मी : हो, पण तुला कसं कळलं?
चोर : मला नाही तर कोणाला कळणार.
मी : म्हणजे?
चोर : मीच चोरले ना तुझे सहा हजार रुपये.
मी : आणि तूच शहाजोगपणे विचारतोयस की तळमळत होतो का मी रात्रभर म्हणून. शरम नाही वाटली माझे कष्टाचे पैसे चोरताना?
चोर : एक मिनिट, म्हणजे मला कष्टाशिवाय मिळाले पैसे, असं तुला म्हणायचं का?
मी : तू काय केलेस बाबा कष्ट?
चोर : तुला जमेल का माझ्यासारखे खिसे उडवायला. खिशातून, म्हणजे दुसऱ्याच्या बरं का, पैसे उडवणं सोपं नसतं. त्यालाही कौशल्य लागतं. शिवाय मी जेव्हा तुझ्या खिशातून पैसे काढत होतो तेव्हाच माझा हात पकडायचा होतास ना. तुला कुठं ते जमलं.
मी : एक तर बसमध्ये चढताना प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी होती. सगळे प्रवासी बसमध्ये एकाच वेळेला चढण्याच्या बेतात असताना झालेल्या लकटालकटीत, खरं तर धक्काबुक्कीत माझा चष्माही खाली पडला आणि तोही बसच्या बाहेर. माझ्या या क्षणिक गाफील राहण्याचा पुरेपूर फायदा घेण्यात कसले कष्ट आणि कौशल्य.
चोर : परत तेच. तुझा चष्मा मीच खाली पाडला. पण एवढय़ा प्रचंड गर्दीत त्याचा चक्काचूरही होऊ शकला असता. तसं नाही ना झालं. उलट तुला तुझा चष्मा परत तर केलाच पण शक्य असूनही तुझ्या शर्टाच्या खिशातील जाडजूड पाकीट नाही मी उडवलं.
मी : फार उपकार झाले नाही तुझे? थोर कष्टकरी का चोर कष्टकरी म्हणायचं तुला!
चोर : कष्टकरी चोर हे जास्त बरोबर होईल. मुद्दा आहे कष्टाचा. कधी कधी गिऱ्हाईक शोधताना तासन्तास उभं राहावं लागतं.
मी : म्हणजे तुझ्या ताटकळत उभं राहण्याला तू कष्टाचा सदरा चढवू इच्छितोस.
चोर : नुसतं ताटकळत उभं राहणं पुरेसं असतं तर काय हवं होतं! सावजाची मानसिकता लक्षात घेणे, त्याने चोरकप्प्यात ठेवलेल्या रकमेचा किंवा मौल्यवान वस्तूच्या किमतीचा अंदाज बांधणं आणि सावजाच्या बेसावध असण्याचा क्षण हेरणं किंवा वेळ प्रसंगी तो निर्माण करणं हे सारं कष्टाचं तर असतंच पण..
मी : आता हे पण काय?
चोर : कधी कधी जरा जरी गाफील राहिलो तर पुढे काय वाढून ठेवलंय या कल्पनेनंसुद्धा माझा थरकाप होतो. लाथाबुक्क्यांचा प्रसाद म्हणजे काय ते तुला नाही कळणार.
मी : पण चोरी करणं हा प्रामाणिक व्यवसाय आहे अशा थाटातच तू बोलतोयस.
चोर : अगदी तसं नसेल कदाचित..
मी : मग कसं असेल बरं?
चोर : प्रामाणिकपणे चोरी करणारे आम्ही भुरटे चोर आणि दिवसाढवळय़ा तुमच्या खऱ्या आणि कष्टाच्या कमाईतून लाखो रुपये लंपास करणारे संघटित आणि कायदेशीर चोर या दोघांच्यात आम्ही भुरटे चोर काकणभर जास्त प्रामाणिक आणि थोडेसे कमी धोकादायक.
मी : ही कसली अप्रस्तुत तुलना?
चोर : अप्रस्तुत का बरं? तू मला सांग तुझी वेगवेगळय़ा बँकांतून किती बचत खाती आहेत.
मी : असतील चार-पाच.
चोर : त्यातील बुडालेल्या बँका किती?
मी : असेल एखाद दुसरी.
चोर : एखाद दुसरी नाही. चक्क दोन बँका बुडाल्यात. नावं सांगू? आज तीन वर्षे व्हायला आली तुझे साठ-सत्तर हजार रुपये या बँकांतून अडकलेत, हो की नाही?
मी : अरे पण त्याला चोरी असं म्हणता येईल का?
चोर : हो नक्की म्हणता येईल. तुमच्यासारख्या अनेक ठेवीदारांच्या चांगुलपणाचा म्हणजेच गाफीलपणाचा फायदा घेऊन तुमच्याच ठेवीतून कोटय़वधी रुपये आपल्याच माणसांना कर्जाऊ देऊन मग बँका बुडीत खात्यात टाकून मूठभर लबाड लोक तुम्हालाच नाही तर साऱ्या देशाला लुबाडतात आणि ही लबाड माणसं आमच्यासारख्या प्रामाणिक भुरटय़ा चोरांपेक्षाही जास्त धोकादायक असतात. तुझ्या बँका बंद झाल्या आणि तुझे लाखो रुपये अडकले तेव्हा तळमळला होतास का रात्रभर?
मी : तुझं ते ‘प्रामाणिक चोर’ हे हास्यास्पद पालूपद संपतच नाहीये.
चोर : कसं संपणार? आम्ही पकडले गेलो तर आमची बेमुदत पिटाई तर होतेच पण तुरुंगाची हवाही खायला लागते. तसं या बँकवाल्यांचं झाल्याचं क्वचितच ऐकायला मिळतं. तुमच्या संमतीनं, तुमच्या देखत तुमचा गळा केसांनी कापणाऱ्या या लबाड धनदांडग्या बँकर्सपेक्षा आम्ही एक कण जास्तच प्रामाणिक आहोत. नाही का?
मी : वा. चोर तर चोर वर साव असल्याचा डांगोरा पिटतोयस का?
चोर : नाही रे बाबा, तुझे डोळे उघडावेत आणि तुझ्या हे लक्षात यावं की आमचा व्यवसाय हा तसा कमीत कमी अप्रामाणिकपणाचा आहे. कायदेशीर कामधंदा अथवा सुयोग्य नोकऱ्या उपलब्ध नसल्याने अपरिहार्य परिस्थितीत जन्माला आलेला व्यवसाय आहे आमचा. तुला आणखी एक विचारू
मी : हो विचार ना.
चोर : मला सांग किती कंपन्यांचे समभाग.. म्हणजे शेअर्स बरं का..
मी : भाषांतर करण्याची गरज नाही, मला येतंय सगळं, पुढे बोल.
चोर : तर मग सांग, किती कंपन्यांचे समभाग तू आतापर्यंत खरेदी केलेस? आणि किती कंपन्यांनी तुझ्या तोंडाला पानं पुसली सांगशील.
मी : त्याचा चोरी करण्याच्या प्रयत्नांशी काय संबंध?
चोर : खूप जवळचा संबंध आहे. सरकारी यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेऊन आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने छोटय़ा-मोठय़ा कंपन्या सुरू करायच्या, मध्यवर्ती बँकेच्या संमतीनं बाजारात समभाग विक्रीला काढायचे, आर्थिक विकासाच्या आणि रोजगारनिर्मितीच्या गोंडस नावाखाली भागभांडवल उभं करायचं आणि कोटय़वधी रुपये गोळा करायचे आणि मग एके दिवशी पोबारा करायचा. किती कंपन्यांनी अशा प्रकारे तुझे पैसे लुबाडले, म्हणजे चोरलेच, ते सांग पाहू.
मी : असतील तीनेक कंपन्या.
चोर : का, शरम वाटते का आपला गाढवपणा कबूल करायची. माझ्या हिशेबाप्रमाणे सात-आठ कंपन्यांतून तुझे एकूण एक-दोन लाखांवर पैसे कायमचे अडकले असावेत. डिव्हिडंड वगैरे तर सोडाच, पण गुंतवणूक केलेले पैसेही गेल्यातच जमा असणार. याला चोरी नाही तर काय म्हणायचं? तुझे अशा प्रकारे लाखो रुपये बुडाल्येत हे कळल्यावर झाली होती का तळमळ तुझी आजच्यासारखी?
मी : अरे, पण आम्ही गुंतवणूक समजून-उमजून करतो. बरीच माहितीपण गोळा करतो. शिवाय प्रत्येक कंपनीच्या उलाढालीचा छापील लेखाजोखा आम्हाला दर वर्षी पाठविला जातो.
चोर : ते सारं ठीक आहे, पण तुझ्या पैशाचं काय, ते केव्हा आणि कसे पदरात पडणार तुझ्या?
मी : थांबायचं, दुसरं आमच्या हातात काय?
चोर : म्हणजे राजरोस तुमच्या संमतीने तुमचे पैसे लुबाडायचे आणि वर साधूसंत असल्याचा आव आणायचा. हा चोरीचाच एक प्रकार आहे. असं तुला वाटत नाही का?
मी : तू फार कोडय़ात टाकतोयस मला. बऱ्यापैकी शहाणासुरता दिसतोयस.
चोर : अर्थशास्त्रात बी.ए. केलंय, पण कायमस्वरूपी नोकरी नाही म्हणून ही बिनभांडवली स्वयंरोजगारी सुरू केली.
मी : आणि म्हणून तुझ्या व्यवसायाचं उदात्तीकरण करत मला जाणूनबुजून गोंधळात टाकतोयस का?
चोर : गोंधळात नाही, उजेडात आणतोय तुला आणि खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतोय. प्रत्येक माणसात थोडय़ा फार प्रमाणात एक छोटा-मोठा चोर लपलेला असतो. पैसा, प्रेम, प्रसिद्धी, सत्ता हे सगळं मिळवायचे राजमार्ग संपले किंवा माहीत नसेल की किंवा खूप काही थोडक्यात साध्य करावं याच्या अट्टहासापायी आपण आपल्यातल्या चोराला पाचारण करतो आणि कामाला लावतो.
मी : बरोबर आहे तुझं कारण प्रेमात मीदेखील कळत-नकळत थोडंफार खोटं बोललो आहे आणि सत्तेच्या हव्यासापोटी माझ्या राजकीय मित्रांनी बरेच वेळा खोटेपणा, लबाडी केल्याचं स्मरतंय मला; पण या सर्व गोष्टींना चोरी असं म्हणता येईल का?
चोर : हो, तेच तर सांगतोय तुला प्रत्येक वाममार्ग आणि लबाडी हा चोरीचाच एक प्रकार आहे. फरक इतकाच आहे की तू किंवा मी अपरिहार्य परिस्थितीतच आपल्यातील चोराला थोडं मोकळं सोडतो. पण तुझ्या-माझ्यापेक्षा जास्त निर्ढावलेल्या आणि सराईत चोरांना जेव्हा समाज आणि सरकारी यंत्रणा पाठीशी घालते आणि वर त्यांना प्रसिद्धीच्या झोतात ठेवते तेव्हा तुला आणि मलाही वारंवार आपल्या मनाविरुद्ध वाममार्गाला जायला उद्युक्त केलं जातं.
मी : थोडं थोडं लक्षात येतंय माझ्या.
चोर : माझा आक्षेप आहे संघटित आणि प्रतिष्ठित चोरांना मोकळं सोडण्यावर. ‘नो मॅन इज परफेक्ट’ हे जरी खरं असलं तरी ‘ऑल मेन आर इक्वल अन्टू द लॉ’ हे तत्त्व काटेकोरपणे अमलात आणलं तरी निर्ढावलेल्या संघटित आणि प्रतिष्ठित धनदांडग्या चोरांची संख्या खूप कमी होईल. तसं झालं की आम्हा भुरटय़ा चोरांनाही कायदेशीर आणि कायमस्वरूपाचा रोजगार किंवा धंदा उपलब्ध होईल आणि आपोआप आम्ही पडद्याआड जाऊ. मग..
मी : मग अच्छे दिन आएंगे असंच ना..
चोर : नक्कीच, आता तू जागा होण्याच्या बेतात आहेस. तेव्हा मला पळ काढायला हवा.
संघटित, प्रतिष्ठित चोर विरुद्ध मी भुरटा
चोर : रात्रभर तळमळत होतास ना? मी : हो, पण तुला कसं कळलं? चोर : मला नाही तर कोणाला कळणार....
आणखी वाचा
First published on: 19-12-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vachak lekhak