खरं म्हणजे लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. परंतु मुला-मुलींचे पळून जाऊन लग्न करणे, लग्नाचा खेळ, लग्न- प्रेम-संसार यांची जत्रा, पळून जाणाऱ्या मुलींची लग्नानंतर होणारी दुर्दशा हेसुद्धा वास्तव आहे.

एक लग्न लावणारे भटजी दिवसाला लग्न लावून लावून किती लग्न लावत असावेत असे तुम्हाला वाटते? दोन-चार-आठ? छे, अहो हा आकडा तर सीझन- मुहूर्त (!) नसतानाचा आहे. सीझन-मुहूर्त  असताना हे गुरुजी तब्बल पंधरा ते वीस लग्नं लावतात! मुंबईत वांद्रा कोर्टच्या समोरच एक मंदिर आहे. त्या मंदिराच्यावर चाळीस ते पन्नास लोक बसू शकतील असा एक छोटेखानी हॉल आहे. कोर्टात रजिस्टर लग्न केल्यानंतर काही जोडपी तिथे येऊन विधिवत लग्न करतात.

वांद्रय़ाच्या या मंदिरात अशाच एका पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याच्या अध्र्या तासाच्या लग्न समारंभात जाण्याचा योग आला. माझ्या मित्राच्याच भावाचं ते लग्न! घरातून प्रेमविवाहाला परवानगी नसल्यानं त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या एक तास आधीच त्याचा फोन आला की, या या ठिकाणी लग्न करतोय, ये आणि घरी सांगू नकोस. तडक लग्नाच्या ठिकाणी गेलो. जाऊन बघतो तर ही भली मोठी रांग.

ठरावीक अंतर सोडल्यानंतर प्रत्येकाच्याच हातात लग्नामध्ये वधू-वर गळ्यात घालतात तसा फुलांचा हार होता. काही मुलांच्या पाठीवर मोठाल्या बॅगा होत्या. बहुतेक कपडे, सामान असावे त्यात. गर्दीत बहुतेक अठरा ते पंचवीस वयोगटांतील तरुण-तरुणी होते. मध्येच तीन-चार चाळिशीची माणसं दिसली. ही सगळी मुलं पळून जाऊन लग्न करण्यासाठीच इथं आली होती!

मित्राचा भाऊ आमच्याजवळ आला. थोडा घाबरलेला दिसत होता. तो जिच्यासोबत लग्न करणार होता,  ती त्याच्यापेक्षा निदान दोन वर्षांनी तरी लहान असेल (एप्रिलचा महिना. नुकतीच तिची परीक्षा संपलेली. कदाचित परीक्षा संपल्यानंतर लग्न करण्याचा घाट होता त्यांचा. आणि तो ते पूर्णत्वास नेत होते. त्याच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत सरस होती ती. तिथे लग्न करण्यासाठी उभ्या असलेल्या बहुतेक मुली या मुलांपेक्षा सर्वच बाबतीत सरस दिसत होत्या.

मित्राने विचारलं, ‘‘किती वेळ लागेल अजून?’’

‘‘आपला पाचवा नंबर आहे.’’ तो उत्तरला. सगळ्यांनी लग्नासाठी चक्क नंबर लावले होते!

तेवढय़ात एक जोडपं (!) लग्न करून बाहेर आलं. दोघांनीही अगदीच भाजी आणायला जावे असे कपडे घातले होते आणि त्यांच्यासोबत केवळ दोनच मुलं होती. दोघांच्याही पाठीवर जड बॅगा. आणि दोघांचंही वय खूप कमी वाटत होतं.  नंतर आमचा नंबर आला. गुरुजींनी पाच-दहा मिनिटांत मंगलाष्टकं म्हटली. वधू-वरांनी एकमेकांना हार घातले. सात फेरे झाले, वधू-वरांनी मिशन सक्सेसफुल झाल्याचे एकमेकांसोबत हसत सेल्फी काढले, आमचे चार-पाच जणांच्या वऱ्हाड मंडळींचे त्यांच्यासोबत फोटोसेशन झाले. अशा प्रकारे अध्र्या तासात या पळून आलेल्या जोडप्याचा विवाह समारंभ पार पडला. ‘चला पुढचा नंबर.’ गुरुजींनी हजार रुपयांची नोट खिशात घालत मोठी जांभई देत गर्जना केली.

या दोघांनी आधी लग्न कोर्टात रजिस्टर करून नंतर हा विधी तरी केला होता, बाकी कित्येकजण तर नुसतेच गळ्यात हार घालून लग्न करायला आले होते.

विशेषत: मार्च-एप्रिल-मे या महिन्यांत परीक्षा संपल्यावर मुलं-मुली पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण मोठं आहे. अजून कशातच स्थिरस्थावर झाले नसतानाही लग्न करण्याची यांची प्रवृत्ती असते. सिनेमात बघून ते असं लग्न करतात. परंतु चित्रपट व वास्तव यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.  वास्तवातला फरक हा त्यांना संसाराचे चटके बसू लागल्यावर जाणवतो.

अक्षय टेमकर response.lokprabha@expressindia.com

Story img Loader