ट्रिंग ट्रिंग ..व्हॉट्सअ‍ॅपने इशारा द्यायचे काम केले, पुढचे काम आपले, काय कुणी पाठवलंय, त्याच नवीन उत्सुकतेने पाहायचे, असतो कुणाच्या तरी सुमार डोक्यातून उगवलेला टुकार विनोद, काय तर म्हणे, राज ठाकरेच्या घरी लांबच लांब रांग, कशाला तर जसा त्याच्या बायकोला कुत्रा चावला तसा आपापल्या बायकांना चावावा यासाठी.’

मागे एकदा एका झूमध्ये वाघाने एका माणसाला मारले, तर या प्रसंगाचा आधार घेऊन लगेच काय विनोद तर सगळ्या पुरुषांची बायकांना घेऊन झूमध्ये गर्दी. आपण त्यावर हसतो, तो शेअर करतो, झालंच तर फॉरवर्ड करतो. तेही फारसा विचार न करता. हा विनोद खरंच काही सुचवणारा, काही देणारा आहे का?

व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप निर्माण झाल्यापासून तमाम पुरुष जात काय करत असेल तर आपली बायकांना नावं ठेवायची हौस सोशल मीडियाचा वापर करून भागवते. जे जे म्हणून असे बायकांना कमी लेखणारे विनोद असतात, त्या पुरुषांना खरंच आपली बायको नकोशी झाली आहे काय, असा प्रश्न पडावा एवढं या विनोदांचं प्रमाण दिसतं.

स्त्रियांना मानाने वागविणारी संस्कृती आपली आहे असं आपण अभिमानाने सांगतो खरं, पण  प्रत्यक्षात मात्र कुणी तसं वागताना दिसत नाही.  स्त्री ही एक व्यक्ती आहे, ती विनोदासाठी वापरावी अशी वस्तू नव्हे हे ओरडून सांगावं असं वाटू लागलंय. बायका म्हणजे बडबड करणार, बायका म्हणजे आपापसात भांडणार, बायका म्हणजे वेळ काढत शॉपिंग करणार, बायका म्हणजे नवऱ्याच्या मागे लागणार अशा एक ना अनेक गोष्टी बायकांना चिकटविल्या गेल्या आहेत. सीरियल असो की नाटक असो, त्यातील स्त्री व्यक्तिरेखा या विनोदाचा विषय. काय तर म्हणे जान्हवीला गॅस झाले असताना गरोदर आहे असे सांगणाऱ्या डॉक्टरला अटक.  जितकी ती सीरियल टुकार तितकेच त्यावरचे विनोदही.

विनोद हीसुद्धा एक कला आहे. दुसऱ्याच्या व्यंगावर विनोद करणे याला फारशी अक्कल लागत नाही. तसं तर दुसऱ्याला हसायला अक्कल लागतच नाही. पण एखाद्याला मनापासून हसवायला, त्याच्या उदासीतून बाहेर आणायला मात्र ती लागते. पण हे असं? ती अक्कल अशी वापरून?  छे, हा तर अकलेचा दुरुपयोग झाला. आहे तुमच्याकडे मुबलक म्हणून काय कुठेही वापरावी? विनोद हा नर्मविनोद असावा. ज्यात कुणाला न दुखावता एखादी गोष्ट सुचविली जावी. त्यात कुणाचा अनादर नसावा. चेष्टा नसावी. गंमत आणि चेष्टा यात फरक असतो, फार पुसट असते ती रेषा. विनोदात अश्लीलपणा तर नसावाच नसावा. असा विनोद असावा की त्यात तुमची बुद्धीची चुणूक दिसावी, पु.लं.सारखी. (कोण पु.लं.? असा प्रश्न जर पडला तर हातातील मोबाइल फेकून देऊन पुस्तक वाचण्यास सुरुवात करावी ही विनंती)

बायका एवढय़ा ह्य असतील तर करू नका बरं लग्न, बघू जमतंय का? स्त्रीशिवाय समाज चालवून बघा; माया, प्रेम हे सगळ्यांना आवश्यक आहे, ते स्त्रीजवळ नक्कीच असते आणि तिच्याकडून तेच अपेक्षित असते, मग त्याचा आदर करायला शिका ना, की सहज मिळतं त्याची  किंमत नाही?

व्हॉट्सअ‍ॅप हे एक अ‍ॅप म्हणजेच अ‍ॅप्लिकेशन आहे ज्याचा उपयोग एखादी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी होतो. एखाद्याला अचानक एखादी गोष्ट आवश्यक असेल तर ती उपलब्ध करून देण्यासाठी. उदा.  एखाद्या तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईक यांना ठरावीक रक्तगटाचे रक्त पाहिजे आहे आणि ते मिळत नाहीये तर ती गरज पाठवा या व्हॉट्सअ‍ॅपवर, तुम्ही एखादा नवीन प्रकल्प चालू केलाय, त्याचा अनेक गरजूंना उपयोग होण्यासारखा आहे तर टाका या व्हॉट्सअ‍ॅपवर, जरूर त्याचा चांगला उपयोग होईल. पण. पण म्हणून त्यापायी सतत कामातलं निम्मं लक्ष त्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये, असं कसं करून चालेल? या सगळ्यात वेळ किती वाया जातो, शिवाय मुलांची एकाग्रता कमी होते ते वेगळंच. तोच वेळ सत्कारणी लावायचा ठरवला तर कितीतरी विधायक कामे घडू शकतात.  मला तर वाटू लागलंय याच्या वापराला काही वयोमर्यादा बंधनकारक असावी.

आज जगात उपलब्धी खूप आहेत, त्या चांगल्याही आहेत, पण त्याचा चांगल्यासाठीच वापर केला तर, न पेक्षा त्या मानवी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतील एवढं नक्की!
मेघना फडके – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader