शब्द हे आपल्याला जे काही म्हणायचं असतं ते व्यक्त करण्याचं साधन. एक प्रकारे शस्त्रच. हे शस्त्र आपण इतकं बिनदिक्कतपणे वापरत असतो की, त्यातून अनेकदा अर्थ व्यक्त होण्याऐवजी विनोदच निर्माण होतो.
आता हेच बघा ना, खूपदा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा ‘‘काय म्हणतोस’’ अथवा ‘‘काय म्हणतेस’’ म्हणतात. समोरचा बिचारा कधी काहीच म्हणत नसतो.. सुरुवातच जर अशी मनोरंजक असेल तर पुढच्या संभाषणाचं काय सांगावं..
नाटय़गृहात तुम्ही कुटुंबासमवेत एखादं छानसं पाहण्यासाठी गेला आहात. तुम्हाला तुमचा मित्र, नातेवाईक, मैत्रीण असं कुणीही तुम्हाला पाहतात आणि प्रश्न येतो ‘‘अरे, इथे काय करतोयस?’’ ना तुम्ही तिथला तिकीट तपासणारा, ना तिथला प्रेक्षकांना त्यांचे आसन दाखविणारा, ना त्या नाटकातील कलाकार, त्यामुळे अर्थातच तुम्ही नाटक- कार्यक्रम पाहण्यासाठीच आले असणार, तरीही हा असा प्रश्न?
असाच एक दुसरा प्रसंग. तुम्ही सलूनमध्ये तुमचा केस कापण्याचा क्रम येईपर्यंत तेथेच पडलेली वर्तमानपत्रे चाळत आहात. तुमचा एखादा मित्र तेथे येतो व विचारतो, ‘‘काय केस कापायला वाटतं?’’
‘‘काय ऑफिसमधून आलास का?’’ नेहमीच्या वेळी कार्यालयातून – कामावरून घरी आल्यावर कोणी पाहुणे आले असतील तर हा प्रश्न हमखास विचारला जातो.
मी एकदा एका नातेवाईकाकडे गेलो होतो. एकटय़ाला बघूनही मला विचारले गेले की, ‘‘काय तू एकटाच आलास?’’ गप्पांमध्ये पुढे मला विचारले गेले, ‘‘बायको काय म्हणते? मुलगा काय म्हणतो? ’’ मी भाबडेपणे विचारले की, ते तिघे काही म्हणणार होते का? यावर ते हसले आणि म्हणाले, ‘‘ते कसे आहेत?’’
‘‘अरे वा घेताय वाटतं?’’ घेताय म्हटल्यावर तुम्हाला दारू व त्यासारखे तत्सम पेय वगैरे घेताय असे वाटले असेल, पण तसं काही नाही. ठिकाण-एखादे मोठ्ठे दूरचित्रवाणी संच विकत मिळण्याचे दुकान. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दूरचित्रवाणी संच पाहात आहात. तेवढय़ात मागून हा प्रश्न येतो, अहो, मग तिथे काय भाजी घेणार?
आता जरा दूरध्वनी संभाषणातील काही गमतीजमती.
‘‘कोण बोलतोय?’’ अनेक जण स्वत: दुसऱ्याला दूरध्वनी करतात व समोरच्याने उचलल्यावर उचलणाऱ्यालाच विचारतात की, ‘‘कोण बोलतोय?’’ अशा वेळी वाटते की, समोरच्या व्यक्तीला ओरडून सांगावे की, ‘‘अरे सद्गृहस्था, तू दूरध्वनी केला आहेस, तेव्हा अगोदर तू कोण बोलतोय हे सांग ना.’’
अशीच आणखी एक गम्मत ‘‘मी बोलतोय- मी बोलतेय’’ असे म्हणणाऱ्या व्यक्ती करीत असतात. या व्यक्तीदेखील स्वत: दूरध्वनी (म्हणजे लॅण्डलाइनवरून) करतात व समोरच्याने उचलल्यावर संभाषणाची सुरुवात ‘‘मी बोलतोय -मी बोलतेय’’ अशी करतात. आता लॅण्डलाइनच्या दूरध्वनी यंत्रावर समोरून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे चित्र आलेले असते का? मग आपण कसे ओळखायचे, की समोरची दूरध्वनी करणारी व्यक्ती कोण आहे ते? एखाद्याने भाबडेपणाने विचारले की आपण कोण बोलता, तर अनेकदा उत्तर यायचं की, काय मला ओळखत नाही? अथवा चल ओळख बघू.
‘‘काय करतोस’’ दूरध्वनी संभाषणामध्ये असा प्रश्नही अनेकांना विचारायची सवय असते. समोरच्याने काहीही उत्तर दिले तरी, प्रश्न विचारणाऱ्याला काहीच फरक पडत नसतो. तरीही अनेकांना हा एक गमतीदार पण वायफळ असा प्रश्न विचारायची सवय असते.
‘‘जेवण झालं का?’’ हासुद्धा असाच प्रश्न. संभाषण करणाऱ्या दोन्ही महिला असतील तर या प्रश्नाचं शेपूट अर्थातच बरंच वाढत जातं.
