नेहमीप्रमाणे साडेअकरा वाजता शाळा सुटली. बाकीची मित्रमंडळी टणाटण उडय़ा मारीत घरी निघून गेली. बबलूची आई एक वाजेपर्यंत ऑफीसमधून घरी येत असे. त्यामुळे स्वत:च्या हाताने कुलूप उघडून घरात शिरणे बबलूच्या खूप जिवावर येई. म्हणून तो रमतगमत पायाने विटकरीचे तुकडे उडव तर कुठे एखाद्या बकरीच्या मागे लाग असे करीत वेळ घालवीत घरी येत असे. आजही त्याचे तेच चालले होते. इतक्यात घराच्या वाटेवरील बागेजवळून जाताना दुपारच्या टळटळीत उन्हात एक प्राणी त्याला दबकत दबकत बागेत शिरताना दिसला. तसा हाही त्याच्या मागे बागेत शिरला. दुपारची उन्हाची वेळ त्यामुळे बागेत सामसुम होती. कुठला प्राणी म्हणून हा निरखून बघतोय् तोच त्याच्या लक्षात आले की अरेच्चा, हा तर बिबटय़ा. परवाच त्याला डॅडींनी वर्तमानपत्रातील त्याचे चित्रही दाखवले होते.
‘‘बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून निसटलेला बिबटय़ा भरवस्तीत..’’ आल्याची बातमीही त्याने वाचली होती.
कुतूहलाने तो बिबटय़ाकडे बघतोच आहे तर चार-पाच माकडे ही माठ, कळश्या, बादल्या घेऊन बिबटय़ा मागोमाग आत आली. ही काय गंमत बुवा! म्हणूत तो झाडामागून बघतोय् तर ही माकडे न घाबरता चक्क बिबटय़ाशी हितगुज करीत होती. चोरून, लपून बघणाऱ्या बबलूकडे बिबटय़ाचे लक्ष जाताच त्याने त्याला खुणेनेच स्वत:जवळ बोलावले. बबलूची तर भीतीने गाळणच उडाली. परंतु एक माकड चक्क त्याच्या जवळ चालत आले. बबलूचा हात धरून त्यांच्या स्नेहसंमेलनात घेऊन गेले. बबलू भीतीने त..त..प..प करू लागल्यावर बिबटय़ा त्याला म्हणला घाबरू नका राव. नाव काय तुमचे? बबलूने नाव सांगितल्यावर चक्क बिबटय़ाने त्याच्याशी हस्तांदोलन केले व म्हणाला बबलू काही घाबरू नको. आम्ही काही तुझ्यावर हल्ला करणार नाही. आम्ही सारे जण शेजारच्या जंगलात राहतो. पण काय करणार? उन्हाळा जसा तापू लागला तसे जंगलातील झरे, पाणवठे आटले. तुम्ही माणसांनी बेसुमार जंगलतोड केल्याने आमचे सारे जीवनचक्रच बिघडून गेले. प्राणीही जंगलातील कमी झाले, शेवटी आमच्या एका भागातील या माकडांनी व मी ठरविले की असे आठ-दहा माकडांना मी फस्त करून टाकल्यावर पुढे मलाही काय? हा प्रश्न उद्भवणारच. तेव्हा आम्ही साऱ्यांनी ठरविले की, अधूनमधून अशा मानवी वस्त्यांवर हल्लाबोल करायचा, मला पाणी साठविता येत नाही म्हणून या माकडांनी कळश्या, बादल्या भरून उघडय़ा टाक्यांमधील पाणी पळवायचे व मीही जमेल तसे शेरडू वगैरे पळवायचे म्हणून आमची ही वरात आज इकडे आली आहे. हे सारे ऐकून बबलूला तर मोठी गंमतच वाटली. परंतु त्याला वाचलेली पुढची बातमी लगेच आठवली की बोरीवली उद्यानातील त्या बिबटय़ाला पोलिसांनी महत्प्रयासाने चार तासांत जेरबंद केले. हे आठवल्याबरोबर बबलू बिबटय़ाला म्हणाला, तुमची कल्पना तर मोठी नामी आहे. शिवाय कळश्या, बादल्या घेतलेली माकडे आणि सोबत बिबटय़ा असा फोटो काढून एखाद्या छायाचित्रणाच्या स्पर्धेला पाठविला तर बक्षीसही मिळेल. परंतु माणसांच्या वस्तीत तुम्हाला फार काळ सुखासमाधानाने राहता येईल असे मला काही वाटत नाही. हे वाक्य ऐकताच ‘मानवाचा धोका’ बिबटय़ाच्या लक्षात आला व तात्काळ त्याने बबलूची मानगुटी धरली. त्याबरोबर ओरडत, ओरडत बबलू बाकावर उठून बसला. बागेचा पहारेकरी त्याला हलवून, हलवून जागे करीत होता.
डॉ. मधुलिका महाजन – response.lokprabha@expressindia.com
बिबटय़ाशी हितगुज
नेहमीप्रमाणे साडेअकरा वाजता शाळा सुटली. बाकीची मित्रमंडळी टणाटण उडय़ा मारीत घरी निघून गेली.
Written by दीपक मराठे
आणखी वाचा
First published on: 25-09-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaguar