नवरात्र विशेष
महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे. नेपाळी भाषेत देगू तलेजूभवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधली तुळजाभवानीची परंपरा वैशिष्टय़पूर्ण आहे.
छत्रपती शिवराय आणि आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. प्राचीन काळापासून तुळजाभवानीचे अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता. त्यानुसार इ. स. १३२४ ला कर्नाटवंशयीय राजा हरिसिंगाने प्रथम नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे श्री तुळजाभवानीची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला आहे. नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हणतात. नेपाळमध्ये कर्नाट राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे ही नेवारी बांधकामशैलीची आदर्श उदाहरणे आहेत. उतरते छप्पर किंवा पॅगोडय़ाप्रमाणे आकार असणारी तलेजूभवानीची भव्य मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत.
हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर असून हा देश ८०० किमी लांब आणि २०० किमी रुंद आहे. नेपाळमध्ये पूर्वी अनेक छोटी मोठी संस्थाने असल्याने या राजांच्या अधिकारक्षेत्रामुळे नेपाळचा भूभाग विविध संस्थानांत विभागला गेला होता. परंतु २१ डिसेंबर १७६८ साली पृथ्वीनारायण शाहा नावाच्या राजाने नेपाळमधील सर्व राजांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली. त्यानंतर जवळपास २००८ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाहीच होती. यादरम्यान नेपाळमध्ये मल्ल, शाहा आणि राजपूत या घराण्यांनी आपला राज्यकारभार केला. विशेष म्हणजे ही तीही घराणी मूळची हिंदुस्थानातील आहेत. या राजघराण्याबरोबरच नेपाळमध्ये ब्राह्मण, मोर, रजपूत, कायस्थ, मगर, गुरुंग, जरिया, नेवार, मुरची, किरत, लिंबस, लापचा याप्रमाणे अनेक समाजांचे लोक राहतात. हा सर्व समाज हिंदू असल्याने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची ओळख होती. नेपाळवर राज्यकारभार करणारे राजघराणे कुठलेही असले तरी देगू तलेजूभवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झाला आहे. हजारो वर्षांपासून नेपाळने आपली परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापुराप्रमाणे त्याठिकाणच्या देवीच्या प्रथापरंपरा, पुजाअर्चा आणि विधी उपचार केले जातात.
तुळजाभवानी भक्त राजा हरिसिंग –  
राजा हरिसिंगदेवाचे मूळ घराणे कर्नाटवंशीय असून त्यांच्या साम्राज्यविस्तार कर्नाटकापासून बंगालपर्यंत आणि त्यानंतर पुढे बिहापर्यंत पसरला होता. राज्यकारभारामुळे या घराण्याच्या राजधान्या बदलल्या तरी दक्षिणेत असताना त्यांनी सुरू केलेली तुळजाभवानीची भक्ती कायम ठेवली होती. बिहार प्रांतात या घराण्याची राजधानी सिमरौनगढ या ठिकाणी असून मध्ययुगीन कालखंडात या भागाला मिथिला म्हटले जात होते. सध्याच्या बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यत सिमरौा गढचा भाग मोडत होता. या ठिकाणी राज्यकारभार करत असताना दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकाने सिमरौनगढावर आक्रमण केले. तुघलकापुढे हरिसिंगाचा निभाव न लागल्याने त्यांनी आपली पत्नी देवलदेवी आणि पुत्र जयपालदेवसह नेपाळकडे पळ काढला. या वेळी ते आपल्या मुलीला वाचवू शकले नाहीत. कारण घियासुद्दीनने हरिसिंगाच्या मुलीला उचलून नेले होते. हरिसिंग हरले असले तरी त्यांनी देवीवर श्रद्धा ठेवून आपला पुढचा प्रवास चालू ठेवला. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपली कुलदेवता तुळजाभवानीची मुर्ती घेतली होती. आपल्या संरक्षणार्थ या लोकांनी नेपाळ जवळ केला. नेपाळच्या भक्तपूर भागात त्यावेळी रुद्र मल्ल नावाचा राजा राज्यकारभार करत होता. मल्ल म्हणजे पहेलवान. कधीकाळी कुस्तीच्या जोरावर या घराण्याने नेपाळमध्ये आपली सत्ता  प्रस्थापित केली. मल्ल घराणे मुळचे उत्तर भारतातील अवध या ठिकाणचे रहिवासी असून ते सरजुबंशीयांचे वंशज असल्याने त्यांनी हरिसिंगाच्या कुटुंबाला आश्रय दिला. राज्य गेले, राजा गेला परंतु तरीही हरिसिंगाच्या वंशजांनी तुळजाभवानीची आस सोडली नव्हती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली तुळजाभवानीची भक्ती त्यांच्या वंशजांनी पुढेही चालूच ठेवली होती. त्यामुळे आपल्या पदरी असलेल्या तुळजाभवानीच्या मुर्तीचा जप करत या लोकांनी अखेर नेपाळमध्ये राज्याश्रय मिळविला.
नेपालनरेश रुद्रमल्लने हरिसिंगाचा पुत्र जयपालदेवशी  आपली मुलगी नायकदेवीचा विवाहलावून दिला. मल्ल घराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपालदेवच्या हाती आली. साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगाच्या वंशजांची होती. त्यामुळे हरिसिंगाच्या वंशजांनी प्रथमत: नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी श्री तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साहजिकच तुळजाभवानी ही राजघराण्याची कुलदेवता बनून नेपाळमध्ये विराजमान झाली. दिवसेंदिवस मल्लांच्या सत्तेचा उत्कर्ष होवुन नेपाळमधील काठमांडू आणि पाटण इथपर्यंत या घराण्याने आपला साम्राज्यविस्तार घडवून आणला.
साम्राज्यविस्तारोबरच मल्लांचा विस्तारही वाढला आणि त्यातूनच या घराण्याचे तीन भाग पडून भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा तीन राजधान्या तयार झाल्या. साम्राज्यविस्तारासोबत तुळजाभवानीचा महिमाही विस्तारित झाला. आणि तुळजाभवानी त्या त्या राजधानीत विराजमान झाल्या. प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इ. स. १५६७ साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडूत तर १६६७ ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि १७३६ ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधली.
तुळजाभवानी ते तलेजूभवानी –    
नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हटले जाते. मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे अतिशय भव्य असून देगू तलेजूभवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडा आणि त्यासोबत देवी परिवारातील देवदेवतांची अनेक मंदिरे बांधलेली असल्याने देवी मंदिराच्या परिसरात इतर मंदिराची गर्दी झालेली आहे. या मंदिर परिसराला दरबार चौक म्हटले जाते. देगू तलेजू ही नेपाळमधील राजघराण्याची कुलदेवता असल्याने देवीची मंदिरे ही राजाच्या वैयक्तिक मालकीची असल्याने या मंदिरात वर्षभर बाहेरच्या सर्वसामान्य लोकांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. अगदी २००७ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाही असल्याने शेकडो वर्षांपासून यात कुठलाही बदल झाला नाही.

