दगडूबाई.. अगदी कथेत शोभेल असं नाव आणि व्यक्तिमत्त्वही तसंच. कपाळावर ठसठशीत कुंकू, सावळा रंग, नऊवारी साडी, खणाचं पोलकं, टापटीप राहणी, काटक शरीर आणि अंगात कमालीचा उरक. प्रत्येक काम मनापासून आणि उत्साहानं करण्याची वृत्ती. अशी होती आमची दगडूबाई. आमची मदतनीस, मोलकरीण नव्हे तर घरातलीच एक. ती, तिचं वागणं, काम करणंच असं होतं की ती घरातली कामवाली नं राहता घरातलीच एक केव्हा होऊ न गेली ते आम्हाला कळलंही नाही. अंगात चिकाटी, पडेल ते काम करण्याची तयारी असलेली आणि सतत आनंदाने सळसळणारी अशी दगडूबाई. आळस, कंटाळा हे शब्दं जणू ठाऊ कच नव्हते तिला. आमच्या घरी अवघी तीस वर्षे काम केलं तिनं आणि माझ्या मनातल्या ‘मोलकरीण’ या संकल्पनेला एक नवीन परिभाषा दिली.

दगडूबाई आठवली की मन थेट वीस र्वषे मागे जातं आणि डोळे आपोआपच भरून येतात, आजही. तिचे ते कष्ट, तिची ती जिद्द, परिस्थितीशी दिलेला लढा, एकहाती ओढलेला संसार आणि प्रतिकूल परिस्थितीतही चेहऱ्यावरचं हसू हरवू न देता तिनं मांडलेला आयुष्याचा डाव.. हे सारं आठवलं की अभिमान वाटतो तिचा आणि जगण्याची नवी उमेद मिळते जणू. दगडूबाईचा नवरा परागंदा होता, पण तो कधी न कधी येईल या आशेवर ती जगत होती. एक कधीही न संपणारी प्रतीक्षा तिच्या वाटय़ाला आली होती. पण हे सगळं तिनं आनंदानं स्वीकारलं होतं. ती अधेमधे आईला म्हणायची, ‘‘माझे मालक आज माझ्याबरोबर नाहीत. पन ते कुटंतरी हाएत. आज ना उद्या येतीलच की; त्यांना बी माझी आठवन येतच असंल. तुमी बघा वहिनी एक न एक दिवस ते येनार, नक्की येनार!’’ मी पण ऐकलं होतं तिचं हे वाक्य एक-दोनदा. पण तिच्या या ‘दारुण’ आशेची मला कधी कीव नाही आली. अगदी लहान वयात फारसं काही कळत नव्हतं, मधल्या वयात मला तिचा आभिमान वाटायला लागला. ती होतीच तशी. सहानुभूती मिळवण्याची तिची धडपड कधीच नव्हती. आणि तिची मुद्रा सदैव हसरी. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटायचं आणि आदरही.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..

माझ्या जन्माच्याही आधीपासून दगडूबाई आमच्याकडे कामाला होती. मी अगदी लहान असल्यापासून तिला पाहत होते. तेव्हा आमचा मोठा बंगला होता. एकत्र कुटुंबं, घरात खूप माणसं, सततचा १२-१५ माणसांचा राबता. दगडूबाई न चुकता रोज सकाळी आठ साडेआठच्या सुमारास घरी येत असे. मग पडतील ती कामं अगदी मनोभावे करायची ती, जणू काही ती स्वत:च्याच घरातली असावीत. घरातल्यांनीही तिला कधीच नोकरासारखं वागवलं नाही. तिचा सकाळचा चहा आमच्या बरोबरच असायचा. अधे-मधे ती आमच्याकडेच जेवायची सुद्धा. आई, काकू, आजी कधी तिला घालून पाडून बोलल्याचं मला आठवत नाही. आजी तिच्यासाठीही कधी लुगडं, कधी बांगडय़ा असं काही ना काही आणत असे.

धुणं, भांडी, केर-फरशी ही तर तिची रोजची कामं असायची आणि कधी घरी पाहुणे असतील तर भाजी निवडणं, घर आवरणं अशा कामांमध्ये दगडूबाईची मदत होत असे. जागा मोठी होती. घरासमोर छोटं अंगण आणि मागे लहानशी बाग होती. त्या बागेतल्या झाडांची निगा, अंगणाची साफसफाई ही तर कोणीही नं ठरवताच दगडूबाईची कामं होऊन गेली होती. घराला जेव्हा जेव्हा तिची गरज भासे तेव्हा तेव्हा दगडूबाई तत्परतेने येत असे. भरवशाची, एका हाकेला धावत येणारी अशीच होती. हे काम माझं नाही किंवा या कामाची बोली झाली नव्हती असलं काही ती कधीच म्हणत नसे. एकदा मी तिला आजीशी बोलताना ऐकलं होत. ती म्हणाली होती, ‘‘तुमच्या घरातली समदी माणसं मला माझीच वाटतात. पैशाचं म्हनाल तर मला असा किती पैका लागनारे, आनि पैसा घेऊन तरी कुटं जानारे मी? मला या घरानं भरभरून प्रेम दिलंय. अशी माया करनारी मानसं मिळनं लै भाग्याचं हाय. हातपाय चालतायत तोवर मी हितंच काम करनार.’’

निष्ठा, इमानदारी म्हणजे तरी वेगळं काय असतं? दगडूबाई कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधलेली नसतानाही, कोणत्याही अपरायजल किंवा प्रमोशनची अपेक्षा न करता स्वप्रेरणेने काम करत होती. तिने कुठे घेतले होते मॅनेजमेंट सायन्स किंवा कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यांचे, तत्त्वांचे धडे? पण दगडूबाई स्वत:च्या जगण्यातून खूप काही शिकवून गेली मला. तिचा आशावाद, तिची उमेद, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन, तिचा सच्चेपणा.. या सगळ्यातून किती शिकण्यासारखं होतं.

अशा दगडूबाई आता दुर्मीळ झाल्या आहेत. तेव्हाचं सगळच वेगळं होतं. बराच काळ लोटला त्या गोष्टीला. पुढे दगडूबाई थकली. तिच्या नशिबात एकटेपणाच लिहिला होता. ती ज्याची वाट पाहत जगत होती तो, तिचा नवरा कधीच परत आला नाही. हातपाय थकले होते, चेहरा सुरकुतला होता. पण तिच्या चेहऱ्यावरची ती तरतरी, तिचं वाढतं वयही पुसू शकलं नव्हतं. मन तरतरीत असलं तरी शरीर थकत चाललं होतं. पुढे पुढे दगडूबाईचं आमच्याकडे येणं कमी झालं. घरातले सगळेही आपापल्या मार्गाने गेले, पूर्वी १२-१५ माणसांचा राबता असलेला, सतत गजबजणारा बंगला आता ओस पडत चालला होता, घरातली माणसं कमी होत गेली तसं ते मोठं घर खूप ‘मोठं’ पडायला लागलं. मग आम्ही बंगला विकण्याचा निर्णय घेतला आणि फ्लॅटमधे राहायला आलो. ती जागा सुटली, आणि दगडूबाईही. नंतर ती कधी भेटली नाही आणि तिच्याबद्दल काही कळलंही नाही. आज दगडूबाई असेल.. नसेलही; पण तिची आठवण आमच्या बरोबर आहे.
मनाली ओक – response.lokprabha@expressindia.com