टीव्हीनं मनोरंजनाचं जग घराघरांत पोहोचवलं, तसंच स्काय शॉपच्या माध्यमातून अवघ्या जगाची बाजारपेठही रिमोटच्या एका बटणावर आणून पोहोचवली. या बाजारपेठेला पहिल्यापासूनच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
‘‘माझे केस तेव्हा खूपच गळत होते. या समस्येमुळे मी बाहेर कुठेही जाण्यासही भीत असे, पण सुरेशने मला हे तेल दिले आणि काय सांगू. अवघ्या काही दिवसांत केस गळणे थांबले आणि मी आत्मविश्वासाने वावरू लागलो.’’ हा संवाद तुम्ही चॅनेल सर्फिग करताना अनेकदा ऐकला असेल. आपल्यापासून खूप दूर कुठल्या तरी देशातल्या प्रॉडक्टची ही जाहिरात. साहजिकच मॉडेलही त्याच देशातले. केसगळती हा आजार मात्र युनिव्हर्सल असा. इंग्लिश किंवा परदेशी भाषेतली जाहिरात डब करून मराठीत ऐकताना समस्येचं वर्णन असूनही जाम हसायला आलं असेल. बालिश आणि हास्यास्पद वाटणारा तो प्रकार हळूहळू परिपक्व होऊन विकसित होत गेला आहे आणि आता तर टीव्हीवर पॅसिव्हपणे कार्यक्रम पाहण्याऐवजी ‘इंटरअॅक्टिव्ह दुकानदारी’ सक्रिय झाली आहे. केस गळणे किंवा तत्सम आरोग्यविषयक समस्यांपुरते मर्यादित मार्केट आता सर्वसमावेशक बाजारपेठ झाली असून, घरबसल्या वस्तू मिळवता येत असल्याने या दुकानदारीचा चाहतावर्गही वाढू लागला आहे.
कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी बाहेर पडून दुकानात जाणे हा आपला रुटिनचा भाग आहे. मग ती भाजी असो किंवा कपडे; परंतु जागतिकीकरणाच्या आक्रमणानंतर आपण वस्तूपर्यंत जाण्याऐवजी वस्तूच थेट आपल्यापर्यंत पोहोचण्याची तरतूद झाली. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील ही ऑनलाइन दुकानं चांगलीच तेजीत आहेत. मेट्रो शहरं, उपनगरं, निमशहरांमधल्या तरुणांमध्ये ऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढते आहे, परंतु भारतासारख्या खंडप्राय देशात इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण अजूनही अल्प टक्क्यांत आहे. फोरजी का थ्रीजी या गप्पा एकीकडे आणि दुसरीकडे अजूनही मोबाइलला धड रेंजही येत नाही अशी गावं, खेडी, पाडे आहेत. त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेट, ऑनलाइन शॉपिंग हे प्रमाण वाढायला अजून बराच कालावधी आहे. मात्र ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ संक्रमणाआधी एक वस्तू आपल्या घराचा अविभाज्य घटक आहे-ती म्हणजे टीव्ही. गरीब असो का श्रीमंत, जात, वर्ण, धर्म, पंथ, रंग, वय या सगळ्यापल्याड व्यापून राहिलेली वस्तू म्हणजे टीव्ही. फ्लायओव्हर्स आणि स्कायस्क्रॅपर्सवाल्या मेट्रोसिटीपासून साधं गवताकुडाचं घर असणाऱ्या पाडय़ातही टीव्ही असतोच. याच टीव्हीच्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्टची जाहिरात केली तर अधिकाअधिक जनतेपर्यंत सहजतेने पोहोचता येईल या कल्पनेतून इन्फोकमर्शिअल्सचा जन्म झाला. मनोरंजनाच्या वाहिन्यांबाबत माणसं तेवढी गंभीर नसतात आणि तसंही दिवसभराचं रहाटगाडगं आवरलं; की माणसं टीव्हीसमोर बसतात. तेव्हा कुठे जाहिराती दाखवणार? असा प्रश्न होता, पण आयडियाच्या कल्पना संपतात का? विक्रेत्या मंडळींनी वृत्तवाहिन्यांचा आधार घेतला. वृत्तवाहिनी चालवण्यासाठी प्रचंड पैसा लागतो. सगळे खर्च भागवून किमान नफा मिळवायचा तर जाहिराती हव्यातच. वृत्तवाहिन्यांसाठी जाहिरातींची अशी ही अपरिहार्यता. दुसरीकडे या मंडळींना वस्तू विकायच्या आहेत, वस्तूंबाबत माहिती सांगायची आहे, त्यासाठी त्यांनी आकर्षक जाहिरात कम माहितीपर कार्यक्रमही तयार केले आहेत. वृत्तवाहिन्यांना पैसा हवाय आणि विक्रेत्यांना वस्तू मांडण्यासाठी व्यासपीठ हवंय आणि त्यासाठी ते पैसे ओतायला तयार आहेत. आता दोन्ही पाटर्य़ा तयार आहेत, मग काय झकासच जमलं की राव. लोकांना वृत्तपत्रात छापून येणारी आणि वृत्तवाहिनीवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी आणि सत्य वाटते. आता अध्र्या तासाच्या जाहिराती दाखवल्या आणि प्रॉडक्टमध्ये काही गडबड असेल तर आपली पत जायची हा धोका वृत्तवाहिन्यांना होता, पण कसं आहे सदरहू कार्यक्रम जाहिरात आहे. तिकडच्या वस्तू, त्याची विश्वासार्हता, दर्जा याचा चॅनेलशी काहीही संबंध नाही. शंका-कुशंका-समस्या, प्रश्न असल्यास विक्रेत्यांशी संपर्क करावा, असं म्हटलं की चॅनेल सेफ.. डोक्याला ताप नाही. केस गळायचे थांबोत अथवा आहेत ते केसही जावोत- काही देणंघेणं नाही. पैसा पडतोय ना पदरात ते महत्त्वाचं चॅनेलसाठी. चीन, कोरिया किंवा तशाच कुठल्या तरी देशातल्या वस्तू विक्रीसाठी असलेल्या जाहिरातींचे कार्यक्रम अजब वेळी लागतात. दुपारी साडेतीन ही फिरंग्यांची वस्तू विकण्याच्या जाहिरातपर कार्यक्रमाची हुकमी वेळ. रात्री बारा ते साडेबारा ही दुसरी हमखास वेळ. पोटावर वाढलेला मेद असो किंवा काही तासात तुम्हाला सडपातळ करणं- चारचौघांत वावरताना शरमेची बाब झालेल्या मुद्दय़ावर घाव घालत या जाहिरातींनी आपल्याला भुलवलं. आडनिडय़ा वेळांमुळे अन्य लोकांच्या तुलनेत त्यांना कमी पैसे देऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं व्यासपीठ मिळालं. माणूस अगतिक झाला की तऱ्हेतऱ्हेचे उपाय करून पाहतो. जाहिरातीत दिसणारी माणसं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घडणे स्वप्नवत असूनही लोक वस्तू विकत घेतात.
आरोग्यासंबंधित वस्तू विक्रीचा हा फॉम्र्युला अन्य विक्रेत्यांना आकर्षून न घेता तरच नवल. आता तुम्ही टीव्ही लावलात तर हिंदी, इंग्रजीसहित असंख्य स्थानिक भाषांमध्ये दुकानदारी वाहिन्यांचे पेव फुटलेले दिसेल. या व्यापाराची अर्थात होम शॉपिंग चॅनेलची मुहूर्तमेढ रोवली २००८ मध्ये होमशॉप एटीन या चॅनेलद्वारे. नेटवर्क एटीन समूहातल्या या चॅनेलवर पहिल्यांदा वस्तू विक्रीला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत त्यांच्या प्रतिस्पध्र्यामध्ये वाढ झाली आहे. नॅप्टोल ही ऑनलाइन तसेच टीव्हीद्वारे वस्तू विक्रेती कंपनी. जपानमधल्या एका मोठय़ा उद्योगसमूहाची गुंतवणूक असलेल्या या चॅनेलचा पसारा आता असंख्य भाषांमध्ये पसरला आहे. महिला वर्गाच्या आवडत्या साडय़ांपासून, युवा वर्गाला भावणाऱ्या स्मार्टफोन्सपर्यंत सगळं काही विक्रीला असतं. आपल्या ठरलेल्या दुकानात सेल्समन असतो तसं टीव्हीवर पुरुष आणि बायका सेल्समन असतात. साडी असेल तर ती लेवून दाखवतात. फोन असेल तर त्याची फीचर्स समजावून सांगून ऑपरेट करून दाखवले जातात. नॅप्टोलप्रमाणेच शॉप सीजे हा पूर्ण वेळ शॉपिंगला वाहिलेला चॅनेल. आपल्या घराजवळच्या भाजीबाजारात अहमहमिका लागते तसं वाटावं, अशा पद्धतीने बोलतात ही माणसं. चार गॅसवाली शेगडी, या गॅसवर काम करण्यासाठीच्या भांडय़ाचा सेट आणि त्याबरोबर तीन गिफ्ट्स असा संच सहा हजार रुपयांत. पडद्यावर उजवीकडे आकडे फिरू लागतात. उजवीकडे सांगितलेल्या वस्तूचा स्टॉक किती शिल्लक आहे आणि किती खपतोय तो आकडा दिसतो. मग डावीकडे खालच्या बाजूला दहा आकडी टोल फ्री नंबर येतो. यानंबरद्वारे तुम्ही बुकिंग करू शकतात शेगडीचं. मग पैसे भरण्याची काय व्यवस्था आहे ते सांगण्यात येतं. शेगडय़ा म्हणजे रोज काम. मग गॅरंटी-वॉरंटी सांगितली जाते. डिस्काऊंटही सांगतात. मग त्या गॅसवर कसे खमंग पदार्थ शिजतात याचा छानसा व्हिडीओही दाखवतात. एवढा थाट घरबसल्या अनुभवायला मिळत असेल तर कोण घेणार नाही? तर या दोन्ही चॅनेल्सची उलाढाल आता काही शे कोटींच्या घरात आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील कंपन्यांची संयुक्त गुंतवणूक असलेल्या शॉप सीजे वाहिनीने गेल्या वर्षभरात सहा स्थानिक भाषांमध्ये चॅनेल सुरू केले आहेत. या सगळ्या चॅनेल्सना उत्तम प्रतिसाद आहे. प्रत्येक भारतीय सणांना विशेष ऑफर्स दिल्या जातात. बेडशीट, पिलो कव्हर्स, टी तसंच कॉफी मग्जपासून लहान मुलांची खेळणी, ड्रेस मटेरियल, किचन अॅक्सेसरीज, फर्निचर, फूटवेअर असं वाट्टेल ते मिळू शकतं. आपण वस्तू पाहू शकतो; मागवू शकतो. चॅनेल आणि वस्तू तयार करणारी कंपनीचं टायअप असतं. मागणी केलीत की गोडाऊनमधून तुम्हाला वस्तू पुरवली जाते. किंमत, सूट, गॅरंटी सगळं छापील मिळतं. काही अडचण जाणवली तर कस्टमर केअर वगैरे नंबर देतात. एकदा तुम्ही पैसे देऊन वस्तू घेतलीत की जबाबदारी तुमचीच. कारण तुम्ही उठून दुकानात जाऊन जाब विचारू शकत नाही किंवा टीव्हीवरच्या मॉडेल्सना माझी वस्तू का बिघडली; असा सवाल करू शकत नाही. हा धोका असूनही असंख्य गृहिणी आणि वर्किंग वुमन या होम शॉपिंगला प्राधान्य देत आहेत. घरबसल्या व्हरायटी पाहायला मिळते. साधारण बाजारभावाचा अंदाज त्यांना असतोच, जाणंयेणं-घासाघीस आणि शॉपिंगच्या निमित्ताने होणारे अन्य खर्च टाळण्याच्या दृष्टीने हा बेस्ट ऑप्शन असल्याने होम शॉपिंग चॅनेल्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. या बाजाराचा आवाका ओळखून ‘डेन स्नॅपडील टीव्ही शॉप’ वाहिनी सुरू झाली आहे. डेन हे केबल नेटवर्क आणि स्नॅपडील ही ऑनलाइन वस्तू विक्रेती कंपनी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा आणि खिलाडी नंबर वन अभिनेता अक्षय कुमार यांनी एकत्रित ‘बेस्ट डील टीव्ही’ नावाचा चॅनेल सुरू केला आहे. सुरुवातीला या चॅनेल्सच्या विश्वासार्हतेबाबत साशंकता होती. मात्र आता अध्र्या तासाच्या कार्यक्रमाऐवजी रीतसर चॅनेलच सुरू झाल्याने मोठमोठे ब्रँड्सनी आपल्या वस्तूंसाठी या चॅनेल्सचा प्राधान्याने विचार सुरू केला आहे. टीव्ही म्हणजं निव्वळ पाहणं ही संकल्पना आता बदलू लागली आहे. खरेदी-विक्रीच्या आपल्या नवनवीन योजनांमुळेच होम शॉपिंग चॅनेल्सनी आपला पाया भक्कमपणे रोवला आहे. कौटुंबिक नाटय़ाच्या डेली सोप, गुन्हेगारी घटनांच्या क्राइम मालिका किंवा रिअॅलिटी शोमधला मॅनेज केलेलं नाटय़ पाहण्यापेक्षा स्वत:च्या जगण्याला उपयोगी पडेल असे चॅनेल्स प्रेक्षकांना साद घालू लागले आहेत. एका अर्थी हा बदल टीव्हीकरिता सकारात्मक आहे. मात्र त्याच वेळी खरेदी-विक्रीतलं माणूसपण लोप पावून यांत्रिकीकरण होणं तितकंसं चांगलं नाही.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com