प्रलय
उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयातून झालेली हानी बघून सगळा देश हादरला आहे. चारधाम यात्रा करून पुण्य गाठीला बांधू इच्छिणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची, स्थानिकांची सगळ्यांचीच या प्रलयाने ससेहोलपट केली. केंद्र सरकारने ही आपत्ती मानवनिर्मित मानायला नकार दिला असला तरी बेसुमार पर्यटन, त्यासाठी झालेली बांधकामं, सतत लँडस्लाइड होत असलेल्या डोंगररांगांमधून धावणाऱ्या गाडय़ा या सगळ्याचा तिथल्या निसर्गावर काहीच परिणाम झाला नसेल? आपण निसर्गाचा हा इशारा कधी समजून घेणार?
केदारनाथ येथे ढगफुटी
५०,००० यात्रेकरू अडकले
चारधामचे रस्ते अनेक ठिकाणी खचले
मृतांचा आकडा पाच हजारांवर जाण्याची शक्यता
उत्तराखंड म्हणजेच देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चारधाम परिसरातील या बातम्यांनी गेल्या आठ दिवसांत संपूर्ण देश काळवंडून गेला आहे. जो तो आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याच्या मागे लागला आहे. कोणी ग्लोबल वॉर्मिगचे पिल्लू सोडून देत आहे. तर काही अतिउत्साही धर्माध मंडळी प्रलय वगरेच्या कथा पसरवत आहेत. पण हे सारे घडण्यामागे काही मूलभूत नसíगक आणि मानवी गोष्टी आहेत याचाच आपल्याला विसर पडला आहे. वास्तविक नसíगक नव्हे तर मानवी हस्तक्षेपाच्याच घटना जास्त आहेत. आजचे हे भयंकर दृश्य केवळ नसíगक आपत्ती आहे की आपल्याच अनियंत्रित वागणुकीचा फटका आहे, याचा खरं तर विचार करण्याची ही वेळ आहे. मुख्यत: येथील भौगोलिक रचना, हवामान आणि तथाकथित पर्यटन यांच्या आधारे आजच्या परिस्थितीचे विश्लेषण केले तर नेमके कोण, कोठे आणि कसे चुकले आहे जास्ती व्यवस्थित स्पष्ट होऊ शकेल.
भौगोलिक रचना :
सर्वप्रथम आपणास हिमालयाची रचना समजून घेणे गरजेचे आहे. हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत असला तरी तो कणखर नाही. त्याची निर्मिती झाली आहे ती इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेटच्या टकरीतून. इंडियन प्लेट व तिबेटिअन प्लेट यांच्यात प्रचंड घर्षण झाले, त्यामध्ये तिबेटिअन प्लेट वर उचलली गेली आणि हिमालयाची निर्मिती झाली. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांची निर्मिती जशी ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारासाचे थर थर एकमेकांवर पडून झाली तशी प्रक्रिया येथे झाली नाही. सह्य़ाद्रीच्या अशा निर्मितेमुळे येथील बॅसॉल्ट हा कठीण खडक हा येथील डोंगरांचा प्रमुख आधार बनला. तर हिमालयात मुख्यत: समुद्र मागे रेटून ही निर्मिती घडली. त्यामुळे अत्यंत भुसभुशीत अशा पायावर हिमालय उभा आहे. हिमालयाचे अंतरंग इतकेच काय पण बाह्यरंगदेखील वालुकामय आणि ठिसूळ असेच आहे. त्याचबरोबर इंडियन प्लेट आणि तिबेटिअन प्लेटची रेटारेटी आजही सुरू असते. त्यामुळेच हिमालयाच्या अंतरंगात आजही ही सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडीमुळे याच्या बाह्य़रचनेत सूक्ष्म पण सातत्यपूर्ण बदल हे सुरूच असतात. सर्वोच्च हिमशिखर असलेल्या एव्हरेस्टची उंची काही इंचाने वाढणे हे त्याचेच द्योतक आहे. याचाच अर्थ ज्या परिसरात आज हा हाहाकार उडाला आहे त्या संपूर्ण डोंगररांगात सतत काही ना काही हालचाली होतच आहेत. एकदा का हे समजून घेतले की मग आज येथे होत असणाऱ्या सर्व घडामोडींकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णत: बदलून जातो.
येथील नद्यांचे मार्ग हे व्ही आकाराच्या दरीतून जातात. येथील डोंगरांचा उतार हा तीव्र स्वरूपाचा म्हणजेच ६० डिग्रीचा आहे. वर्षांनुवष्रे वाहणाऱ्या नद्यांनी येथे जो गाळ आणला तोदेखील सारा वाळूचाच. कारण त्यांचा उगमस्थान असणारा डोंगर हाच मुळात वाळूचा आहे. त्यामुळे खोल दरीतून जरी या वाहत असल्या तरी त्त्यांच्या तीरावरील प्रदेश हा भुसभुशीत असा आहे. अशा नद्यांवर गेल्या काही वर्षांपासून तब्बल ७०० छोटी-मोठी धरणे बांधली आहेत.
या पाश्र्वभूमीवर चार धामांचा विचार करावा लागेल. हे चारही धाम सरासरी दहा ते चौदा हजार फूट इतक्या उंचीवर वसले आहेत. हा सर्व प्रदेश गढवाल हिमालय म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर येथे देशातील मोठया नद्यांची उगमस्थाने आहेत. रुद्रप्रयागच्या पुढे डोंगरांची दाटी वाढत जाते. या डोंगरांच्यामध्ये जेथे कोठे थोडीफार सपाट मोकळी जागा, पठार मिळेल तिथे मानवी वस्त्या झाल्या आहेत. अर्थात या वसाहती त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांवर अवलंबून होत्या. त्यामुळे येथील काही ठराविक वस्त्या सोडल्या तर बहुतांश गावे ५०-१०० उंबरठय़ाची आहेत. केदारनाथ आणि बद्रीनाथ ही ठिकाणे तर डोंगरात आणखीन अवघड जागी वसली असून तेथेच अनुक्रमे मंदाकिनी व अलकनंदा नद्या उगम पावतात. याच नद्या पुढे गंगेला मिळतात.
अनियंत्रित पर्यटनाची बेसुमार वाढ
बद्रीनाथ मंदिर समितीच्याच वेबसाइटवरील ही आकडेवारी पाहता येथील व्यवस्थेवर आणि नसíगक साधनांवर किती ताण पडत असेल हे लक्षात येऊ शकते. मंदिर समितीच्या वेबसाइटवर भाविकांनी काय करावे, काय करू नये याचेदेखील विवेचन केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यामध्ये बद्रीनाथला शक्यतो पावसाळ्यात येऊ नये असे म्हटले आहे, कारण दरडी आणि पावसाळ्यामुळे येथील रस्ते बंद होतात. येथील पावसाळा हा जूनच्या मध्यावर सुरू होतो तो ऑक्टोबपर्यंत असतो. पण गेल्या काही वर्षांत कोणतेही देवस्थान पाहिले तर तेथे बारा महिने तीन-त्रिकाळ भाविकांचे लोंढे असतात. या पाश्र्वभूमीवर पाहिले असता केवळ सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत बद्रीनाथला इतक्या मोठय़ा प्रमाणात भाविक भेट देत असतात. याचाच अर्थ एका दिवसाला सर्वसाधारणपणे पाच हजार भाविक भेट देतात. ही झाली अधिकृत आकडेवारी, पण सध्या तर या सर्व परिसरात पन्नास हजार भाविक अडकल्याची माहिती मिळते. म्हणजे हे सारेच प्रकरण किती अनियंत्रित झाले आहे याची कल्पना करता येईल.
हवामान
एकूणच या साऱ्या ढाच्यावर उभ्या असणाऱ्या या पर्वतराजीत ढगफुटी, भू-स्खलन, रस्ते वाहून जाणे, नद्यांना महापूर येणे या साऱ्या घटना अगदी नेहमीच्या आहेत. याचाच अर्थ, एक तर हा प्रदेश भूशास्त्रीयदृष्टय़ा अस्थिर आहे आणि हवामानाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे.
या परिसरातील नसíगक आपत्तीसंदर्भात ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया सांगतात, ‘‘यापूर्वी १९७१ साली कर्णप्रयाग येथे गुणातल सरोवरात ढगफुटी होऊन प्रचंड हानी झाली होती. नसíगक आपत्तीच्या घटना येथे नेहमीच्या असल्या तरी यंदा गढवाल हिमालयात आलेला मान्सून नेहमीपेक्षा लवकरच होता.’’ आज रस्ते वाहून गेल्यामुळे आणि पर्यटकांना मलोन् मल चालावे लागण्याच्या घटना घडत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे येथे हे प्रकार नेहमीचेच आहेत. गिर्यारोहणाच्या निमित्ताने हिमालयात अनेक वष्रे नियमित भटकंती करणारे हृषीकेश यादव सांगतात, ‘‘यापूर्वी या भागात आम्ही जितक्या वेळा आलो आहोत तेव्हा भू-स्खलनामुळे, दरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद होणे या अडचणींचा आम्हाला अनेक वेळा सामना करावा लागला आहे. एकदा तर रुद्रप्रयाग ते हेमकुंड येथपर्यंत जाण्यासाठी तब्बल आठ वेळा मला वाहन बदलावे लागले होते.’’ व्हॅली ऑफ फ्लॉवरला गेली नऊ वष्रे नियमित भेट देणारे बिभास आमोणकर यांनादेखील रस्ता बंद होण्याचा अनुभव नेहमीचाच आहे. येथे एक लक्षात घ्यावे लागेल की, या तिघांनी हे जे अनुभव घेतले त्या वेळी कोणतीही ढगफुटी झाली नव्हती. म्हणजेच थोडक्यात काय, तर आज जे रस्ते वाहून गेल्यामुळे गोंधळ घातला जातोय ती समस्या काही आजच अचानक आकाशातून, ढगातून पडली नाही; ती जुनीच आहे. म्हणजेच या सर्व मार्गावर जे काही तथाकथित पर्यटन विकसित होत गेले त्यामध्ये हे संकट अध्याहृत आहे. मग आजच या सर्वाचा इतका मोठा अडथळा निर्माण होण्याचे कारण काय?
सद्यस्थिती
सध्या घडलेल्या ढगफुटी व त्यामुळे झालेल्या भीषण पूर-परिस्थितीचा विचार करताना वरील घटकांचा विचार करणे गरजेचे भासते. या सर्व परिसरातील नसíगक घटना आणि भौगोलिक रचना पाहता त्यातून काही ना काही प्रमाणात हानी होतच होती आणि आतादेखील होणार होतीच. पण त्याचे आजचे जे भयावह रूप आपल्या समोर दिसून येते त्यामागे केवळ निसर्ग नाही तर अनियंत्रित पर्यटन, नियोजनशून्य धोरण आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी नेमके काय करावे, यासंदर्भात असणारा सरकारी गोंधळ मुख्यत: कारणीभूत आहे.
गेल्या काही वर्षांत चारधाम यात्रेची गर्दी वाढत गेली तसतसे वाटेवरील छोटी छोटी गावेदेखील विस्तारात गेली. पण हे सारे विस्तार होत असताना एक गोष्ट आपण साफ विसरलो ती म्हणजे येथे उपलब्ध असणारी सपाट जमीन. उत्तराखंडचे क्षेत्रफळ आहे ५३,४८४ चौरस किलोमीटर, त्यापकी वन जमीन आहे ३४,४३४ चौरस किलोमीटर. संपूर्ण क्षेत्रफळाच्या ९२.५७% इतका भाग हा डोंगराळ प्रदेश आहे, तर केवळ ७.४३% भाग हा सपाट प्रदेश आहे. याचाच अर्थ असा आहे की, येथे मोठय़ा वसाहती अथवा पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा उभारण्यासाठी लागणारी जमीन ही अत्यंत अत्यल्प आहे. कारण येथील डोंगर हा काही वसाहतीसाठी पूरक नाही. त्यातही वन खात्याची जमीन बरीच असल्यामुळे त्याचा विचार करता येणार नाही. केवळ पर्यटकांच्या राहण्याबद्दल नाही तर त्यांच्यासाठी रस्ते व इतर वाहतूक सुविधा करण्यासाठीदेखील जी काही उपलब्ध जमीन हवी ती तुटपुंजीच आहे. हे नसíगक सत्य आपल्याला नाकारता येणार नाही.
हवाई पर्यटन
गेल्या तीन-चार वर्षांपासून हा प्रकार वाढला आहे. अर्थात कमी वेळ उपलब्ध असणाऱ्या लब्धप्रतिष्ठित भाविकांना देवदर्शनाची सोय म्हणून असे पर्याय असण्यास काहीच हरकत नाही. पण हे पर्यटन सुरू होते ते डेहराडून येथून. तर चारधामांची ठिकाणे आहेत सरासरी दहा ते चौदा हजार फूट इतक्या उंचीवर. एका दिवसात अशा प्रकारे पटकन उंची गाठणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. गिर्यारोहकदेखील टप्प्याटप्प्याने उंची गाठत जातात. प्रत्येक ठरावीक टप्प्यावर, उंचीवर आपले शरीर तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी ठरावीक वेळ द्यावा लागतो. तो अशा हवाई पर्यटनात कितपत दिला जातो?
मूलभूत सुविधा
लेखात वारंवार अनियंत्रित सुविधांवर भर दिला आहे, पण त्यादेखील पूर्णपणे उपलब्ध होत नसल्याचे येथे यापूर्वीदेखील दिसून आले आहे. शौचालयांसारखी सुविधादेखील या भागात म्हणावी तशी उपलब्ध होत नाही. पुन्हा तेच कारण, जागेची कमतरता. बरे अशी सोय झालीच तर त्याची विल्हेवाट कशी लावणार? पुन्हा नदीलाच वेठीला धरायचे. म्हणजेच ज्या पवित्र गंगेबद्दल आपण भावुक असतो तिची वाताहत तिच्या उगमापासूनच झाली आहे.
पण मग अशा पाश्र्वभूमीवर आपले धोरण काय असायला हवे, किती पर्यटकांना आपण सामावून घेऊ शकतो, त्यासाठी किती रस्ते तयार करू शकतो, किती वसतिस्थाने बांधू शकतो? आजमितीला तरी उत्तराखंड सरकारचे यासंदर्भात काही धोरण होते असे दिसत नाही. पर्यटकांच्या संख्येचा विचार केला तर बद्रीनाथ येथील पर्यटकांच्या संख्येत वीस वर्षांत तब्बल ३०० पट वाढ झाली आहे, तर केदारनाथ येथे ५०० पट वाढ झाली आहे. या अनुषंगाने सपाट जागा किती उपलब्ध झाली याचे गणित मांडले तर ते व्यस्तच आहे. एक टक्कादेखील सपाट जमीन नव्याने उपलब्ध झालेली नाही. बद्रीनाथचे क्षेत्रफळ तर केवळ तीन चौरस किलोमीटर इतके आहे. असे असेल तर इतक्या मोठय़ा पर्यटकांची व्यवस्था कशी केली जात असेल याची कल्पनाच केलेली बरी. यामध्ये एका मुद्दय़ाचा विचार करणे गरजेचे आहे, तो म्हणजे फक्त माणसेच वाढली नाहीत तर त्याचबरोबर त्यांच्याबरोबर येणारी वाहनेदेखील वाढली. त्यामुळे गेल्या काही वर्षांत दरड कोसळली की शेकडो गाडय़ाांची रांग हे नेहमीचेच दृश्य होते (आश्चर्याची बाब म्हणजे बद्रीनाथ येथे चाळीस हजार वस्ती होती असे काही स्थानिक दावा करीत आहेत. ते खरे असेल तर मग यासारखा दुसरा गुन्हा नाही).
बद्रीनाथ मंदिराची सपाट जागा हेच मोठे बलस्थान
सध्याच्या नसíगक संकटात नदीकिनाऱ्यावरील बांधकाम असणारी अनेक घरे, हॉटेल्स उद्ध्वस्त झाली. पण बद्रीनाथ मंदिर सुस्थितीत राहिले. अनेकांनी मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचे कौतुक केले. कोणी तरी त्याचा संबंध थेट पांडवकाळापर्यंत नेला. हा भाग काही काळ बाजूला ठेवू. मंदिर सुस्थितीत राहण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील सपाट जागा. डोंगरउतार सोडून व्यवस्थित सपाट जागा पाहून याचे बांधकाम झाले होते. त्यातील स्थापत्यकला हा भाग तर आहेच, पण त्याहीपेक्षा सपाट जागा हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही वर्षांत पर्यटकांचा, भाविकांचा वाढता रेटा आणि सपाट जागेचे व्यस्त प्रमाण अतिक्रमणाला कारणीभूत ठरत गेले. शेजारचे छायाचित्र हे चार वष्रे जुने आहे. बिभास आमोणकर यांनी त्या वेळी त्यामध्ये डोंगरउतारावर देखील कशा प्रकारे अतिक्रमण केले जात आहे हे टिपण्यासाठी मुद्दाम हे छायाचित्र घेतले होते. दरवर्षी यामध्ये भरच पडली आहे.
अत्यंत प्रतिकूल आणि अजूनही सतत जडणघडण सुरू असलेल्या या डोंगररांगांमध्ये जी टीचभर जमीन होती त्या जमिनीवर सोयीसुविधा तयार होत गेल्या. या साऱ्या विस्ताराला कोणताही धरबंद नव्हता. याचे अगदी ठसठशीत उदाहरण आपल्याला गोिवद घाट आणि जोशी मठ या ठिकाणी दिसून येते. या जागा या बद्रीनाथच्या वाटेवरील तुलनेने मोठय़ा आणि पर्यटकांसाठी बऱ्यापकी सोयीसुविधा असणाऱ्या आहेत. परवाच्या महापुरात गोिवद घाट येथील वाहनतळावरील सर्व मोटरसायकल वाहून गेल्या. हिमालयाची उपरोक्त जडणघडण आणि तेथून वाहणाऱ्या नद्यांचे एकंदरीत वर्तन हे लक्षात घेतले तर नदीकाठावर कोठपर्यंत बांधकाम असावे याचे काही नियम होते की नाही, असे वाटावे असे बांधकाम येथे झालेले दिसून येते. नदीपात्रात थेट खांब उभे करून त्यावर अनेक मजले चढवले जाणे, खालच्या बाजूने डोंगर पोखरला असला तरी वरील बाजूस बांधकाम असणे हे येथील नेहमीचे दृश्य आहे. गेल्या काही दिवसांत महापुरात जे गिळंकृत झाले त्यामध्ये अशा प्रकारच्या बांधकामांचा प्रामुख्याने समावेश होतो. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ बिभास आमोणकर याबाबत सांगतात, ‘‘हे नुकसान केवळ बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे झाले नाही तर रुद्रप्रयागपासून पुढील सर्व रस्त्यांवर झाले आहे. कारण येथील सारेच रस्ते हे नदीच्या किनाऱ्याने जातात. मुख्य तीर्थ क्षेत्रे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने जे काही मार्केट तयार झाले ते अशा रस्त्यांच्या काठानेच. नदीकिनाऱ्यावरच अनेक छोटी-मोठी वसतिस्थाने तयार झाली होती. त्याच बरोबर हे रस्तेदेखील डोंगर पोखरून तयार केले गेले. तेदेखील सातत्याने दरडी आणि भू-स्खलनाची शक्यता असणारे.’’ हे पाहता सध्या पर्यटक, सुरक्षित स्थळे आणि बचाव पथके यांची सांगड घालताना जो काही अडथळा येतो आहे, वेळ लागत आहे, त्यामागे हे सारे घटक कारणीभूत आहेत.
हिमालयाची रचना
आपल्याकडे एक नेहमीची सवयच झालेली आहे. कोणतीही घटना घडली की त्याची तुलना परदेशातील घटनांशी करायची आणि आपण कसे कमी आहोत, त्यांच्याकडे कसे प्रगत तंत्रज्ञान आहे वगरे चर्चा करायची. हा पायंडाच पडला आहे, पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याकडेदेखील प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याबाबत आपण प्रगत देशांपेक्षा कोठेही कमी नाही, पण आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हिमालयाची उंची ही जगातील इतर कोणत्याही पर्वतरांगांपेक्षा खूप वेगळी आहे हे ध्यानात घ्यावे लागेल.
दुसरे असे की, आपण अनुमान देऊ शकतो; पण ते अनुमान संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीदेखील हिमालयाची भौगोलिक रचना मोठा अडथळा ठरते. तसेच तेथील लोकसंख्या ही विखुरलेली आहे. या सर्वांपर्यंत शहरासारखे त्वरित संपर्क होणे शक्य नसते. सर्व डोंगरांवर रडार बसवावा म्हणजे मग काहीच अडचण राहणार नाही, अशी मल्लिनाथीदेखील अनेकांकडून केली जाते. आपल्याकडे रडारचे तंत्रज्ञान चांगल्या आणि मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे, पण रडारसाठी जी लाइन ऑफ साइट हवी असते ती हिमालयात योग्य प्रकारे मिळू शकत नाही. काही क्षणांपूर्वी दिसणारा एखादा ढग क्षणात डोंगराआड जातो, तेव्हा त्याचे ट्रॅकिंग करणे अवघड होते. तंत्रज्ञानाला असलेल्या या मूलभूत मर्यादा आपण दृष्टिआड करून चालणार नाहीत.
हिमालयाच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर एक तास आधी जरी या संकटाची सूचना मिळाली तरी तेथे असणाऱ्या मोठय़ा प्रमाणातील भाविकांना तेथून बाहेर काढणे शक्य झाले नसते. तसेच एखादा ढग केव्हा, कसे, कोठे, किती काळ फुटेल असे अगदी स्पेसिफिक उत्तर देणे शक्य नसते. साधारण कल्पना तुम्हाला मिळू शकते. दुसरे असे की, हिमालयातील वातावरण बऱ्याच वेळा मिनिटामिनिटाला बदलत असते. एखादा ढग येतो आणि पाहता पाहता शिखर पार करून जातो. उपग्रह छायाचित्रदेखील ३० मिनिटांनंतर मिळते. ढगफुटी झाली तरी पुढे तो पाण्याचा लोंढा कोणत्या दिशेने जाणार हे कसे काय सांगणार?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिमालयाबाबत आणि सध्याच्या घटनेच्या अनुषंगाने सांगायचे तर, येथे हवामान अंदाजापेक्षा माणसाला शिस्तीची गरज जास्त असल्याचे दिसून आले आहे.
