01-vachak-lekhakहाय! अ‍ॅण्ड हॅलो. एव्हरीबडी. हाय, अ‍ॅण्ड हॅलो! आय अ‍ॅम साधना इगनोरकर हिअर! अहो, वाचता वाचता अशा थांबलात काय? हा मराठीच लेख आहे आणि वाचता ते शुद्ध मराठी आहे म्हटलं. हल्ली की नाही मी सगळय़ा मराठी सीरियल बघते. हो ऽऽ आणि सगळी खादाड संस्कृती बघते. गेलं वर्ष तर झालं या गोष्टीला. पण या मराठी सीरियल बघून, माझं इंग्रजी धडाधड चालायला लागलं बघा. अगदी फाडफाडचा क्लास न लावता, घरच्या घरी माझ्यात केवढी धाडधाड सुधारणा झाली. आता मराठी थोडं जास्त डॅमेज झालं, पण ते जाऊ द्या हो. त्याचं काय एवढं!

मला माहीत आहे, तुम्हाला माझ्या नावाचेही अप्रूप वाटले असेल. म्हणे, ‘साधना इगनोरकर.’ म्हटलं मंडळी या नावा आणि आडनावासाठी तर मी जवळजवळ दोन-तीन वर्षे काया वाचा धने तपश्चर्या केली. आता खरं सांगू का? माझं खरं नाव आहे रमा अनंत विचारे. पण माझं रमा नाव होतं ना तेव्हा मी फक्त अनंत विचारांनी त्रासलेली, ग्रासलेली, दुर्मुखलेली अशी गृहिणी होते. आता संसारात काय कटकटी कमी असतात? सांगणार कोणाला? अमके भाव वाढले, मालामध्ये फसले, कामवाली, भांडीवाली, पोळीवाली, प्रत्येक गोष्टीत काही तरी कटकट. बरं, त्यांना सांगू, तर ते अगदी सहज म्हणणार, ‘जाऊ दे ना रमा, तू कशाला त्रास करून घेतेस!’.. बरं बाहेर समाजात वावरतानाही मला फार गोष्टी खटकायच्या. रिक्षावाला हमखास थुंकोजीराव भेटायचा. म्हणजे रिक्षात बसून डोक्याला तापच जास्त. रस्त्यावर कचरा टाकणारे दिसायचे, प्लॅस्टिक पिशव्या हक्काने भाजीवाल्याकडे मागणारे ग्राहक दिसायचे. डोकं नुसतं या विचारांनी आणि दररोजच्या पेपरातील बातम्यांनी भंडावून जायचं.

शेवटी एक दोन काऊन्सिलर गाठले आणि माझे सगळे सगळे प्रॉब्लेम सांगितले. प्रत्येक जण ही एवढाली फी घेऊन नंतर म्हणतं, ‘अहो, तुम्ही उगाच बाऊ करताय. आता या सगळय़ा बाबी इगनोर करा आणि बघा तुमचं तुम्हालाच किती छान शांत शांत वाटेल. त्यांना तुम्ही सुधारू शकता कां? तर उत्तर काय? नाही. मग आता काय काय करायचं, तर आपण बदलायचं आणि इगनोर करायचं. अगदी घरापासून-जगापर्यंत.’ या मंत्राने मग मात्र मी बदलले आणि एवढय़ा मोठय़ा साधनेनंतर ‘साधना इगनोरकर’ झाले.

पण या नावानंतर खरंच माझ्यात खूप फरक पडला. जास्त बोलून, विचार करून, काही घडत नाही. उलट आपलंच बिघडतं. आता माझ्या या लेखाची चव कदाचित तुम्हाला आवडेल किंवा तिखटही लागेल पण म्हटलं मंडळी, आवडली तर छानच, पण समजा तिखट, आंबट, खारट लागली तर मग मात्र मी ‘साधना इगनोरकर’ होणार.

Story img Loader