पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आकाशवाणीवरील ‘मनकी बात’चे मासिक प्रसारण ऐकून मला आकाशवाणीशी जुळलेले माझे नाते आठवले. 

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मशताब्दी ९ मे १९६६ साजरी करण्यात आली. त्या दिवशी माझे पहिलेवहिले नभोवाणीवरील प्रसारण होते. आकाशवाणी, त्रिवेंद्रम (आता तिरुवनंतपुरम्) वरून हे इंग्रजी भाषण होते. त्यानंतर हिंदी व संस्कृत प्रभाषणे देण्याची संधी मला मिळाली.
आर्य समाजाची शताब्दी, अमीर खुसरो, संस्कृत शतक काव्य इत्यादी अनेक विषयांवर मला आपले मनोगत मांडता आले. हे करताना ध्वनिमुद्रण झाल्याबरोबर चेक मिळायचा. ना. गोखले यांच्याविषयी भाषणासाठी मला त्यावेळी फक्त २५ रुपयांचा चेक मिळाला होता. पण साठीच्या दशकात ती रक्कमही कमी नव्हती. त्या पैशातून केरळ विद्यापीठाच्या नवीन संकुलासाठी दहा रुपयांचे कूपन मी घेतले व उच्च शिक्षणासाठी हातभार लावू शकलो.
सध्या टीव्हीचा जमाना आहे. पण मला अजूनही रेडिओचे आकर्षण वाटते. कारण रेडिओचे कार्यक्रम ऐकताना आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त संचार करता येतो. पण रेडिओ जरी टीव्हीसारखा लोकप्रिय मनोरंजन प्रकार राहिला नसला तरी आपल्या खंडप्राय देशात कानाकोपऱ्यांत व अनेक भाषा-बोलीतून प्रसारित होणारे रेडिओसारखे अन्य साधन नाही.
सैनिक स्कूल, त्रिवेंद्रम येथे १९६२ मध्ये संस्कृत शिक्षक असताना मला तेथील रेडिओद्वारे केरळच्या प्रबुद्ध जनतेबरोबर संवाद करता आला. दहा मिनिटांच्या या कार्यक्रमासाठी आठ मिनिटे पुरेल एवढे हस्तलिखित किंवा टंकलिखित भाषण अगोदर आकाशवाणीकडे पाठवावे लागे. ते मान्य झाल्यावर ध्वनिमुद्रणासाठी आकाशवाणी केंद्रात जावे लागे. भक्तिविलास नामक एका भव्य प्रासादात त्रिवेंद्रम आकाशवाणी केंद्र होते. या इमारतीत पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाच्या दिवाणाची राहण्याची व्यवस्था होती. सुप्रसिद्ध प्रशासक सर सी.पी. रामस्वामी अय्यर यांचे ते शासकीय निवासस्थान होते, पण ते संस्थान व सर.सी.पी. ही आता गतकालीन खजिना झाले आहेत. तर मुख्य मुद्दा हा आहे की, आतासुद्धा रेडिओचा प्रभावी वापर करता येतो हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे.
गोविंद ध. टेकाळे

Story img Loader