गरीब माणूस आपोआप गबाळा बनतो का? माझे तसेच झाले असावे. बरेच दिवस मी स्वत:ला उंट समजत होतो. जगात माझे कुणीच नव्हते. माझे मीच ओझे वाहून नेत होतो. काचेचे तुकडे असावेत, तसे स्वप्नांचेही ठिकऱ्या झालेले भाग आपल्याबरोबर असतात. पहाटे कोमट जाग येते, तेव्हा त्यातल्या एखादाच तुकडा टोचत राहतो.

कॉलेज बुडवून मी एकुटवाणा जुहू बीचवर वाळूत उभा असायचो. तेव्हा निवृत्त व्हायला आलेला उंट माणसांना वाहून नेताना दिसायचा. मी ठरवले की, माणसांचे असे ‘ओझे’ आपण अजिबात वाहून न्यायचे नाही. म्हणून मी संसार मांडला नाही. माझा मिच हिरवळ शोधत गेलो. मला खरोखरच पाणी फार कमी लागते. एक मुक्त मैत्रीण मला म्हणायची, ‘गवण्या तू किती कमी पाणी पितोस! काहीतरी होईल तुला..’
व्यवस्थेसमोर मी फारच बापुडा होऊन नोकरी करत गेलो. इतरांची कामे माझ्यावर लादली तरी मला करावी लागत. कॉलेज शिक्षक झाल्यावर तर नेमणुकीला ‘मान्यता’ मिळेपर्यंत दरवर्षी दिवाळी यायची. पहिल्या टर्ममध्ये आम्ही बिनपगारीच असायचो. पगार नसलेला आवाज वर्गात कितीसा घुमणार? फक्त पर्मनंट लोकांचे आवाज जोरात ऐकू यायचे. कारण दरमहा वेतन मिळायचे. मी ‘मान्यताप्राप्त टेंपररी’ होतो. डुगडुगत संथपणे मी करिअर केले.
वाळवंट तुडवताना लक्षात आले की, पृथ्वी नावच्या या ग्रहावर नैतिक नियंत्रण ठेवणारी शक्तीच अस्तित्वात नाही. उत्क्रांतीला नैतिक उद्देशच नाही. सगळी टोटल केऑस आहे. पदोपदी विसंगती व विकृती नखे काढून उभ्या आहेत. माणसे एकमेकांना ओरबाडत सुटली आहेत. या जंगलराज्यात माझ्यासारख्या माणसाळलेल्या उंटांना स्थानच नाही. कुणीही मला फाडून टाकू शकते. अस्तित्व किती मामुली, निर्थक असते!
मी विचार करत राहायचो की, काय आहे हा एकूण जगण्याचा तमाशा? जत्रा तर फार मोठी भरलीय. विकायला काढलेली असंख्य खेळणी हळू-हळू बोलू लागली आहेत. बैल आहेत. मीडियामिठ्ठू आहेत. ते स्वत:वरच प्रसन्न आहेत आणि आपण सर्वज्ञ आहोत असा त्यांनी खोटा आव आणलाय. भाव खाणाऱ्या बाहुल्या तर कितीतरी! एक माझ्यासारखा दिसणारा बेढब उंटही आहे. त्याला कुणीच जवळ करत नाही. तरी बरे, मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही काळ सखी मिळाली. तसेच व्हर्जिन मरून जाणे बरोबर नाही. एक डॉबरमन कुत्रा ‘तसाच’ राहिला आणि नंतर त्याला एकाकीपणातून एकाएकी वेड लागले. वेडाचा लैंगिकतेशी बऱ्याचदा जवळचा संबंध असतो. एकच उंटीण कायम सांभाळत राहणे उंट म्हणून मला बोअर करणारेच झाले असते. उलट नंतर विरहाच्या चांदण्यात कसे छान अंग भाजून निघते आणि तरी पश्चात्ताप होत नाही. आईला मात्र काळजी वाटायची की, हा आपला कॅमलबाळ एकटा कसा काय आयुष्य काढणार? पण कुणी ना कुणी वाटसरूला सावली द्यायला उभेच असते. दाबके नावाच्या एक प्राथमिक शिक्षिकासुद्धा मलाच त्यांचे लेकरू मानून माया, छाया देत राहिल्या होत्या, पण हे सगळे आधीच ‘वरून’ ठरलेले असते, त्याप्रमाणे घडत जाते असे मी कधीच मानले नाही. उंट असूनही हळूहळू माझ्या अंगावर वैचारिक समृद्धीची ‘झल’ दिसू लागली. माझा वेग वाढला. शब्द हेच माझ्या पावलांचे ठसे!
माधव गवाणकर, दापोली

Story img Loader