अश्विन शुक्ल प्रतिपदेला आदिशक्ती, आदिमाया भवानी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. मानवी जीवन पाप-पुण्य, चांगले वाईट, अनुकूल-प्रतिकूल इत्यादि द्वंद्वांनी व्यापलेले असते. यातील इष्ट ते स्वीकारणे आणि अनिष्ट ते त्यागणे, टाळणे हेच हितकारी असते. मनुष्याच्या ठायी असणाऱ्या देहरूपी ‘मी’च्या अहंकारामुळेच तो प्रवाहपतित होतो. त्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच आपल्या पूर्वसूरींनी सणवार, व्रतवैकल्यांची योजना मोठय़ा चतुराईने करून ठेवली आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस शरीराने आणि मनाने उपवास करून म्हणजे आदिशक्तीच्या समीप राहून तिला ‘तू आमच्यातील कुटिलता, पापवृत्ती आणि दुर्गुण दूर कर’ अशी प्रार्थना करायची असते. षड्रिपूंच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वत: अशांत राहतात व इतरांनाही अशांत बनवून सामाजिक सौहार्द बिघडवतात. निदान नवरात्रोत्सवात तरी अशा व्यक्तींपासून दूर राहणे म्हणजे उपवास करणे होय. देवीसमोर हात जोडून नमस्कार करताना उच्चारलेले मंत्र किंवा शब्द हे केवळ कर्मकांड नसून मन अहंकारापासून मुक्त होण्यासाठी केलेले समर्पण असते. उत्सव कंटाळवाने होऊ नयेत म्हणून त्यात सामूहिक नृत्य-गायनाची योजना केलेली असते. गरबा, रास-दांडियाकडे त्याच नजरेतून बघायला हवे. त्याच्या अती आहारी गेल्यास नवरात्रोत्सवाचा हेतूच हरवेल. नवरात्रोत्सव हा भवानी मातेच्या शक्तीचं गुणगान करण्यासाठी, धरतीमातेचं सृजन साजरं करण्यासाठी असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा