लहानपणी सर्वसामान्यपणे सगळीच मोठी माणसं लहान मुलांना असं करू नये, तसं करू नये असं सारखं सांगत असतात. बरीच मुलं ते ऐकतही असतात. कारण आपल्या वडीलधाऱ्यांवर विश्वास असतो. पूर्वीच्या काळी मुलांना वडीलधाऱ्यांचं ऐकायचं हेच माहीत होतं, का म्हणून विचारायचं नाही. (हल्ली तसं नाहीये); म्हणून करू नये असं सांगायची पद्धत आहे, तरी मनात कुठे तरी प्रश्न असतोच ‘पण का?’
जेवताना दिवे गेले तर जेवू नये, दिवा लावेपर्यंत हात तसाच ठेवावा. सांगायचे ना घरात? का बरं?
अंधारात ताटातल्या अन्नात एखादा किडा-मुंगी, पाखरू गेले तर दिसणार नाही. मग ते जेवताना पोटात जाईल, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. म्हणून जेवताना दिवे गेले तर जेवू नये.
संध्याकाळच्या वेळी नट्टापट्टा करू नये. का असेल?
आता खरं तर तो जमाना गेला. तरीही संध्याकाळनंतर सर्वसामान्य सगळे आपापल्या घरी परततात. वेश्या म्हणजे देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया. संध्याकाळनंतर नटणे हे फक्त वेश्याच करायच्या. कारण त्यांना गिऱ्हाईक गाठायचे असते. म्हणून एखाद्या सर्वसामान्य घरातील बाई संध्याकाळी आवरून सावरून बसली तर ते पूर्वीच्या काळी असभ्यपणाचे मानत.
मुलींना सातच्या आत घरात यावे म्हणतात, का?
संध्याकाळी सातनंतर रात्र सुरू होते. अशा वेळी रोड रोमिओ, चोर, लफंगे असे लोक घराबाहेर पडतात. मग त्यांच्यापासून त्रास होऊ नये म्हणून मुलींनी सातच्या आत घरात यावे म्हणतात. दिवसाही हे लोक त्रास देतात, पण निदान आजूबाजूला माणसे तरी असतात. ती मदत करतील अशी शक्यता असते. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ हे फक्त आजारांबाबतच नसतं.
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असो, ग्रहणकाळात जेवू नये. तसेच शिजलेले अन्न ग्रहणानंतरही खाऊ नये, का?
ग्रहणकाळात हवा दूषित झालेली असते. अशा वेळी अन्न प्राशन केल्यास त्या दूषित हवेतील दोष अन्नावाटे आपल्या पोटात जातील, तसेच तयार केलेले अन्न दूषित हवेमुळे बाधित होऊ शकते, तसे होऊ नये म्हणून ग्रहणकाळात जेवू नये. ग्रहण संपल्यानंतर अन्न तयार करून खावे.
कोकणात घरात शेणाचा शिंतोडा घालण्याची पद्धत आहे. म्हणजे खरं तर दररोज घर सारवणेच अपेक्षित असते, पण ते शक्य नसते म्हणून शिंतोडा म्हणजे पाण्यात थोडे शेण घालून ते पाणी घरभर शिंपडायचे. यामागचं कारण असं की, पूर्वी घरं मातीची असत. दररोज खूप केर जमायचा. केर लोटून झाल्यावर पुन्हा धुलिकण उडू नये म्हणून शिंतोडा घालायचा. तर तो गरम पाण्याचा घालू नये, का?
अशी पद्धत आहे की, घरातील एखादा माणूस मृत झाल्यावर त्याचे प्रेत घरातून नेल्यानंतर गरम पाण्याचा शिडकावा करतात. यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे त्या माणसाला काही आजार असतील तर ते जंतू मरून जावेत. म्हणूनच नेहमीचा शिंतोडा घालताना गरम पाण्याचा घालू नये.
दह्यत गूळ घालून खाऊ नये असं म्हणतात, का?
दह्यत नेहमी साखर घालून खातात. श्रीरामाचा पिता दशरथाने दही-गूळ एकत्र करून खाल्ले आणि त्याला पुत्रशोक झाला. म्हणजे स्वत:च्या मुलाला मुकावं लागलं. म्हणून दह्यत गूळ घालून खाऊ नये असं म्हणतात.
मांडी घालून झोपू नये असे म्हणतात, का?
माणूस मेल्यानंतर त्याला दहन करण्यापूर्वी त्याच्या पायांची मांडी घालायची पद्धत आहे. म्हणून जिवंतपणी मांडी घालून झोपू नये असं म्हणतात.
आजी जप करताना कधी पाहिलंय? जप करताना जपमाळेचे मणी ओढताना पहिले बोट म्हणजे तर्जनीने मणी ओढू नये. ते बोट सोडून मधल्या बोटाने मणी आढावे, का?
सर्वसामान्यपणे मेलेल्या माणसाचे क्रियाकर्म करताना पहिले बोट वापरतात. म्हणून ते बोट जप करताना, देवपूजा करताना वापरू नये असे म्हणतात.
बऱ्याच गोष्टी ज्या माणूस मेल्यावर करतात, त्या इतर चांगल्या वेळी करू नये. असे का? तर चांगले काम करताना आपण जर या गोष्टी केल्या, तर आपल्याला त्या वेळची म्हणजे दु:खद आठवण जागी होईल आणि त्या चांगल्या कामात लक्ष लागणार नाही म्हणून असावे.
या सगळय़ा गोष्टी अशा आहेत, ज्या न केल्याने आपले फार काही नुकसान होते असे नाही. मग ऐकलं मोठय़ांचं तर कुठे बिघडतं? आमची आई यावर एकच सांगायची, ‘करू नये ते केलं, की होऊ नये ते होतं!’
मेघना फडके response.lokprabha@expressindia.com
करू नये, पण का?
लहानपणी सर्वसामान्यपणे सगळीच मोठी माणसं लहान मुलांना असं करू नये, तसं करू नये असं सारखं सांगत असतात. बरीच मुलं ते ऐकतही असतात. कारण आपल्या वडीलधाऱ्यांवर विश्वास असतो. पूर्वीच्या...
आणखी वाचा
First published on: 03-07-2015 at 01:17 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vachak lekhak