01-vachak-lekhakअगदी परवा गाणे लागले होते रेडिओवर ‘मैफील में जल उठी शमा परवाने के लिये,’ आणि अनंत मैफीलींचे झंकार मनाला सुखावून गेले. मैफील गाण्याची असते म्हणतात. पण ती गप्पांचीदेखील असते. त्या मॅजेस्टिकसारख्या या फॅन्टास्टिक रंगतात असे म्हणतात. गेल्या काही वर्षांत गाण्याचेसुद्धा विभाजन झाले आहे. शास्त्रोक्त गाणे, ठुमरी व दादरा, सिनेमाची गाणी, पुराने फिल्मो के गीत, जुनी व नवी मराठी गाणी. तसेच साहित्यिक गप्पांचेही आहे. काही संस्थांनी आयोजिलेला काही मोठमोठय़ा शहरी केलेल्या गप्पा. काही खरोखरच्या मोठय़ा व्यक्ती गैरहजर असताना त्यांच्या नावाने ठोकलेली बोंब. ही होळीत जमा नाही झाली तरी काहींना मानसिक समाधान देऊन जाते. याचाच उपविभाग म्हणजे तो मोठा मनुष्य तिथे असला-नसला तरी त्याचे आयोजक मतप्रदर्शनाची जत्रा भरवतात, विशेषत: स्वत:च्याच. कारण त्या मोठय़ांचे मोठेपण तर गौरवायचे असतेच त्याबरोबर स्वत:चेही. प्रत्यक्षात त्या मोठय़ा लोकांना या असल्या कुबडय़ांची गरज नसते. त्यांना मैफील हवी असते. इतरांना ते मैफिलीत हवे असतात. पण हे काही आयोजक स्वत:ला प्रतिसूर्य समजतात. त्यामुळे त्या कलाकाराची जन्मकुंडली जणू यांनीच लिहिली असते. परिणामत: मैफिलीत कोणी यायचे, काय बोलायचे हे तेच ठरविणार! तसे काही आयोजक खरोखर चांगले असतात. त्यांचा तो संयत स्वर, शुद्ध भाषा, कमी शब्दांत जास्त आशय सांगायची पद्धत आणि निरपेक्ष वागणूक. हे देखील कलाकारच असतात. त्यांचाही सत्कार व्हायलाच हवा. पण प्रमुख अतिथी माझ्या कब्जात राहायला हवेत. मैफिलीनंतर वर सांगितल्याप्रमाणे पाहुण्यांची वासलात हाच लावणार! पण एखादेवेळेस या आयोजकावरच बाजी उलटू शकते. यावरून मला तीस वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा आठवला. एका आयोजकाने एका लहान गावात एका प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग बसवण्याचे ठरवले. त्यात दोन स्त्रियांची गरज होती. एक साधारण मुलगी मिळाली. त्यामुळे त्याने स्वत:च्या पत्नीला त्यात काम करण्यास परवानगी दिली. प्रयोगास आठ दिवस राहिले असता ती आजारी पडली. दुसऱ्या स्त्रीपात्रासाठी शोध सुरू झाला. कोणी तरी आयोजकाची मदत केली. त्याला सुंदर, हुशार व अभिनयाची जाण असलेली मुलगी त्या पात्रासाठी आणून दिली. आता त्याच्या पोटात गोळा उठला. त्या पात्रांची अदलाबदल करावी असे जाहीर केले. ते न झाल्यास हा प्रयोग रद्द होईल, अशी धमकीही दिली. परत हलकल्लोळ. या वेळेस एका लहानशा मुलीने मदत केली. ती चौदा-पंधरा वर्षांची मुलगी म्हणाली ही, काकू नाही म्हणते तर न येऊ दे. माझ्या प्रायमरी शाळेच्या हेडमास्तरीणबाई आहेत. त्यांनाच मी घेऊन येते. त्या कामही छान करतात आणि त्यांचे प्रॉम्प्टिंग मी करेन. विनासायास ते काम जमले. चार दिवसांत ते नाटक सादर झाले. आम जनतेला आवडले. त्या आयोजकाचे त्याबाबत बोलायचे शब्द, वाक्य सारेच विसरले. तर असे असतात काही आयोजक आणि त्यांच्याशिवाय रंगलेल्या मैफिली!

मैफील साधारणत: उर्दू शायरीचीच असते असा माझा समज होता. त्यापूर्वी म्हणजे एकतीस वर्षांपूर्वी माझ्या एका मुस्लीम मित्राच्या लग्नानंतर घरी मुशायरा ठेवला होता. ज्याच्यासमोर शमादानमध्ये तेवत ठेवलेली मेणबत्ती येईल त्याला काही ना काही सादर करावे लागे. त्या वेळी हेच गाणे माझ्या मदतीस आले. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून परत एक गाणे म्हणावे लागले ते होते ‘शामे गम की कसम.’ सांगायची गोष्ट म्हणजे त्या वेळी मैफिलीत वा मुशायऱ्यात काही म्हटले तरी चालायचे आणि श्रोते सहनही करायचे.

शास्त्रोक्त ज्ञानाच्या अज्ञानापोटी मला गप्पांच्या मैफिली जास्त आवडतात. बाबा आमटेंच्या आनंदवनात हे सुख अमाप अनुभवले. माझ्या मोठय़ा भावाचे मित्र, राम शेवाळकर यांच्या गप्पा कुठेही रंगत, जेवताना तर जास्तच. त्या व महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून वध्र्याला उतरवून

पु. ल. देशपांडे व सुनीताबाई यांना आमच्या गावावरून वरोऱ्याला विलासबरोबर जाताना त्या दोन तासांत रंगलेल्या गप्पा या दोन्ही माझा एक बहुमोल ठेवा आहे. याशिवाय आमच्या घरी दोन दिवस मुक्कामाला असताना सुरेश भटांनी गप्पा करीतच मध्यरात्री नव्या कविताही म्हटल्या होत्या. या साऱ्या आठवणींत कोणी आयोजक टांग अडवायला नसल्याने चिरस्मरणीय झाल्यात. लताबाई म्हणून तर गेल्या,

महफील मे जल उठी शमा परवाने के लिये।

प्रीत बनी है दुनिया मे मर जाने के लिये॥

तरी त्या परवान्यासारखे हम नहीं मरेंगे आणि शमा म्हणजे ती ज्योत आमच्या हृदयात टिकावी म्हणून प्रयत्नच करीत राहू.

Story img Loader