मालिकेतलं एखादं पात्र लक्षात राहतं ते त्याच्या अभिनयामुळे. पण अलीकडे मालिकेतली विविध पात्रं प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहेत ती त्यांच्या मुखी असलेल्या एखाद्या वाक्यामुळे. काही वेळा व्यक्तिरेखा फार महत्त्वाची नसली तरी ठरलेल्या वाक्यामुळे ती व्यक्तिरेखा संपूर्ण मालिकेत भाव खाऊन जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना आकर्षून घेण्यासाठी खमंग वन लायनर पंचेस असतात. आजूबाजूच्या परिस्थितीवर कोटी करणारे हे वन लायनर्स कळीचे असतात. यातूनच प्रेरणा घेत कौटुंबिक कथानकं असलेल्या मराठी मालिकांनी एकवाक्यतेवर भर द्यायला सुरुवात केली आहे. मालिका, कथानक, पात्रं प्रेक्षकांच्या मनात ठसण्यासाठी काही अभिनव मार्ग लेखकांनी चोखाळले आहेत. एखाद्या पात्राच्या तोंडी लक्षात राहील असे ट्रेडमार्क वाक्य देणे या योजनेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या वाक्याबरोबर ते पात्र, कथानक आणि मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर होतात. क्षणार्धात रिमोटद्वारे चॅनेल बदलू शकणाऱ्या प्रेक्षकांना आपली मालिका बघण्यासाठी थोपवणं अत्यावश्यक आहे. मराठी मालिकांतल्या ‘एक’वाक्यतेचा घेतलेला आढावा.

– नुकत्याच सुरू झालेल्या ‘काहे दिया परदेस’ मालिकेत विकी नावाचं पात्र आहे. बंटी आणि बबली चित्रपटात बंटीचे कलागुण आहेत, तेच तंतोतंत विकीचे आहेत. सांगण्यासारखा व्यवसाय-धंदा, नोकरी नाही, पण हातात दोन गॅझेट्स- एक टॅब आणि दुसरा स्मार्टफोन, टापटिप कपडे, परफ्युम, मिठ्ठास वाणीसह लोकांना ठकवण्याची हातोटी. सगळीकडे स्वत:चंच घर असल्यासारखा आत्मविश्वासपूर्ण वावर. मी तुमचाच आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी या विकीच्या तोंडी एक भन्नाट वाक्य देण्यात आलंय. हा विकी बाजूच्या घरातल्या आजींचा फार लाडका. आजी म्हणतात- तू आमच्यासाठी एवढा त्रास का करून घेतोस. आजींचे वाक्य पूर्ण होईपर्यंत विकी आजींना कवटाळून म्हणतो- बोललीस.. केलंस ना विकीला परकं! आजींना क्षणार्धात आपलंसं करणारा हा विकी त्यांच्या घरातलं खातोपितो आणि वरती त्यांना यथेच्छ लुबाडतो. पण या ट्रेडमार्क वाक्याने विकी सावंत कुटुंबीयांच्या गुडबुक्समध्ये राहतो, सदैव. हे वाक्य आणि ते उच्चारण्याची पद्धत अफलातून आहे. रोजच्या एपिसोडमध्ये हे वाक्य विकी किमान एकदा तरी उच्चारणार याची खात्री असते आणि तसं घडतंही. मालिका, कथानक, पात्रं प्रेक्षकांच्या मनात ठसण्यासाठी अशा क्लृप्त्या आवश्यक आहेत. एरव्ही मालिकांमध्ये उठसूट मिठय़ापाप्या मारतात. पण या मालिकेत विकी परकं करणाऱ्या वाक्याद्वारे आपलंसं करून घेतो-प्रेक्षकांना.

– कलर्स मराठीवर सुरू असलेली ‘अस्सं सासर सुरेख गं बाई’ ही मालिका आता अंतिम टप्प्यात आहे. यश महाजन, मुन्नू ऊर्फ जुई आणि विभावरी असा एक फूल दो माळी, खरं तर माळिणी प्रकार. यश महाजनचे वडील दाखवलेले नाहीत पण काका आहेत. आणि त्यांचा पेशा अनोखा आहे. ते काडीशास्त्र ज्योतिषी आहेत. त्यांनी सांगितलेलं भविष्य खोटं ठरत नाही अशी त्यांची ख्याती. ज्योतिषावर घर चालवण्याची धडपड करणारा खुशालचेंडू काका आणि त्याची भविष्यवाणी ऐकताना मजा येते. या काकांच्या मुखी एक गमतशीर द्विभाषिक वाक्य आहे. काका आपल्या घरातल्यांना आणि भक्तांना वारंवार सांगतात- आहे ना हरी, सो डोन्ट वरी! हरी आणि वरीचे ऱ्हिदमिक भाष्य लक्षात राहतं. काका एपिसोडमध्ये एकदा तरी हे वाक्य उच्चारतातच.

– स्टार प्रवाहवर गेली अनेक वर्षे ‘पुढचं पाऊल’ टाकलं जातंय. म्हणजे या नावाच्या मालिकेचं दळण सुरू आहे. यात भलंमोठ्ठं एकत्र कुटुंब आहे. उग्र, बटबटीत शब्दही सौम्य वाटतील असा मेकअप, साजशृंगार, कपडे आणि याहीपेक्षा गडद आणि भपकेबाज रंगाचं फर्निचर आणि सेट ही खास ओळख. कुटुंबाची सूत्रं अक्कासाहेबांकडे असतात. त्यांचा सगळ्यांवर मोठा धाक. वाक्य बोलता बोलता त्या मध्येच विचारतात- कळलं>>> हे ‘कळलं’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. वजनदार व्यक्तिमत्त्व, प्रचंड कुंकू, सदासर्वकाळ गजरा, अठरापगड दागिने अशा पेहरावातील अक्कासाहेबांनी ‘कळलं’ विचारलं तर नाही म्हणण्याची कोणाची बिशाद आहे. मालिकेत मूळत: अनेक ट्रॅक म्हणजे कथाविस्तार शाखा होत्याच. पण त्यानंतर किती सबट्रॅक येत गेले, गुंडाळत गेले हे फक्त दर्दी प्रेक्षकांनाच कळू शकतं. वास्तवाशी जराही साधम्र्य नसतानाही अक्कासाहेबांचा कारभार टीआरपीची आब राखून आहे.

– ‘बाबाजी, लक्ष असू द्या’.. काही महिन्यांपूर्वी गाशा गुंडाळलेल्या जुळून येती ‘रेशीमगाठी’ मालिकेतल्या मेघनाचे बाबा अर्थात बाबाजी अतिलोकप्रिय झाले होते. कचेरीत नको त्या मार्गाने मिळवलेला पैसा, हा पैसा जगाला दिसू नये म्हणून कुठल्या तरी अगम्य बाबांचं सदोदित नामस्मरण ही बाबाजींची खासियत. पांढरा हाफ शर्ट, काळी पँट, कमरेत मुद्दाम वाकून चालणारे, काखेत छोटं पाऊच, भाळी जांभळा टिळा आणि वर बघून वायपर हलावा तसे हात हलवत बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या ही बाबाजींची हाळी प्रसिद्ध झाली नसती तरच नवल. कसलेला अभिनेता एका वाक्यातूनदेखील काय किमया करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे वाक्य होतं. असंख्य लहान मुलं, ऑफिसेसमध्ये लोकांच्या तोंडी हे वाक्य रुचलं होतं. यावरून बाबाजींची जनमानसावरील पकड लक्षात यावी.

– स्टार प्रवाहवर ‘देवयानी’ नावाची मालिका होती. पारंपरिक कर्मठ वातावरण असलेलं सर्जेराव विखे पाटलांचं घर. देवयानी ही मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी वेगळ्या वातावरणाशी कसं जुळवून घेते याची कहाणी मालिकेत होती. देवयानीचा नवरा संग्राम अर्थातच रांगडा गडी. गावरान ठसका असलेल्या संग्रामच्या तोंडी एक रोमँटिक वाक्य होतं- ‘तुमच्यासाठी काय पण’! एरव्ही मालिकांमध्ये प्रेम, इश्क, मोहब्बत व्यक्त करणाची पद्धत टिपिकल बॉलीवूड स्टाइल असते. पण या मालिकेने वेगळेपण जपलं. वाक्य उच्चारण्याची संग्रामची स्टाइल राज्यभरातल्या तरुणींना प्रचंड भावली होती.

– ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेच्या नावानुसार आटपाट नगरीत सगळे सुखाने संसार करायला हवेत. पण दुर्दैवानं तसं होत नाही. नुकतंच लग्न झालेल्या स्वानंदी आणि संपदाच्या आयुष्यावर बेतलेलं कथानक. परंतु भाव खाऊन जाते ललिता आणि वच्छीमावशींची जुगलबंदी. कपटी, कारस्थानी ललिताबाईंच्या वागण्याला वेसण घालण्याची जबाबदारी मध्यमवयीन, नवरा आजारी असलेल्या, आर्थिकदृष्टय़ा जेमतेम असणाऱ्या वच्छीमावशींनी स्वीकारली आहे. चांगल्या लोकांशी चांगलं वागणाऱ्या वच्छी मावशी दुर्जनांशी मात्र तसंच वागतात. ‘बोलते ती तुच्छी, करते ती वच्छी’ या वाक्यातूनच त्यांचा खाक्या उमगतो.

– ‘काहीही हां श्री’- एखाद्या मराठी मालिकेतल्या पात्राच्या तोंडी असलेल्या एका वाक्यावरून हजारो व्हॉट्स अप विनोद निर्माण होण्याचा विक्रम या वाक्याने रचला. साध्या मध्यमवर्गीय घरातली जान्हवी आणि आयांचा षटकार लाभलेल्या वातावरणात वाढलेला श्री यांची ही कथा. श्रीजींना प्रतिसाद देताना जान्हवीताईंनी हे वाक्य म्हणायला सुरुवात केली आणि नंतर हे वाक्य हिट ठरलं. कौतुक ओसरल्यानंतर नेटिझन्सनी या वाक्याची, मालिकेची, कलाकारांची यथेच्छ खिल्ली उडवली. नकारात्मक असली तरी प्रसिद्धी मिळत होती या वाक्याला, त्यामुळे वाहिनी आणि मालिकाकर्त्यांना अडचण नव्हती. फायनली खंडप्राय कालावधीनंतर का होईना, जान्हवीताईंना बाळ झाल्यानंतर ही मालिका संपली. पण आताही कोणी सर्वसामान्य माणूस काहीही म्हणतो तेव्हा लोक जान्हवीताई आणि श्रीजींची आठवण काढतात.

‘चला कामाला लागा’- तीन शब्दांच्या या वाक्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते. अनेक वर्षांपूर्वी ‘वादळवाट’ नावाची मालिका लागायची. आबा चौधरींचा पेपर होता. त्या ऑफिसमध्ये अण्णा होते सूत्रधार. युवा वर्गाला गप्पाटप्पा, टंगळमंगळ यातून बाहेर काढून अण्णांच्या तोंडी हे वाक्य दिलेलं होतं. हेच वाक्य नुकत्याच आटोपलेल्या ‘का रे दुरावा’ मध्ये नवरेंच्या मुखी होतं. इथं पेपरच्या ऐवजी ट्रॅव्हल कंपनीचं ऑफिस होतं. आणि काम करणारी मोठ्ठी टीम होती. कामाचं टेन्शन, वैयक्तिक व्याप, गप्पाटप्पा, गॉसिप्स यांमध्ये गुंतलेल्या मंडळींना भानावर आणण्यासाठी नवरे होते. गप्पा मारून झाल्या असतील तर आता कामाला लागा असा दमवजा आदेश नवरे द्यायचे.

‘तुम्हारी शरण में.. तांबडेबाबा’- तू तिथे मी नावाच्या मालिकेत राजकारणी कम बिल्डर सदृश गुंड पात्र होतं. अतरंगी हालचाली, अगम्य वाक्यं आणि कविता, विक्षिप्त स्वभाव हे या पात्राचं वैशिष्टय़ होतं. मात्र सगळे जुगाडरूपी धंदे नीट सुरू राहावेत यासाठी हे पात्र तांबडेबाबांचं भक्त होतं. घरी किंवा कचेरीत आलेल्या व्यक्तींशी बोलताना मध्येच तुम्हारी शरण में. तांबडेबाबा ऐकवत बुचकळ्यात टाकणं खासियत होती. मालिका संपली तरी तांबडेबाबा आणि आरतीची लोकप्रियता कमी झालेली नाही.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व टीव्हीचा पंचनामा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi tv serials characters