दहावी-बारावी आणि त्यानंतरच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाले. ज्या कुटुंबातील मुलं-मुली या परीक्षांना बसलेली असतील ती कुटुंबं निश्चितपणे एका अनामिक आणि अनावश्यक दडपणाखाली वावरत होती. थोडीशी उत्सुकता, थोडीशी हुरहुर, थोडीशी धाकधूक समजू शकते, परंतु आपल्या पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या की निराशा पदरी येणारच. आपल्या सगळ्या अपेक्षा, अतृप्त इच्छा आपण आपल्या पुढच्या पिढीकडून पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करीत असतो. यात गैर काही नाही, परंतु आमची स्वप्नं साकार करण्याइतपत आमची पाल्यं सक्षम आहेत का? ती सक्षम व्हावीत, त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यावेत, ती आत्मनिर्भर व्हावीत म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेत का? मूल लवकर चालायला शिकावं म्हणून आपण त्याला पांगुळगाडा देतो, परंतु योग्य वेळी तो काढून घ्यायचा असतो, हेच आम्ही विसरून जातो. आपल्या पाल्यानं कपडे कुठले घालावेत, प्रवेश कुठे आणि कुठल्या शाखेत घ्यावा, हेही आम्ही पालकच ठरवतो. आपल्या पाल्यांवर आणि कशावरच आपला शंभर टक्के विश्वास नसतो. बाकीचं राहू द्या, आमचा आमच्यावर तरी तो असतो का? सतत संभ्रमित अवस्था! एखादी गोष्ट मी, माझा पाल्य करू शकेन का? मला, माझ्या पाल्याला जमेल का? अरे, सकारात्मकतेने आपण सगळं जग बदलू शकतो, समाज बदलू शकतो या शाश्वत मूल्यांवर आधी पालकांचा दृढविश्वास हवा आणि तो त्यांच्या वर्तणुकीतून जाणवायला हवा. पाल्यांवर सुसंस्कार करण्यासाठी पालकही सुसंस्कारित असायला हवेत. प्रत्येक कृतीतला आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो. आम्हाला जे-जे करायचे आहे ते-ते आमच्या डोक्यात पक्कं असलं पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची शारीरिक, मानसिक तयारी असली पाहिजे. अशा प्रयत्नातून मिळालेला आनंद हा अवर्णनीय असतो. आपल्यातला आत्मविश्वास जेव्हा त्यांना जाणवेल, आपल्या डोळ्यांतला सात्त्विक आनंद त्यांनाही दिसेल, तेव्हा आपला पाल्य कुबडय़ा टाकून देऊन जीवनातल्या प्रत्येक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरा जाईल आणि उत्तम गुणांनी उत्तीर्णही होईल. दहावी-बारावी ही तर सुरुवात आहे; खरी कसोटी तर पुढेच असते.
आजकाल दहावी-बारावी परीक्षांच्या निकालानंतरचे दृश्य सात्त्विक आनंद देण्यात कुठे तरी कमी पडत आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचे श्रेय लाटण्यासाठी शाळा आणि खासगी शिकवणी वर्ग यांच्यात चढाओढ लागलेली असते. ज्यांचा निकाल अधिक त्यांचा आर्थिक फायदाही अधिक. सरकारी अनुदानही निकालाशी निगडित. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे पालक तर हवेतच तरंगत असतात. परंतु मिळालेले यश किती निर्भेळ आहे? सारे गुणवत्ताधारक खरोखरच गुणवत्ताधारक असतात का? तसे असेल तर यातले कित्येक गुणवत्ताधारक पुढे नापास का होतात? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार?
बहुतेक पालकांना वाटत असते की आपल्या पाल्याला ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळावेत; त्याने डॉक्टर-इंजिनीअर व्हावे. यात वावगं काही नाही. परंतु आपल्या पाल्याच्या कुवतीचा, त्याच्या आवडीचा, आवडीच्या विषयातील गतीचा विचार नको करायला? ९५ टक्के गुण मिळवणाऱ्यांचे पालकही काही वेळा दु:खात बुडालेले दिसतात. कारण ? कारण शेजाऱ्याच्या पाल्याला ९६ टक्के मिळालेले असतात! ही कसली विकृती? शेजाऱ्याच्या पाल्याला अधिक गुण मिळाल्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा कशी काय कमी होऊ शकते? मुळात ती असते का? इतरांच्या आनंदामुळे आनंदी होता येत नसेल तर नका होऊ, परंतु निदान जळू तरी नका.
नापास झालेल्यांची, कमी गुण मिळालेल्यांची वेगळीच तऱ्हा. आपला पाल्य नापास झाला, त्याला कमी गुण मिळाले, हे स्वीकारायला बरेच पालक तयारच नसतात. भीतीमुळे किंवा अन्य कारणांमुळे पाल्य वस्तुस्थिती पालकांना सांगत नाहीत. त्यातूनच पुढे आत्महत्या घडतात किंवा कुणाला तरी जबाबदार ठरवून फसवे समाधान करून घेतले जाते. प्रश्नपत्रिका कठीण होती, परीक्षा फार कडक घेतली, गणिताची शिकवणी लावली नव्हती इत्यादी, इत्यादी. गणित वगळता इतर सर्व विषयांत नापास झालेला श्रीनिवास रामानुजन पुढे जागतिक कीर्तीचा गणितज्ञ झाला. ग्रामीण भागातून आलेला, मराठी माध्यमातून शिकलेला मी काय शिकतोय हे माझ्या आई-वडिलांना समजत नसे. माझे सारे निर्णय मीच घ्यायचो. मला इंग्रजीत ४७ आणि गणितात ८० गुण मिळाले होते. मी ३३ वर्षे पदव्युत्तर स्तरावर इंग्रजीतून गणिताचे अध्ययन, अध्यापन केले. इंग्रजीत कमी गुण असल्यामुळे माझे कुठेही अडले नाही. माझ्या तिन्ही मुलींचेही कुठे अडले नाही. कारण मातृभाषेतून विचार करण्याची सवय! संगीतकार होण्यासाठी रसायनशास्त्रात, व्यावसायिक होण्यासाठी इतिहासात, खेळाडू होण्यासाठी भूगोलात प्रावीण्य मिळविण्याची गरज नसते. गरज असते ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची, करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळण्याची. आज देशाला उत्तम शिक्षकांची, संशोधकांची, तंत्रज्ञ-शास्त्रज्ञांची, कुशल प्रशासकांची खूप गरज आहे. होतकरू विद्यार्थ्यांनी आणि जागरूक पालकांनी याचा जरूर विचार करावा.
सोमनाथ देविदास देशमाने – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा