हे दोन शब्दांचे निमंत्रण वाचायला गोड वाटते. हे ऐकून सामान्य व्यक्ती काही कल्पना करतात. एक पती आपल्या पत्नीस म्हणतो, ‘‘प्रिये, तुझ्याशिवाय आयुष्य व्यर्थ आहे, नांदायला ये.’’ एक प्रेमळ सासू सुनेला म्हणते, ‘‘अगं बाळ, घर तुझेच आहे, नांदायला ये.’’ ज्या मुलींच्या संदर्भात हे निमंत्रण आहे, त्यांना त्यातील भयानकता कळली आहे. त्या निमंत्रणाने त्या होरपळून जात आहेत. माझ्यासारखे जे त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही ‘नांदायला ये’ या निमंत्रणाचे गांभीर्य जाणवले आहे.

घरकाम करणाऱ्या महिला, हमाली काम करणारे कष्टकरी, शेतमजूर हे आपल्या मुलीचे लग्न वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षीच करतात. या विवाहाची नोंदणी नसते. मुलीचे शिक्षणही अपुरेच राहते. अनेकदा नवऱ्या मुलाचे शिक्षणही अपुरेच असते. त्याला उद्योग नसतो. उद्योग मिळाला तरी चिकाटीने करण्याची तयारी नसते. मुलीला लग्नानंतर काही दिवसांतच ते खटकू लागते. तिने त्या बाबतीत नाराजी दाखविली की, नवरा माहेरचा उद्धार करणे, मारहाण करणे या गोष्टी करून आपल्या नवरेपणाचा हक्क बजावतो. एखादे वर्ष, कधी कधी दोन वर्षेही या मुली नवऱ्याचा मार खात, छळ सोसत सासरी राहतात. त्यानंतर जिवावरच बेतल्यावर नवऱ्याने दिलेल्या मुलाची देणगी घेऊन माहेरी येतात. त्या ठिकाणीही ती मुलगी सुखाने राहू शकत नाही. सासरचे धमकीचे फोन सारखे येऊ लागतात. पोलिसांची मदतही वेळेला मिळत नाही, मुलींचे असेही अनुभव आहेत. या मुली पोटगीसाठी कोर्टात दावा करतात. कोर्टात मुलाची बाजू सांगते, ‘आम्ही नांदवायला तयार आहोत.’ म्हणजे पोटगी देण्याचे कारणच राहत नाही. नांदायला जाण्यातले धोके त्या मुलीला माहीत असतात. तिने ते अनुभविलेले असतात. ‘नांदायला ये’ हे निमंत्रण पोटगी मागणाऱ्या मुलींच्या आयुष्याचे वाळवंट बनविणारे आहे. अनेक मुलींनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बळ कमी पडल्याने हे दावे अर्धेच सोडून दिलेले आहेत.

Story img Loader