छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येने मराठय़ांच्या स्वातंत्र्य-युद्धाचे पहिले पर्व संपले व दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. हे दुसरे पर्व अनेक दृष्टींनी वैशिष्टय़पूर्ण ठरले. मराठय़ांचा एक राजा मारला गेला. दुसरा राजा कर्नाटकात राहू लागला. छत्रपती संभाजी राजांची पत्नी म्हणजे मराठा राज्याची राणी व राजपुत्र (येसुबाई व शाहू) मोगलांचे कैदी बनले.
मराठय़ांचे गड, कोट, जंजिरे, प्रदेश भराभर मोगलांच्या हाती पडले आणि काही काळ असे वाटले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा राज्य संपले, नष्ट झाले. ज्यासाठी महाराजांनी अपरंपार द्रव्य आणि शक्ती वेचली. हजारो तरुण मराठय़ांचे बलिदान दिले, ते मराठय़ांचे स्वातंत्र्य नष्ट झाले, आणि मराठे पुन्हा गुलामीत पडले. पण ही भावना काही काळच पसरली. मराठय़ांनी लगेच स्वत:ला सावरले. छत्रपती संभाजी राजांच्या क्रूर हत्येने महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठा खवळून उठला व त्याने मिळेल त्या साधनानिशी मोगली शत्रूशी गनिमी काव्याने युद्ध चालू केले. राज्य नाही, राजा नाही, गडकोट नाहीत. मोठमोठय़ा फौजा नाहीत, खजिना नाही, राज्ययंत्रणा नाही, तरीही या महाराष्ट्रातील लोक औरंगजेब बादशहाशी लढत राहिले, ही गोष्ट त्या काळात अचंबा वाटावी अशी घडली.
मराठे का लढत राहिले? कारण मराठय़ांची अस्मिता व स्वातंत्र्यता महाराणी ताराबाई यांच्या रूपाने प्रकट झाली होती.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी २५ वर्षे वय असलेल्या राणी ताराबाई यांनी आपला पुत्र दुसरा शिवाजी यास मराठय़ांचा छत्रपती म्हणून गादीवर बसवले व मुघलांशी लढा सुरू ठेवला. राजारामाच्या मृत्यूनंतर गादीचा वारस शाहू आपल्याच ताब्यात असल्याने मराठय़ांचे राज्य बुडाले, अशी औरंगजेब याची समजूत होती. पण या समजुतीचे उत्तर आपल्या शौर्य व पराक्रमातून महाराणी ताराबाई यांनी देऊन सिद्ध केले.
महाराष्ट्रात मुघली फौजांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर धुडगुस घालणे सुरू केले. परंतु महाराणी ताराबाई यांनी धनाजी, बहिर्जी, राणोजी, हनमंतराव, नेताजी या आपल्या सरदारांच्या साहाय्याने १७०२ पासून आक्रमक पवित्रा घेऊन मुघलांच्या गुजरात, माळवा, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू या भागातही आपले सैन्य पाठवून मुघलांना सतावले. त्यामुळे औरंगजेबाला आपल्या साम्राज्याचे रक्षण कसे करावे हे कळेनासे झाले.
ताराबाईंचा असा आक्रमक पवित्रा मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने डिसेंबर १७०३ पासून पुन्हा मराठय़ांविरुद्ध मोहीम सुरू केली व त्याने सिंहगड, तोरणा, राजगड जिंकून घेतले. इकडे कृष्णा व भीमा नदीच्या दुआबात वाकिणखेड येथील बेरड जमातीने मुघलांविरुद्ध बंड उभारले. ते मोडून काढण्यासाठी औरंगजेब गेला असताना ताराबाईने लोहगड, सिंहगड व राजमाची हे किल्ले परत जिंकून घेतले. वाकिणखेडचा किल्ला जिंकून (२७ एप्रिल १७०५) औरंगजेब २० जानेवारी १७०६ रोजी अहमदनगरला आला. यावेळी तो आजारपणामुळे हताश झाला होता. अहमदनगरला त्याचा मुक्काम असताना धनाजी, नेमाजी, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर, दमाजी थोरात या मराठी सेनापतींनी बादशाहाच्या छावणीवर हल्ला केला व मुघलांची परिस्थिती अत्यंत बिकट करून टाकली. अहमदनगर मुक्कामीच २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. मराठय़ांच्या स्वातंत्र्ययुद्धाचीही अखेर औरंगजेबाच्या मृत्यूनेच झाली. महाराणी ताराबाई व औरंगजेबात सात वर्षे संघर्ष झाला, पण त्यात त्याला हार पत्कारावी लागली.
केवळ २४-२५ वर्षांची एक स्त्री औरंगजेबासारख्या मुत्सद्दी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग सात वर्षे त्याच्याशी लढा देते, त्या लढय़ात ती अजिंक्य राहते व शेवटी मोगल बादशाह औरंगजेबाची कबर तिच्या कारकिर्दीत खणली जाते, ही घटनाच तिच्या कर्तृत्वाची साक्ष देते. महाराणी ताराबाईच्या कर्तबगारीचे मूल्यमापन करताना कवी देवदत्त म्हणतो,
‘‘दिल्ली झाली दीनवाणी
दिल्लीशाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी
भद्रकाली कोपली॥
रणरंगी क्रुद्ध झाली
प्रलयाची वेळ आली
मुघल हो सांभाळा॥
अशा थोर पराक्रमी, स्वराज्य रक्षक , झुंजार, रणरागिणी महाराणी ताराबाई यांना मानाचा मुजरा॥
साईप्रसाद कुंभकर्ण – response.lokprabha@expressindia.com