एक तरुण इंटरव्हय़ू रूममध्ये बसला होता. समोर तीन प्रोफेशनल्स चष्मा आणि टाय लावून बसले होते. एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरने तरुणाकडे पाहून विचारले, ‘टेल मी, जिथे खूप पाऊस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होते?’
तरुणाने उत्तर दिले – ‘छत्र्या!’
दुसऱ्या टायवाल्या लठ्ठ सीईओने विचारले- ‘या वर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?’
तरुणाने उत्तर दिले – ‘मला.. कारण माझे नुकतेच लग्न झाले असून बायकोचे नाव आहे पद्मश्री!!’
तिसरा रीजनल मॅनेजर वैतागून म्हणाला- ‘काही डोके आहे का तुला?’
तरुणाने शांतपणे उत्तर दिले, ‘हो, खूप डोके आहे. शाळेत भरती झाल्यापासून या इंटरव्हय़ूपर्यंत सगळे जण तेच खात आहेत.’
एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरने विचारले, ‘तुझ्या बायोडाटामध्ये एमएबीएफटी अशी डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?’
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिले, ‘मॅट्रिक अॅपीअर्ड बट फेल्ड थ्राइस.’
त्यावर सीईओने चिडून फाइल आपटली आणि ओरडला- ‘फार मोठा गाढव आहेस तू !!’
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनते आहे. परीक्षेत शंभर टक्के पाहिजेत, कराटे क्लासमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर डान्स क्लास अटेण्ड करायचा. भगवद्गीता स्पर्धेत जायचे आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण फर्स्ट प्राइझ मिळालेच पाहिजे!! मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला.. संगीत विशारद बनायला. अल्बर्ट आइनस्टाइन बनवून देणाऱ्या मल्टिनॅशनल शाळा आल्या, पण अल्बर्ट हा आइनस्टाइन बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो अॅक्टिंग स्कूल्स उभ्या राहिल्या, पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही अॅक्टिंग स्कूलमध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षांला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठीसुद्धा लागले नाहीत.
आता शाळा सुरू केल्या आहेत गुंतवणूकदारांनी ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचे आणि पालक-शिक्षकांचे अपेक्षांचे ओझे वाहणारी मुले म्हणजे चालतीबोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की, ‘व्हॉट इज स्क्वेअर ऑफ ट्वेल्व्ह’ असे विचारून त्यांचे बालपण चिरडून टाकतात. मोदींनी मुलांना एक प्रश्न विचारला होता- ‘तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?’ तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले एसीमध्ये जन्म घेतात, एसीमध्ये वाढतात, चिप्स खातात, सॉफ्ट ड्रिंक पितात आणि मोबाइलवर गेम खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा यांच्याशी संबंध येत नाही. पडणे-लागणे, खेळात हरणे माहीतच नाही. स्कूल बस आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्षे सहा पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हाता-पायांच्या एक तर काडय़ा होतात नाही तर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरू झाले. या घटकांची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची हार्मोनल आणि जैविक वाढ रोखतात.
ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच डायबिटिसचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे यांत घातक घटक नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंडय़ाचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकारक्षमता संपते. मग व्हिटॅमिन्स, मिनरल्स देणारी उत्पादने विकत आणून ती खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारे रक्त तयार होते. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत: काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटीन्स माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात, तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन!! खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि टीम वर्क कळत नाही. मित्र फक्त व्हॉट्सअप, फेसबुकवर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दु:खाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडले की, लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात.
ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो. या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वागीण नाही हे शिक्षणतज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरू झाला.
मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या शाळाप्रवेशाची तयारी सुरू होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरू होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर (ए =टू square) म्हणायचे बाकी राहिले आहे.
अशी मुले सर्व फॉम्र्युला पटापट म्हणून दाखवतील, पण स्वत:चा फॉम्र्युला कधीही शोधू शकणार नाहीत. गिटार शिकतील, पण स्वत:ची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, मेरी कोम यांचे अनुकरण अचूक करतील, पण स्वत:ची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवले जाते.
जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गसंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकले जाते तेच ज्ञान मुलांना मिळतेय, त्यात ते पारंगत होत आहेत.
काही जणांना कॅम्पसमध्ये दर महिना चार लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय.. पण त्यात देशाचे नाही, भांडवलदारांचे हित साधले जातेय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल, पण ना स्वत: जगण्याचा आनंद लुटू शकतील, ना दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील..
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत एसी लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर देतात. वृक्ष-वेली स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात?.. असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची- वेलींची जोपासना करायला लावतात. ‘निप्पोन टेक्नॉलॉजी’ने केलेल्या तपासणीत म्हटले आहे की, शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाले आहे आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नाते जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत पॅ्रक्टिकल चालते आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांचे प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्समध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा सायकलप्रेमी देश चार वर्षांच्या मुलांना सायकल चालवण्याचे शिक्षण देतो. त्यानंतर थियरी कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार याचा विचार नेदरलँड्ससारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यांवर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारही दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते. शिक्षण काय असते? रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पाहा. टागोरांची ‘शांतीनिकेतन’ शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोके खुपसून बसले होते. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवढय़ात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय.. गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- ‘या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?’
टागोर म्हणाले, ‘चिंता वाटते, पण नाचणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांची नाही, तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठय़ा माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरे तर मलाही झाडावर चढावे असे वाटते. पक्ष्यांशी बोलावसे वाटते. भरपूर खेळावेसे वाटते; पण माझे शरीर आता साथ देत नाही.’
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात!
मग एक रेस सुरू होते आणि जगायचे राहून जाते!!
प्रशांत निकम