच्या खुणा, परिठेवाडीतून डोंगरापल्याड ‘गडदच्या लेण्यां’कडे जाणाऱ्या पायऱ्या, कळमजाई राऊळ – दीपमाळा – वाघोबा शिल्प आणि परिठेवाडीच्या कातळकडय़ाच्या पोटातलं महादेवी राऊळ!!!!
पाऊलखुणा सातवाहनांच्या?
आंदर मावळाच्या फक्त २०-२५ किमी परिसरात गवसलं होतं
दुर्गसोबती ढाक आणि पेठचा किल्ला आणि त्यांच्या पोटातली लेणी.
गाळदेवी- कुसुर- फेण्यादेवी- कौल्याची धार अशा ठळक घाटवाटा;
कांब्रे- अन्सुटे- गडद- कल्हाट- निगडे पद्मवती- पीराचा डोंगर- फिरंगाई अशी कातळकोरीव लेणी;
वरसूबाई- महादेवी- गडूबाई- तासूबाई- पद्मावती पदूबाई- कळमजाई- फिरंगाई अशी देवीरूपं आणि देवीजवळ असणारं वाघरू किंवा वाघाशी लढणाऱ्या वीराचं शिल्प!
त्यामुळे खूप प्रश्न पडले:
का असतील पूर्वजांच्या इतक्या सगळ्या पाऊलखुणा, या ‘इथेच’ आंध्रा खोऱ्यात?
साधी हत्यारं वापरून इथेच या डोंगरात अपार कष्ट घेऊन ही लेणी का खोदवली असतील?
पराक्रमी सातवाहनांना ‘आंध्रभृत्य’ म्हणतात, त्यांचं असेल का हे ‘शैलकृत्य’?
कार्ले-बेडसे लेण्यांच्या मानाने अर्वाचीन असूनही कातळाची निवड आणि लेणी खोदाई तंत्र सामान्य दर्जाचे का?
प्रत्येक लेणी इतक्या दुर्गम आणि अवघड चढाईची कशासाठी?
का पुजिलं जातंय ‘देवीतत्त्व’ या खोऱ्यात? का पुजिली जातीये वाघासारखी ‘निसर्गदेवता’ या खोऱ्यात?
बाजूच्या खोऱ्यात असूनही, आंदरमावळात कुठेच बौद्धलेणी का नाहीत?
आजच्या या अडचणीच्या ‘आडवाटा’, असतील का कोणे एके काळी ‘वहिवाटा’? अशा प्रश्नांची उत्तरं नकाशातून आणि प्रत्यक्ष भेटीतून शोधायचा प्रयत्न केलेला. साईली पालांडे-दातार सारखी अभ्यासू डोंगरमैत्रिण या भूगोलातला इतिहास मांडायला हजर होतीच.
निसर्गाशी जुळवून घेताना नदीच्या खोऱ्यात जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधला. परिसर ‘सुजलाम सुफलाम’ करणाऱ्या आंध्रा नदीच्या आधाराने जगू पाहणाऱ्या माणसाच्या शेती-व्यापारउदीम-धर्मप्रचार-सत्तानियंत्रण अशा गरजा विकसित होत गेल्या असणार. या गरजांमधून फुलत गेली नद्यांच्या खोऱ्यात संस्कृती. रोमन-ग्रीक व्यापारामुळे कोकणातील बंदरे नालासोपारा-कल्याण-चौलपासून घाटमाथ्यावरची सत्ताकेंद्रे जुन्नर-नाशिक-पैठणकडे नेणाऱ्या घाटवाटा सुरू झाल्या. धर्मप्रचार, ध्यानधारणा आणि वर्षांवासासाठी लेणी खोदवली गेली असणार. सत्तानियंत्रण म्हणून दुर्ग-किल्ले बनले. आसपासच्या प्रमुख शिखरांवर श्रद्धास्थानं आणि दैवतांची स्थापना झाली. अजस्र कातळाच्या उदरात, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, पारंपरिक थोडकी साधने-पद्धती वापरून वर्षांनुवर्षे या पाऊलखुणा घडवण्याचा उपक्रम कित्येक शतके खोऱ्यात चालू असावा.
आंदर मावळातील या सर्व शैलकृत्यांबद्दल माझा ‘कयास’ असा.
१. कल्याण ते नवलाख उंबरे ते पुणे या पुरातन मार्गासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून ‘आंदर मावळा’तला सोप्प्या चढाईचा कुसुर घाट असणार.
२. लेणी खोदण्याच्या काळाबद्दल अनुमान काढणं अवघड आहे. पण, बाजूच्या नाणेमावळात कार्ले-भाजे-उकसण-पाल अशा बौद्धलेणी असूनही या आंदर मावळात बौद्धलेणी नसणं आणि लेण्यांसाठीच्या कातळाची निवड आणि खोदाई सामान्य असणं, यावरून या लेण्या दहाव्या ते बाराव्या शतकाच्या आसपास खोदल्या असाव्यात – जेव्हा लेणीखोदाईचं तंत्र लुप्त पावू लागलं असू शकेल.
३. इतकी लेणी खोदली गेलीयेत, म्हणजे या उपक्रमाला राजाश्रय आणि धनाश्रय नक्की होता. पण, तरीही सातवाहनांशी या खोऱ्याचा संबंध जोडावा, असं मला तरी काही आढळलं नाही.
४. लेणी खूप दुर्गम आणि अवघड चढाईच्या, त्यामुळे त्या जगापासून दूर राहणाऱ्या कोण्या साधकांच्या असू शकतील.
५. ‘देवीतत्त्व’ आणि वाघासारखी ‘निसर्गदेवता’ या खोऱ्यात पूजली जातीये.
आंदर मावळच्या वारी करून, एका साध्या ट्रेकरने जाता जाता नोंदवलेली ही निरीक्षणे!!!
आपल्या मातीत बनलेल्या – घडलेल्या जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणांचा हा समृद्ध वारसा आज निव्वळ अडगळीत पडलाय. त्याचा अजून शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास व्हावा, असं मनोमन वाटतं.
पाऊलखुणा, भुलविती पुन:पुन्हा
आजही मावळवारीच्या फोटोजचे अल्बम धुंडाळतो, तेव्हा डोळ्यांसमोर तरळतात, पुन:पुन्हा भुलवणाऱ्या पाऊलखुणा – आंदर मावळच्या संस्कृतीच्या!!!
सह्यद्री आणि मान्सूननी बनवलं आंध्रा खोरं आणि नदीच्या आधारावर माणसानं फुलवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा धुंडाळत भटकंती केली होती. ..विस्मृतीत दडलेल्या कोण्या आंद्रा नदीच्या खोऱ्यात, पूर्वजांच्या पाऊलखुणा जपणाऱ्या घाटवाटा-दुर्ग-लेणी-राऊळं पाहून थक्क झालेलो..
आंदर मावळच्या घुमणाऱ्या वाऱ्याने, फुललेल्या रानफुलांनी आणि घमघमणाऱ्या भातखाचरांनी वेड लावलेलं.
काहीशे वर्षांपूर्वी वाटसरूंसाठी घाटमार्गावर पाण्याची टाकी खोदवण्याची जिद्द थक्क करणारी.
काहीशे वर्षांपूर्वी व्यापार-प्रवासी-धर्मप्रचार-राज्यसंस्था यांच्यासाठी घाटवाटांचं महत्त्व वादातीत होतंच.
पण, आजही या ‘पाऊलखुणा’ जोडतात कोण्या सासुरवाशिणेला वाडी मधल्या माहेराशी. सासुरवाशीण मुलीला वाडीवर माहेरी घेऊन जाणारे आजोबा तान्ह्य़ा नातीला हातात घेऊन, ओढय़ातल्या धोंडय़ांवरून उतरताना पाहून थक्क झालेलो.
..रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना खटपट आणि धडधड झाली, ती अजून जाणवत होती..
..कातळावरून निसटत्या पायऱ्यांची न संपणारी श्रृंखला कशी खोदली असेल, या विचारानं थक्क झालो होतो..
..देवराईमधली निखळ शांतता अनुभवून भारावून गेलो होतो..
..डोंगरकपारीतल्या शिवलिंगास नैसर्गिक जलाभिषेक अलगद घडावा, ही कृती एखाद्या कविमनाच्या भक्ताचीच असणार..
काळ बदलला, पण सह्यद्रीतल्या संस्कृतीच्या पाऊल-खुणा, भुलविती-पुन्हा..भुलविती-पुन्हा..
साईप्रकाश बेलसरे

Story img Loader