आजपर्यंत माझा असा समज होता की, भाग्य फक्त माणसांचेच बदलते किंवा फळफळते म्हणा. आज जे प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झालेले दिसताहेत त्यातल्या कित्येकांचा भूतकाळ पाहिला, तर ते जे काही आज आहेत तसे होतील असे कोणालाच कालपर्यंत वाटले नसेल. राजकारणात, खेळात, सिनेमा किंवा टीव्ही स्टार यांच्या बाबतीत असे अनुभवपण खूप प्रसिद्ध आहेत; परंतु बारकाईने विचार केला तर माणसांचे नाही तर काही काही शब्दांचेदेखील भाग्य उजळलेले आढळून येईल. ‘गावठी’ हा त्यातलाच एक शब्द.

आता गावठी म्हणजे गावातल्या किंवा खेडेगावातल्या वातावरणात वाढलेल्या व्यक्तीबद्दलच उल्लेख करताना म्हटले जायचे. शहरातील मुले म्हणजे जरा जास्त हुशार व चांगली समज असलेली अन् गावाकडची म्हणजे अनाडी असा एक (गैर)समज आपणच पसरवलेला. मला आठवते की, लहानपणी एखाद्याला हिणवायचे असेल तर त्याला आम्ही शाळेतली मुले ‘गावठी’ म्हणायचो. ‘‘अरे, त्याला काय विचारतोस? तो आहे गावठी.. कालच भाऊच्या धक्क्यावरून आलाय!’’ समोरच्याही मुलाला गावठी म्हटलेले खपायचे नाही. त्याला राग यायचा. मग तेवढय़ावरून मुलांमध्ये वादविवाद, भांडणे अन् कधी कधी मारामाऱ्याही व्हायच्या. कॉलेजमध्ये काय, नोकरीच्याही ठिकाणी एखाद्याचा पाणउतार करायचा असेल तर ‘गावठी’ शब्दाचा सर्रास व पद्धतशीरपणे वापर व्हायचा. मुंबईतल्या गिरगाव, लालबाग, दादर इत्यादी ठिकाणी मोठमोठय़ा चाळींतून तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरून ‘‘ए गावठीऽऽऽ ए गाऽऽऽवऽऽऽठीऽऽऽ’’ असा मुलांचा ओरडा व्हायचा आणि ती व्यक्ती सगळय़ांचा डोळा चुकवून गर्दीत कुठे तरी पसार व्हायची.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…

परंतु आता या ‘गावठी’ शब्दाचे दिवस बदललेत. एके काळी अपमानित वाटणारा व मान खाली घालायला लावणाऱ्या या शब्दाची मान आता उंचावलीय. गावठी शब्दाबद्दल एक लोभनीय वलय निर्माण झाले असून त्याचा भावही चांगल्यापैकी वधारलाय.

बाजारात भाजी घ्यायला गेलात तर भाजीवाला गावठी भाजी चढय़ा भावाने विकतो. पूर्वी मुंबईत रेल्वेलाइनच्या आजूबाजूला किंवा थोडीफार मोकळी जमीन होती तिथे भाजी लावण्याचा प्रकार चांगल्या प्रमाणात होता. त्याला लागणारे पाणी आणि ज्या जमिनीवर ती लावली जायची तिचा कस पाहिला तर माहीतगार माणसे तशी भाजी घ्यायला नाक मुरडायचेच. तसेच या भाज्यांच्या दुष्परिणामांच्या बातम्या सतत वर्तमानपत्रांतून यायच्या. यामुळे ‘गावठी’ भाजीलाच जास्त मागणी; पण आता परिस्थिती बदललीय. मुंबईत मोकळी जागा राहिलेली नाही अन् रेल्वेलाइनच्या आजूबाजूची भाजी लावणे बंदच झाले आहे. आता भाज्या, फुले अन् फळे येतात ती प्रामुख्याने वसई, विरार, पालघर, कल्याण, कर्जत, नाशिक व पुणे या भागांतूनच. म्हणजे येणाऱ्या भाज्या तशा ग्रामीण भागांतूनच येतात. तरीही ‘गावठी’ शब्द वापरला, की गिऱ्हाईक जास्त पैसे देऊन भाजी, फुले किंवा फळे घ्यायला मागेपुढे पाहात नाही. ‘‘आमच्याकडे किनई.. गावठी भाज्यांशिवाय चालतच नाही,’’ असे म्हणायचे आणि भय्याकडून ‘गावठी’ नावावर जास्त दराने भाजी घेऊन आपले सात्त्विक समाधान मानायचे. काही काही भाजीवाले तर पूर्वी वसई- विरारमधून कावड घेऊन भाजी विकायचे. त्यांची नक्कल करत मार्केटमधीलच भाजी कावडीत घालून ‘गावठी’ म्हणून जास्त दराने विकतात आणि आपण मागचापुढचा विचार न करता चांगली ‘गावठी’ भाजी घेतल्याच्या आनंदात घरी परततो.

संत्री, मोसंबी, केळी, पेरू, पपई वगैरे फळांच्या बाबतीत तर ‘गावठी’चे लेबल लावून दुकानदार गिऱ्हाईकाला हातोहात चकवतात अन् चढय़ा भावात विकून मोकळे होतात. आंबे विकताना नुसतेच हापूस न म्हणता ‘देवगड का हापूस’ म्हणून  खपवणार. खरा देवगडचा हापूस ज्याने चाखला आहे आणि ज्याला त्याची पारख आहे असे फार थोडे लोक सोडले, तर या जादूई दुनियेत सारेच जण हातोहात फसवले जातात अन् गावठी या शब्दाचा भूलभुलैया वाढतच चालला आहे.

जी गोष्ट भाजी, फुले आणि फळे, तीच गोष्ट अंडी, मासे अन् मटण विकताना सर्रास दिसून येते. गावठी कोंबडी अन् गावठी कोंबडीचे अंडे आजही सर्वाच्या जास्त पसंतीचे आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर मिळणाऱ्या माशांपेक्षा आजूबाजूच्या गावांतून अन् कोकणपट्टीतून येणाऱ्या गावठी माशांना दर जास्त असला तरीही मागणी वाढणारी दिसून येते. मुंबईत आजही काही काही हॉटेल्स आहेत, की त्यांच्याकडे रोज रत्नागिरी, मालवण येथून मासळी आणली जाते (असे म्हणतात) अन् भाव जास्त असले तरी खवय्यांची गर्दीही जास्त असते.

गावठी भाजी, फळे व फुले यांच्याप्रमाणेच गावठी औषधाचेही महत्त्व लोकांना पटू लागलंय. निरनिराळय़ा वनस्पती, धान्ये, फळे, फुले यांच्यातील नैसर्गिक औषधी गुण ओळखून पूर्वी पणजी, आजी काढे, सूप, मुरांबे बनवायच्या. आज हे आजीबाईंच्या बटव्यातले काढे, सूप व मुरांबे करण्याकडे लोकांचा कल मोठय़ा प्रमाणात वाढलेला दिसतो. आंघोळीसाठी लागणारे साबण, श्ॉम्पू, केसांसाठी लागणारी तेले घेताना औषधी वनस्पतींचे गुणधर्म बारकाईने आवर्जून पाहिले जातात. आजच्या जगात पिझ्झा, नूडल्स आणि बर्गर यांची कितीही जाहिरातबाजी झाली तरी पौष्टिकता व उपयुक्तता या गुणधर्मावर लोकांची जास्त पसंती सकस आहार म्हणून कांदे-बटाटे पोहे, थालीपीठ, भाकरी- चटणी, इडली-डोसा (गावठी?) यांनाच आहे यात शंकाच नाही.

पूर्वी सिनेमात लंडन, जपान, पॅरिस अशी परदेशी स्थळे दाखवून गर्दी खेचायचा यशस्वी प्रयत्न व्हायचा. आता मात्र सिनेमांचे चित्रीकरण शक्यतो ग्रामीण भागात करून जास्तीत जास्त गावाकडचे वातावरण दाखवायचे प्रकार वाढले आहेत आणि असे सिनेमे चांगल्यापैकी यश मिळवताना दिसतायेत. राज कपूर यांचे काही सिनेमे काय किंवा दादा कोंडके यांचे सिनेमे काय याच कारणाने लोकांच्या मनात घर करून बसले. आजही ग्रामीण लोकनृत्य व लोकगीते जास्त प्रसिद्धी मिळविताना आढळून येतात. एकंदर गावठीचा वरचष्मा सर्वच क्षेत्रांत वाढत चाललेला दिसून येतोय. गावातील ‘गावठी’ दिसायला बावळट व अनाडी असला तरी त्याची प्रतिमा दिलदार, मनमोकळा अन् इमानदार या गुणांनी उजळलेली दाखवण्याचे प्रामाणिक प्रयत्न या सिनेमातून दिसून येतात.

हल्ली मुंबईसारख्या शहरातील हवा व पाणी यांचे प्रदूषण वाढतच चाललंय. बऱ्याच जणांना त्यांचे फॅमिली डॉक्टर वर्षांतून १० ते १५ दिवस तरी गावाकडे हवापालटासाठी जाऊन राहा, असा सल्ला देताना दिसतात. पूर्वी शाळा-कॉलेजांना सुट्टी पडली की, कित्येक कुटुंबे हमखास आपापल्या गावी हवापालट करायला जायची आणि खरोखरच मोकळय़ा अन् शुद्ध हवा व पाण्यामुळे चांगली तब्येत करूनच परतायची. आता बऱ्याच जणांना वर्षांनुवर्षे शहरातच राहण्याची सवय झाल्याने गावच राहिलेले नाही. त्यामुळे मग ‘मामाचा गाव’सारख्या रिसॉर्टला जाऊन दुधाची तहान ताकावर भागवायची पाळी बऱ्याच जणांवर आलीय. आपले आरोग्य अन् आयुष्य चांगले राहिले पाहिजे तर गावाकडेच राहता आले पाहिजे म्हणून लोक पुंजी जमवून गावाकडेच ‘सेकंड होम’ घेण्यासाठी धडपडताना दिसताहेत. एके काळी जे शिक्षण व नोकरीसाठी गावाकडून शहरात स्थायिक झाले अन् आपल्याच गावातील लोकांना गावठी म्हणून संबोधायचे तेच लोक स्वास्थ्यासाठी गावाकडे परतायचा यशस्वी अन् प्रामाणिक प्रयत्न करताहेत. गावातील शुद्ध हवा व पाणी, सकस भाजी व फळफळावळ, निरनिराळे उत्सव, उत्सवातील भारावले जाणारे वातावरण याचे महत्त्व त्याला पटू लागले आहे. जीवनातला खरा आनंद हा गावात राहण्यातच आहे असा साक्षात्कार त्याला झाला आहे. एकूण काय, तर गावठी म्हटल्यावर खाली मान घालायला लावणारेच आता गावातील जीवन जगण्यालाच धन्य मानू लागले आहेत. एक गोष्ट मात्र यामुळे मानावीच लागेल की, ‘गावठी’ या शब्दाचा करिश्मा बदलत चालला आहे.
गुरुप्रसाद शिरसाट – response.lokprabha@expressindia.com