ऑफिसवरून लवकर घरी निघालो. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून उतरून पुढे चालू लागलो. बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीने पाठीवरील सॅकची चेन उघडी असल्याचे सांगितले. मी सॅक पाठीवरून खाली काढली. सॅकच्या बाहेरील खिशाची चेन पूर्णपणे उघडी होती. मी सॅकमध्ये हात घातला अन् मला धक्का बसला. माझ्या सॅकमधून माझे पाकीट चोरण्यात आले होते. पाकिटात पैसे नव्हते, परंतु डेबिट अन क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, कार आणि बाइकचे आरसीकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, रेल्वेचा पास अशी महत्त्वाची ओरिजिनल डॉक्युमेंट त्यात होती. मी घरी फोन करून पाकीट चुकून घरात असल्यास चेक करायला सांगितले, परंतु घरी काही ते सापडले नाही. मग मी निराश होऊन परतीच्या प्रवासाला निघालो. डेबिट अन क्रेडिट कार्ड लॉक करणे गरजेचे होते, परंतु माझ्याकडे नंबर नसल्याने मी मोबाइलवरून माझ्या एका बँकेच्या खात्यावरून तात्काळ पैसे दुसऱ्या बँकेत वळते केले.

मीरारोड निघून गेल्यावर माझा मोबाइल वाजला. पलीकडून एका तरुणाचा आवाज आला. त्याने ‘सचिन मेंडिस’ बोलता का असे विचारले. मी ‘हो’ असे उत्तर दिले. माझे पाकीट त्याला अंधेरी स्टेशनच्या बाहेर सापडले आहे असे त्याने सांगितले, अन् अंधेरीला यायला सांगितले. माझे पाकीट परत करण्यासाठी तो पाऊण तास अंधेरीला थांबणार होता. त्याचे मला कौतुक वाटले. मी तात्काळ भाइंदरला उतरून चर्चगेट गाडी पकडली. त्या मुलाने त्याचे नाव ‘अमर’ असे सांगितले होते. मी मोबाइलमध्ये ‘अमर अंधेरी’ असा त्याचा नंबर सेव्ह केला. माझ्या जिवात जीव आला होता. आता मला गाडी अंधेरीला कधी पोहोचते असे झाले होते. मी ट्रेनमधून अमरला फोन लावला आणि पाकिटातील ओरिजिनल डॉक्युमेंट सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. ट्रेन अंधेरीला पोहोचली अन् त्याचा पुन्हा फोन आला. मी कुठे पोहोचलो त्याने चौकशी केली. मी त्याला गाडी अंधेरी स्टेशनला लागल्याचे सांगितले, त्याने मला त्याच प्लॅटफॉर्मवर सरकत्या जिन्याच्या खाली उभे राहायला सांगितले अन् तो तिथेच येईल असे कळवले. मी स्टेशनला उतरून सरकत्या जिन्याच्या बाजूला उभा राहिलो. काही मिनिटाने एक काळा, शिडशिडीत २५ वर्षांचा तरुण माझ्या समोर आला अन् त्याने ‘सचिन सर’ अशी हाक दिली. मी त्या तरुणाला मिठी मारली अन् त्याचे आभार मानले. त्याने पाकीट माझ्या हातात सोपवले. माझ्या पाकिटातील व्हिजिटिंग कार्डवर माझा मोबाइल नंबर होता, त्यावरून त्याने मला संपर्क केला होता. त्याची चौकशी केली. कोणत्या तरी छोटय़ा कंपनीत तो ऑफिसबॉय म्हणून काम करीत होता अन् काही कामानिमित्त तो अंधेरीला आला होता. मला त्या कमी शिकलेल्या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे अन् विशेषकरून परोपकाराचे कौतुक वाटले. मी खिशातून ५०० रुपयांची नोट काढून त्याच्या हातात ठेवली अन् माझे व्हिजिटिंग कार्ड त्याकडे दिले. त्याला उशीर झाला होता. त्याने ‘मी निघतो’ असे म्हटले अन् तो पाठी फिरला. अमरच्या रूपाने मला एक सुखद अनुभव मिळाला होता.

रात्री घरी गेल्यावर घरच्यांना ही घटना सांगितली. दुनियेत अशी चांगली माणसे आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. मनात आले अमरच्या मोबाइलवर फोन करून त्याच्या आईशी बोलावं अन् तिच्या गुणी मुलाचे कौतुक करावं. मी अमरला फोन लावला. म्हटलं ‘घरात कोण असते तुझ्या’. ‘मी आणि माझा भाऊ , आम्ही दोघेच असतो’ अमरने उत्तर दिले. ‘अन् आई-बाबा’, माझा पुढचा प्रश्न. पुढून थंड उत्तर आले, ‘आई-बाबा लहानपणीच वारले’. मला खूप वाईट वाटले. आई-बाबांच्या मायेला पारखी झालेली ही अल्पशिक्षित मुले किती सुंदर आहेत, असे मनोमन वाटले. मी फोन ठेवण्याअगोदर अजून एक प्रश्न केला ‘अमर, पाकीट सापडल्यावर तुला परत करावेसे का वाटले?’ त्याने उत्तर दिले, ‘सर, काही महिन्याअगोदर खोली पाहण्यासाठी मी विरारला आलो होतो, घरून निघाल्यावर मी एटीएममधून महिन्याचा ७ हजार पगार काढून पाकिटात टाकला अन् ट्रेनमध्ये चढलो. विरार स्टेशनाला उतरल्यावर लक्षात आले की पाकीट चोरीला गेले आहे. पूर्ण महिन्याचा पगार क्षणात निघून गेला होता. मी खूप शोधाशोध केली, परंतु पाकीट मिळाले नाही. मला पाकीट हरवल्याचे दु:ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला’.

अमरचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो. त्याच्या हरवलेल्या पाकिटाचे दु:ख माझ्या सापडलेल्या पाकिटाच्या आनंदापेक्षा नक्कीच जास्त होते. मी त्याला त्याचे पाकीट परत मिळवून देऊ शकणार नव्हतो, परंतु माझ्या ओळखीने त्याच्यासाठी चांगली नोकरी तरी नक्कीच शोधू शकत होतो. मी त्याला वचन दिले, ‘मित्रा, मी तुझे काम करतो’. मला त्याला पगाराने भरलेले नवीन पाकीट द्यायचे आहे.
सचिन मेंडिस – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader