सकाळी ११ वाजता दोन ठिकाणची पूर्वनियोजित भेट पूर्ण होण्यासाठी पायी चालत जाणे योग्य होणार होते. त्यामुळे थोडाफार शारीरिक व्यायामही होणार होता. विद्यार्थिदशेत असा वेळ व प्रवासामधील वेळ, चिंतन करण्यात सदुपयोगी घालवण्याची सवय होतीच; पण अशा वेळी मी चारधाम यात्रेमधील ‘केदारनाथ’ यात्रा ध्यानात घेतो. जवळजवळ १४ कि.मी. अंतर डोंगरकपारीतून हळूहळू चालत सुमारे ११ हजार फूट उंचीवर जावयाचे असते. या थंड वातावरणामुळे दमावयास होत नाही. त्याची आठवण ठेवून मी हे दोन कि.मी. अंतर सुमारे अध्र्या तासात पार करून माझी त्या परिसरातील कामे केली.
आर्थिक परिस्थितीमुळे रेल्वे स्टेशनपासून दूर राहणारे लोकसुद्धा अनियमितपणे धावणाऱ्या बसची वाट न पाहाता ३० ते ४५ मिनिटे पायी चालत रेल्वे स्टेशनला येतात. त्यामुळे शारीरिक व्यायामही होतो, पैशाची बचत होते. वेळेवर कार्य करता येते.
पण अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी काही कंपन्या आपणास कार्य करण्यास प्रवृत्तकरतात. त्यांचे खरेच आभार मानले पाहिजे. माझ्या एका मित्राने त्याच्या परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलीला कधीही संपर्क करण्यासाठी एका प्रसिद्ध मोबाइल सेवा देण्याच्या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय सेवेसाठी डिपॉझिट म्हणून रुपये तीन हजार त्यांच्या कचेरीत जाऊन भरले, परंतु महिन्याचे बिल काही हिडन चार्जेस लावून, अपेक्षेच्या किती तरी म्हणजे तीनपट येऊ लागले म्हणून ती खास सेवा खंडित करून घेतली, परंतु डिपॉझिट मात्र परत करण्याचे सोयीस्करपणे टाळले. असा दोन वर्षे कालावधी गेल्यानंतर जेव्हा मित्र त्यांच्या खनपटीलाच बसला तेव्हा सांगितले की, पैसे डिपॉझिट केल्याची रीसिट दाखवा, खरे म्हणजे डिपॉझिटची रक्कम त्यांच्या महिन्याच्या बिलामध्ये दर्शविली जात होती. शेवटी त्यांच्या अपिलेट अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर ३-४ महिन्यांत ते डिपॉझिट नॉर्मल व्याजासह परत मिळाले; पण त्यासाठी ती सेवा बंद करून पोस्टपेडवरून प्रीपेड करून घ्यावी लागली. अशा छोटय़ा-छोटय़ा अनेक व्यवहारांमध्ये आपण अडून जातो.
घराच्या खरेदीच्या व्यवहारामध्ये तर फारच सावध राहावे लागते. सर्वसाधारणपणे, तयार होणारे घराची किंमत, तयार असणाऱ्या घराच्या किमतीपेक्षा कमी असते, परंतु घर कधी तयार होणार हे सांगणे कठीण असते. बिल्डरच्या आर्थिक अडचणी, तांत्रिक अडचणी, मालाची कमतरता, मजुरांचा प्रश्न इत्यादीमुळे घर तयार होण्यास वेळ लागतो. बिल्डर एखाद्या वित्तपुरवठा करणाऱ्या वित्तसंस्थेकडून भांडवल उभे करू शकतो, परंतु त्यामुळे व्याजांचे मीटर सुरू होऊन आर्थिक गणित चुकते व त्याचा परिणाम संबंधित सर्वानाच सहन करावा लागतो. माधवरावांनी नोकरीमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर आलेल्या पैशामधून घर बुक केले, ते सर्वसाधारणपणे १८ महिन्यांनी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु २४ महिने झाले तरी घर तयार होईना. भाडय़ाचे घर तर खाली करावे लागणार होते. नवीन भाडय़ाच्या घरासाठीचे डिपॉझिटही जास्त होते, शिवाय महिन्याचे भाडेही जास्त होते. सध्याचे घर सोडल्याशिवाय डिपॉझिट परत मिळणार नव्हते. दुर्दैवाने त्यांचे मुलगेही आर्थिकदृष्टय़ा स्थिर नव्हते. माधवराव अशा तऱ्हेने आर्थिक कात्रीत सापडले होते. बिल्डरकडे सखोल चौकशी केल्यानंतर समजले की, घर बुक केलेल्या अध्र्याहून अधिक कुटुंबांनी त्यांची देय रक्कम भरलेली नव्हती, त्यामुळे ज्या कुटुंबांनी त्यांची देय रक्कम भरली होती ते चांगलेच आर्थिक अडचणीत आले होते. शेवटी मोठय़ा अनेक संकटांवर मात करीत त्या बिल्डरकडून भरलेली रक्कम परत मिळाली व त्या पैशामधून उपनगरामध्येच जुन्या इमारतीमधील तयार घरात राहावयास गेले.
नारायणरावांची गोष्ट तर वेगळीच झाली. रिटायर झाल्यामुळे कंपनीचे घर सोडावे लागले. स्वत:चे घर खरेदी करू शकले नाहीत. हळूहळू स्वत:जवळचे ८० टक्के पैसे संपले, मुलांना नवीन जगात उभे राहण्यातच वेळही नव्हता आणि आर्थिक स्थिरताही नव्हती. शेवटी आज जवळजवळ १५ वर्षे रिटायर होऊन झालीत, स्वत:च्या घराचे स्वप्न, स्वप्नच राहिले. भाडय़ाच्या घराच्या भाडय़ावरच पेन्शनची अर्धी रक्कम खर्च होते, राहिलेल्या पैशामध्ये दोघांचा दैनंदिन खर्च सांभाळत आनंदात असल्याचे नाटक करीत दिवस ढकलावे लागत आहेत. त्यांची मुले वेळीच स्थिर न झाल्यामुळे आता नोकरीनिमित्त दूर राहतात. त्याचे त्यांनाच होत नाही, तर आईवडिलांना कोठून मदत करणार. विद्यार्थिदशेत मुले पॉकेटमनीसाठी आई-वडिलांवर अवलंबून असत, आता काही ठिकाणी महिन्याच्या पॉकेटमनीसाठी आईवडील मुलांवर अवलंबून असतात. जीवनात काही पथ्ये पाळावी लागतात. ही पथ्ये आर्थिक विकासामध्ये मोडणाऱ्या कुटुंबांसाठीच नव्हे, तर बहुतांशी सर्वासाठी लागू पडतात. रिटायर होण्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे वयाच्या ४५-५० वर्षांपासून स्वत:च्या हक्काच्या घरासाठी प्रयत्न करा, म्हणजे रिटायर झाल्यावर जागेच्या अडचणीमुळे आर्थिक संकटात सापडणार नाहीत. कंपनीचे, सरकारचे घर रिटायर होण्याच्या अगोदर ३ ते ५ वर्षे तरी सोडून स्वत:च्या घरी राहण्याची योजना आखावी. नोकरीला/ आर्थिक स्थैर्याला लागल्यापासूनच कुटुंबाचे आर्थिक नियोजन केलेले असावे.
डॉ. रवींद्रनाथ पडवळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा