अलीकडे झालेल्या बऱ्याच मराठी मालिकांतून समजूतदार आणि खेळकर कौटुंबिक वातावरण दाखविले गेले. हे एकत्र कुटुंबातील वातावरण सर्वानाच हवेहवेसे वाटले. अशाच या काही मालिका.

’ होणार सून मी या घरची : या मालिकेतील श्री, जान्हवी, आजी आणि जान्हवीच्या पाच सासवा, या सर्वाचा एकत्र कुटुंबातील एकोपा, तसेच नंतर आलेले श्रीरंगचे काका आणि बाबा यांचाही कुटुंबाशी झालेला समन्वय. सासवांच्यात होणारे वादही काही वेळा पोरकट वाटले तरी करमणूक करणारे असल्यामुळे कंटाळवाणे वाटत नाहीत. जान्हवीने लग्न होऊनही घरी आल्यावर सर्वाची मने जिंकून घेतली आणि त्यांच्याशी गोड बोलून आपल्या सासवांना त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे भावले.

’ जुळून येती रेशीमगाठी : या मालिकेतील देसायांचे एकत्र कुटुंब आठवणीत राहील असेच होते. देसाई कुटुंबातील एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा समंजसपणा, मनमिळावूपणा, अर्चनाचा खटय़ाळपणा, त्यामुळे भावंडांत होणारी चेष्टामस्करी, नवरा बायकोतील अधूनमधून होणारे प्रेमळ वाद आणि नाना माईची सर्वाना सांभाळून घेण्याची वृत्ती यामुळे मालिका संपूच नये असे वाटत होते. देसाई वाडीला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून नाना- माई, अमित- विजया, आदित्य- मेघना, अर्चना- सतीश यानी सादर केलेले नाटय़प्रवेश यामुळे मालिका पद्धतशीरपणे वाढविण्यासाठी घातलेले काही उपकथानके घातलेली असूनही मालिकेच्या शेवटपर्यंत कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण राखण्यात मालिकेचे यश होते.

’ नांदा सौख्यभरे : झी मराठीवरील या मालिकेतील देशपांडे यांच्या एकत्र कुटुंबातील एकोपा मनाला मोहवून गेला. कुटुंबातील जाणती आजी तिची आज्ञाधारक दोन मुले वसंतराव व हेमंतराव यांच्यातील तसेच जावा- जावातील  एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, स्वानंदी व तिच्या बहिणी यांना वडील मंडळींसमोर आपले विचार मांडण्याची मुभा या साऱ्या गोष्टी ललिताच्या घरच्या कारस्थानी वातावरणासमोर अगदी उठून दिसले.

’ माझे मन तुझे झाले : ही मालिका ‘कलर्स मराठी’वरून प्रक्षेपित झाली होती. तिची कथा अनेक वळणे घेत पुढे जात होती तरी देसाई कुटुंबातील एकोपा अभंग होता. आपापसात अधूनमधून छोटे मतभेद असत तरी ते दीर्घकाळ कधीच टिकले नाहीत. कोणत्याही गोष्टीचा निर्णय सर्वाच्या संमतीनेच घेतला जाई. मग झोपडपट्टीतला मुलगा सुधारण्यासाठी शेखरने घरात आणलेला असो किंवा बिहारी भैयाला पत्नीसह शुभ्राचे घरात जागा दिलेली असो, किंवा मोठय़ा विधवा वहिनीच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव असो, सर्वाचे एकमतच असे. मालिकेतील संवादही तसेच खेळीमेळीचे होते थोडक्यात आई- बाबा, भाऊ- भाऊ आणि जावा जावा यांच्यातील एकोपा टिकविण्यात मालिकेचे यश होते.

’ अस्सं सासर सुरेख बाई :  ही मालिकाही कलर्स मराठी चॅनलवर चालू आहे. या मालिकेचा नायक यश महाजन याचे कुटुंब आवडावे असेच आहे. विशेषत: यशची आई व काकी यांचा समंजस एकोपा, यशच्या दोन्ही बहिणींचा आज्ञाधारकपणा आणि या सर्वाना कौटुंबिक मतभेदाच्या वेळी शांतपणे सांभाळून घेणारा यश. तसेच काहीसुद्धा काम न करता फक्त ज्योतिष्यावर विश्वास ठेवून भविष्य वर्तवीत राहणारे यशचे काका, आणि त्यांच्या तोंडी घातलेले व लक्षात रहाण्यासारखे वाक्य ‘आहे ना हरी, मग डोन्ट वरी’ असे हे नमुनेदार एकत्र कुटुंब मालिकेची शान वाढवीत आहे.

थोडक्यात, या सर्व मालिकेतील अशी गोजिरवाणी एकत्र कुटुंबे विभक्त राहणाऱ्या नव्या पिढीला नावीन्यपूर्ण म्हणून त्यांची अपूर्वाई वाटते आणि एकाकाळी एकत्र कुटुंबात वावरलेल्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ मंडळींच्या आठवणीना उजाळा देतात.

काही मालिकांतील कार्यालये

’ का रे दुरावा :  या मालिकेत अविनाश सरांनी चालविलेल्या पर्यटन कंपनीचे कार्यालय मनोरंजक होते. कारण आऊ आणि अविनाश सर नवनवे ‘प्रॉजेक्ट’ आपल्या कर्मचाऱ्यांपुढे ठेवत, त्यांनी कसून काम करावे म्हणून आकर्षक योजनाही आखत. पण हे कर्मचारी मात्र कार्यालयात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपापसात सतत गप्पा मारताना दिसत. त्यामुळे ही मंडळी आपले नेमून दिलेले काम तरी केव्हा करत हा प्रश्न पडायचा. तसेच ती रजनी नेहमी आदितीवर कमेंटस करायची आणि आदिती आपले काम थांबवून तिच्याकडे पाहत त्या कमेंट्स ऐकायची. म्हणूनच नवरे अधूनमधून ‘गप्पा पुरे आता काम करा काम’ असा समज सर्वाना देत. किंचित अवास्तव वाटणारे पण रंजन करणारे असे या कार्यालातील वातावरण होते.

’ अस्सं सासर सुरेख बाई : या मालिकेतील पृथ्वी कंपनीतील कार्यालयात विभा मॅडम कडक बॉस आणि पुढे बॉस होणारी तिची बहीण जुही कंपनीचे एकूण काम शिकण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे बाहेर बसणारी पण स्वभावाने नम्र, मनमिळावू सहृदय, इतरांच्या समस्या जाणून घेणारी व त्यांना मदत करणारी आणि यश महाजनवर नकळत प्रेम करणारी म्हणून मालिकेची नायिका. त्यामुळे बाहेरचे सर्वच कर्मचारी एकमेकांशी जिव्हाळ्याने वागताना दिसतात. तसेच ‘का रे दुरावा’प्रमाणे डायलॉगबाजी न करता आपले काम करताना दिसतात. जुही व यशचे प्रेम जुळावे असे बाकीच्या सर्वाना वाटते त्याबद्दल एकमेकाना खाणखुणा करून बोलतात. टॉप बॉसने कंपनीत गणेशोत्सव असा संकेत देताच यश व जुही पुढाकार घेतात व बाकीचे आनंदाने साथ देतात. दुपारी एकत्र जेवायला बसतात आणि यशच्या आईने दिलेल्या डब्यातील पदार्थ आवडीने ‘शेअर’ करतात. विभा मॅडमने यशला आत बोलावले की सगळे अस्वस्थ होतात व तो बाहेर आल्यावर आत काय झाले ते जाणण्यासाठी उत्सुक असतात. असे आहे पृथ्वी कंपनीच्या कार्यालयातील वातावरण कधी गंभीर तर कधी खेळकर.

अचानक गायब होणारे कलाकार

‘होणार सून’मधील श्रीचे बाबा सुरुवातीला अमेरिकेहून आलेले आणि गोखले कु टुंबात कायमचे राहतील असे वाटले होते. पण पुन्हा त्यांना अमेरिकेला जावे लागले ते कायमचे. श्रीची छोटी आई (लीना भागवत) दुसरीकडे कोठे सामाजिक कार्य करण्यासाठी गेली. तिचे या मालिकेत नंतर बराच काळ दर्शन झालेच नाही.

‘जुळून येती रेशीम गाठी’मधील मोठी सून विजया तिची आई फार आजारी आहे म्हणून तिच्या माहेरी गेली आणि तिनेच लिहिलेली ‘एलिझाबेथ एकादशी’ मार्गाला लागल्यावर या मालिकेत परत आली.

हल्ली मालिकेतील बरेचसे कलाकार नाटकात काम करताना दिसतात. त्यामुळे मालिकेतून गायब होण्याचे हेही एक कारण असू शकेल.

‘होणार सून’ ची घोडदौड

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेचे ५०० भाग पूर्ण केल्याबद्दल दूरदर्शनच्या ‘झी मराठी’च्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये या मालिकेचा कौतुक सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर मालिका ज्या पद्धतीने रेंगाळत गेली ते पाहणे मनोरंजक ठरेल. यातील पिंटय़ाच्या लग्नाचा घोळ सर्वात मोठा. त्यासाठी जान्हवी व श्री, जान्हवीचे आई व बाबा श्रीच्या घरचे महिला मंडळ यांच्यामध्ये लग्नापूर्वी व लग्नानंतर वारंवार होणाऱ्या चर्चा मालिका रेंगाळण्यास कारणीभूत ठरल्या. शेवटी एकदाचे लग्न पार पडले (पिंटय़ाच्या आईला- कलावती बाईला न कळविता) मग नवदाम्पत्याच्या गृहप्रवेशावेळी नव्या नवरीला- हात धरून घराबाहेर काढून कलावती बाईने चाळीत केलेला तमाशा. त्यानंतर पिंटय़ाच्या बायकोचे जान्हवीच्या घरी वास्तव्य असणे व ते कलाबाईना अचानक कळल्यावर त्यांचा जान्हवीला जाब विचारण्याचा तमाशा. यावेळी एक गोष्ट आवडली म्हणजे इतके दिवस गुळमुळीतपणे वागणारी व बोलणारी जान्हवी तिच्या आईला परखडपणे तिचे दोष दाखवून तिला सुनावते. नंतर कलाबाई पिंटय़ा व त्याचे वडील आपल्याला एकटे टाकून जातील या भीतीने त्यांच्या सर्व अटी मान्य करून पिंटय़ाच्या बायकोची सर्व चाळकऱ्यांसमोर क्षमा मागून तिला सन्मानाने घरात घेते. या सर्व घोळासाठी बरेच भाग खर्ची पडले होते आणि मग सरूमावशी व तिने पूर्वी झिडकारलेला नवरा पप्पू तिला आवडू लागला, आणि त्यांच्या लग्नासंबंधी चर्चासत्र सुरू झाले. शिवाय जान्हवीचे बाळंतपण लांबत गेले ते वेगळेच.

आठवा महिना लागला तरी जान्हवी गरोदर नसल्याप्रमाणेच धावपळ करताना दिसत राहिली. त्यामुळे सोशल मीडियावर विनोदांना ऊत आला होता.

अशा या काही गमती काही मराठी मालिकांतील!
रामचंद्र नाडकर्णी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader