अश्विन शुक्ल प्रतिपदेला आदिशक्ती, आदिमाया भवानी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. मानवी जीवन पाप-पुण्य, चांगले वाईट, अनुकूल-प्रतिकूल इत्यादि द्वंद्वांनी व्यापलेले असते. यातील इष्ट ते स्वीकारणे आणि अनिष्ट ते त्यागणे, टाळणे हेच हितकारी असते.  मनुष्याच्या ठायी असणाऱ्या देहरूपी ‘मी’च्या अहंकारामुळेच तो प्रवाहपतित होतो. त्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच आपल्या पूर्वसूरींनी सणवार, व्रतवैकल्यांची योजना मोठय़ा चतुराईने करून ठेवली आहे. नवरात्रोत्सवात नऊ  दिवस शरीराने आणि मनाने उपवास करून म्हणजे आदिशक्तीच्या समीप राहून तिला ‘तू आमच्यातील कुटिलता, पापवृत्ती आणि दुर्गुण दूर कर’ अशी प्रार्थना करायची असते. षड्रिपूंच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वत: अशांत राहतात व इतरांनाही अशांत बनवून सामाजिक सौहार्द बिघडवतात. निदान नवरात्रोत्सवात तरी अशा व्यक्तींपासून दूर राहणे म्हणजे उपवास करणे होय. देवीसमोर हात जोडून नमस्कार करताना उच्चारलेले मंत्र किंवा शब्द हे केवळ कर्मकांड नसून मन अहंकारापासून मुक्त होण्यासाठी केलेले समर्पण असते. उत्सव कंटाळवाने होऊ  नयेत म्हणून त्यात सामूहिक नृत्य-गायनाची योजना केलेली असते. गरबा, रास-दांडियाकडे त्याच नजरेतून बघायला हवे. त्याच्या अती आहारी गेल्यास नवरात्रोत्सवाचा हेतूच हरवेल. नवरात्रोत्सव हा भवानी मातेच्या शक्तीचं गुणगान करण्यासाठी, धरतीमातेचं सृजन साजरं करण्यासाठी असतो.

गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियाला ‘महाइव्हेंट’चं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे तो तसा व्यावसायिक पद्धतीने ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. गरब्याचे क्लासेस, वर्कशॉप्स चालवले जातात. गरबा प्रायोजित केले जातात. नवरात्री रसिल्या-रंगिल्या करण्यासाठी आटापिटा केला जातो. सण-उत्सवाचे स्वरूप कालानुरूप बदलत जाणे अपरिहार्य असले तरी त्यांचे सध्याचे हिडीस सादरीकरण पाहून समाजस्वास्थ्याची चिंता वाटते. एकदा व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले की त्या ठिकाणी मांगल्याला, आत्मिक-आध्यात्मिक ओलाव्याला थारा नसतो. नफा-नुकसानीचाच विचार केला जातो.

गरबा-रास-दांडियामध्ये गद्धेपंचेविशीतील तरुणाई फार मोठय़ा संख्येने सहभागी होत असल्यामुळे चिंता अधिकच वाढते. आई-वडिलांचा विरोध झुगारून नटूनथटून दांडिया खेळायला बाहेर पडलेली तरुणाई धमाल मस्ती करायला आसुसलेली असते. त्यांना कवेत घेण्यासाठी बाजारही आसुसलेलाच असतो. आपल्या लेकरांवर आपला पूर्ण विश्वास असला तरी त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीची खात्री कोण देणार? कारण गरबा खेळणारी प्रत्येक तरुणी ही कृष्णाची गोपी नसते आणि प्रत्येक तरुण हा कृष्ण नसतो. कृष्ण, गोपी, रासक्रीडा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नसणारे अनेक दु:शासन तिथे वावरत असतात. गरबा जसा प्रायोजित केला जातो तसे दु:शासनही प्रायोजित केले जात असण्याची दाट शक्यता आहे. गरब्याच्या बाजारात तारुण्य विकणारे, विकत घेणारे, ओरबाडणारे येतच नसतील असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. आजच्या भोगवादी-चंगळवादी जीवनशैलीत काहीही विकले-खरीदले जाऊ  शकते. म्हणून घरातून बाहेर पडलेली लेकरं घरटय़ात पुन्हा परत येईपर्यंत जन्मदात्यांचा जीव आत-बाहेर होत राहतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकी आणि भ्रामक समजुतींनाच पुरोगामित्वाची प्रतिष्ठा लाभल्यामुळे माता-पिता आपल्या लेकरांना हे करा, ते करू नका, असं सांगायला धजावत नाहीत. सांगायचा प्रयत्न केला तर, ‘जग कुठे चालले आहे; तुम्ही कुठे आहात?’ अशी अवहेलना पोटच्या पोरांकडून सहन करावी लागते. जग कुठेही जात असले तरी आपली मुलं भरकटू नयेत, असे वाटणे स्वाभाविक आहे. आजच्या मध्यमवयीन आई-बाबांचे दुर्दैव असे की त्यांनी त्यांच्या तारुण्यात चांगल्या वर्तणुकीसाठी त्यांच्या आई-बाबांच्या थपडा खाल्ल्या आणि आता त्यांची पोरंपोरी ‘तुमचे विचार जुनाट झाले’ म्हणून त्यांना थपडा मारत आहेत. अशाही परिस्थितीत लेकरांसाठी त्यांचा जीव तुटतोच, परंतु ठरावीक मर्यादेपलीकडे ते काही करू शकत नाहीत.

एकटय़ा मायानगरी मुंबईत शेकडो ठिकाणी गरबा नृत्य होत असतात आणि त्यात हजारोंच्या संख्येने तरुणाई धुंद-बेधुंद होऊन नाचत असते. उघडी मैदाने, फाइव्ह स्टार हॉटेल्स, क्लब्ज, गल्ली-मोहल्ले ओसंडून वाहत असतात. गरबा ड्रेस, खोटे दागिने, सौंदर्य प्रसाधने आणि आणखी बरेच काही मुंबईच्या गरबा इंडस्ट्रीत मिळते. नवरात्रोत्सवातून घरी न परतणाऱ्या अविवाहित तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात हा आकडा काही लाखांत असल्याचे बोलले जाते. गरबा खेळायला गेलेली मुलगी घरी परत आली नाही या धक्क्यानेच तिचे कुटुंबीय खचून जातात. चारचौघात उघडपणे वाच्यता करू शकत नाहीत. हिंमत करून तक्रार नोंदवायला गेले तर पाहणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या कुत्सित नजरा ‘तुम्हाला तुमच्या मुली सांभाळता येत नाहीत?’ असा खोचक प्रश्न विचारत राहतात. सज्ञान मुलींच्या आई-बापांची अवस्था तर अजूनच केविलवाणी असते. ज्या आई-बाबांच्या तरुण अविवाहित मुली गायब झाल्या असतील, त्या परत येऊ  शकत नसतील, यायला तयार नसतील त्यांच्या दु:खाची इतरांना कल्पनाही करता येणार नाही.

लेकरांनो, सारं जग तुम्हाला उघडं करायला टपलेले असताना , माझा बाबा- माझी छकुली म्हणून तुमच्यावर मायेचं पांघरूण फक्त तुमचे आई-वडीलच घालू शकतात. लाज सोडली की जगात काहीही मिळते. मिळत नाहीत फक्त आई-बाबा आणि त्यांची माया-ममता. ते जवळ असेपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आणि त्यांच्या प्रेमाला पारखं झाल्यानंतर तुमच्यावर खरं प्रेम जगात कुणी करत नाही. म्हणून म्हणतो, ‘लेकरांनो, जरा जपून!’
सोमनाथ देशमाने – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader