पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, अशा काही जणांपैकी एक म्हणजे अनंतराव काळे. त्यांचा परिचय-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पैलू पाडण्याचे काम अनेकांनी केलेले आहे. त्यातील मधुकरराव भागवत, लक्ष्मणराव इनामदार, केशवराव देशमुख, सर्वश्री गजेंद्रगडकर, चिपळूणकर, भगत आदींची थोडीफार तरी माहिती वृत्तपत्रे, साप्ताहिके, दूरदर्शन आदींवर येऊन गेली.
मोदीही या सर्वाप्रती अत्यंत कृतज्ञ आहेत, पण या सूचीत काही नावे राहिलेली आहेत, त्यांचाही अवश्य परिचय करून घेतला पाहिजे. त्यातील एक महत्त्वाचे व्यक्तित्व अनंत रामचंद्र तथा अनंतराव काळे.
अनंतराव काळे हे महाराष्ट्रात विस्मृत झालेले व्यक्तिमत्त्व आहे. एकदा वाहिनीवर त्यांचा ओझरता उल्लेख होता, त्यांचे कोकणातील घर दाखवले होते. एका वृत्तपत्रातही अगदी थोडीशी माहिती आली होती. त्यात म्हटले होते की पंतप्रधान झाल्यावर मोदी कृतज्ञता म्हणून अनंतरावांच्या उंडील (देवगड) येथील तसेच लक्ष्मणरावांच्या खटाव (सातारा) येथील घरांचे दर्शन घेणार आहेत.
मी स्वत: अनंतरावांना पाहिले होते नि त्यांच्याशी दोन मिनिटे बोललो होतो. एक घटना आठवते. १९६१ मध्ये मी कर्णावती (अहमदाबाद) कार्यालयात गेलो होतो. तिथे लक्ष्मणराव, भगत, अनंतराव काळे आदींना मी पाहिले. पूर्वी घरात खुंटय़ा असत त्याला कपडे, पिशव्या आदी अडकवत असत, तेव्हा खुंटी पाहुण्यांसाठी आहे असे काही तरी ते म्हणाले. ‘आताच माटे’ असा शब्द त्यांच्या तोंडी आला. ‘माटे’ म्हणजे करिता असा त्यांनीच मला अर्थ सांगितला. मोदींनी त्यांचे वर्णन कार्यनिष्ठ अनंतराव काळे असाच केला आहे.
मोदी सांगतात, गांधीजींचा कोकण दौरा होता. भव्य शामियाना, नेत्यांची वर्दळ नि गडबड. या वेळी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील) देवगड तालुक्यातील ‘उंडील’ गावच्या एका छोटय़ा ११ वर्षांच्या एका चुणचुणीत, हुशार, तेजस्वी मुलाला मुद्दामून बोलाविलेले होते. सभेनंतर त्याने इतक्या सुरेल आवाजात ‘वन्दे मातरम्’ इतके सुरेख म्हटले की गांधीजीही प्रभावित झाले. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलाविले, नाव, गाव विचारले. गांधीजींचं लक्ष त्या मुलाच्या हातातल्या सोन्याच्या कडय़ाकडे गेलं, नि त्याच वेळी गांधीजींच्या शेजारची एक व्यक्ती त्या मुलाला म्हणाली, ‘बाळ, देऊन टाक ते कडं बापूजींना!’ आणि खरोखरच त्या मुलानं ते कडं बापूजींना देऊन टाकलं आणि सर्व मंडळी चकित होऊन हे दृश्य पाहात असतानाच तो मुलगा गर्दीत दिसेनासा झाला. तो म्हणजेच अनंतराव काळे.
अनंतरावांचे वडील रामभाऊ यांची इच्छा होती की आपल्या गावात प्राथमिक शाळा हवी, पण शिक्षणाधिकारी अनुमती देईनात. त्यांनी रामभाऊंना अट घातली उंडील गावातील मुले पहिल्या इयत्तेत उत्तीर्ण झाली, तर शाळेचा विचार करू. या वेळी अनंता खारेपाटणच्या शाळेत सातवीत शिकत होता. छोटय़ा अनंताने आपल्या शिक्षणाचा त्याग केला आणि संपूर्ण वर्षभर उंडील गावातल्या लहान मुलांना शिकविले आणि सर्व मुले उत्तीर्ण झाली, उंडील गावाला शाळा मिळाली, पण अनंताला एका शैक्षणिक वर्षांचा त्याग करावा लागला होता.
शिक्षणानंतर महाराष्ट्रातील प्रख्यात कन्स्ट्रक्शन या कंपनीत ते नोकरीसाठी रुजू झाले. गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील काम चालू होते. त्यांची नोकरी चालू होती, पण लक्ष मात्र व्यक्तिनिर्माणाकडे होते. हळूहळू ते उत्तमपैकी गुजराती शिकले. पुलाचे काम संपले नि त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले. महाराष्ट्र सोडून ते गुजरातशी एकरूप झाले. नडियाद हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरले. अन्न, राहण्याची जागा आदी कसल्याही सोयी नसतानाही अनेक कष्ट करून त्यांनी स्वत:ला संघकार्यात झोकून दिले. पाहता पाहता कार्यकर्त्यांचा एक संच उभा राहिला.
एके दिवशी एका स्वयंसेवकाने त्यांना कोबी दिली. अनंतरावांना आनंद झाला, कारण त्या दिवशी पोळीची कणीक वाचली, नुसती कोबी उकडून त्यांनी ती खाल्ली आणि जे मिळाले त्यासाठी देवाचे आभार मानले. त्या स्वयंसेवकाला अनंतराव आपली भाजी स्वीकारतात याचा आनंद होत असे. तो प्रतिदिन त्यांना वेगवेगळी भाजी देऊ लागला, त्यामुळे अनंतरावांचे कणकेचे पैसे वाचू लागले. त्या पैशांचा विनियोग बसच्या वा सायकलच्या भाडय़ासाठी होऊ लागला नि आसपासच्या गावांत त्याआधारे स्वयंसेवक जाऊ लागले. संघकार्य खूप वाढले.
अनंतरावांची मातृभाषा मराठी, पण गुजरातीत त्यांनी अतिशय सुंदर पद्यरचना केली. आज सहस्रो स्वयंसेवकांच्या जिभेवर त्यांची पद्ये आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की ही पद्ये अनंतरावांनी लिहिलेली आहेत. ते स्वत: उत्कृष्ट गायक होते नि संगीत शिक्षकही होते.
अनंतराव स्वत:साठी कठोर होते. नाथाभाईंनी त्यांना शाल पाठवली होती, पण ती शंभर रुपयांची आहे हे कळताच त्यांनी ती परत केली, पण मगनभाई नामक कार्यकर्ते आणीबाणीत पकडले गेले तर भावनगरच्या कारागृहात स्वत: अनंतराव मगनभाईंसाठी शाल आणि स्वेटर घेऊन आले. का? तर त्यांचे थंडीत हाल होता कामा नयेत.
शिक्षणाची आवड असणाऱ्या अनंतरावांनी अनेक संस्था चालू केल्या. धोळका (अहमदाबाद, कर्णावती) येथील सरस्वती विद्यालय, दुर्गम वनवासी (आदिवासी) क्षेत्रातील पालचे (सुरत), सरस्वती विद्यालय सिद्धपूर (पाटण), कडी (मेहसाणा), विसा (साबरकांठा) येथील विद्यालये. अनंतरावांची कमाल अशी की त्यांनी पाया घातला पण ते विश्वस्त वा सल्लागार कोणीच नव्हते. पद, पैसा, प्रतिष्ठा आदींपासून दूरदूर!
(‘ज्योतिपुंज’ या नरेंद्र मोदी लिखित अमेय प्रकाशन, पुणे, या पुस्तकातील संकलन)