पहाटेचे चार-साडेचार वाजलेले. पक्ष्यांची किलबिल सुरू झालेली. मऊशार गुलाबी थंडी पडली होती. त्यामुळे असं वाटत होतं की नुसतं अंथरुणातच पडून राहावं. पण असं करून कसं चालेल. आळस झटकून कादंबरी लगेचच उठली. एक दीर्घ श्वास घेऊन ती कामाला लागली. खिडकी उघडली तर अंगाला बोचणारा गार गार वारा लगेचच आत शिरला. त्या वाऱ्याने तिचे सारे अंग शहारून गेले. समोर तिने पहिले तर संपूर्ण शहर धुक्याच्या दुलईत विसावले होते. दूर कुठे तरी रस्त्यावर एखादी गाडी जात होती आणि लाइट्स होते. बाकी कोणी चिटपाखरूदेखील रस्त्यावर नव्हते.
कादंबरीची लगबग सुरू झाली होती. सर्व काही झाल्यावर देवाला नमस्कार करून ती निघाली. आज तिच्या आयुष्यातील एक वेगळाच दिवस होता. कादंबरीने साधासा पंजाबी ड्रेस परिधान केलेला होता. लांबसडक केसांची वेणी आणि त्यावर छानसा अबोलीच्या फुलांचा नाजूकसा गजरा. कादंबरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तजेला व उत्साह आज होता.
कादंबरी तिच्या नेहमीच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जात होती. हे मित्रमैत्रिणी म्हणजे ट्रेनमध्ये काही ना काही वस्तू विकणारी लहान लहान मुले. त्यांच्याशी ती रोज येता-जाता गप्पा मारते. त्यांना ती आपलीशी वाटते. रूपा, चंपा, शिवा, नंदू, सदा सारे जण तिला भेटायला आले होते.
‘काय रे आज काय स्पेशल?’ कादंबरीने शिवाला विचारले.
त्यावर शिवा म्हणाला, ‘नाही गं काही नाही आपलं रोजचंच.’
कादंबरीने सर्वाना खायला आणलेली फळे दिली व त्यांच्याबरोबर बसून सर्व खाऊन गप्पाटप्पा करून ती निघाली.
आता कादंबरी समुद्रकिनारी जायला निघाली. आज तिला तिचा प्रियकर भेटायला येणार होता. जो याआधी फक्त एकदाच तिच्या बहिणीच्या लग्नात भेटलेला आणि ती त्याला भेटलेली. पत्र आणि त्याशिवाय काही माध्यम नसलेलं असं हे कादंबरी आणि अनुराग याचं प्रेमप्रकरण. आज या प्रेमप्रकरणाची नव्याने सुरुवात होणार होती. कादंबरी पत्रातील प्रत्येक वाक्य शब्द आठवत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघाली. अनुरागचा सुंदर, गोरापान चेहरा, त्याचे घारे डोळे व इवलंसं नाक. सारखं सारखं तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. तोच तिला अवतीभवती असल्याचा भास होत होता. कादंबरी समुद्रकिनारी पोहोचली. तिने अनुरागला नारळाच्या झाडाखाली जिथे बाजूलाच खूप दगडांची शिल्पे तयार केली होती, तिथे थांबायला सांगितलेले. ती येऊन पोहोचली परंतु अनुराग काही अजून आला नव्हता. कादंबरी अनुरागची वाट पाहत होती. आज प्रत्येक सेकंद तिला तासासारखा भासू लागला. उन्हे चढू लागली तरी अजून अनुरागचा पत्ता नाही. सूर्य कलू लागला. अजून अनुराग आला नव्हता. थोडय़ाच वेळात चंद्रदेखील उगवू लागला. त्या दिवशी शरदातील पौर्णिमा होती. लख्ख चांदणं पडलं होत. अजूनही कादंबरी आपल्या प्रियकराची वाट पाहत होती. जसजसा चंद्र आकाशात येऊ लागला तशी कादंबरीला कोणी तरी एक व्यक्ती तिच्या दिशेने येताना दिसू लागली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. जीव घाबराघुबरा झाला आणि ती व्यक्ती कादंबरीच्या पुढय़ात येऊन उभी राहिली. गार वारा सुटलेला. सुंदर चांदणं आणि कादंबरीने त्या व्यक्तीला बघून घट्ट मिठी मारली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुरागच होता तो.
या कोजागरीच्या चांदण्यात तिचा चंद्र आला होता. तिच्या आयुष्यात तिला आयुष्यभर साथ देण्यासाठी. जणू तोच चंद्रमा नभात…
दुर्वा दळवी