या वेळची आमची अमेरिका ट्रिप १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या काळात होती. अमेरिकेचा उत्तर पूर्व भाग न्यू इंग्लंड म्हणून ओळखला जातो. कॅनडाच्या बॉर्डरवर असलेल्या या भागात ऑक्टोबरमधले फॉल कलर्स बघायला जगभरातून पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. आपणा भारतीयांसाठी ऑक्टोबरमधली तिथली थंडी खूपच जास्त वाढते, पण फॉल कलर्सचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागातील (व्हरमॉन्ट) व (मेन) या राज्यांना भेट द्यायला हवी.
नेमके कसे असतात हे फॉल्ड कलर्स? हा एक निसर्गाचा चमत्कारच मानला पाहिजे. दरवर्षी वसंतामध्ये म्हणजेच मार्च एप्रिलमध्ये झाडांना, वेलींना नवीन पालवी फुटते. नवीन फुटत असलेल्या पोपटी रंगाच्या कोवळ्या कोवळ्या पानांनी सगळी झाडं चैतन्याने लहरू लागतात. मग येतो उन्हाळा. तेव्हा ही पोपटी पानं गडद हिरवी व्हायला लागतात आणि फळा-फुलांनी झाडं वेली समृद्ध होतात. एक प्रकारची तृप्तता सगळीकडे पसरलेली वाटते. हिरवागार निसर्ग, फळाफुलांनी बहरलेली झाडं, वेली माध्यान्हीच्या उन्हाने न्हाऊन निघालेली दिसतात. जुलै ते सप्टेंबर हे आनंदाचे गाणे चालू असते. नंतर मात्र शिशिराची चाहूल लागायला लागते. झाडांची फुलं, फळं गळून जायला लागतात. पण निसर्गाचा खरा चमत्कार दिसतो तो याच वेळी. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होणार हे आपल्याला माहीत असतं, पण या न्यू इंग्लंडमध्ये निसर्गाचं एक वेगळंच लोभसवाणं रूप बघायला मिळतं ते याच वेळी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये.
सप्टेंबर अखेरीपासून ही झाडावरची पानं हळूहळू आपले रंग बदलायला लागतात. प्रथम थोडा थोडा पिवळेपणा या पानांवर चढायला लागते. दिवसागणिक तो पिवळेपणा गडद होत जातो. मग सोनेरी, पिवळ्या, नारिंगी, हलक्या तपकिरी, गहिऱ्या तपकिरी रंगांनी ही मैलच्या मैल पसरलेली उंचच उंच झाडे दिमाखाने लहरू लागतात. काही झाडांवर सगळ्यात वर हिरवट पिवळा, जरा खाली गडद पिवळा, त्या खाली सोनेरी, नारिंगी मग ब्राऊन, करडा, गडद तपकिरी आणि सगळ्यात खाली जांभळट ब्राऊन अशी रंगांची उधळण दिसते. तर काही झाडं वरपासून खालपर्यंत पूर्णपणे एकच रंग परिधान करतात तो म्हणजे सोनेरी पिवळा. काही झाडं पूर्णपणे नारिंगी रंगात न्हाऊन निघतात अगदी आपल्याकडल्या गुलमोहोराची आठवण करून देतात. काही झाडांवर जरा उशिराच रंग चढतो तर काही झाडं ‘‘आम्ही नाही जा’ असं जणू काही म्हणत हिरवीच राहातात. त्यांना ‘एव्हरग्रीन्स्’ म्हणतात. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली हजारो झाडं आपल्या रंगांनी दिमाखात सळसळत असतात. डोंगराळ भागातून नागमोडी रस्त्यांवरून जाताना असं वाटतं की हा रस्ता एखाद्या गच्च भरलेल्या प्रचंड मोठय़ा फ्लॉवर पॉटमधून जातो आहे. मैलच्या मैल ही रंगांची उधळण चालू असते. प्रत्येक झाड या आनंदोत्सवात सामील झालेलं वाटतं. या बाजूला पाहू की त्या असं होऊन जातं. आपल्या पाठीला डोळे असते तर बरं झालं असतं असं वाटून जातं. उत्साहाने सळसळणारी ही झाडं आपल्याला एक संदेश देत आहेत की ‘इट इज एन्टायरली इन युवर हॅण्ड्स हाऊ यू ग्रो ओल्ड अ‍ॅण्ड नॉट गेट ओल्ड.’ प्रौढ वयातसुद्धा, फळं फुलं दूर गेल्यावरसुद्धा आपल्यामुळे इतरांना जास्तीत जास्त आनंद कसा देता येईल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रंगांच्या शेकडो छटांनी नटलेली ही हजारो झाडं! मन हरखून जातं, वेडावून जातं हे रंग बघताना. प्रसन्नतेचा शिडकाव होतो तनमनावर. उदासीन विचारांना केव्हा मागे टाकलं आणि ‘आनंदी आनंद गडे’ असं कधी गुणगुणायला लागतो कळतच नाही. ‘नको वसंताचा तोरा, आम्ही शिशिरात दंग’’ असंच ही झाडं म्हणताहेत असं वाटतं.
मग हळूहळू थंडी वाढायला लागते. वारे सुटायला लागतात, बोचरे वारे, झोंबते वारे, ही रंगीबेरंगी पानांची सळसळ जरा जास्तीच वेगवान होते. पानांचे रंग गडद होत जातात. सगळे वेगवेगळे रंग एकाच सोनेरी, तपकिरी रंगात मिसळून जातात. ही तपकिरी झालेली पानं वाळून शुष्क होतात. जून दिसायला लागतात आणि बघता बघता रस्त्यांवर, घरांवर, गाडय़ांवर, हिरव्यागार लॉनवर सगळीकडे या तपकिरी पानांचे सडे पडायला लागतात. दोन्ही बाजूने पायवाटेवर झुकलेली ही सोनेरी झाडे आणि पायाखाली चूरचूर आवाज करणारे पानांचे सडे हा अनुभव अगदी अविस्मरणीय आहे! फोटोमध्ये त्यातला एक क्षणच पकडता येईल, पण दिवसभराचा हा आनंद अनुभवायलाच हवा!
झाडांचा घनदाटपणा विरळ होत जातो आणि जमिनीवरचे वाळलेल्या पानांचे ढीग, थरच्या थर वाढत जायला लागतात. झाडं निष्पर्ण होत जातात, ओकी बोकी दिसायला लागतात. पुढे येणाऱ्या हिमवर्षांला तोंड द्यायला ही झाडं जणू सज्ज होत असतात. काही पानं चिवटपणे झुंज देत राहातात. वाऱ्यावर सळसळत राहातात अगदी जीवाच्या आकांताने; पण एक ना एक दिवस त्यांनाही जमीनदोस्त व्हावंच लाागतं.
अशी ही सोनेरी सळसळ, पानगळीच्या आधीची. जाण्यापूर्वी जगाला आनंद देऊन जावे हा केवढा मोठा विचार निसर्ग आपल्याला शिकवत असतो. ‘बिनभिंतींची उघडी शाळा, निसर्ग इथला गुरू’या ओळी अगदी सार्थ वाटतात.
उमा सहस्त्रबुद्धे – response.lokprabha@expressindia.com

Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
Gold silver price
Gold silver Rate Today : सोन्याचा दर ८१ हजारावर, चांदीही महागली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Republic Day 2025 How India chooses its chief guest for Republic Day celebrations
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? जाणून घ्या पद्धत
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Story img Loader