रोज सकाळी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राजाच्या पुढील दिनचर्येला सुरुवात होत नव्हती. याकरिता प्रत्येक मंदिरात रोजच्या पूजेची व्यवस्था पाहण्याकरिता विशेष कायमस्वरूपी पुजारी आणि त्याच्या मदतीला इतर सेवेकरी देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे तुळजापुरातील देवीचे पुजारी ज्याप्रमाणे वंशपरंपरेने एकच आहेत त्याप्रमाणे नेपाळमध्येही पूर्वीपासून आतापर्यंत पूजेचा मान एकाच घराण्याकडे आहे. त्यानुसार भक्तपूरमध्ये सिद्यवीर कर्माचार, काठमांडूत उद्धव मानकर्माचार्य आणि पाटणमध्ये विष्णूचंदा मानकर्माचार्य हे वंशपरेने तलेजूची धार्मिक पद्धतीने पूजाविधी करतात. फक्त नावच नाही तर बऱ्याच बाबतीत तुळजाभवानीच्या पूजाविधी परंपरेचे साम्य या ठिकाणी पाहण्यास मिळते. देवीचा पुजारी ब्राह्मण समाजाचा असून इतर सोळा सेवेकरी अन्य समाजांचे आहेत. तुळजापुरातील सेवेकऱ्यांना सोळा सेवेकरी म्हटले जाते त्याप्रमाणे तिथे सोलकास्ट म्हणतात. देवीला स्पर्श करून पूजाविधी करण्याचा मान ज्याप्रमाणे इथे फक्त कदम घराण्याकडेच आहे त्याप्रमाणे तिथे तो मान ठरवून दिलेल्या ब्राह्मणांकडे आहे. तलेजूची पूजाअर्चा ही सोवळ्यात आणि पूर्णपणे वैदिक पद्धतीने केली जाते. याचबरोबर आपल्याप्रमाणे कुठलीही आरती न करता पूजा झाल्यानंतर जोशी संकल्प सोडतो. पूजेकरिता लागणारे पाणी, फुलं, नैवेद्य यांसारख्या सर्व बाबींची पूर्तता मंदिरातच केली जाते. रोज सकाळी पूजाविधी व्यवस्थितपणे संपन्न व्हावेत म्हणून मंदिर परिसरात मोठा बारव, फुले यांसारख्या सेवा कायम करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्य तयार करण्याकरिता मंदिरातच चूल मांडलेली असते. सोलकास्टमधील प्रत्येक जण ठरवून दिलेले काम नियमितपणे करत असतो. त्यानुसार सोलकास्टमधील सेवेकरी आणि त्यांची कामे याप्रमाणे ठरवून देण्यात आलेली आहेत.
१.     जोशी : तिथी मिथी ठरवणे आणि पूजेनंतर संकल्प सोडणे.
२.     मल्लठकुणी : राजाचा खासगी नोकर असून राजाचा प्रतिनिधी म्हणून पूजेला उपस्थित असतो.
३.     प्रधान : मंदिरात तयार करण्यात आलेला नैवेद्य दाखविण्याचे काम करतो.
४.     राजोपाध्याय : राजाकडून आलेला पक्वान्नाचा नैवेद्य दाखविणे.
५.     राजभंडारी :  मंदिरात नैवेद्य बनविण्याचे काम करतो.
६.     महर्जा : बाहेरील कामावर देखरेख ठेवणे.
७.     परिहार : ठरवून दिल्याप्रमाणे नगारा वाजविणे.
८.     डंगोल : पूजाविधी करताना सर्व कामांत मदत करणे.
९.     कुचीहार (मेहतर ) : मंदिर आणि परिसराची साफसफाई करणे.
१०.     दमई (दर्जी ) : देवीचे वस्त्र शिवणे.
११.    कसाई : बलिदान देणे.
१२.    शिगसेन : बलिदानासाठी रेडा (रांगा) आणि बोकड (बोका) आणणे. इतर चार सेवेकरी सर्व कामांत मदत करतात.
नेपाळमधील तलेजूभवानीची मूर्ती १० भुजांची असून पाठीमागे शंकर उभे आहेत. देवीच्या हातात विविध प्रकारची आयुधे आहेत. हातात त्रिशूल घेऊन देवी विजयी मुद्रेने महिषासुराचा वध करताना प्रसन्न दिसून येतात. नवसाने वेगवेगळ्या भागांतील मूर्ती सोन्या चांदीने मढविलेल्या असतात. भक्तपूरमधील देवीची मूर्ती तर १०८ किलो सोन्याची आहे.

देगू तलेजाभवानीची परंपरा
*    ८ व्या शतकात दक्षिणेकडील बहुसंख्य प्रांतावर कर्नाट घराण्याची सत्ता असून तुळजाभवानी ही त्यांची कुलदेवता होती. सत्ता संघर्षांत कर्नाट घराण्याची सत्ता दक्षिणेकडून बंगाल प्रांतावर आणि तेथून बिहारमधील चंपारण्य जिल्हय़ात पसरत गेली तरी या घराण्याने तुळजाभवानीची भक्ती कधी सोडली नाही.
*    १४ व्या शतकात बिहारमधील चंपारण्य जिल्हय़ात सिमरौनगढ या ठिकाणी कर्नाटवंशीय राजा हरिसिंगाची सत्ता असून दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलकनने हरिसिंगावर आक्रमण केल्याने हरिसिंगाने नेपाळचा आश्रय घेतला. नेपाळमध्ये गेल्यानंतर भक्तपूर या ठिकाणी हरिसिंगाने तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिसिंगाचा पुत्र जयपालदेवाचा विवाह मल्ल राजवंशातील कन्येबरोबर झाल्याने कर्नाटवंश नेपाळच्या सत्तास्थानी बसला.
*    मल्ल घराणे आईकडून कर्नाटवंशीय असल्याने त्यांच्यातील तुळजाभवानीची भक्ती कायम असल्याने या घराण्यातील प्रत्येक राजाने तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानल्याने इ. स. १५६७ साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडूत तर १६६७ ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि १७३६ ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधून काढली.
*    नेपाळमध्ये तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हणतात. नेपाळी भाषेतील हा बदल असला तरी तेथील पूजाविधी आणि प्रथापरंपरा अगदी तुळजाप्रमाणेच आहेत. दसऱ्याला दसैन म्हणतात तर अष्टमीला १०८ रेडे आणि बोकडांचे बलिदान दिले जाते.
*    तुळजाभवानीप्रमाणेच तेथेही सोळा सेवेकरी असून ते वंशपरंपरेने नेमून दिलेले काम करतात. राजेशाहीनंतर मंदिराच्या देखभाल दुरुस्तीत शिथिलता आलेली आहे. साहजिकच त्याचा परिणाम मंदिरावर झालेला आहे. नेपाळमधील छोटय़ा-मोठय़ा मंदिरात जाताना पायातील चप्पल किंवा बूट काढले जात नाहीत.

shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास

लोकशाही येण्यापूर्वी देवीच्या पूजेकरिता राजा किंवा त्याचा प्रतिनिधी प्रत्यक्ष मंदिरात राहत असे. परंतु राजेशाहीच्या अस्ताबरोबरच पूजाविधीमध्येही मोठी शिथिलता आली. राजाकडून सेवेकऱ्यांना मोबदला दिला जायचा. लोकशाहीमुळे राजाचे अधिकार गेले आणि मंदिरातील प्रशासनव्यवस्था कोलमडून पडली. मंदिराची मालकी सरकारकडे गेली तरी तेच पुजारी कायम असून त्यांना कुठलाही मोबदला मिळत नाही. केवळ भक्ती म्हणून ते देवीचा पूजाविधी करत असले तरी चरितार्थ चालविण्यासाठी त्यांना अन्यत्र रोजगार करावा लागतो. मी स्वत: तीनही मंदिरांच्या पुजाऱ्यांशी चर्चा केली. त्याद्वारे एक निश्चित सिद्धांत मांडता येतो की, नेपाळमधील देगूतलेजूचे वसतिस्थान हे केवळ नावापुरते तुळजाभवानीचे वसतिस्थान नसून त्यातील प्रथापरंपरेबरोबरच सर्व काही सारखेच आहे.
देगू तलेजूचा उत्सव दसैन (दसरा )-   
तुळजाभवानीप्रमाणे तलेजूचा नवरात्र महोत्सव नऊ दिवसांचा असून तुळजापुराप्रमाणे तेथेही शाकंभरी आणि शारदीय नवरात्रात घटस्थापाना होत असते. फक्त नावात बदल आहे. नेपाळात दसैनचैत आणि दसाइन या नावाने नवरात्र महोत्सव साजरा होत असतो. नेपाळी कालगणना वेगळी असली तरी धार्मिक सणसमारंभ हिंदूंच्या शकगणनेप्रमाणेच साजरे होत असतात. आपल्याकडे नवरात्र महोत्सव हे चैत्र आणि आश्विन महिन्यात साजरे केले जातात. त्या ठिकाणीसुद्धा अगदी याच वेळी नवरात्र होते. फरक एवढाच की, तेथे चैत्राला चैत आणि आश्विन महिन्याला असोज म्हणतात.
असोज प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. नऊ दिवस ज्या ठिकाणी घटस्थापना केली जाते त्या ठिकाणी घरातील स्त्रियांनादेखील प्रवेश करू दिला जात नाही. घटाची पूजाअर्चा करण्याचे काम पुरुषमंडळीकडेच असते. उगवून आलेल्या घटाला जमरा म्हणतात. नवरात्रीतील सातव्या माळेला फुलपती नावाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. शाहा घराण्याचा राज्यकारभार काठमांडूतून होत असल्याने राजाला दुवा देण्यासाठी गोरखा प्रांतातून एक कलश काठमांडूत आणला जातो. यामध्ये ऊस, केळी, जमरा याप्रमाणे विविध प्रकारचे धान्य ठेवून त्याला लाल कपडय़ाने बांधलेले असते. विशेष म्हणजे १६९ कि. मी.चे अंतर मोठय़ा उत्साहात पार पाडले जाते. मानाचा कलश काठमांडूत आल्यानंतर त्यापुढे राजेशाही लष्कराची मानाची परेड सादर केली जाते. यालाच फुलपती परेड म्हटले जाते. फुलपती परेडनंतर राजाचा तिलकदान कार्यक्रम होतो. या वेळी राजा कुमारीदेवीचे दर्शन घेऊन साक्षात देवीचा आशीर्वाद घेतल्याचा आुभव प्राप्त करतो. आपले शासन हे देवीच्या कृपेने चालू असून पुढील वर्षांकरिता ती एक परवानगी असते. त्यामुळे दरवर्षी फुलपती परेड घेऊन तिलकदान करून राज्यकारभारासाठी ती एक प्रकारे देवीची परवानगी असते.
नवरात्रीतील नऊ दिवसांत देवीचे महिषासुराशी युद्ध चालू असते, त्यानुसार अष्टमीच्या दिवशी देवीकडून महिषासुराचा वध केला जातो. त्यामुळे अष्टमीच्या रात्रीला काळरात्र म्हटले जाते. महिषासुराचे प्रतीक म्हणून बलिदानाची प्रथा इथेही आपल्यापेक्षा जरा वरचढ असल्याने तलेजूच्या पुढे या दिवशी तब्बल ५४ रेडे (रांगा) आणि ५४ बोकड (बोका) बळी दिले जातात. याचबरोबर या दिवशी वैयक्तिक नवसासाठी म्हणून जवळपास हजारच्या वर बळी दिल्याने दरबार चौकात अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला असतो.
नवरात्रीला तुळजाभवानीची मूर्ती मुख्य मंदिराबाहेर आणून ज्याप्रमाणे मिरविली जाते त्याप्रमाणे फुलपती परेडकरिता तलेजूची मूर्ती मंदिराबाहेरच्या चौकात आणली जाते. ज्या ठिकाणी देवी परिवाराची मंदिरे आहेत त्याबाहेरील भव्य चौकाला दरबार चौक म्हणतात तर काठमांडूतील या चौकाला हनुमान ढोकाही म्हटले जाते. दोन दिवस मूर्ती बाहेर ठेवल्यानंतर नवरात्रीदिवशी देवीची भव्य मिरवणूक काढून दसैन (दसरा) साजरा केला जातो. या दिवशी अवजारे, वाहने, दुकाने, वह्या पुस्तके, नवीन वस्तूची पूजा केली जाते.
देवीच्या रूपातील कुमारीदेवी –               
भारतात देवीच्या नावावर ज्याप्रमाणे जोगत्या सोडण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे नेपाळमध्ये तलेजूचा आवतार म्हणून एका कुमारीची निवड करून तिला कुमारीदेवीचा स्वतंत्र दर्जा दिला जातो. कुमारीदेवीची निवड करण्याची प्रक्रिया फारच कडक असून याकरिता ३ ते ५ वर्षांच्या कुमारिकेला निवडण्यासाठी मोठे दिव्य केले जाते. या कुमारिकेच्या शरीरावर कसलाही डाग असू नये, असा एक निकष असतो. त्याशिवाय निवड झाल्यानंतर तिला घनदाट जंगलात सोडून तिच्या निर्भयतेची परीक्षा घेतली जाते. अशा अनेक कसोटय़ांवर उतरल्यानंतर तिची कुमारीदेवी म्हणून निवड केली जाते. तीन ठिकाणच्या देवींसाठी तीन स्वतंत्र कुमारीदेवी असून राजाच्या राजवाडय़ालगतच कुमारीदेवीचा महाल असतो. रोज देवीचे दर्शन घेतल्यानंतरच राज्याच्या दिनचर्येला सुरुवात व्हायची. तिलादान कार्यक्रमाच्या रूपाने राजाने राज्यकारभारासाठी देवीची परवानगी घेणे अपेक्षित धरण्यात आलेले आहे. कुमारीदेवीच्या भावमुद्रेवरून रोजचे भविष्य वर्तविले जायचे. कुमारीदेवी हे शक्तीचे एक रूप असले तरी अन्यत्र कुठेही ही पद्धत अस्तित्वात नसल्याने राजा हरिसिंगाची मुलगी घियासुद्दिनने पळवून नेल्याने तिच्या रूपात शक्तीची पूजा करणे आणि मुलीला आत्मनिर्भर करणे हे दोन्ही उद्देश या ठिकाणी गृहीत धरलेले असावेत. कुमारीदेवीच्या रूपातील मुलगी वयात आल्यानंतर नव्या  कुमारिकेची निवड केली जाते. पहिल्या कुमारीदेवी त्यानंतर गृहस्थाश्रमात जातात हा अत्यंत चांगला संदेश या रूपाने दिला जातो. राजेशाही संपल्यानंतर कुमारीदेवीची अवस्थाही बिकट व्हायला सुरुवात झाली. चरितार्थाकरिता त्यांना आता दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या हाताकडे पाहण्याची वेळ आली आहे.

नेपाळमधील देवी परंपरेची वैशिष्टय़े ..
कुमारी देवी
*    पहाटेपासूनच मंदिरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. त्यातही स्त्रियांचा भरणा अधिक असतो. देवीच्या पाया पडल्याांतर भांगामध्ये कुंकू लावण्याची पद्धत मोठय़ा प्रमाणावर आहे. सौभाग्याचे लक्षण म्हणून जवळपास प्रत्येक स्त्रीच्या भांगात कुंकू असते. भारताबरोबरच नेपाळवर चीनचाही प्रभाव मोठा आहे. त्यामुळे शृंगाराच्या बाबतीत भारताचे कपडय़ांच्या बाबतीत चीनचे अनुकरण केल्याचे दिसून येते. कुठल्याही स्त्रीच्या अंगावर गुंजभरदेखील सोने आढळून येत नाही.
*    नेपाळमध्ये तलेजूच्या नावाने भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा तीन ठिकाणी मंदिरे आहेत. तीनही मंदिरे वर्षांतून एक दिवस म्हणजे फक्त अष्टमी दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली असतात. नेपाळमध्ये आपल्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने देवीची मंदिरे नाहीत. फक्त देगू तलेजूभवानी हेच मंदिर देवीसाठी सर्वपरिचित आहे.
*    देवी मंदिराच्या परिसरात गजानन, शंकर, भैरव, विष्णू अशा अनेक मंदिरांचा समावेश असतो. इतर वेळी लोक देवपरिवाराचे दर्शन घेत असतात. विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिराचा अपवाद सोडल्यास इतर कुठल्याही मंदिरात जाताना चप्पल न काढताच देवाचे दर्शन घेतात. त्यामुळे मंदिर आणि परिसरात कमालीची अस्वच्छता असते.
*   भैरव म्हणजे शिवाचा गण असून तो देवीच्या संरक्षणाकरिता कुठल्याही देवी मंदिराबाहेर असतो. काठमांडूतील देवी मंदिराच्या बाहेर असणारा भैरव हा जवळपास ३० फूट उंचीचा आक्राळविक्राळ असून तो एकाच दगडात कोरलेला आहे. या भैरवाला पशुबळीबरोबरच नेवैद्यात बीअर दिली जाते.
*    नेपाळमध्ये सध्या राजपरिवाराबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. त्यामुळे देवीच्या पूजेचा मानही लोकशाही मार्गाने निवडलेल्या पंतप्रधानाकडे आलेला आहे. परंतु राजकीय पातळीवर देवाविषयी कमालीची उदासीनता आहे.
*    बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्याचे शिर कापून ते एखाद्या ताटात ठेवून अगदी वाजतगाजत मिरविले जाते.
*   पाटणच्या देवीमंदिराबाहेर रेडय़ाचा बळी दिल्यानंतर त्याच्या आतडयाचा वापर मुख्य मंदिराच्या दारावरील तोरण म्हणून केला जातो. दुसऱ्या वर्षी नवीन आतडय़ाचे तोरण आल्याशिवाय पहिले काढले जात नाही.
*    हिंदू धर्मातील अनेक प्रथापरंपरात बौद्धांनाही मोठे स्थान असून कुमारीदेवी ही बौद्ध धर्मीयातून निवडण्याची पद्धत रूढ होती. राजकीय वरदहस्त गेल्याने कुमारीदेवीसाठी मोठा महाल असला तरी लोकांपुढे हात पसरून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे कुमारीदेवींचे वय लहान असल्याने त्यांचे पालकच त्यांची गादी चालवतात. आता सुधारणांमुळे कुमारीदेवींना शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेला असतो. तो त्यांना घरी जाऊन सामान्य शिक्षण देत असतो. कुमारीदेवी वयात आल्यानंतर त्यांचे देवी म्हणून महत्त्व संपून त्यांचे सर्वसामान्यांप्रमाणे लग्न, संसार वगैरे होते.
*    नेपाळमध्ये गरिबी असली तरी कुठेही फसवणूक होत नाही, असे निरीक्षण आहे. नेपाळ हा भारताचाच एक हिस्सा होता असे म्हटले तर नेपाळींना प्रचंड राग येतो. भारताने नेपाळला कधीही मदत केलेली नाही, आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, असे ते अभिमानाने सांगतात.
*    काठमांडूसारख्या राजधानीच्या शहरातच अजून रस्त्यावरील पथदिवे नाहीत मग बाकीच्या स्थळांचा विचार न केलेला बरा. आपल्याकडे बंद पडलेल्या मारुती कार तिकडे मोठया प्रमाणात वापरल्या जातात.  
*    नेपाळ हे लहान आणि अत्यंत गरीब राष्ट्र असले तरी उघडय़ावर नैसर्गिक विधी केले जात नाहीत. अगदी छोटीशी झोपडी असली तरी अतिशय छोटे का होईना स्वच्छतागृह  असतेच.
*    काठमांडूतील दरबार चौकात एक जुने शिव मंदिर असून अलिकडे त्याला हिप्पी मंदिर म्हणतात. याच मंदिराबाहेर दम मारो दम या गाण्याची शूटिंग झाले होते. पूर्वी इथं शंकराचे नाव घेत चिलीम ओढत बसणारे लोक असायचे. आता मात्र या मंदिरात प्रेमवीरांची प्रचंड गर्दी असते. भर चौकात चाळे करणाऱ्या या लोकांकडे कुणी ढुंकूनही पहात नाहीत हे विशेष.

जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळने आपली संस्कृती अबाधित ठेवली. तेथील राजपूत, मल्ल आणि शाहा अशी तीनही राजघराणी मूळची भारताचीच असल्याने इथली संस्कृती, आचारविचार आणि भाषेत फारसा फरक दिसत नाही. नाही तरी प्राचीन कालखंडात नेपाळ हा अखिल हिंदुस्थानातील एक घटक होता. काही इतिहासकारांच्या मते नेपाळमधील बहुसंख्य असणारा नेवारी समाज मूळचा दक्षिणेतील नायर असून नायर हे पूर्वी परमाराशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. जगाच्या पाठीवर शक्तिपीठांची  नावे भिन्न भिन्न असली तरी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत कोल्हापूर, तुळजापूर, शप्तशृंगी आणि माहूर यांचा समावेश होत असला तरी वीरांची देवता म्हणून तुळजाभवानीचा उल्लेख करवा लागतो. कोल्हापूरचे देवीचे ठाणे जवळ असतानाही छत्रपती शिवराय ज्याप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला भजत होते. त्याप्रमाणे ८ ते १०व्या शतकात दक्षिणेपासून ते बंगाल आणि बिहापर्यंत साम्राज्यविस्तार करणाऱ्या कर्नाटवंशीय राजांनी शेवटपर्यंत तुळजाभवानीचा वसा सोडला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी मल्लांच्या रूपाने नेपाळमध्ये स्थिरावल्या आणि शाहा घराण्यानेही शेवटपर्यंत तुळजाभवानीच्याच आशीर्वादाने आपला राज्यकारभार चालविला.
छत्रपती शिवरायांचे मूळ हे शेवटी मेवाडचे आणि नेपाळमध्ये राज्यकारभार करणारी सर्व राजघराणीही याच भागातील. अखिल भारतात वीरांची देवता म्हणून शक्तीची उपासना केली जाते. मग नाव काही असो, शेवटी ते वीरांचे स्फूर्तिस्थान आहे. तुळजाभवानी ते तलेजू या नावात बदल झाला तरी त्यामागची संकल्पना तीच आहे. तुळजीभवानीप्रमाणे सर्व पूजाविधी प्रथापरंपरा सारख्याच असल्या तरी नेपाळमधील देवीची मंदिरे ही सर्वसामान्यांसाठी वर्षभर खुली व्हावीत हीच अपेक्षा आहे. राजेशाही जाऊन आता लोकशाही आलेली आहे, त्यामुळे या बदलाला उशीर का होतो आहे हे कळत नाही. शक्तिपीठाच्या माध्यमातून जगभरात देवीची अनेक मंदिरे आहेत. मात्र तरीही नेपाळसारख्या दूरदेशी तुळजाभवानीचे वसतिस्थान असावे, हा एक विशेष आहे. नेपाळ या छोटय़ाशा राष्ट्राला कधीही पारतंत्र्यात राहावे लागले नाही. त्यामुळे आजही नेपाळमधील देवींची मंदिरे अतिशय भव्य आणि मूळ अवस्थेत आहेत. पृथ्वीचे रक्षणकर्ते शंकर आणि त्यांच्या पती पार्वती यांचे मूळ हिमालयात आहे, असे मानले जाते. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये तुळजाभवानीचे वसतिस्थान असणे हे रास्तच आहे. कारण नावात तुळजाभवानी ते तलेजू हा बदल असलातरी शेवटी ते पार्वतीचे रूप आहे.