‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे.’
‘अन्नदानासारखे पुण्य नाही.’
‘पोटासाठी दाहीदिशा, का रे? फिरविशी जगदीशा.’
अशा प्रकारे मानवी जीवनाला नव्हे, संपूर्ण प्राणिजीवनाला व्यापून टाकणाऱ्या अन्नासंबंधी वरील प्रकारचे विचार लहानपणापासून ऐकलेले असतात. नव्हे ते रोमारोमांत भिनलेले असतात. म्हणून सर्व प्राणिमात्रांचे जिवंत राहण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे अन्नच होय.
त्यामुळेच मानवाची सर्व संस्कृती, त्याची विचारसरणी, त्याची भाषा अन्नाभोवती फिरते. भाषेच्या दालनात एकदा नजर टाकून बघा ना! सर्वत्र अन्नदेवतेचाच संचार दिसेल. आपले रोजचे जगणे, रोजचे बोलणे, रोजचा व्यवहार अन्नाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लेख झाल्याशिवाय होतच नाही. अगदी बालपणापासून हा घास काऊचा, हा घास चिऊचा- ऐकूनच आपले भरण-पोषण होत असते.
मराठी भाषेमधल्या शब्दसमूहांचा, वाक्प्रचारांचा, म्हणींचा खजिना पाहिला तर विस्मयचकित होण्याची पाळी येते. ‘रोटी-बेटी व्यवहार, खाऊन माजावे, पण टाकून माजू नये, शेजीने खाऊ घातला भात, आईने फिरविला हात, अन्नान्नदशा, दुपारची भ्रांत, तळीराम शांत होणे, पोटात कावळे ओरडणे, खाई खाई मसणात जाई, पिंडाएवढा भात खाऊन मुडद्यासारखा पडून राहीन, तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले, साखरेचे खाणार त्याला देव देणार, खसखस पिकणे, आयत्या पिठावर नागोबा, पी हळद नि हो गोरी, अध्र्या हळकुंडात पिवळे होणे, मिरच्यांचे खळे, टाळूवरचे लोणी खाणे, खाईन तुपाशी नाही तर राहीन उपशी, अन्नासारखा लाभ नाही, मरणासारखी हानी नाही, वडय़ावरचे तेल वांग्यावर काढणे, आगीत तेल ओतणे, खाई गोड की आई गोड, नावडतीचे मीठ अळणी, तिळा तिळा दार उघड, एक तीळ सात जणांत खाल्ला, तिळगूळ घ्या गोड गोड बोला, तिलांजली देणे.
इथले अन्न-पाणी संपणे, ज्या गावच्या ‘बोरी’ त्याच गावच्या बाभळी, खंडी खाऊन सलबत्ता, सुदाम्याचे पोहे, विदुराघरच्या कण्या, मीठ-भाकरीचे जेवण, दुधावरची साय, दुधाची तहान ताकावर भागविणे, अंगाची लाही लाही होणे, अंगाचा तिळपापड होणे, आवळा देऊन कोहळा काढणे, सुतविलेले कोहळे गोड मानून घेणे, चल रे भोपळय़ा टुणूक टुणूक, सांडगे खाईन कुडूम कुडूम, भाकरी मिळत नाही तर शिरा-पुरी खा. खाल्याघरचे वासे मोजणे, अन्नछत्र उघडणे, अन्नछत्रात जेवणे आणि वर मिरपूड मागणे, दही खाऊ मही खाऊ, दुधात मिठाचा खडा टाकणे, बाजारात तुरी भट भटणीला मारी, अबब! ही यादी न संपणारी आहे. लिहिण्याचा मोह आवरता घ्यावा लागतो आहे.
काव्यप्रांतातही अन्नब्रह्माची हजेरी आहेच! भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली! ‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो’ केळीचे सुकले बाग’, ‘मधु मागसी माझ्या सख्या परी’- कुटुंबवत्सल इथे फणस हा, कटीखांद्यावर घेऊन बाळे, ‘चिंचा बोरे आवळे पेरु नकोत मजला काही, ‘डोहाळय़ाची रीत आगळी भान हरपुनी जाई’ मामी मोठी सुगरण रोज रोज पोळय़ा शिकरण’ ‘मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा’ ‘पाहुनी चिमणी पिला भरविते आणून चारा मुखी आपोआप मनात बोल उठले मृत्यो, नको येऊ की।’
कथा-वाङ्मयाचा शोध घेतला तर अगदी पुराणापासून ते आजच्या कथा, गोष्टी, कहाण्या यांमध्ये अन्नदेवतेचा वावर आहेच.
