सुट्टीत घरी आलेला मुलगा दुसऱ्याच दिवशी म्हणाला मम्मी खूप बोर होऊन राहिलं, काय करू? त्याच्यासमोर पर्याय ठेवले नागपूरला मामाकडे जा.. (उत्तर नाही.) हैद्राबादला काकाकडे जा.. (उत्तर नाही.) कुठेतरी फिरायला जा.. (कोणी मित्र असते तर गेलो असतो.) (एकटय़ाला बोअर होईल.) मूव्ही बघायला जा, (जे बघायचे होते ते आधीच लॅपटॉपवर बघितले आहे.)

सर्व सुखसुविधा प्रत्येक गोष्टीला पर्याय तरी आजकालच्या मुलांना बोअर होतं. पण आमच्या लहानपणी आम्हाला कधीच बोअर झालं नाही. कारण आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो. घरभर माणसं होती. शिवाय शाळा, कॉलेज, मैत्रिणी, बहिणी, घरकाम, अभ्यास यामध्ये दिवस कसा जायचा समजत नव्हतं.

Ants the World’s First Farmers?
Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Deepinder Goyal Success Story
Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

दहा हजार स्क्वेअर फुटाचा वाडा, मागे १५ हजार स्क्वेअर चौरस फुटांचं आवार, जुन्या घराचंच नवीन, नवीन होत गेलेलं कुठल्याही प्लॅनिंगशिवाय बांधलेलं घर, त्यात वडील धरून १२ भावांचे संसार, काही भाऊ नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी तर काही घरीच (यवतमाळला) राहणारे. घराचा ३/४ भाग कॉमन तर प्रत्येकाला एक किंवा दोन स्वतंत्र खोल्या मिळाल्या होत्या. त्या खोल्यांतच आमचा अभ्यास, झोपणं, दैनंदिन गरजेच्या वस्तू असायच्या. खोल्यांची नावंही गमतीशीर होती. समोरची ओसरी, रेडिओची खोली, जेवायची ओसरी, तिजोरीची खोली, देवघर, जुनं स्वयंपाकघर, नवीन स्वयंपाकघर, हॉल, नवीन खोल्या, भाऊ आजोबाची खोली (नंतरचं नामकरण बाळंतिणीची खोली). ही खोली नावाला साजेशीच होती. दर सहा महिन्यांनी त्या खोलीत एक बाळंतीण हजर असायची. एका पार्टिशन घातलेल्या खोलीचं नाव तर चक्क टाउन हॉल असं होतं. शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषदेच्या टाउन हॉलमध्ये व आमच्या घरातल्या टाउन हॉलमध्ये काय साम्य आहे हा माझ्या बालमनाला नेहमी सतावणारा प्रश्न. अंगणसुद्धा एक नव्हतं. त्यातही समोरचं अंगण, विहिरीपासचं अंगण, मागचं अंगण असे प्रकार होते.

मी पाचवीत असताना माझ्या वडिलांची नोकरीनिमित्त बदली यवतमाळवरून चंद्रपूरला झाली. पहिल्यांदा चंद्रपूरला जाताना पूर्ण प्रवासात मी रडत होते. यवतमाळचं घर सोडून जायची कल्पनाच करवत नव्हती. शाळेत पहिल्याच दिवशी चितळेबाईंनी प्रश्न विचारला, तुला भाऊबहिणी किती? मी उत्तर दिले- १७ भाऊ, २१ बहिणी. बाई हसल्या. पुन्हा त्यांनी विचारलं, तुझ्या घरी मेंबर किती? उत्तर : असतील (४०, ५०) चाळीस किंवा पन्नास. बाईंनी तिसरा प्रश्न विचारलाच नाही. पण नंतर माझ्या आईशी बोलताना त्यांना आमच्या एकत्र कुटुंबाबद्दल समजले. लहानपणी सख्ख्या, चुलत हा विचारही मनात येत नव्हता. हे एवढं मोठं घर पूर्ण आपलं, सर्व काका-काकू आपले, सर्व बहीणभाऊ आपले. छोटय़ा घराची, छोटय़ा कुटुंबाची सवयच नव्हती. म्हणूनच चितळेबाईंना माझे दोन भाऊ, मी व माझे आईवडील असे आम्ही पाच मेंबर आहोत हे सांगता आलं नाही. मन यवतमाळच्या घरातच गुंतलं होतं. पुन्ह चार वर्षांनी वडिलांची बदली यवतमाळलाच झाली. आजकालच्या दृष्टीने विचार केला तर तेव्हा आमच्या घरात भरपूर गैरसोयी होत्या. आंघोळीसाठी नंबर लावावा लागत होता. सणवार असला की, स्वयंपाकाला उशीर व्हायचा. असंच काहीतरी खाऊन शाळा, कॉलेजमध्ये जावं लागायचं. पण कुठल्याही गोष्टींचा कधीच त्रास वाटला नाही. प्रत्येक गोष्टीत अ‍ॅडजेस्ट व्हायची सवय लागली होती. सगळी कामं वाटणीनी असायची. घरातील सगळय़ा वडीलधाऱ्या माणसांचा आदरयुक्त धाक होता. बायकांना तर भरपूर कामं असायची. त्यांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरातच जायचा. सगळय़ांचे स्वभाव भिन्न असले तरी एक कुटुंब म्हणून सगळय़ांना एका अदृश्य धाग्याने एकत्र बांधून ठेवले होते. आम्हाला सगळय़ा गोष्टी घरातच शिकायला मिळत होत्या. प्रत्येक गोष्टीचा उत्सव असायचा. लहानपणी हुंदडण्यात, थोडं मोठं झाल्यावर कॅरम, पत्ते या खेळात बहिणींकडून विणकाम, भरतकाम शिकण्यात कसा वेळ गेला ते समजलेच नाही. अभ्यासातसुद्धा मोठय़ा बहीण-भावांचीच मदत असायची.

गप्पा मारायला बसलो तर ४/५ तास कुठे निघून जायचे समजत नव्हतं. कुठेही जायचं असलं तर आम्ही सर्व बहिणी मिळून जात असू. शिवाय प्रत्येक बहिणीची एक खास मैत्रिण असायची व ती सर्व घरच्यांना परिचित असायची. कॉलेजमध्ये एकमेकींचे ड्रेस घालून जायचो. घरची खूप श्रीमंती नव्हती, पण गरिबीही नव्हती. खाऊन-पिऊन सुखी असा परिवार. घरी कुठलं लग्नकार्य असलं तर पूर्ण घर कामाला लागत होतं. बाहेरच्या कुणाची काहीच मदतीची आवश्यकता नसायची.

देशस्थ ब्राह्मणाचं घर असल्यामुळे झाडून सगळे सण घरात साजरे व्हायचे. शिवाय सगळय़ा सणांना सोवळय़ाचा स्वयंपाक असायचा. दिवाळी आणि महालक्ष्मी पूजा या सणाला तर खूपच मजा यायची. नवरात्रीच्या आरत्या म्हणताना सगळय़ांचा आवाज इतका टिपेला पोहचलेला असायचा की विचारता सोय नाही. पु.ल. देशपांडे यांनी ‘हरीतात्या’ या गोष्टीत आरतीचं जे वर्णन केलं आहे, अगदी तशीच आमच्या घरची आरती असायची. घर माणसांनी गच्च भरलेलं असायचं. जेवणाच्या पंक्ती उठायच्या. येणारा जाणारा पै-पाहुणा सतत असायचा. वेळेवर जरी कोणी पाहुणे आले तरी काही प्रश्न नसायचा. एवढय़ा मोठय़ा घरात त्यांची सर्व सोय व्हायची. दिवस कुठे उगवायचा आणि कुठे संपायचा याचा पत्ता लागत नसे. बायकांच्या वेगळय़ा गप्पा, माणसांचे गप्पांचे विषय वेगळे. (मुख्यत: राजकारण, शेती इत्यादी.) मुलांची वेगळीच गडबड, दंगामस्ती, खेळ आमचं घर म्हणजे गोकुळ होतं.

आज मागे वळून बघताना जाणवतं की आपल्या आयुष्यात काही काळ नक्कीच खूप चांगला होता. त्या काळाने खूप संस्कार दिले. मनाला मुरड घालायची सवय लागली. सगळय़ांशी मिळूनमिसळून वागण्याची बुद्धी दिली. खूप आनंद दिला; इतका की, त्या आनंदाचा ठेवा आयुष्यभर पुरेल.
स्वाती नेवास्कर – response.lokprabha@expressindia.com