परवा बुटिकमध्ये गेले होते. बुटिकवालीची मैत्रीण आपल्या साताठ वर्षांच्या मुलीला फॅशनचा ड्रेस-अनारकली शिवायला टाकायला आली होती. त्यांचा संवाद ऐकला.. 

बुटिकवाली – ‘‘फ्रॉक शिवायचा का गं! छान आहे कापड..’’
मैत्रीण – ‘‘फ्रॉक नाही गं तिला लेटेस्ट फॅशनचा अनारकली. तो ड्रेस शिवायचा हो ना गं मिनू..’’
मैत्रिणीने मिनूला विचारले, ‘‘काय गं मिनू तुला चालेल ना!’’ माझ्या भुवया उंचावल्या. एवढीशी ती मुलगी आणि आई तिला विचारते.
बुटिकवाली- ‘‘अगं कापड कमी आहे. एवढय़ा कपडय़ात हा ड्रेस होणार नाही. आपण छान फ्रॉक शिवू या नाहीतर वर वेल्वेटचे कापड वापरावे लागेल.’’
मैत्रीण – ‘‘चालेल का गं मिनू तुला वेल्वेटचे कापड लावलेले!’’
एवढीशी ती मिनू पण ती नखरेलपणे हो-नाही करत होती.
मला आईचीही कमाल वाटली आणि मुलीचीही. नको त्या गोष्टी आपण मुलांच्या एवढय़ा ऐकायच्या? एवढे स्वातंत्र्य द्यायचे?
काकू- ‘‘अरे इथे बॉल खेळू नका. दुपारची विश्रांती घ्यायची आहे. दोन ते चार खेळू नका?’’
मुलगा- ‘‘घरचे म्हणतात खाली जाऊन खेळ आणि तुम्ही म्हणता दोन ते चार खेळू नका. नंतर माझा क्लास आहे ना. मी खेळणार..’’
काकू- ‘‘आजकालच्या मुलांवर संस्कारच नाही बघ.. खेळू नको म्हटलं की मुद्दाम खेळत राहतात. चिडविण्यासाठी. आई- वडिलांना सांगता येत नाही. पण मुले काय वाटेल ते करू दे. त्यांना समज कोण देणार? संस्कार कोण करणार.’’
खरं तर इथे मुलांचेही बरोबर होते. त्यांनी बंदिस्त फ्लॅट, पाìकग एरिया सोडून खेळायचे नाही तर कुठे खेळायचे, त्यांचे अंगणच हरविले आहे. पण या सर्व प्रकारांत एकप्रकारचा त्यांच्या वृत्तीत जो उद्दाम किंवा मुद्दाम करण्याचा अभिनिवेश असतो तो कितपत सयुक्तिक आहे? काकूंचं तरी काय चुकलं? विश्रांतीची वेळ सोडूनच मुलांनी खेळावं असं पालकांनी सांगायला नको का?
आई – अगं अजून टी.व्ही.च बघत बसली आहेस? काय असतं गं त्या कार्टूनमध्ये? बंद कर टी.व्ही आणि मुकाटय़ाने अभ्यासाला बस.
मुलगी- तू नाही का कोणत्या कोणत्या सीरियल का रे दुरावा, जावई विकत घेणे आहे, जुळुनी येती रेशीमगाठी, होणार सून.. बघते.. आई- ‘‘मला शहाणपणा शिकवू नकोस. चल मुकाटय़ाने अभ्यासाला.’’
मुलांची अनुकरण करण्याची वृत्ती खूप असते. आधी केले मग सांगितले हा रामबाण उपाय इथे वापरावा लागतो. मग वाटतं प्रसारमाध्यम, टी.व्ही., मोबाइल, कॉम्प्युटर आपल्याला याचं अतिक्रमण थोपविता येईल का?
‘‘आबा तुम्ही थांबा मी तुम्हाला ड्रम वाजवून दाखवितो. दिसतंय का आबा स्काइपवर?’’ तीन वर्षांचा चिमुरडा ड्रम वाजवायला लागतो. त्याच्या मानाने मोठा ड्रम पण अगदी मोठय़ा ड्रमरसारखा तालावर ड्रम वाजवितो. मध्येच झांजेवर त्याच्या काठी आपटते. छोटीशी लडीवाळ मूर्ती दूर देशात केस उडवीत मनापासून ड्रम वाजविते. आजी-आजोबा स्काइपवर मन लावून पाहतात आणि ऐकतात. मध्येच खटय़ाळपणे हसणाऱ्या नातवाकडे पाहात आजीच्या मनात येते याची ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. खूप ऊर्जा आहे याच्यात. संस्कारित मन विचार करते अरे संस्कार संस्कार.
अशी अनेक उदाहरणं आपल्या भोवताली असतात. आजची मुलं चॅलेजिंग आहेत. प्रत्येक गोष्ट निकषावर घासून बघणार. पटलं तरच स्वीकार अन्यथा स्वत:ची स्पेस जपण्याच्या नादात खूप बऱ्या-वाईट गोष्टी घडत असतात. सगळीकडून धडाधड आक्रमणं होतात. चांगलं काय, वाईट काय याच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. भराभर धावण्याच्या नादात, पैसे मिळविण्याच्या नादात काही गोष्टी आपण करीतच नाही. त्यांना वेळच देत नाही! भांबावलेल्या लहानपणाला आणि भरकटलेल्या तारुण्याला वळण लावायाचं असेल तर पारंपरिक गोष्टींचं जतन करून आधुनिक विचारांशी मैत्री केली पाहिजे. जुनं ते सोनं आणि नवीन ते पण आपलं अशी सांगड घातली पाहिजे.
दाराचं कुलूप काढत होते. शेजारच्या घरातून आदितीचा आवाज येत होता. डोकावून पाहिलं. देवासमोर हात जोडून बसलेल्या मिनूला पाहिलं. देवासमोर मंद समई तेवत होती. उदबत्तीचा गंध वातावरणात मिसळून गेला होता. मिनूचे स्वर कानावर येत होते.
मना वासना दुष्ट कामा नये रे॥
मना सर्वथा पाप बुद्धि नको रे॥
मना धर्मता नीती सोडू नको रे॥
मना अंतरी सार विचार रहो॥
मी खुदकन हसले, अगं.. संस्कार संस्कार नको करू इतका विचार.. लहानग्यांचे सुंदर विश्व होईल त्यातूनच साकार…
मीनल श्रीखंडे, पुणे</strong>

Story img Loader