(१) एकदा ब्रह्मदेवाकडे देव आणि दानव आपापले श्रेष्ठपण विचारण्यासाठी गेले. ब्रह्मदेवाने आधी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले. आधाशासारखे दानव प्रथम पानावर बसले. पण ब्रह्मदेवाने एक अट घातली. जेवताना कोपरामध्ये हात वाकवायचा नाही. सरळ हात ठेवूनच जेवण करावयाचे. अर्थात दानवांची फजिती झाली. पण देवांचे जेवण सुखासमाधानाने पार पडले. कारण त्यांनी स्वत: जेवण न घेता समोर बसलेल्या देवांना भरविले. खरंच, दुसऱ्यांना खाऊ घालण्यातली तृप्ती काही औरच.
अशीच एक कथा पांडवांनी विजय मिळविल्यानंतर केलेल्या यज्ञातील घटनेची. तिथे आलेले अर्धसोन्याचे मुंगूस तेथील राखेत लोळूनही पूर्ण सोन्याचे झाले नाही. कारण एका ब्राह्मण कुटुंबाने उपासमारीने गलितगात्र झालेले असतानाही समोर आलेल्या अतिथीला आपल्यासमोरील ताट देऊन दानाचे महत्त्व पटविले. त्याच्या दानयज्ञापेक्षा पांडवांचा दानधर्म फिकाच पडला.
अनसूयेने दारी आलेल्या देवांना बालरूप देऊन दुग्धपान देऊन तृप्त केले.
आपली उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांनी खाल्ल्यावर शबरी कृतकृत्य झाली.
हाच आनंद मिळवून देण्यासाठी संत एकनाथ राणूकडे जेवणासाठी जातात. इतके च नव्हे तर वडिलांच्या श्राद्धदिनाचे जेवण दारी आलेल्या भुकलेल्यांना देऊन स्वत: धन्य होतात.
असा आहे हा अन्नदानाचा महिमा..!
अलीकडील काळातही विविध कथांमधून ही थोरवी दिसतेच. य. गो. जोशी यांच्या ‘अन्न, अन्न आणि अन्न’ या कथेतून मातेचे प्रेम दिसून येते. स्वयंपाकासाठी येणारी मावशी श्रावणातल्या दर शुक्रवारी काहीतरी चोरून नेताना मालकीणबाईंच्या नजरेस पडते. चौथ्या शुक्रवारी त्या तिला अडवतात. चोरीचा आरोप करतात, तेव्हा ती माऊली रडवेली होते आणि लुगडय़ाच्या ओच्यात लपविलेल्या चार जिलब्या दाखवून म्हणते, बाईसाहेब, मी चोरी नाही केली. माझ्या पानात वाढलेल्या चार जिलब्या बाजूला ठेवून मी आता घरी नेत आहे. घरी माझा अपंग मुलगा शिळे तुकडे खाणार आणि मी इकडे जिलबी कशी खाऊ? बाईसाहेब, आईच्या घशातून घास कसा उतरणार? तुम्ही म्हणत असाल तर खरेच एका आईने मुलाच्या प्रेमासाठी चोरी केली आहे. काय शिक्षा द्यायची ती द्या..
अशी अन्नाची महती! सर्व मानवी जीवनाला व्यापून उरणारी. मानवाची संस्कृती, त्याचे साहित्य, पुराणे, भाषा, विचारसरणी, दृष्टिकोन सारे सारे अन्नाभोवती फिरते आहे. त्याचा जीवच अन्नमय प्राण आहे. म्हणूनच संस्कृतीने अशा या अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले आहे. म्हणूनच अन्नाचा मान ठेवून त्याला भजून खाणे त्याचे कर्तव्य आहे. अन्नाची नासाडी न करण्याचे त्याने व्रत घेतले पाहिजे.
पण आजही पुष्कळ घरी अन्न कचऱ्यात फेकले जाते. लग्नसमारंभात अन्नाची नासाडी बघवत नाही. तेव्हा मानवाने विचारपूर्वक वागावे. मिडास राजाची कथा काय सांगते? म्हणून अन्न ही राष्ट्रीय संपत्ती असे लक्षात घेऊनच अन्नाचा दुरुपयोग थांबवावयास हवा.
गरजूंना अन्न द्यावे. स्वत:च्या ताटातले चार घास इतरांनाही द्यावेत. भगवंतांनी गीतेत सांगितलेच आहे की, जो स्वत:पुरते खातो तो पाप खातो.
वाडवडिलांच्या श्राद्धपक्षदिनी अपंगांना, वृद्धाश्रमात, कुष्ठधाम, अनाथाश्रमात, जेवण देता येईल, भुकेल्यांना सुग्रास भोजन देऊन तृप्त करता येईल. यात स्वार्थ, परमार्थ, राष्ट्रीय कार्यही साधता येईल. इथे एका कवीच्या ओळी आठवतात-
‘जोवरी सुखाचा घास नसे सर्वाना
जोवरी न झाल्या उन्नत अवघ्या मान।
तोवरी न मानू प्रगतपथावर देश
तोवरी असेलच अंगावर रणवेश॥
यासाठी प्रत्येकाने अन्नधान्याच्या बाबतीतला आपापला खारीचा वाटा उचलू या.
सुधा नरवाडकर – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा