ज्येष्ठ-नागरिकांकरता दूरदर्शन हे एक वरदान आहे. दिवस कसाही जातो, पण संध्याकाळपासून कंटाळा जाणवायला लागतो व हात आपल्या-आपण ‘रिमोट’कडे जाऊन दूरदर्शन बघितले जाते. घरातल्या घरात करमणूक म्हणजे अगदी मेजवानीच असते. पण; त्या मेजवानीत प्रत्येक मालिकेतील वाढीवपणामुळे मीठ, आंबट व जहाल तिखट केव्हा पडते ते कळतच नाही आणि मालिकेच्या प्रसारणाबरोबर प्रेक्षक वहात जातात. अगदी जाग येऊन ‘चॅनल’ बदलला, तरी दुसऱ्या वाहिनीवर पण तोच रटाळपणा असतो.
लेखकांची कमाल वाटते. सुरुवातीला सर्व नवीन मालिका प्रेक्षकांची पकड घेतात. त्यावर आमच्या चर्चा होतात. दूरध्वनी करून एकमेकांना बघायला सांगतो. काही भाग झाले की मालिकेची गाडी हळू रुळावरून घसरायला सुरुवात होते व अगदी खाली पडते, तरी मालिका चालूच असते. पुढे चालू ठेवण्याकरता नवीन पात्राची भर आणि वाटेल त्या दिशेने मालिका पसरायला लागते. अर्थहीन मालिका बघायला मजा येत नाही, पण अडला हरी..
मन:शांती मिळावी, म्हणून मालिका बघतो, तर कट-कारस्थाने, खलनायिका इ.नी डोके भणभणायला लागते. अर्थात, त्या पात्रावरून रागवून फायदा नसतो, कारण ती पात्रे राग येण्याइतके म्हणजेच सुंदर कामे करतात. तेव्हा लेखकांना जरा आवरायला पाहिजे. अती तिथे माती होते, हे सर्वाना माहितीच आहे. कृष्णानेपण शिशुपालाचे शंभर गुन्हे माफ केले होते. नंतर सुदर्शनचक्राने डोळे उघडले. ‘पुढचं पाऊल’मध्ये रुपालीचे असंख्य गुन्हे झाले व ते तिने कबूल केले आहेत. तेव्हा अक्कासाहेब कडक कारवाई का करत नाही तिच्यावर? प्रत्येक गुन्ह्यच्यावेळी वाटते की, आता हिला मालिकेतून काढून टाकतील. म्हणजे जब्बर शिक्षा करतील. तुरुंगवास भोगून आल्यावरही जी मुलगी सुधारत नाही. तिला घरात ठेवण्यात काय हंशील आहे? रुपालीच्या आई-मामालापण मालिकेतून काढून नाही, तर हाकलवून दिले पाहिजे. ‘निर्लज्जम् सदासुखी’ असतो, पण इथे तर ही दोघे इतके निलाजरे आहेत की, त्यांच्यामुळे मालिकेत ‘रोगट-वातावरण’ निर्माण होते. त्यांचे त्यांना काही वाटत नाही. त्यांचे डाव फसले तरी नव्या उमेदीने नवे-डाव रचतात. पकडलेपण जातात, तेव्हा एवढी बेशरम पात्रे दाखवणे बंद करा.
‘अक्का’ करारी असली, तरी मनाने चांगली, चाणाक्ष आहे. तिच्याकडून काही घेण्यासारखे आहे. तरुणांना चांगली धडा शिकवणारी आहे. अक्काच्या रुपाने ‘पुढचं पाऊल’ पडू दे; पण रुपाली, आई, मामा यांना काढून टाका. ते चांगले झाली तरी मनाला पटणार नाहीत.
‘जूळून येती रेशीमगाठी’मधील कुटुंबांची नाती फारच सुंदर दाखवली आहेत. काही ‘मधुमेह’ वगैरे होणार नाही. कट-कारस्थानांपेक्षा प्रेमळ वागणूक चांगली वाटते. ‘चित्रा’बाबतीत अतिरेक आहे, पण त्याने प्रेक्षकांची मने खराब होत नाहीत. नणंद-भावजय, सासू-सूना, वडील-मुलगा इ. नाती बहारदार दाखवली आहेत. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतही प्रेमाचा कहर दाखवला आहे. ४-५ आयांचे दाखवलेले प्रेम (वेगवेगळी नाती असताना) पटत नाही. प्रत्येक गोष्टीत आया ‘लुडबुड’ करतात. तेसुद्धा भावत नाही तरीही अशा मालिका बघायला आवडतात. लहान मुलांवर संस्कार होतात. ज्येष्ठांना प्रसन्न वाटते.
‘रुंजी’ गोड आहे. तिचं व्यक्तिमत्त्व पण छान आहे, पण आता अगदी वेगळेच वळण घेते आहे. रुंजीच्या चुलत सासूने तर कहरच केला आहे. आजकाल कोणताही माणूस नोकरी न करता रहाणार नाही. हा स्वत: फुकटय़ा व मुलगी-जावयाला पण ठेवून घेतो. अजिबात पटत नाही. सासरेबुवांसारखाच जावई-आयत्या बिळावर नागोबा? मुलगीपण इतके अपमान होऊन ऋषीच्या घरात रहाते. असला बीनडोकपणा दाखवून तरुण मुलींची डोकी फिरवू नका व त्यांना नको त्याचा अभिमान वगैरे वाटू देऊ नका. ऋषीच्या आईची भूमिका इतकी कच्ची का दाखवली आहे? दरवेळेस तिचा नवरा वहिनीची बाजू का घेतो? नवरा-बायकोचे भांडण नसताना तो दरवेळेस बायकोला का गप्प करतो? हा बाईवर अन्याय होत नाही का? मोठी जाऊ तर अन्याय करतेच आहे ढोंगीपणा करून!
अनेक ‘चॅनेल्स’ झाले आहेत. त्यामुळे असंख्य मालिका निर्माण होतात. तेव्हा दर्जेदार मालिका बनवायला काय हरकत आहे? आपल्या भारताची संस्कृती जुनी आहे, तेव्हा महाभारत, रामायण व गीता यातील चांगले मुद्दे घेऊन लेखक शुगरकोटेड औषध नाही का देऊ शकत?
‘इडियट-बॉक्स’मध्ये अनेक चांगले कार्यक्रम होतात. अंताक्षरी, नाचाचे-गाण्याचे प्रश्नोत्तराचे, चर्चेचे, गूढ-मालिका, पोलीसी-मालिका इ. इ. छान कार्यक्रम आहेत. तेव्हा ‘इडियट-बॉक्स’ बंद करून चालणार नाही. ‘रिमोट’मुळे इथून-तिथे उडय़ा माराव्यात एवढेच आमच्या हातात आहे.
रेखा केळकर