आलोक माझ्या शाळेमधला विद्यार्थी नाही. कारण त्याचं इंग्रजी माध्यम, पण येऊन जाऊन असायचा. आमच्याच सोसायटीत राहायला. पुस्तकं वाचण्याचा त्याला प्रचंड नाद. त्यामुळे तो आमच्याकडे खेचला गेला. तसा सशक्त होता. कारण शेवटी जिमवाला. पण नंतर हळूहळू तो मला अस्वस्थ, अशांत वाटू लागला. चर्चा करताना आलोक मोडक, चिडचिडू लागला. ‘बायकांची जातच वाईट’ असं पटकन बोलून गेला. मला ते खटकलं. सगळय़ा विषयांवर मोकळेपणाने तरीही सभ्य भाषेत चर्चा करायची ही माझी पद्धत. मी मोडकला थोडं शब्दांनी खरवडायचं ठरवलं. ‘‘तू हल्ली जरा अपसेट असतोस. काही प्रॉब्लेम नाही ना?’’ असा विषय काढला. ‘‘प्रॉब्लेम आहे! कसं सांगू ते कळत नाहीये. पण तुम्हालाच सांगावं असं वाटतंय.’’ मोडकच्या हाताला थोडा कंप जाणवला. चहाच्या कपात तो उतरलाच. ‘‘स्पष्टपणे बोल..’’ मी विश्वास दिला. ‘‘गोष्ट आपल्यातच राहील..’’ ‘‘काका, ती भिसेबाई आऊ नसताना, मी एकटा असताना येते. गुदगुल्या करते. चिमटा काढलान. नॉनव्हेज जोक्स मारते. स्पष्ट सांगतो, ती मला पटवायला बघतेय. तिला असे भुकेले पोरगे आधी मिळालेही असतील, पण मला इंटरेस्ट नाही. ती बाई असली, तरी वयाने मोठी आहे. आगाऊ आणि उनाड आहे. तिने लग्न केलं नाही. हा काय माझा दोष आहे का? मला माझ्याबरोबरच्या माझ्या वयाच्या मैत्रिणी आहेत. पण या बयेचा चावटपणा वाढतच चाललाय. काका, मला भीती वाटते की, ती माझ्यावर जबरदस्ती करेल आणि मीच काहीतरी केलं असा कांगावाही करू शकत.े’’ आलोकच्या अशांत असण्याचं कारण समजलं.
मी म्हटलं, ‘‘तुला अशा उनाडक्या नको आहेत ना? नक्की?’’ ‘‘प्रश्नच नाही. भिसेने लग्न केलं असतं तर तिला माझ्याएवढा पोरगा असता.’’ ‘‘अलोक, तू तिला स्पष्ट सांग, मला माझ्या आईला हे सगळं सांगावं लागेल. तुझी ‘आऊ’ किती कडक भडकू आहे ते सगळय़ांना माहीत आहे.’’ आलोकने माझ्याकडून कानमंत्र घेतला.
भिसे दुपारच्या वेळी त्याच्या घरात शिरली, तेव्हा त्याने चाबूक मारावेत तसे शब्द लगावले. ‘‘मला वापरायला बघतेस तू? मी माधवकाकांना तुझी ‘नाटकं’ सांगितली आहेत. आऊलाही सगळं सांगणार आहे. पुन्हा इथं यायचं नाही. आणखी एक, मी व्यायाम करत असताना एकटक बघत बसायचं नाही समोरून.’’ ‘‘अरे, तुझा गैरसमज होतोय.’’ भिसे आपलं मोहजाल आवरत खोटं हसली. ‘‘मी सांगतोय तेवढे कर. माझ्या नादी लागायचं नाही. तमाशा पुरुषही करू शकतो. इज्जत पुरुषालाही असते. लालबुंद निखाऱ्यासारखा तापलेला गोरापान, देखणा आलोक स्वत:चं ‘रक्षण’ करायला स्वत:च समर्थ झाला आणि नागिणीने पडतं घेतलं. फणा टाकला. इथं आपला निभाव नाही हे ओळखलं. आलोकच्या आईपर्यंत आम्ही प्रकरण नेलं नाही. कारण ते तिथेच थांबलं. त्यानंतर भिसेबाई माझ्याशीही बोलत नसे. मला ‘सगळं’ कळलंय याचा एक खजील भाव मात्र त्या फाजील बाईच्या चेहऱ्यावर दिसायचा. आलोक माझ्याशी मोकळेपणाने बोलला नसता तर कदाचित ‘शोषणा’ची सुरुवात झाली असती. ‘सांगू तरी कसं’ हा प्रश्न अशा वेळी पडतो. त्यासाठी चांगला फॅमिली फ्रेंड लागतो.
(सर्व नावे काल्पनिक)