मुंबईसारख्या प्रसिद्ध शहरातसुद्धा ‘जेथे मंदिर तेथे गाईला चारावाली’, असे दृश्य बघायला मिळते. मुंबईत कोणत्या धंद्याला महत्त्व येईल व पैसा देईल हे सांगता येत नाही. गोमातेवर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या वाढतेय असे वाटते. माझी ही त्यात भर पडली आहे, पण निराळ्या अर्थाने. सकाळी माझ्या नातीला शाळेत घेऊन जाताना रोज ती हट्ट करते, वाटेत मंदिरासमोर बसलेल्या गाईला चारा घालूया.

शाळेच्या बसला वेळ होता, गाय घेऊन बसलेल्या चारावाल्या जवळच आम्ही उभे होतो. कुतूहल म्हणून त्यांच्याशी गप्पाच्या ओघात, त्याच्या व्यवसायाबद्दल विचारपूस करत होतो. तो चारावाला सांगत होता, ‘आम्ही या हिरव्यागार चाऱ्याची गुंडी कल्याण स्टेशनच्या बाहेर याचे मार्केट आहे, तेथून १०० रु. ला एक याप्रमाणे पहाटे घेऊन येतो. सणावारी जास्त गुंडय़ा आणतो. त्या दिवशी दत्त जयंती होती तर तीन गुंडय़ा सकाळीच संपल्या. हल्ली तर लाडवाचा धंदा लई जोरात चालतो. त्याच्यातच आम्हाला लईभारी पैसा भेटतो. १० रुपयाला दोन लाडू विकतो.’ मी त्याला लगेचच सहज विचारले काय रे! हे लाडू कशाचे बनवता? ‘अहो! हा कडधान्यांचा भुगा हाय, तो पण कल्याणच्या मार्केटमध्येच मिळतो. ३० रु. एक किलो. त्याचीपण १ किलो, ५ किलोची थैली भेटते.’

त्याची बायको ‘चारावाली’ छोटय़ा स्टुलावर त्या कडधान्याच्या भुग्यात पाणी टाकत टाकत घट्ट घट्ट असे लाडू वळत होती, एकीकडे कंबरेला खोलावलेल्या खाकी बटव्यात दहा दहाच्या नोटा कोंबता कोंबता माझ्यावर खेकसली, ‘काय हो? तुम्हाला काय एव्हढी पंचायत पडली, लय माहिती विचारताय?’ नात माझी शेजारीच उभी असल्यामुळे ठोकून दिले अगं! माझ्या या छोटीला गाईवर निबंध लिव्हायचाय ना म्हणून विचारतोय. व्हय का गं ठमे! म्हणून ती चारावाली बोलती झाली.

ती म्हणाली, ‘आम्ही या गाई प्रभादेवी, सीपीटँक, वाळकेश्वर वगैरे ठिकाणी गोठे आहेत तिकडून ५० रु. भाडय़ाने अर्धादिवस आणतो. गाईचे दूध पहाटे काढून झाले की ते आमच्या ताब्यात देतात. आणि दुपापर्यंत परत नेऊन द्यायची. ते तबेलेवाले आम्हाला खुशीनी गाय देतात कारण गाईला सकस हिरवा चारा, लाडू, चपात्या, वगैरे खायला भेटते, आमची रोजची गाय आम्हाला ओळखते, जवळ आणायला गेले की हंबरते व गुमान आमच्या बरोबर देवळाकडे येते.’

‘हे बीएम्सीवाले भारी त्रास देतात. तरी आम्ही सगळी लगेचच साफसफाई करतो. अहो! आमच्याकडून भाविक गोमूत्र विकत घेऊन जातात. एव्हढेच काय! शेण पण प्लॅस्टिक थैलीत घालून नेत्यात, त्याचेपण पैसे भेटतात. लोकांकडे धार्मिक कार्यक्रम झाला की नैवेद्य व दक्षिणापण देतात.’ हे सगळं बोलत असताना जो तो जाणारा गाईला हात लावून पुढे जात होता, कोणी भाविक गाईची शेपटी डोळ्याला लावत होता, कोणी नुसते लाडवाला व हिरव्या चाऱ्याला हात नुसता लावून दहा वीस रुपये देऊन पुढे जात होता, म्हणजे गाईला खायला घालायला पण वेळ नव्हता, पण श्रद्धा मात्र अफाट होती. माझ्या मते या सर्व प्रकारात चांगले काय होत असेल तर भाकड, अशक्त गाई थोडय़ा का होईना या व्यवसायात असल्यामुळे धष्टपुष्ट होत आहेत. तबेल्यातून त्या गाईंची चांगली देखभाल होत असावी.

राज्यातील गोवंश हत्याबंदी कायदा मार्च २०१५ मध्ये लागू झाला. गोवंश हत्येवर तसेच त्यांचे मास बाळगणे, विकणे, खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गोवंश या शब्दात गाय, बैल, वासरू, वळू असे सर्व आले. गोवंश हत्याबंदी कायद्यात म्हैस, शेळी, मेंढी, बोकड, डुक्कर, कोंबडी यांच्या हत्येस मात्र परवानगी आहे. असं का?

गोमातेवर श्रद्धा असणाऱ्यांनी गोहत्या बंदीचे समर्थन केले आहे तर काही नागरिकांनी गोमांस खाण्याच्या अधिकारावर बंदी हा घालाच असून, ते मांस गोरगरिबांना परवडणारे आहे असा युक्तिवाद करत आहेत. गोहत्या बंदी विरोधातील विविध याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. काही म्हणतात गोवंशबंदीमुळे चामडय़ाशी संबंधित सर्व उद्योगांना टाळा लागेल. चामडय़ाच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करणारे व्यावसायिक सुमारे दीड कोटी असून, मोठी उलाढाल धारावीत चालते. ते बेकार होतील.

असे मानतात की ३३ कोटी देव गाईत असतात, गाय हे दत्ताचे वाहन आहे, कृष्ण आणि गाय यांचे अतूट नाते आहे. गरीब स्वभावाच्या बाईला गाईची उपमा देतात. अखूड शिंगी, बहू दुधी गाय क्वचित मिळते असे म्हणतात. दूध पचायला हलके असते, गोमूत्र पवित्र असून त्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे. शेण जंतूनाशक आहे. ती कामधेनू आहे. तरी..

श्रद्धा, धर्माभिमानापेक्षा धर्माचरण करणे महत्त्वाचे. उत्तर प्रदेशातील दादरी येथील इखलाक या मुस्लीम रहिवाशाचे आयुष्य हिंदूंच्या जमावाने संपवून टाकले, का तर! त्याच्या घरी गाईचे मांस आहे या अफवेने, हे श्रद्धेचे दुसरे टोक.
श्रीनिवास डोंगरे

Story img Loader