समजा तुम्ही नातेवाईकाच्या, मित्राच्या घरून, निघालात आणि तुम्ही तुमच्या घरी पोहोचल्यावर तुम्ही तुमच्या लॅण्डलाइनवरून त्यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाइल) वर फोन केलात अथवा त्यांनी तुमच्या लॅण्डलाइनवर फोन केला तरीही ‘‘काय पोहोचलास का?’’ हा प्रश्न विचारला जातो. लॅण्डलाइनवर संभाषण होत आहे याचा अर्थ घरी पोहोचल्यावरच लॅण्डलाइनवरून बोलणार. तरीही हा प्रश्न येतोच.
नेहमीची काही विनोदी वाक्ये :
– बघा ते नवरा-बायको दोघे जोडीने जाताहेत. (आता नवरा-बायको असे म्हटल्यावर परत दोघे म्हणण्याची काय गरज आहे?)
– माझा दिवस रोज सकाळी मॉर्निग वॉक घेतल्याशिवाय सुरू होत नाही. (आता मॉर्निग वॉक कोणी दुपारी, संध्याकाळी वा रात्री घेतो का?
– काल रात्रीच्या जागरणाने डोळ्यावर खूप झोप येतेय. (या एका छोटय़ाशा वाक्यात दोन गमतीशीर गोष्टी आहेत. पहिली म्हणजे जागरण हे नेहमी रात्रीचेच असते, दिवसा झोप न मिळणाऱ्याला जागरण म्हणतच नाहीत. दुसरी म्हणजे झोप ही नेहमीच डोळ्यावरच येते. झोप कधीही कानावर, नाकावर वगैरे आलेली कुणी कधी पाहिली किंवा अनुभवली नाही.)
– त्याने स्वत: आत्महत्या केली (आत्महत्या ही ती व्यक्ती स्वत:च करते, दुसऱ्या कोणी त्याला मदत केली तर तो खून ठरू शकतो.)
– स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले, स्वत:च्या कानांनी ऐकले.
( यातदेखील गंमतच आहे. एक तर स्वत:च्याच डोळ्यांनी पाहणार व स्वत:च्याच कानांनी ऐकणार. दुसरे म्हणजे डोळ्यांनीच पाहणार आणि कानांनीच ऐकणार.)
– त्या मागचा बॅकग्राऊंड तुला सांगतो. (मी पुढचा बॅकग्राऊंड कधीही ऐकला / पाहिला नाही.)
– मी डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन येतो. ( माझे सामान्यज्ञान असे सांगते की दवाखाना हा डॉक्टरांचाच असतो, मी टेलरचा दवाखाना किंवा सलूनवाल्याचा दवाखाना कधीच पाहिला नाही.)
-अगं तुला कळालं का, काकूंच्या सुनेला म्हणे दोन जुळ्या मुली झाल्या. (जुळे म्हणजे दोन. दोन जुळ्या म्हणजे चार झाल्या का?)
– माझं बॅडलकच खराब आहे. ( आता तुम्हीच सांगा कधी बॅडलक चांगलं असू शकतं का?)
ताजमहाल हे सगळ्या जगात वर्ल्डफेमस आहे. (जगात आणि परत वर्ल्ड?)
– मागचा इतिहास जेव्हा तू बघशील तेव्हा.. ( मी तर पुढचा इतिहास ना कधी पाहिला ना ऐकला. पण तरीही हे वाक्य तावातावाने काही जण बोलतात.)
आता थोडंसं शाळा, महाविद्यालयातील गमतीशीर वाक्यांबद्दल – शिक्षक विद्यार्थ्यांला – ए तू शेवटचा लास्ट बेंचर, चल उत्तर दे. (शेवटचा म्हणजेच लास्ट बेंचवरचा ना?)
चला आता तुम्ही गोलाकार वर्तुळ काढा. (चौकोनी अथवा त्रिकोणी वर्तुळ तुम्ही पाहिलं आहे?)
मुलांनो आता मी परत एकदा प्रश्न रिपीट करतो. (परत एकदा म्हटल्यावर रिपीट करतो हे म्हणण्याची काय गरज?)
काही जण पत्ता सांगताना एवढय़ा गमती करतात की त्यामुळे फारच छान करमणूक होते. अशीच एक व्यक्ती पत्ता सांगतेय, हे बघा असं स्ट्रेट सरळ जा. त्यानंतर तुम्ही डावीकडे वळा. (पण हे सांगताना ते उजव्या हाताने वळा असे दाखवतात). नंतर उजव्या हाताला एक गल्ली येईल. (या वेळेला ते डाव्या हाताचा वापर उजव्या हाताला गल्ली सांगताना करतात). हे सगळं डावं, उजवं हे सगळं तोंडी व हाताच्या खुणेनेच ऐकून पत्ता विचारणारा गोंधळून जातो.
सत्यजीत शाह – response.lokprabha@expressindia.com
बोलण्यातल्या विनोदाच्या ‘जागा’
शब्द हे आपल्याला जे काही म्हणायचं असतं ते व्यक्त करण्याचं साधन. एक प्रकारे शस्त्रच.
Written by दीपक मराठे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-09-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Witty talk