रंजन केळकर, माजी संचालक, हवामान खाते
बांधकामांसंदर्भात आणखी एका पलूकडे हृषीकेश यादव लक्ष वेधतात. ते सांगतात, ‘‘सुविधा तयार करताना त्यामध्ये जसे स्थानिक होते तसेच बाहेरील मोठय़ा कंपन्यादेखील. फरक इतकाच की, त्यांना काही प्रमाणात भक्कम बांधकाम परवडायचे. पण स्थानिकांनी केवळ जागा आहे आणि पर्यटकांची मागणी आहे म्हणून येथे जे बांधकाम केले ते तकलादू स्वरूपाचे होते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बांधकाम साहित्य, सिमेंट, स्टील आणायचे तर ते डेहराडूनवरून आणावे लागायचे. खर्चाच्या दृष्टीने ते परवडणारे नव्हते. परिणामी उपलब्ध साधनांत जे काही करता येईल ते त्यांनी केले. पर्यटकांना गरज होती आणि स्थानिकांना उत्पन्न मिळत होते. मग कसले नियम आणि कसे धोरण? वाढते पर्यटन आणि त्यासाठी सोयी-सुविधा तयार करणे या नावाखाली येथे जे काही झाले त्यामुळे खरे तर सध्याच्या घडीला सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
संकटाला संधी मानावे
प्रगत राष्ट्रांत संकट येऊच नये म्हणून आणि आले तर त्याचा प्रतिकार कसा करावा, या दृष्टीने धोरणे आखली जातात. आपण प्रगतशील राष्ट्र आहोत. आपल्याला वेध लागले आहेत महासत्ता होण्याचे. त्यामुळे येनकेनप्रकारेण आपण विकासाचे घोडे दामटवत असतो. ते चुकीचे नाही, पण त्याला काही नियम-नियमावली आहे की नाही? सद्यस्थितीत तरी सारे काही रामभरोसेच सुरू असल्याचे दिसून येते. आपले पर्यटन धोरण म्हणजे तर पीएच.डी.चाच विषय आहे. त्यातही धार्मिक ठिकाण असेल तर अस्मितेचे असे काही डोंगर उभे केले जातात की त्यापुढे हिमालयदेखील फिका पडावा. आपल्याच अनियंत्रित आणि फालतू, भंपक धोरणाचा फटका तर आपण खाल्ला आहे, पण यातून आपण शहाणे होणार का? हा खरा प्रश्न आहे. आता उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सोडवले जाईल, मदतीच्या हजारो योजना जाहीर होतील, पण भविष्यात असे काही होऊ नये म्हणून आपण काय करणार? त्या दृष्टीने महत्त्वाचे असेल ते म्हणजे येथील पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण राखणे. त्यासाठी आधी किती पर्यटक उपरोक्त परिसरात सामावून घेता येतील हे पाहावे लागेल. त्यानुसार ठरावीक इतक्याच सुविधा तयार करून नियंत्रित कराव्या लागतील. त्याचबरोबर आपत्कालीनप्रसंगी शासकीय व्यवस्थेला किती पर्यटकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविता येऊ शकते हेदेखील ठरवावे लागेल. या घटकाच्या अनुषंगानेच एका वेळी किती पर्यटक सोडायचे याचे गणित मांडावे लागेल. अमरनाथ यात्रा, मानसरोवर यात्रा अशा ठिकाणी जशी संख्या नियंत्रित केली जाते तसेच येथेदेखील करण्याची गरज आहे. पर्यटन हा उत्तराखंडचा मोठा महसूल स्रोत आहे, पण त्याचे नियोजन केले नाही तर तेच राज्याच्या मुळावर उठू शकते. पण या सर्व व्यापारात अनेक जणांचे हितसंबंध हस्ते-परहस्ते गुंतले आहेत. अशा वेळेस त्या नियमावली करण्यापेक्षा धर्माच्या नावाखाली बेसुमार, अनियंत्रित पर्यटन जोपासणे कधीही फायद्याचे असाच तेथील राजकारण्यांचा हेतू दिसून येतो.