lp07ओडिशा म्हटले की आपल्याला कोणार्कचे सूर्यमंदिर आणि जगन्नाथपुरी एवढेच माहीत असते. पण त्यापलीकडेदेखील ओडिशात खूप काही बघण्यासारखे आहे आणि ते नितांतसुंदर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीचा उत्सव मोठय़ा धडाक्यात आपल्याकडे साजरा होतो. धडाका इतका असतो की आपण अगदी बहिरेपणाच्या सीमेवर येऊन पोहोचतो. गेली अनेक वष्रे ऐन दिवाळीचा मुहूर्त साधून सीमोल्लंघन करायचे ठरवत आलोय. एकतर सुट्टय़ा असतात आणि आम्ही जिथे जातो तिथे पर्यटकांची गर्दी पण नसते. ती सुरू होते दिवाळी झाल्यावर. यंदा बेत ठरला तो ओडिशाचा.

बायको-मुलगा-आई आणि मी असे आम्ही चौघे आठ दिवस काढून कोणार्क एक्स्प्रेसने थेट पोहोचलो ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील नितांत रमणीय ओडिशाला. मंदिरांचे राज्य म्हणूनसुद्धा त्याची ओळख सांगता येते. रमणीय किनारे, शिल्पसमृद्ध मंदिरे आणि इतिहासाचा वारसा जपणारी धौली, उदयगिरी, खंडगिरीसारखी ठिकाणे, गर्द जंगलात वसलेले कोरापुट, तर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध अशी नंदनकानन, सिमलीपालसारखी अभयारण्ये अशा सर्वच गोष्टींनी संपन्न असलेले हे ओडिशा राज्य. राईस बाउल ऑफ इंडिया अशी प्रौढी मिरवणारा हा प्रदेश. नजर जाईल तिकडे भाताची शेती डोळ्याचे पारणे फेडते. दहा वर्षांपूर्वी ओडिशाला भेट दिली होती. पण ती फक्त कोणार्क-पुरीएवढीच मर्यादित होती. यंदा फिरायचं होतं ते अगदी वेगळ्या ओडिशामध्ये. काही दुर्मीळ ठिकाणं, काही वैशिष्टय़पूर्ण गावं यांना भेट द्यायची होती. मुक्काम टाकला होता राजधानी भुवनेश्वरला आणि एक गाडी घेऊन रोज वेगवेगळ्या दिशा धुंडाळायला सुरुवात केली. गाडीचा ड्रायव्हर शंभू हा पण तरुण आणि उत्साही गडी निघाला. त्याला िहदी उत्तम येत असल्यामुळे भाषा ही अडचण दूर झाली.

ओडिशाचा इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. सम्राट अशोक, महान राजा खारवेलपासून ते अगदी गंगवंशीय राजवटीपर्यंतचे पुरावे आणि संदर्भ इथे पाहायला मिळतात. इथे नांदलेल्या राजवटी या संपन्न होत्या, समृद्ध होत्या, विजिगीषू वृत्तीच्या होत्या. आपल्या राज्याच्या सीमा सर्वदूर कशा पसरतील याची जाणीव ठेवूनच त्यांचा कारभार चालत असे. राज्यविस्ताराबरोबरच कला आणि संगीत या क्षेत्रांना मोठे पाठबळ देणारी अशी इथली राजघराणी होती. निसर्गाचा वरदहस्त जसा या भूमीवर आहे तसाच या राजघराण्यांचादेखील वरदहस्त इथल्या प्रजेवर, कलेवर, संस्कृतीवर आजही दिसतो. पुरी-कोणार्क म्हणजेच ओडिशा एवढाच हा प्रदेश संकुचित नसून पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आश्चर्यकारक गोष्टी इथे आहेत. त्यामुळे भुवनेश्वरपासूनच वेगळ्या गोष्टी पाहायला सुरुवात केली.

मंदिरांची नगरी – भुवनेश्वर

इथे तुम्ही रिक्षा घेऊन फिरणे अगदी सोयीस्कर. सगळी मंदिरे एकमेकांच्या जवळजवळ अशीच आहेत. ओल्ड टाऊन नावाचा जो भाग आहे तिथेच ही प्राचीन मंदिरे पाहता येतील. आम्ही चौघे असल्यामुळे गाडी केली होती. भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ओडिशा स्थापत्य शैलीतील संक्रमणाची स्थिती दाखवणारी आणि त्या कलेमध्ये बांधलेली मजबूत आणि अत्यंत दिमाखदार मंदिरे या ठिकाणी पाहता येतात. िलगराज मंदिर म्हणजे या सगळ्याचा मेरुमणी आहे. भव्यदिव्य असे हे मंदिर आपल्याला लांबूनसुद्धा दिसते. त्याला लागूनच असलेले भले मोठ्ठे तळे या परिसराची शोभा अजूनच वाढवते. अत्यंत सुंदर मूर्तिकला आणि ओडिशा स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे मंदिर जरूर पाहावे. या मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरे पाहायला मिळतात. मात्र गाभाऱ्यात असलेली शिविपड ही नोटांनी झाकून गेलेली दिसते. असंख्य नोटांनी मढवलेली शिविपड आणि आशाळभूतपणे आपल्याकडे पाहणारे पंडे अगदी अंगावर शिसारी आणतात. पण एवढे एक सोडले तर खूपच भव्य आणि देखणे मंदिर पाहण्याचे भाग्य आपल्याला इथे लाभते. अभ्यासकांसाठी तर हे मंदिर म्हणजे पर्वणीच आहे परंतु सामान्यजनांनीसुद्धा मुद्दाम इथे थांबून या मंदिरावर शिल्पांकित केलेली अनेक शिल्पे मनसोक्त पाहून घ्यावीत. या मंदिराच्या परिसरात अगदी चालत फिरता येतील अशी बरीच मंदिरे एकामागे एक अशी उभी आहेत. ज्यात अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, वेताळ मंदिर अशी काही नावे घेता येतील. परशुरामेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असलेले मुक्तेश्वर मंदिर हे अत्यंत देखणे आणि अत्यंत सुंदर असे म्हणावे लागेल. अगदी टुमदार असलेल्या या मुक्तेश्वर मंदिरासमोर एक दगडी कमान आहे ज्यातून आपला या परिसरात प्रवेश होतो. मंदिर छोटेखानी आहे पण त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. प्रदक्षिणा मारताना मंदिरावर काही ठिकाणी एक खिडकी आणि त्यातून डोकावणारी एक स्त्री दाखवली आहे. तिच्या खिडकीवर कावळ्यासारखा पक्षी दाखवला आहे. ते पाहून ‘पल तो गे काऊ कोकताहे.. शकून गे माये सांगताहे..’ याचा काही संदर्भ असेल का, असे उगीचच वाटले? मंदिर पाहायला आलेल्या लोकांमध्ये आपल्या माहेरचे कोणी आले असेल आणि म्हणून तो कावळा ओरडतोय हे बघायला ती स्त्री बाहेर डोकावत असेल का? कल्पनेला खूप वाव आहे. पण हे मंदिर मात्र अगदी सुंदर आहे. प्रत्येक प्रदेशाला एक समृद्ध भाषा असते आणि त्या भाषेची काही वैशिष्टय़े असतात. ओडिशामध्ये कळसाला देऊळ असा शब्द आहे आणि सभामंडपाला जगमोहन. मुख्य गर्भगृहावर असलेल्या कळसाला रेखा देऊळ म्हणतात, तर जगमोहनावर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात. खूप वेगळी आणि आकर्षक अशी ही नावे वाटतात.

कलाकारांचे गाव – रघुराजपूर

अगदी वेगळी ठिकाणे पाहायचा दृष्टिकोन आणि तळमळ एव्हाना माझ्या चालकाच्या, शंभूच्या लक्षात आली होती. पुरीला भेट देऊन झाल्यावर शंभू म्हणाला, चला तुम्हाला एक सुंदर गाव दाखवतो. कलाकाराचं गाव रघुराजपूर. जगन्नाथपुरी या सुप्रसिद्ध ठिकाणापासून अवघ्या

१० कि.मी.वर असलेले हे अत्यंत सुंदर ठिकाण. ओडिशा सरकारने या गावाला ऐतिहासिक वारसा गाव असा दर्जा दिलेला आहे. सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे हे जन्मगाव. या गावात १२० घरं आहेत आणि सगळी मंडळी कलाकार. गावाच्या मधोमध मंदिरांची एक रांग आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला घरांच्या रांगा. शिल्पकार, चित्रकार, लाकडावर काम करणारे, रंगकाम करणारे आणि पट्टचित्र हे खास ओडिशाचे वैशिष्टय़ असलेली कला जोपासणारे असे सगळे लोक आहेत. इथे सगळ्या घरांवर बाहेरून सुंदर सुंदर चित्रकला केलेली. घराबाहेर मूर्ती करून ठेवलेल्या असे हे अगदी मनमोहक असे गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे हे गाव. इथे बरेच परदेशी कलाकार शिकायला येतात त्यांची सोय गावाच्या एका टोकाला बांधलेल्या टुमदार बंगलीमध्ये केलेली असते. चित्तरंजन स्वाइन हा इथलाच एक कलाकार आणि आमच्या शंभूचा मित्र. मग काय त्यांनी आम्हाला त्याच्या घरी अगदी अगत्याने नेले आणि आमच्यासमोर उभा केला एका अप्रतिम कलेचा जिवंत देखावा. पट्टचित्र कला ती कशी केली जाते, त्याचा कच्चा माल कसा आणतात आणि त्यावर चित्रकला करून ती कशी सजवली जाते याचे प्रात्यक्षिक आणि त्याने साकारलेल्या असंख्य कलाकृती त्या माणसाने अगदी भरभरून दाखवल्या. जगन्नाथ मंदिराच्या इतिहासाशी निगडित आणि तेवढीच पुरातन अशी ही कला आहे. उंदराच्या केसांचा ब्रश इथे अगदी बारीक चित्रे काढण्यासाठी मुद्दाम वापरला जातो. काही चित्रे मात्र अगदी हुबेहूब आपल्या वारली चित्रांसारखी दिसतात. साबुदाणा भिजवून त्याचा िडक कापडाला लावून त्यावर कृष्णलीला, रामायण, महाभारत आणि जगन्नाथाची चित्रं अशी अनेक चित्रं इथे काढली जातात. चित्रांमधले रंग सगळे नसíगक असतात. िहगूळ जातीचा दगड आणून त्याची पावडर करतात. त्याचा लाल रंग होतो तो या चित्रांमध्ये वापरला जातो. खरंतर या गावात राहायलाच यायला हवे. धावती भेट देऊन काही समाधान होत नाही. खास करून कलाकार मंडळींनी तर तिथे गेलेच पाहिजे. आपल्याकडे दशावतार असतात तसाच इथे गोट्टीपो नावाचा प्रकार आहे. गुरू मागुणीदास यांनी हा प्रकार इथे रूढ केला. केलुचरण महापात्रांचे घर मात्र अगदी दयनीय अवस्थेमध्ये आहे. पद्मविभूषणसारख्या पुरस्काराने गौरवलेल्या या व्यक्तीचे घर इतक्या वाईट स्थितीमध्ये आहे. त्यांचा शिष्यसंप्रदाय पण मोठा आहे. ना त्यांचे लक्ष ना सरकारचे लक्ष. तेवढे एक गालबोट मात्र या गावाला लागले आहे. या गावातून काही पाय निघत नव्हता. चित्तरंजन तर राहण्याचा आग्रह करत होता, पण अजूनही काही खजिना पाहायचा होता म्हणून काहीशा नाराजीनेच निघालो.

ओडिशाचे शनििशगणापूर –

अगदी पुसटसे वाचलेले होते की ओडिशामध्ये पण एक गाव आहे जिथे घरांना दारे नाहीत. बरीच विचारपूस केल्यावर एक दिशा सापडली आणि आम्ही तिकडे कूच केले. विचारत विचारत प्रवास चालू होता. भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर केंद्रपाडा या जिल्ह्यातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर सीरिलिया या गावात एक आश्चर्य दडलेले आहे. या गावात जवळ जवळ ८० घरे असून त्या कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी आपल्या शनििशगणापूरसारखे. गावची देवता खोखराई ठकुरानी हिच्यावर गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा. ही देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली आहे, त्यामुळे घराला दार कसे लावणार आणि त्यामुळे कुठल्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही. पूर्वी कोणी चोरी केली होती तर तो त्या घरातच अडकून पडला. भगवान साहू नावाचा गावकरी मोठय़ा उत्साहाने माहिती सांगत होता. शंभूमुळे भाषांतराचा प्रश्न आला नाही. गावच्या एका बाजूला देवीचे मंदिर आहे. मंदिर म्हणजे मूर्ती उघडय़ावरच आहे. परंतु चारही बाजूंनी िभत बांधली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे. मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. घराला दरवाजे नसण्याची ही पद्धत देशाच्या एका कोपऱ्यातसुद्धा तेवढीच श्रद्धेने पाळली जाते हे खरेच नवल म्हणायला लागेल. शरदचंद्रपती पंडित हे या देवीचे पुजारी आहेत. त्यांनी काही धार्मिक माहिती पुरवली. काíतकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो, पण नवरात्रात मात्र काहीच नसते, हे पण एक अजबच आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गावात कोणत्याही घरी मांसाहार करत नाहीत. तसेच देवीलासुद्धा मांसाचा नवेद्य कधीही दाखवत नाहीत. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथेपण घराच्या िभतींवर चित्रकला केलेली दिसते. अगदी वेगळे आणि मस्त ठिकाण शोधून काढल्याचे समाधान मिळाले. शंभू पण पहिल्यांदाच इथे आला होता, त्यामुळे तो पण खूश झाला. सह्याद्रीमध्ये ट्रेक्स करताना वाटा शोधायचे कसब इथे कामी आले बुवा.

अथांग चिलिका सरोवर

प्रसिद्ध चिलिका सरोवर पाहायचे ऐन वेळी ठरले. त्या सरोवराबरोबरच त्यातले एक बेट आणि त्यावर असलेली देवी पाहायची होती. भुवनेश्वरपासून १०० कि.मी.वर सुप्रसिद्ध चिलिका सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचा हा अथांग जलाशय सरोवर वाटतच नाही. तो एक शांत समुद्रच वाटतो. त्याचा पलीकडचा काठ दिसत नाही. या जलाशयामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर डॉल्फिन मासे पाहता येतात. बाळूगाव नावाच्या गावी गेल्यावर इथून आपल्याला सरोवरात फेरफटका मारण्यासाठी यांत्रिक बोटी मिळतात. या सरोवरात ६ कि.मी.वर एक छोटेसे बेट असून त्यावर कालीजाई देवीचे मंदिर आहे. किनाऱ्यापासून इथे जायला एक तास लागतो. वाटेत बरेच डॉल्फिन दर्शन देतात. बोटीचे भाडे माणशी ५० रुपये किंवा सगळ्या बोटीचे ८०० रुपये असे आहे. अथांग सरोवरात केलेला हा प्रवास खूप रमणीय असतो. बेटावरील देवीचे मंदिर छोटेसे पण आकर्षक आहे. खाण्या-पिण्याची आणि विविध वस्तूंच्या विक्रीची दुकाने तिथे मांडलेली आहेत. साधारण तीन तास या सगळ्या प्रवासासाठी पुरतात. भुवनेश्वर-विजयवाडा या राष्ट्रीय महामार्गावरून होणारा आपला प्रवास फार सुंदर होतो. अध्र्या दिवसात हा कार्यक्रम उरकता येतो. तिथे ४ तासांची पण बोट राईड आहे, पण ती मात्र कंटाळवाणी असते.

नंदनकानन प्राणीसंग्रहालय

प्राणीसंग्रहालय म्हटल्यावर नाके मुरडली जातात. मरतुकडे आणि गलितगात्र झालेले प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर येते. पण नंदनकानन मात्र फार फार वेगळे आहे बरे का. खूप छान राखलेले आणि प्राण्यांसाठी मोठा परिसर आणि मोकळी हवा असलेले हे नंदनकानन प्राणीसंग्रहालय भुवनेश्वरपासून फक्त १८ कि.मी वर आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे उघडे असते. इथे आत फिरण्यासाठी सफारी आहेत. माणशी ५० रुपये असा सफारीचा दर असून अंदाज १ तासाची फेरी मारून आणतात. पांढरा वाघ, सिंह, पट्टेरी वाघ, अस्वले, हरीण, चितळ, सांबर, जिराफ, झेब्रा असे अनेक प्राणी आपल्याला खूप जवळून पाहता येतात. इथे आपण बसमध्ये आणि प्राणी उघडय़ावर असे असल्यामुळे मोकळेपणाने वावरणारे प्राणी पाहता येतात. अस्वले तर पुढचे दोन पाय गाडीला टेकवून आत डोकावून पाहतात. फारच भारी वाटते हे पाहायला. शक्यतो दुपारी ३ वाजता जर इथे गेले तर खूप प्राणी पाहता येतात. कारण ही प्राण्यांना खाणे देण्याची वेळ असते. त्यामुळे इथे प्राण्यांचा वावर खूप मोठय़ा प्रमाणावर असतो. तसेच विविध देशांतून येणारे स्थलांतरित पक्षी इथे दिसतात. खूप मोठय़ा संख्येने मोर इथे आहेत. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे एक छोटेसे दालन इथे केलेले असल्यामुळे त्यांचे दर्शनसुद्धा जवळून आणि नीट होते.

प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर ओडिशा म्हणजे एक नंदनवन आहे. धौली इथे असलेले अशोकाचे शिलालेख किंवा उदयगिरी-खंडगिरी या जैन लेणी आणि तिथे असलेले राजा खारवेलाचा शिलालेख आवर्जून पाहण्यासारखा आहे. इथे माकडे मात्र खूप असतात आणि खाण्याचे पदार्थ जर हातात असतील तर ते हिसकावून घेतात. अन्यथा या माकडांचा काही उपद्रव नाही. हाथीगुंफा आणि राणीगुंफा या इथल्या खास लेणी आहेत. त्याचबरोबर नागाच्या तोंडाच्या आकाराची नागगुंफासुद्धा मुद्दाम पाहण्याजोगी आहे. इथे प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची सुंदर माहिती लिहिलेली आहे. ओडिशाला खाण्या-पिण्याचा काही त्रास नाही. सर्व प्रकारचे पदार्थ इथे आता मिळतात. पण भुवनेश्वरमध्ये काही ठिकाणी खास ओडिशा थाळी मिळते ती मुद्दाम चाखून पाहण्याजोगी आहे. सगळीकडे तवा रोटी म्हणजे आपल्या फुलक्यांसारख्या पोळ्या उपलब्ध आहेत. अगदी कोणार्कलासुद्धा असलेल्या हॉटेल्समध्ये आता राजस्थानी, गुजराथी पद्धतीचे जेवण मिळते. पण आमचा चालक शंभूने एक सुंदर पदार्थ आम्हाला खायला लावला. तो म्हणजे इथे अगदी रस्तोरस्ती मिळणारे दहीवडे! २० रुपयांत ६ उडदाचे वडे त्यावर दही, चिंचगुळाचे पाणी, पिवळ्या वाटाण्याची उसळ, चाट मसाला आणि बटाटय़ाचा रस्सा असे घालून डिश तयार होते. अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ मुद्दाम खाऊन पाहावा. रस्त्यावर अगदी महामार्गावरसुद्धा सायकलला दोन मोठी तपेली लावलेली दिसतात. त्यात हे दहीवडे विकतात. अनेक माणसे सकाळचा भरपेट नाश्ता म्हणूनसुद्धा हे दहीवडे खातात.

आठ दिवस भुर्रकन उडून गेले. मागे वळून पाहताना एका वेगळ्याच ओडिशाने दर्शन दिल्याचे प्रकर्षांने जाणवले. कोणार्क-पुरीच्या बाहेरसुद्धा खूप समृद्ध असलेला हा ओडिशा प्रदेश खासकरून पाहण्याजोगा आहे. इथल्या प्रत्येक भागाला स्वत:ची एक ओळख आहे. जसे नुसत्या कटकमध्ये चांदीच्या तारेपासून केलेले फिलीग्रीचे दागिने विकणारी शेकडो दुकाने आहेत. संबळपुरी सिल्क तर जगप्रसिद्ध आहे. महानदीवर बांधलेले हिराकूड धरण. बालासोरचे क्षेपणास्त्र परीक्षण केंद्र आणि कोरापुट, जेपोर, राजगड इथली विपुल वनसंपदा. ओडिशा अगदी सर्वागसुंदर आहे. ओडिशातून खरेच पाय निघत नव्हता. यावेळी नुसती ठिकाणे नाहीत तर खूप माणसे भेटली. प्रेमाने, अगत्याने बोलणारी, आपल्या गावचे कौतुक सांगणारी, आपली कला, आपला वारसा याबद्दल अभिमानाने बोलणारी, साधीसुधी प्रेमळ माणसे. तिथे भाषा आड आली नाही, कोणताही अभिनिवेश आड आला नाही. शंभू, चित्तरंजन, भगवान अशा अनेकांनी मनापासून स्वागत केले, हातचे काहीही न राखता मनमुराद गप्पा मारल्या. जेवायचा आग्रह झाला. त्यांची कला, संस्कृती आम्ही पाहायला आलोय म्हटल्यावर इतके चेहेरे खुलले होते त्यांचे. अत्यंत निरागस आणि अत्यंत पारदर्शक. पुन्हा येण्याच्या बोलीवरच सुटका व्हायची. काहीशा नाराजीनेच आणि परत येण्याचे मनोमन ठरवूनच या प्रदेशाचा निरोप घेतला. परतीचा प्रवास विमानाने होता. विमान आकाशात झेपावल्यावर खिडकीतून बाहेर पाहिले. निसर्गरम्य ओडिशा हात हलवून निरोप देत होता. मंदिरांच्या उंचच उंच शिखरांसोबत तेवढय़ाच उत्तुंग मनाची निरागस माणसेसुद्धा चटकन डोळ्यांसमोर आली.