मे -जून २०१४ मधली गोष्टी. ई टीव्ही मराठीवर संध्याकाळी साडेसहा वाजता एक मालिका ‘एक संधी अजूनही प्रक्षेपित केली जात असे. ह्या मालिकद्वारे पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात कधी तरी असं वादळ उठत असे व ती दोघंही टोकाची भूमिका घेत. घटस्फोटापर्यंत त्यांची नाती दुरावत असत- अशा प्रसंगी काऊंसेलर, वकील, मनोचिकित्सक, समुपदेशक उत्तम सल्ले देऊन त्यावर मिमांसा करून उपाय सांगत असत व ती कुटुंबं पुन: एकत्र येत असत.
ह्य सर्वातून एका दुख:दायी गोष्टीची जाणीव ही झाली की २१ व्या शतकात काही शिक्षित पुरुषांची भूमिका निर्दयीपणाची आढळते. बहुतेक नवरे बायकोला ‘चालती हो माझ्या घरातून’ हा आदेश देतात व शेवटी स्त्रीलाच घर सोडावे लागते. प्रश्न हा की घर नेहमी स्त्रीलाच का सोडावे लागते?
साहित्य समाजाचा आरसा आहे. असे म्हटले जाते. कथा, कादंबऱ्या, चित्रपट मालिका असोत घर स्त्रीलाच सोडावे लागते किंवा तिला घरातून काढून देतात. अगदी रामायण काळापासूनदेखील सीतेला प्रभू रामचंद्राने धोक्याचा आक्षेप घेण्यावरून सोडले होते अशी आख्यायिका आहे. पण नंतरच्याही काळात स्त्रीमध्ये असुरक्षिततेची भावना विद्यमान असलेली जाणवते. मूल न झालेली स्त्री असो किंवा हुंडा न आणणारी सून असो तिला बाहेरची वाटच दाखविली जाते. मूल न झालेल्या स्त्रीला सारखी भीती असते की नवरा दुसरं लग्न करतो की काय? तिला घरातून हाकलून लावतो की काय? नवऱ्याच्या मनासारखे नाही वागले तर कधी घरातून काढेल ह्याचा विश्वास नाही. जर ती मुकाटय़ानं सर्व हालअपेष्टा सहन करेल तरी देवी म्हणून घरात राहू शकते.
माझ्या ओळखीतली एक नर्स. लग्नाच्या आधी कॅम्पस्मध्ये क्वॉर्टर मिळवलं होतं वडील सेवानिवृत्त, लहान भावंडं होती. लग्न झालं. नवरा सारखा मागे ससेमिरा लावायचा. तुझ्या वडिलांना घर सोडायला सांग, हे माझं घर आहे. शेवटी तिने रडत रडत आईला सांगितलं की, ‘‘तुम्ही घर सोडा नाही तर माझा नवरा मला घरातून काढून टाकेल.’’ शिक्षित स्त्रीला ही असुरक्षेची भावना असावी नवलच, आहे नाही का?
‘ही कार माझी आहे’ ‘हे घर माझं आहे’, हा टी.व्ही, लॅपटॉप, फ्रीज, कंप्युटर माझा आहे’ मी विकीन किंवा ठेवीन. तुला काय करायचं आहे? घराची रजिस्ट्री जरी पत्नीच्या नावे असली तरी घर विकताना तिची सही मात्र घेतली जाते. मर्जी नाही विचारली जात. तसंच पैतृक संपत्ती विकताना वाटाघाटी करताना घरातले पुरुषच निर्णय घेतात. घरातल्या बायकांना दूरच राहण्याची तंबी दिली जाते. एवढंच काय जर नातवंडांना सुनेने मारलं किंवा दटावलं तरी तिला रागे भरलं जातं व म्हटलं जातं की, ‘‘ही आमची लेकरं आहेत, तू काही माहेरून आणली नाहीस.’’ अर्थात घरावर किंवा घरातल्या वस्तूंवर तिचा हक्क नाही असं दिसून येतं.
दरवर्षी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. त्यांच्या अधिकारासाठी, हक्कासाठी लढे लढले जातात. महिला सशक्तीकरण ह्या विषयावर भाष्य केलं जातं. वादविवाद केले जातात. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी हरियाणाच्या हिसार ह्या ठिकाणी ‘बालिका पढाओ बालिका बचाओ’ मोहीम सुरू केली. तरी ते शतक केव्हा येईल जेव्हा खऱ्या अर्थाने ‘ती’ ला ‘ती’ चं स्वत:च्या हक्काचं घर मिळेल. तो दिवस खरा महिला जागतिकीकरणाचा ठरेल.
संध्या बायवार – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा