थोर गायिका कृष्णा कल्ले यांचे १८ मार्च २०१५ रोजी निधन झाले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. गेली ५० वर्षे रसिकांना रिझवणारा त्यांचा आवाज शांत झाला. त्यांच्या अनेक गाण्यांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. म्हणूनच त्यांच्याविषयी थोडेसे.
१९६० साली आमच्याकडे प्रथम रेडियो आला. मी त्या वेळी चार वर्षांचा होतो. तेव्हापासून ‘आकाशवाणी मुंबई-ब’ केंद्र आमच्या घरातीलच एक माणूस झाले. दिवसाची प्रसन्न सुरुवात ‘मंगल प्रभात’ ऐकूनच होत असे. त्यानंतर सकाळपासून भावगीतांचे अनेक कार्यक्रम लागायचे. जसे भावधारा, गुंजारव, गीत गुंजार, भावतुषार, रसरंजन वगैरे वगैरे!
‘भावगीत’ या प्रकाराला मराठी संगीतात त्या काळी एक विशेष स्थान होते. मराठी भावगीतांची एक खास परंपरा होती. गजानन वाटवे, जी. एन. जोशी, बबनराव नावडीकर, त्यांच्यानंतर दशरथ पुजारी, वसंत आजगावकर, गोविंद पोवळे आणि माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मालती पांडे अशा दिग्गज गायक-गायिकांनी हा आनंदाचा मळा फुलविला होता. संगीतकार दशरथ पुजारी, वसंत प्रभू, यशवंत देव, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर अशा प्रतिभावान संगीतकारांनी भावगीतांचे नंदनवन फुलवले होते. त्या काळी हिंदी चित्रपट संगीत जसे लोकप्रिय होते तसेच मराठीमध्ये भावगीते व सुगम संगीत अतिशय लोकप्रिय होते.
त्याच काळात आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘भावसरगम’ हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रत्येक शनिवारी सकाळी सादर होऊ लागला. दर महिन्याला एक नवीन भावगीत जन्माला येऊ लागले! १९६२ ते १९८२ आम्ही हा कार्यक्रम नियमित ऐकत होतो. त्या वीस वर्षांत हजारो नवीन भावगीते जन्माला आली. या भावसरगम कार्यक्रमात एक गोड आवाज सारखा निनादू लागला. त्या आवाजाच्या नादाने सारे रसिक नादावून गेले! त्या आवाजाचे नाव होते- अर्थात कृष्णा कल्ले!
कृष्णा कल्ले यांचा जन्म ८ डिसेंबर १९४० साली झाला. मूळच्या कारवारी असलेल्या कृष्णाबाईंचे बालपण कानपूर येथे गेले. त्यामुळेच हिंदी व उर्दू भाषेशी त्यांची विशेष जवळीक होती. त्यांचे वडील गाण्याचे रसिक होते. आई उत्कृष्ट व्हायोलिन वादक होती. त्यामुळे लहानपणापासूनच कृष्णाताईंना गाण्याची आवड निर्माण झाली. दोघे भाऊ तबला, पखवाज वाजवत असत. त्यांच्या घरी रोज संध्याकाळी देवासमोर भजन म्हणण्याची प्रथा होती. कानपूरमध्ये होणाऱ्या अनेक शास्त्रीय संगीत गायकांच्या मैफली त्या ऐकत असत व त्यांचे वडील अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या घरी बोलावत असत. त्यामुळे लहानपणीच चांगल्या गायकांना ऐकण्याचे भाग्य त्यांना लाभले. गाण्याचे त्यांचे शिक्षण शालेय वयातच सुरू झाले.
१९५७ मध्ये, वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांना युवा गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, (National Youth Singing Award) तो राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिला गेला. १९६५ मध्ये त्यांना ‘के. एल. सेहगल गोल्डन व्हॉइस’ पुरस्कार (K.L. Sehgal Memorial Golden Voice Award)ि मिळाला.
१९६० नंतर त्या मुंबईत आल्या. त्यांचा परिचय संगीतकार यशवंत देव यांच्याशी झाला. यशवंत देव त्या वेळी आकाशवाणीवर कार्यरत होते. मराठी साहित्यात जसे अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ यांना नवकथेचे जनक म्हटले जाते, तसेच मराठी सुगम संगीतात यशवंत देव व श्रीनिवास खळे हे संगीतकार भावगीतांच्या नव्या युगाचे जनक ठरतात. यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले यांचे गाणे प्रथम ‘भावसरगम’ या कार्यक्रमासाठी केले. कवी ना. घ. देशपांडे यांचे शब्द होते- ‘मन पिसाट माझे.. अडले रे.. थांब जरासा..’ आणि त्या आवाजाच्या जादूने रसिकांना वेड लावले. त्यानंतर या आवाजात अनेक गोड गाणी जन्माला आली. यशवंत देव यांनी या गोड आवाजाचे सोने केले जसे, ‘तुझ्याचसाठी कितीदा.. तुझ्याचसाठी रे.. मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे..’; ‘चंद्र अर्धा राहिला.. रात्र अर्धी राहिली.. भेट अर्धी, प्रीत अर्धी गीत अर्धे राहिले..’ किंवा ‘कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा..’
१९६८-६९ सालच्या आसपासची गोष्ट. वंदना विटणकर यांचे एक गाणे ‘भावसरगम’ या कार्यक्रमात आले होते. अनिल मोहिले यांनी या गाण्याचे संगीत केले होते. शब्द होते, ‘परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का? भाव दाटले, मनी अनामिक साज तयांना देशील का?’ हे गाणे चार शनिवार श्रोत्यांनी ऐकले आणि रसिकांनी एवढे डोक्यावर घेतले की काही विचारू नका. हे गाणे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले. त्याचबरोबर गायिका कृष्णा कल्ले हे नाव मराठी मनामनांत ठसले. अतिशय गोड चाल, सुंदर वाद्यमेळ, गाण्यातली हळुवार भावना. युवतीच्या मनातली हुरहुर, तिच्या आशाआकांक्षा, अपेक्षा आणि तिची सोनेरी स्वप्ने! आणि हे अतिशय प्रभावीपणे व्यक्त करणारा जादूभरा आवाज! सारंच खूप सुंदर! हे गाणे म्हणजे विविध रंगांनी नटलेले एक मोहक, लोभस चित्र! हे गाणे अतिशय तजेलदार आहे. गाण्याच्या सुरुवातीचे मेंडोलीनचे छेडलेले सूर ऐकताना आपल्या अंगातून लहरी निर्माण होतात, मन मोहरून जाते, असा माझा अनुभव आहे. मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्याची ताकद या गाण्यात आहे. कृष्णा कल्ले यांनी यापूर्वीही अनेक गाणी गायिली होती, पण या गाण्याने गहजब केला. एच.एम.व्ही. कंपनीने या गाण्याची खास रेकॉर्ड काढली.
गाण्यातील त्यांचे मराठी उच्चारही शुद्ध होते. त्यांच्या आवाजात मात्र कारवारी मोकळेपणा जाणवतो. त्यांनी हिंदीमध्ये दोनशेहून अधिक गाणी व मराठीत शंभरहून अधिक गाणी गायिली आहेत. त्यांच्या आवाजाचा बाज लावणी गायनासाठी चांगला होता. त्यांच्या अनेक लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत. तरीही त्यांनी भावगीत गायिका असाच आपला ठसा उमटवला. गेल्याच वर्षी त्यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
संगीतकार यशवंत देव, अनिल मोहिले, श्रीनिवास खळे, बाळ चावरे, विठ्ठल शिंदे, दत्ता डावजेकर, हृदयनाथ मंगेशकर आदी सर्व दिग्गज संगीतकारांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली आहेत. त्यांनी अरुण दाते, महम्मद रफी, मन्ना डे, महेंद्र कपूर यांच्याबरोबर अनेक द्वंद्वगीतेही गायली आहेत. त्यांना सर्व रसिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा