‘‘आरं, आरं, ए गंपुनाना, कुटं चाललास गचकं खात-’’
‘‘अगं काकी, गचकं कसलं घेऊन बसलीस, रस्त्यानं असंच चालतात माणसं.’’
‘‘रस्ता असतो व्हय, मला ठावं न्हाय रं, रस्ता म्हंजी रं काय?’’
‘‘चल बस इथं कोपऱ्यावर. कोपऱ्यातल्या दगडावर बसून बोलू घटकाभर. बाकडं मिळतील तेव्हा बघू. आता आपला दगडच. सांग रस्ता असतो म्हंजी काय रं?’’
‘‘पुरातन काळी रस्ताच नव्हता तेव्हा माणसं कशी चालत इकडून तिकडे जात होती सांग बरं’’
‘‘अग्गो बया, माज्या ध्येनातच न्हाई आलं रं.’’
‘‘सांगतो ऐक, आम्ही शाळेत माँटेसरीत जात होतो ना तेव्हा टीचरनं एक गाणं शिकवलं होतं- ट्विंकल ट्विंकल ट्रॅफिक लाइट, स्टॅण्डिग ऑन द कॉर्नर राइट, रेड मीन्स स्टॉप अॅण्ड ग्रीन मीन्स गो. म्हणजे काकी, ते उजवा कोपरा दिसतोय ना, तो ट्रॅफिक सिग्नलचा बरे. दुसरा डाव्या बाजूचा कोपरा दिसतोय ना तिथं एक कुडमुडय़ा ज्योतिषी, पोपट आणि कसलेसे कागद घेऊन बसलाय, पोटाला मिळवताय काही बाही करून. त्याच्या शेजारी बसलाय तुझ्या चपलीचा तुटका अंगठा शिवणारा मोची. रस्त्यावर कोपऱ्यात बसून चार पैसे मिळवतात गं.’’
‘‘व्हय रं व्हय. खरं हाय तुजं.’’
‘‘आणि रस्ते नसेल तर घरातल्या गृहिणी, आपापली घरे झाडून कचरा कुठे फेकतील बरे? सगळय़ा लेकुरवाळय़ा आपल्या बाळांना शी शी, शु शु करायला इथेच रस्त्यावर आणतील ना गं, याच रस्त्यावरून जातांना गप्पा मारत मारत केळी खाऊन साली रस्त्यावर फेकणारी मंडळी समाजव्यवस्था सुरळीत ठेवतात.’’
‘‘अग्गो बया, मंग फुडं?’’
रस्ते नसतील तर रास्ता रोको, मोर्चे, ‘ये रस्त्यावर तुला दावतो माझा इंगा, वगैरे कुठे चालणार ग?’
वाढदिवसांचे, निवडणुकीचे बॅनर्स, फलक, कुठे-कुठे लावून रस्त्याची शोभा कोण वाढवणार? रस्ते नसतील तर गरीब बिच्चारे दारुडे कुठे उताणे पडणार?
रस्ते आहेत म्हणून स्कूटर्स, ट्रॉलीज यांच्या टकरी होत असतात. हा रोडशो आपण कुठे पहाणार? वाहनचालकांचा भों, भों भोंगा आणि पोलिसांचा शिटय़ांचा ऑर्केस्ट्रा, कसा ऐकणार? टपोरीगिरी करणारी, मुलींची टिंगल-टवाळी करणारी पोरे कुठे टाइमपास करणार? रस्ते आहेत म्हणून रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करून आगरकरांसारखे समाज सुधारक जन्माला आले गं काके, म्हणून रस्त्यावर दिवेही हवेत. ऐकती आहेस ना गं काके?’’
‘‘व्हय, एकत्येय रे तुझ्या नवलकथा.’’
हे रस्ते आहेत म्हणून परवा कोण कोण रोड शो करून जिंकून आले. त्यांचे बॅनर्स, कटआऊट्स खांद्यावर घेऊन कोण बसले होते, रस्तेच ना. या रस्त्यामुळे नळांचे पाइप्स टेलिफोन, वीज यांच्या केबल्स वगैरे मान्यवर मंडळी आपली ‘तोंडे लपवून कुठे वास्तव्य करणार?’
‘‘सार्वजनिक बांधकाम खाते- पी.डब्ल्यू.डी. गं, यांचे गुप्त धन हस्तगत करायला आणि कंत्राटदारांचे खिसे गरम करण्याला खोदकाम करावेच लागते. म्हणूनच दरवर्षी यांचे खिसे गरम होतात अन् बँक बॅलन्सला सूज येते आणि शेवटी मला सांग काकी, रस्ते नसतील तर बिच्च्याऱ्या खड्डय़ांनी तरी कुठे पडायचं गं?’’
‘‘आरं आरं, बोलता, बोलता पडलास ना रे खड्डय़ांत. लचकला पाय, मोडला गुडघा? चल, आमच्या घरासमोर लई मोट्टं इस्पितळ हाये, लई बेश दाग्दर हायती. माजी वळख हायततं. करतील तुला ते बरं-’’
चला, रस्ते रस्त्यातील खड्डे, यांच्या नावानं चांगभलं! खड्डेरायाचा यळकोट, यळकोट, जय खड्डेराया-
खड्डेरायाच्या नावानं, उदो उदो..
शकुंतला नानिवडेकर