सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या दोन दशकांत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे अगदी परवलीचे शब्द झाले आहेत. याच उद्देशाने या काळात अनेक संस्था अक्षरश: फोफावल्या आणि तथाकथित पर्यावरणप्रेमींचा जन्म झाला. त्याला करिअरची जोडदेखील मिळाली, पण ऐंशीच्या दशकात या पद्धतीची कोणतीही रचना अस्तित्वात नसताना अनेक जण पर्यावरण चळवळींकडे वळले. चळवळे आंदोलनकर्ते इतकीच भूमिका न राहता विधायक रचना मांडणारी व्यक्तिमत्त्वेही तयार झाली, उल्हास राणे त्यापैकीच एक!
ऐंशीच्या दशकात पर्यावरण चळवळींना जसा वेग आला तशीच शासकीय पातळीवरदेखील या बाबींना चालना मिळत गेली; पण हल्लीसारखे केवळ शोधनिबंधाचे रकाने भरायचे असे त्याचे स्वरूप अजिबात नव्हते. मानवाचे आणि निसर्गाचे अतूट नाते आणि पर्यावरण संवर्धन अशी सांगड घालणाऱ्यांचा तो काळ. याच काळात बीएनएचएसच्या माध्यमातून उल्हास राणे डॅनीयल, सालीम अली, हुमायून अब्दुलअली अशा थोरांच्या संपर्कात आले. एकीकडे वास्तुविशारद म्हणून व्यवसाय सुरू करण्याची धडपड, तर दुसरीकडे निसर्गात रममाण होत त्याविषयी काही तरी करण्याची ऊर्मी. उल्हास राणे यांनी दोहोंची सांगड घालत संपूर्ण कारकीर्द सुरेख गुंफली.
पर्यावरणप्रेमी म्हणजे आक्रस्ताळ्या भाषेत प्रकल्पांना विरोध करणारा अशीच प्रतिमा गेल्या दोन दशकांत निर्माण झाली आहे; पण उल्हास राणे हे या प्रतिमेला वेगळ्या पद्धतीने छेद देऊन जगले. अत्यंत शांत, मृदू भाषेत, पण तरीदेखील अतिशय ठामपणे आपला मुद्दा मांडणे ही त्यांची हातोटी. अगदी अखेपर्यंत त्यांनी ती जपली.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध. बीएनएचएसचे ते मानद सचिव, तर संग्रहालयाचे विश्वस्त. दोन्ही ठिकाणी त्यांनी लोकशिक्षणाला प्राधान्य दिले.
पूर्णवेळ व्यावसायिक वास्तुविशारदाचे काम सुरू करतानाच पर्यावरणाशी असलेले नातेही त्यांनी जपले. लोकशिक्षण आणि लोकसहभाग हा त्यांच्या कामाचा गाभा होता ज्याचा वारसा त्यांना थेट सालीम अली आणि हुमायुन अब्दुलअली यांच्याकडून मिळाला होता. तो त्यांनी प्राणपणाने जपला.
गेल्या पाच दशकांत शेकडो संस्थांच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत राहिले. इतकेच नाही तर व्यावसायिक कौशल्य आणि शहरातील पर्यावरण यांची मांडणी करणारी अनेक उदाहरणे त्यांनी निर्माण केली. देशातले ‘शहरातील पहिले निसर्ग उद्यान’ म्हणून ओळखले जाईल अशा धारावातील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या रचनेत, जडणघडणीत त्यांचा पुढाकार होता. आसाममध्ये त्यांनी देशातील पहिले फुलपाखरू उद्यान साकारले.
लोकसहभागातून शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे कायमच केंद्रस्थानी होते. त्यातूनच महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या कामात सक्रिय झाले. नव्वदच्या दशकात पक्षिनिरीक्षण हे तसे मर्यादित पातळीवरच असायचे, पण राज्यभरातील असे हौशी, अभ्यासू पक्षिप्रेमी एकत्र आले आणि त्यातूनच मग पुढे महाराष्ट्र पक्षिमित्र ही चळवळच सुरू झाली. हा विषय केवळ छंदाच्या पातळीवर न राहता त्यातून विधायक कामे होऊ लागली. नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर मधमेश्वर येथील पाणथळ जागा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित व्हावी यासाठी या पक्षिमित्रने जोरदार मोहीम उघडली. उल्हास राणेंनी बीएनएचएस, जागतिक वन्यजीव निधी अशा संघटनांचे पाठबळदेखील मिळवले आणि हे अभयारण्य घोषित झाले. पुढे भीमाशंकरसाठी तर स्थानिकांनादेखील तेथील जैवविविधतेचे महत्त्व पटवून देत त्याला अभयारण्याचा दर्जा मिळवून दिला. त्याचबरोबर सह्य़ाद्री वाचवा मोहीम, पश्चिम घाट बचाव आंदोलन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
महाराष्ट्र पक्षिमित्र ही केवळ एक संस्था न राहता चळवळ झाली. यामध्ये उल्हास राणे यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. केवळ शास्त्रीय भाषेत पर्यावरण न मांडता, सोप्या आणि सहज भाषेत विषय उलगडून सांगणे हा त्यांचा हातखंडा. इतकेच नाही तर ललित लेखनाच्या माध्यमातून विज्ञानाचा अपलाप होऊ न देता त्यांनी विपुल लिखाण केले.
‘लोकप्रभा’ आणि त्यांचे घनिष्ठ संबंध. ज्या भीमाशंकर क्षेत्रास अभयारण्य घोषित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तेथील प्लास्टिकचा अर्निबध कचरा पाहून ते व्यथित झाले. भीमाशंकर हे ‘प्लास्टिकचे अभयारण्य’ झाले आहे अशीच त्यांची भावना होती. ‘लोकप्रभा’ने या प्लास्टिक प्रदूषणावर विस्तृत कव्हरस्टोरी प्रकाशित केली. यंत्रणांनी दखल घेत त्यावर कारवाईदेखील केली. ‘लोकप्रभा’च्या या कव्हरस्टोरीला मुंबई मराठी पत्रकार संघाचा शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाला; पण ही लढाई पुरस्कारापलीकडे सतत सुरू राहणारी आहे, असेच त्यांचे मत होते आणि हीच त्यांची खरी तळमळ होती. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे वास्तव्य बंगळूरु येथे होते. करोनासारख्या आजाराने त्यांना गाठले आणि अखेपर्यंत कार्यरत असलेल्या या पर्यावरणप्रेमीचा अंत झाला.
‘लोकप्रभा’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!